scorecardresearch

व्यक्तिवेध: डिक फॉसबरी

उंच उडीमधला ऑलिम्पिक विक्रम डिक फॉसबरी यांच्या नावावर नसूनही त्यांचे नाव या क्रीडाप्रकारात अजरामर झाले, ते त्यांनी शोधलेल्या उंच उडीच्या तंत्रामुळे.

deshkal
डिक फॉसबरी

उंच उडीमधला ऑलिम्पिक विक्रम डिक फॉसबरी यांच्या नावावर नसूनही त्यांचे नाव या क्रीडाप्रकारात अजरामर झाले, ते त्यांनी शोधलेल्या उंच उडीच्या तंत्रामुळे. एका ऑलिम्पिक पदकानंतर फार प्रकाशझोतात नसूनही फॉसबरी यांच्या १२ मार्च रोजी झालेल्या निधनाची वार्ता जगभर पोहोचली, तीही ते या तंत्राचे जनक म्हणून. उडीसाठी झेपावल्यानंतर पूर्ण पाठमोरे होऊन पायांच्या आधी कंबर उचलून अडथळा (बार) पार करायचा आणि फोमवर खांदे-पाठ आधी टेकतील अशा बेताने पडायचे हे ते तंत्र आज सर्वत्र दिसते. या तंत्राला ‘फॉसबरी फ्लॉप’ म्हणूनच ओळखले जाते. डिक फॉसबरी यांनी पाच वर्षे मेहनतपूर्वक आणि विचारपूर्वक या तंत्राचा विकास केला आणि १९६८ च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये २.२२ मीटरची उडी मारून सुवर्णपदक मिळवले. त्या वेळचा ऑलिम्पिक विक्रम २.२४ मीटरचा होता. तो मोडण्याचा प्रयत्नही फॉसबरी यांनी मेक्सिको सिटीत केला, परंतु तेथे ते अपयशी ठरले. त्याच स्पर्धेत बॉब बीमन या अमेरिकी अॅथलीटची त्यावेळी ‘अमानवी’ ठरलेली ८.९० मीटरची लांब उडी अधिक गाजली. त्यामुळे उंच उडी प्रकारातल्या ‘फॉसबरी उडी’ची म्हणावी तितकी चर्चा झाली नव्हती.

इंजिनीअिरगची आवड असलेल्या अवघ्या सोळा वर्षांच्या डिकची १९६३मध्ये शाळेच्या उंच उडी संघात निवड झाली, तेव्हा त्यांची उंची सहा फूट तीन इंचांच्या थोडी पुढे होती. पण तेवढय़ावर न विसंबता त्यांनी तोवर रूढ असलेल्या स्ट्रॅडल, सिझर्स, वेस्टर्न रोल या उंच उडीच्या तंत्रांपेक्षा निराळी पद्धत वापरण्याचे ठरवले. समोर किमान दोन फूट उंचीची फोमची गादी असेल, तर कोणतीही गंभीर इजा होण्याची शक्यता नाही, हे डिक यांचे निरीक्षण नव्या तंत्राच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचे होते. या गादीच्या वापराचा ‘शोध’ १९६० मध्ये लागला असला, तरी तिचा प्रसार झाला नव्हता. मात्र ओरेगॉनमधल्या फॉसबरींच्या शाळेत हा फोम होता! कुशीवर वळल्यासारखे करून आधी एका पायाने बार ओलांडायचा, मग दुसरा पाय पुढे काढायचा असे तंत्र तेव्हा अधिक प्रचलित होते. मात्र ‘आधी एक पाय, मग दुसरा’ असे करण्यात बारच्या अडथळय़ाला पाय लागण्याची शक्यता अधिक, त्यापेक्षा दोन्ही पाय एकाचवेळी बारच्या वर करायचे, असे ठरवून त्यांनी बारला पाठ दाखवली. पाण्यात उलटा सूर मारणाऱ्याने समजा थेट तिरके न जाता आधी हवेत लांबवर जाण्याचा प्रयत्न केला तर जसे दिसेल, तसे हे तंत्र. त्यासाठी कंबर आणि कमरेखालचा भाग उचलावा लागे. हा फोम कमी प्रतीचा, कमी उंचीचा असल्याने १९६५ मध्ये त्यांना सौम्य दुखापतही झाली होती, मात्र याच वर्षी प्रशिक्षकांनी डिकच्या ‘फॉसबरी तंत्रा’च्या चित्रफिती काढून अन्य खेळाडूंनाही याच तंत्रासाठी तयार करण्यास सुरुवात केली. ही उंच उडीतल्या क्रांतीचीही सुरुवात ठरली! ऑलिम्पिकमधील यशानंतर डिक फॉसबरींनी व्यवसाय आणि खेळाडू म्हणून थोडेफार समाजकार्य एवढय़ावरच लक्ष केंद्रित केले. उंच उंडी तंत्रावरील त्यांचा ठसा मात्र अमीट राहिला.

मराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 03:44 IST