ज्या अमेरिकेत १८६५ पर्यंत गुलामगिरी कायदेशीर होती, तिथे त्या हिणकस मानवी पिळवणुकीचा कायदेशीर दर्जा रद्द झाल्यानंतरही शेतमजुरांची प्रभावी संघटना स्थापन होण्यास सुमारे शंभर वर्षे लागली, यात नवल नाही. या बाबतीत गांधीजींचा चंपारण्य सत्याग्रह (१९१७) किंवा डॉ. आंबेडकरांनी अलिबाग परिसरात घडवून आणलेला खोती प्रथाविरोधी संप (१९३३) यासारखे काहीही अमेरिकेत घडूच शकले नाही, इतकी भांडवलशाहीप्रणीत विषमता त्या देशाच्या अंगवळणी पडली होती. अशा स्थितीत नवल हे की, मेक्सिकोतून अमेरिकेत आलेल्या एका महिलेने अमेरिकी शेतमजुरांच्या या लढ्याचे नेतृत्व केले.

पुढे बराक ओबामांनी लोकप्रिय केलेली ‘येस वी कॅन’ ही साधी- पण सामूहिक बळ वाढवणारी घोषणा पहिल्यांदा या महिलेने, शेतमजुरांच्या सभेत स्पॅनिश भाषेत दिली आणि पुढल्या आयुष्यातही लढाऊपणा तिने सोडला नाही. या महिलेचे नाव डोलोरिस उएर्ता (अडानावाो स्पेलिंग ‘एच’ पासून सुरू होते, तरी स्पॅनिश पद्धतीने ते अक्षर अनुच्चारित). वयाच्या ९६ वर्षी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त गुरुवारी आले.

‘युनायटेड फार्मवर्कर्स युनियन’ हे त्यांनी १९६२ सालापासून स्थपन केलेल्या संघटनेचे नाव. आज तिचे कार्य अमेरिकाभर पसरले आहे. पण प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेतून रोजगारासाठी येणारे शेतमजूर अमेरिकेच्या खिजगणतीतही नव्हते, तेव्हाच्या काळात डोलोरिस आणि त्यांचे सहकारी सीझर चावेझ यांनी अमेरिकेतील दक्षिणेकडची सर्व राज्ये पिंजून काढली.

डोलोरिस यादेखील अशाच शेतमजूर कुटुंबात वाढल्या होत्या. त्या लहान असतानाच आईवडील कॅलिफोर्नियात आले, पुढे वडिलांनी आईला टाकले आणि शिक्षणाची आस असलेल्या डोलोरिस यांना अगदी लहान वयात अन्नप्रक्रिया केंद्रात काम करावे लागले.. सीझर चावेझ हे लढाऊ, प्रभावी नेते. पण या चळवळीला मानवी चेहरा डोलोरिस यांनी दिला. मात्र ‘सीझर चावेझ यांनी माझ्यावर लैंगिक बळजबरी केली होती’ असा आरोप त्यांनी फार उशीरा- सक्रिय चळवळीतून निवृतीनंतर केला. व्यवस्थेशी संघर्ष अदाकि महत्त्वाचा असे आपल्यावर बिंबवण्यात आल्याने स्वत:वरील अन्यायाबाबत आपण गप्प राहिलो, हा त्यांचा त्या वेळचा खुलासा होता.

महात्मा गांधी यांच्या चळवळीने आणि विचारांनी आपण प्रभावित झालो, अहिंसेमधली शक्ती गांधीजींनी जगाला दाखवून दिली, असे डोलोरिस नेहमी सांगत. गांधीजींच्या आध्यात्मिकतेचे सार आपल्यापुरते कॅथॉलिक ख्रिस्ती विचारांत शोधण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यांना ‘एलिनॉर रूझवेल्ट मानवी हक्करक्षण पुरस्कार’ (१९९८) आणि २०१२ चे ‘राष्ट्राध्यक्ष सुवर्णपदक’ यांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. असंघटितांना संघटित करण्यासाठी स्वत:ची सुखदु:खे विसरणार्‍या कार्यकर्ती आणि चळवळीतल्या महिलांची पुढली वाट सुकर करण्याचे धैर्य दाखवणार्‍या नेत्या म्हणून त्यांची आठवण नेहमीच राहील.