ट्रम्प यांनी समेटाची भाषा सुरू केल्यावर शुक्रवारपर्यंत बाजार उसळतो. मग शनिवार-रविवारी ट्रम्प यांचं पुन्हा काही तरी आगलाऊ विधान. पुन्हा तणाव… सोमवारी पुन्हा बाजाराची गटांगळी! ज्यू-मुसलमान वैर, शत्रुत्व वगैरे दंतकथा बावळटांसाठी. बाकी ‘वरती’ सगळं ‘लीधो-बेचो’ हेच सत्य…
गेल्या आठवड्यात लातूरमधे मुलाखतीत अतुलच्या (देऊळगावकर) प्रश्नावर युद्ध हेसुद्धा कसं एक व्यवसाय-प्रारूप असतं काहींसाठी असं मी म्हटलं. अनेकांचा विश्वास बसला नाही त्यावर आणि ज्या काहींचा बसला त्यांना वाईट वाटलं. साहजिक आहे तसं होणं. कोणीतरी कोणत्या तरी गम्य-अगम्य उद्दिष्टासाठी कोणाचा तरी जीव घेतंय… ही कल्पनाच तशी अमानुष. आपल्यातल्या आदिमत्वाची जाणीव करून देणारी. पण एकविसाव्या शतकातही ती कायम असते अनेकांच्या ठायी, त्याला काय करणार. बाकीच्या किंवा आतापर्यंतच्या युद्धांच्या इतिहासात हा मुद्दा सिद्ध करण्यासाठी जाणं वेळखाऊ. तेव्हा आपण या युद्धापुरताच विचार करू या.
एक बाब लक्षात आली असेल या युद्धाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असणार्यांना. इराणवर २८ फेब्रुवारीला हल्ला झाला. त्यानंतर अनेक हेलकावे या युद्धानं अनुभवले. खूप मोठा फटका खाल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आता वाटू लागलंय हे युद्ध संपवायला हवं. पण ते वाटणं म्हणजे त्यांच्यातला सत्त्वभाव जागा झालाय आणि त्यांना पाझर फुटलाय असं नाही. या युद्धात अमेरिका शक्तिशाली असूनही इराणपेक्षा जास्त नुकसान सहन करतीये हे त्यांना हा शहाणपणा सुचण्यामागील कारण. दुसरं असं की या परिसरातनं अमेरिकेत एका पैचंही तेल जात नाही. अमेरिका तेलाबाबत पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे. सगळ्या तेल गरजा अमेरिकेच्या देशांतर्गतच भागतायत. म्हणजे जी गोष्ट मिळवायचीच नाहीये त्यासाठी अमेरिका पदराला खार लावून लढत बसलीये. पण आता आपण लढतोच आहोत तर चार पैसे कमावून घेऊ या या युद्धातनं असा विचार ‘डीलमेकर’ डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नसेलच असं नाही. असं वाटायचं कारण?
युद्धाबाबत ट्रम्प यांनी आगलाऊ, भडकाऊ विधानं कधी कधी केली त्यावर सहज जरी नजर टाकली तरी या प्रश्नाचं उत्तर मिळेल.यातली त्यांची बहुतेक विधानं ही शनिवार-रविवार या दोन दिवसांत झालेली आहेत. होर्मुझची खाडी बंद करू, बेचिराख करू, संस्कृती नष्ट करू, इराणला धडा शिकवू वगैरे सगळे इशारे या दोन दिवसांत दिले गेलेत. बाजाराशी अनभिज्ञ असणार्यांना यातली मेख कळणार नाही. शनिवार-रविवार जगभरातले भांडवली बाजार बंद असतात. सोमवारी सकाळी ऑस्ट्रेलिया-जपान-सिंगापूर-मुंबई-लंडन करत करत हे बाजार सुरू होतात. मग काय होतं?
तर ते बाजार धडाधड कोसळतात. निर्देशांक हजार-बाराशेंनी आपटी खातो. देशोदेशींची चलनं घरंगळतात. आठवड्याची सुरुवात अशी होती. बाजार नरम-गरम राहातो. बुधवार-गुरुवारपासनं ट्रम्प यांचा सूर बदलतो. समेटाची भाषा सुरू होते. शुक्रवारी अशा आशावादी वातावरणाने बाजार उसळतो. मग शनिवार-रविवार येतो. ट्रम्प यांचं पुन्हा ये रे माझ्या मागल्या. काही तरी आगलाऊ विधान. पुन्हा तणाव. आणि सोमवारी पुन्हा बाजाराची गटांगळी. किती वेळा झालं असं तपासून पहायला हरकत नाही. सांगायचं म्हणजे हे काही योगायोगानं होत नाहीये. समभाग कसल्या तरी चिंतेनं विकले जातात तेव्हा बाजार कोसळतो. पण विकणारे विकतात कारण त्यावेळी खरेदी करणारं कोणीतरी असतं म्हणून.
