अलीकडेच झालेल्या जी-७ परिषदेत अनवधानाने सुरू राहिलेल्या माइक्सची चर्चा बरीच रंगली. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनींनी धूम्रपान सोडल्याचे जगाला त्यातूनच कळले आणि ट्रम्प यांनी युरोपीय महासंघाचे अध्यक्ष अँटोनियो डीकोस्टा यांच्यापुढे ग्रीनलँडचा उल्लेख केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विविध देशांचे सर्वोच्च नेते एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात पडद्यामागे काय घडते, ते एकमेकांशी कसे वागतात, याविषयी सर्वांनाच उत्सुकता असते.
बड्यांच्या आयुष्याविषयीचे आकर्षण हा भाग तर त्यात असतोच, पण जगाच्या राजकारणात पुढे काय घडू शकते, तिथली समीकरणे बदलू लागली आहेत का, याचे आडाखे बांधण्याचा प्रयत्नही असतो. अशाच एका पडद्यामागच्या घडामोडीची चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि त्याला कारण ठरले आहे एक पुस्तक. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’चे पत्रकार मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान यांनी लिहिलेल्या ‘रिजीम चेंज: इनसाइड द इम्पीरियल प्रेसिडेन्सी ऑफ डोनाल्ड ट्रम्प’ या पुस्तकात ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांच्यात उडालेल्या खटक्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
गाझा युद्धविरामाबाबत एका दूरध्वनी संभाषणादरम्यान ट्रम्प नेतान्याहूंवर संतापले आणि ‘बीबी (नेतान्याहू) तुमच्यामुळे सारेच त्रासले आहेत,’ असे त्यांनी म्हटल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. नेतान्याहू यांनी संघर्ष लांबवल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. संभाषणात स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनरदेखील सहभागी होते. गाझामधील युद्ध थांबवण्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या त्या प्रदेशाची पुनर्बांधणी सुरू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या २० कलमी शांतता कराराचा आराखडा नेतान्याहू नाकारतील, अशी चिंता तिघांना वाटत होती, त्यामुळे ट्रम्प यांनी नेतान्याहूंना सुनावल्याचे आणि आराखड्याला मान्यता देण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतल्याचे पुस्तकात म्हटले आहे.
हा कथित वाद सप्टेंबर २०२५ मधील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेदरम्यान झाला. त्या वेळी ट्रम्प प्रशासन गाझा युद्धविरामाचे प्रयत्न रेटत होते. युद्धविरामाबाबत चर्चा सुरू असतानाच इस्रायलने दोहामध्ये हमासच्या नेत्यांना लक्ष्य करून हवाई हल्ला केला. परिणामी तणाव वाढला. या हल्ल्यामुळे कुशनर आणि विटकॉफ हे दोघेही संतापले होते; कारण इस्रायली अधिकार्यांनी आपली दिशाभूल केली असे त्यांना वाटले. हल्ल्याच्या अवघ्या एका दिवस आधी, गाझाबाबतच्या युद्धोत्तर नियोजनावर चर्चा करण्यासाठी या दोघांनी मियामीमधील विटकॉफ यांच्या निवासस्थानी नेतान्याहूंचे सल्लागार रॉन डर्मर यांची भेट घेतली होती. या हल्ल्यामुळे कतारचे मध्यस्थीचे प्रयत्नही अडचणीत आले.
कतारने युद्धविराम वाटाघाटींमधून तात्पुरती माघार घेतली, अशी माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. पुस्तकात असाही दावा करण्यात आला आहे की, कुशनर यांनी खासगीत नाराजी व्यक्त करताना इस्रायलींवर तीव्र शब्दांत टीका केली होती आणि या वाटाघाटींपासून आपल्याला दूर ठेवावे, अशी मागणी केली होती. आपल्यात बहुतेक सर्वच मुद्द्यांवर एकमत असल्याचे चित्र ट्रम्प आणि नेतान्याहू विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर निर्माण करत असले, तरीही पुस्तकातील दावे खरे असतील, तर ते त्यांच्यातील दरी वाढल्याचे द्योतक असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