खरे खिलाडी असतात ते हे. स्वत:च्या ‘योग्य’ वेळी इतरांना त्यांच्याकडचे समभाग विकायला लावतात ते. हेन्री फोर्ड हे १९१२-१३ साली म्हणाले होते, बँकवाल्यांकडे अतिरिक्त पैसा जमलाय… युद्ध करतील ते. हे बँकर्स ज्युईश होते हा योगायोग आणि फोर्ड यांच्या भाकितानंतर वर्षभरात पहिलं महायुद्ध सुरू झालं हाही योगायोग. आताही आंतरराष्ट्रीय माध्यमांत चर्चा सुरू आहे दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी इस्रायलकडून लेबनॉनवर सतत हल्ले सुरू आहेत; पण या आणि अशा दहशतवादी संघटनांना पडद्यामागून पाठिंबा नेतान्याहूच कसे देतायत वगैरे. (ज्यांना हे जाणून घ्यायचंय त्यांनी ‘बिबी फाइल्स’ डॉक्युमेंटरी अवश्य पहावी. डोळे उघडायला मदत होईल. असो) न्यूयॉर्क टाइम्स किंवा इस्रायल वगैरे देश ‘लोकशाहीची जननी’ वगैरे नाहीत. पण तिथली माध्यमं सत्ताधार्यांना उघडं पाडण्याचं आपलं कर्तव्य अजूनही विसरली नसल्यामुळे त्यांनी नेतान्याहू हे कसे अमेरिकेकडून मिळवलेले कोट्यवधी डॉलर्स कतारच्या मध्यस्थीनं ‘हमास’ला पोसण्यासाठी वळवत होते त्याचे सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध केलेत. ज्यू-मुसलमान वैर, शत्रुत्व वगैरे दंतकथा बावळटांसाठी. बाकी ‘वरती’ सगळं ‘लीधो-बेचो’ हेच सत्य.
आताही जग या युद्धामुळे होरपळतंय. अर्थव्यवस्था कोमेजून गेल्यात. लाखो नागरिक अक्षरश: रस्त्यावर आलेत, हजारो लहान मुलांना शाळा नाही, त्यांच्या पोटाला पोषक सोडा साधं अन्न नाही… आणि जगातल्या महत्त्वाच्या तेल कंपन्यांच्या खजिन्यात नफ्याचा धबधबा कोसळतोय. या बड्या, महत्त्वाच्या तेल कंपन्यांची कमाई सध्या किती होत असावी? काही अंदाज?
तासाला तब्बल तीन कोटी डॉलर्स! (३० मिलियन डॉलर्स, साधारण २८२ कोटी रु.) ही कमाई एकट्या-दुकट्या कंपनीची नाही. तर जगातल्या बड्या १०० कंपन्या या वायुवेगानं इतकी कमाई करतायत. सगळ्या कंपन्यांचा म्हणून विचार केला तर ही रक्कम होईल २८ हजार २०० कोटी रु. प्रतितास इतकी. युद्ध सुरू झालं, तेलाचे दर वाढू लागले आणि तशी या कंपन्यांच्या गल्ल्यातली छनछन वाढली. या शंभर कंपन्यातही परत डावं-उजवं आहे. म्हणजे वर जी रक्कम दिलीये ती सरासरी. पण यातल्या तीन कंपन्या नफा-शिरोमणी. सौदी अरेबियाची अराम्को, रशियाची गाझप्रॉम आणि अमेरिकेचे एक्झॉन मोबील या तीन कंपन्यांचं उत्पन्न आपल्याला कल्पनाही येणार नाही इतक्या भयानक गतीनं वाढतंय. गेल्या एका मार्च महिन्यात या कंपन्यांना झालेला वट्ट नफा २३ बिलियन डॉलर (२३०० कोटी डॉलर…म्हणजे सुमारे दोन लाख १६ हजार कोटी रु.) इतका महाभयंकर आहे. या युद्धात तेल कंपन्यांचं, तेल शुद्धीकरण कारखान्यांचं मोठं नुकसान झालंय. इराणमध्ये, कतारमध्ये आणि इतकंच काय सौदी अरेबियातही अनेक तेल कारखान्यांची पडझड झालीये. याचा अर्थ लगेच या सगळ्यांची दुरुस्ती काही शक्य नाही. ती व्हायला वेळ लागणार. ती होऊन कारखाने पूर्वपदावर यायला- आणि म्हणून बाजारपेठेत तेलपुरवठा पूर्वीसारखा व्हायला- आणखी वेळ लागणार. म्हणजे तेलाचे दर युद्ध थांबल्यानंतरही काही काळ चढेच राहणार. या क्षेत्रातल्या जाणकार व्यक्ती आणि संस्था यांच्या मते हे तेल दर असेच चढे राहिले तर चालू आर्थिक वर्षात या तेल कंपन्या २३४ बिलियन डॉलर्स (२३,४०० कोटी डॉलर्स, साधारण २१ लाख ९९ हजार ६०० कोटी रु.) इतकी कमाई करतील. तुलनाच करायची तर ही रक्कम १३ कोटींच्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाच्या साधारण निम्मी वा निम्म्याला किंचित कमी इतकी अगडबंब आहे.
सौदी, रशिया, कुवेत, चीन आणि अर्थातच अमेरिका अशा सगळ्या देशांच्या कंपन्यांची चांदी आहे हे युद्ध म्हणजे. खोर्यानं पैसा ओढतायत या कंपन्या…! मनात तरी येईल का या कंपन्यांच्या… परिस्थिती सुरळीत व्हावी आणि खनिज तेलाचे दर कमी व्हावेत असं…?
…आणि आपण आपल्या रुपयाची न थांबणारी घसरगुंडी बघत या कंपन्यांच्या कमाईकडे असुयेनं बघत बसू या…! चौकात गाडी थांबली की गाडीतल्यांच्या सुखाकडे बाहेरनं टकटक करणारी मुलं बघतात तसं…
