‘माहिती अडवा, माहिती दडवा!’ हा अग्रलेख (२९ ऑक्टोबर) वाचला. सुरुवातीला समाजमाध्यमांत पेरलेल्या भाकडकथा जोवर आपल्या राजकीय फायद्याच्या होत्या तोवर विद्यमान सरकारला माहितीचा प्रसार व प्रचार हे दोन्ही हवेहवेसे वाटत होते. कालांतराने तेच राज्यकर्त्यांसाठी दुधारी शस्त्र ठरले. तत्कालीन मुख्य माहिती स्रोतांवर मालकी हक्क प्रस्थापित केल्यावरही राज्यकर्त्यांच्या हितास मारक अशा माहितीचे नवनवीन स्रोत निर्माण झाले व फोफावले. त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सरकारदरबारी सुरू झाले. आणि माहितीच्या अधिकारावर टप्प्याटप्प्याने गदा आली.
‘फॅक्ट चेक युनिट’ स्थापनेचा प्रयत्नदेखील याचाच एक भाग होता. पण लोकशाहीच्या सुदैवाने उच्च न्यायालयाने ते असांविधानिक ठरवून रद्द केले. आता माहितीचे वादळ निवडणूक आयोग, मित्र उद्योगपती आणि सर्वोच्च न्यायालयावरही घोंगावू लागले आहे. केंद्र सरकारचा डीपीडीपी कायदा हा या माहितीच्या वादळाला आळा घालण्याचा प्रयत्न आहे. माहिती बंद, टीका बंद! डीपीडीपी कायद्याखाली दंडाची २५० कोटी रुपये एवढी रक्कम पाहता माहितीचा ब्रह्मराक्षस सरकारच्या मागे किती हात धुऊन लागला आहे, हे स्पष्ट होते.
ओवी भावे, पुणे
आजचे निर्णय उद्या महागात पडू शकतात
‘माहिती अडवा, माहिती दडवा!’ हे संपादकीय वाचले. माहिती अडवली तर ती जास्त जिरते, पाण्यासारखी वाट मिळेल तेथे पसरते. माहिती दाबली तर ती कर्णोपकर्णी जाताना त्यात आणखी भर पडत जाते. गैरसमज वाढतात. झाकले की बघण्याचा मोह वाढतो. डिजिटल माध्यमांना दहा तोंडे असतात. सरकार कोणाकोणाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार देणार? अनेक वर्षे विरोधी पक्षात घालवलेल्या भाजपला डीपीडीपीसारखा कायदा केला तर काय परिणाम होतो हे माहीत असणे अपेक्षित होते. आजचा सरकारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष होऊ शकतो हे ध्यानात ठेवून विद्यमान सत्ताधार्यांनी जपून पावले टाकावीत.
श्रीनिवास डोंगरे, दादर (मुंबई)
नैतिकतेला कात्री लावण्यासाठीच
‘माहिती अडवा, माहिती दडवा!’ हा अग्रलेख (२९ ऑक्टोबर) वाचला आणि १८२३ साली जॉन ॲडम याने ब्रिटिश आधिपत्याखाली असलेल्या भारतातील वृत्तपत्रांना अशाच प्रकारे नियंत्रित करणारा ‘परवाना अधिनियम १८२३’ जारी केल्याचे आठवले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणार्या आपल्या देशातील बहुतांश इलेक्ट्रिक आणि मुद्रित माध्यमांना विविध मार्गांनी स्वत:च्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सरकार करताना दिसते. मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांना त्यांची भूमिका प्रामाणिकपणे बजावण्यात अडथळे येताना दिसतात. त्यामुळेच अनेकांनी पत्रकारितेसाठी नवे मंच शोधले आहेत. आता या मंचांवरील आशयही आपल्या नियंत्रणात असावा यासाठी सरकार धडपडत आहे. धोरणकर्ते घटनात्मक संस्थांना आणि त्यांच्या प्रमुखांना हाताशी धरून स्वत:ला हवे तेच साधून घेत आहेत. हे करताना नैतिकतेलादेखील कात्री लावत आहेत.
सचिन शिंदे, बीड
सरकारच्या सोयीचे बदल
‘माहिती अडवा, माहिती दडवा!’ हे संपादकीय (२९ ऑक्टोबर) वाचले. अलीकडे प्रसारमाध्यमांवर उद्योगपतींचे वर्चस्व वाढू लागले असताना सरकारचा ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन’ कायदा (डीपीडीपी) लोकशाही व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न आहे. लोकशाही व्यवस्था मजबूत करणार्या संस्थांचे अधिकार कमी करण्याचे काम सरकारच्या वतीने सुरू आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ९९वी घटनादुरुस्ती करून राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाच्या (एनजेएसी) माध्यमातून न्यायाधीशांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्याचा प्रयत्न केला गेला. संविधानाने न्यायव्यवस्थेला दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न सरकारने केला; परंतु न्यायव्यवस्थेने ही घटना दुरुस्ती रद्द करून सरकारचे प्रयत्न हाणून पाडले. निवडणूक आयोगाच्या बाबतीतही तेच झाले २०२३ च्या कायद्याने निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमध्ये सरन्यायाधीशांऐवजी केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश केला. म्हणजेच सरकार आपल्या सोयीने वाटेल ते बदल करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. जे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
विष्णू चौरे, नांदेड</strong>
‘हा’ पर्यावरणपूरक विकास?
‘उजाड जंगलातील अस्वस्थ स्मशान शांतता!’ ही बातमी (लोकसत्ता- २९ ऑक्टोबर) वाचली. कर्जत परिसरात टोरंट पंप स्टोरेज प्रकल्पासाठी हजारो झाडांची होणारी कत्तल हा भविष्यावर घाला आहे. राज्यात दुष्काळस्थिती असताना विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश होणे, दुर्दैवी आहे. जंगलसंपत्ती वाचवली तरच पुढच्या पिढ्या वाचतील, याचा विचार करणार की नाही? स्वच्छ हवा, पाणी, जंगले आणि जैवविविधता उधळून लावली जात आहे. वर्षानुर्षांची झाडे तोडून म्हणायचे आम्ही नवीन ९० हजार झाडे लावू, प्रकल्प पर्यावरणपूरक आहे… या दाव्यांत अजिबात तथ्य नाही. सत्ताधारी नेत्यांची यासंदर्भातील वक्तव्ये ही दिशाभूलच आहे. परिपक्व जंगल हा केवळ झाडांचा समूह नसतो. ती कार्बन शोषणारी, तापमान संतुलित ठेवणारी, मातीची धूप रोखणारी, जलचक्राला आधार देणारी आणि असंख्य जीवांना आश्रय देणारी जिवंत परिसंस्था आहे, हे सरकारच्या लक्षात का येत नाही? विविध प्रकारची परिसंस्था, जैवविविधता निसर्गच निर्माण करतो, ही संपदा नष्ट करून उभारण्यात येणार्या ‘विकासा’लाच पर्यावरणपूरक विकास म्हणायचे का?
राजेंद्र पाडवी, तळोदा (नंदुरबार)
गोपनीयता, जबाबदारीचे काय?
‘आता जनगणनाही खासगी व्यक्तींच्या हाती’ ही बातमी (लोकसत्ता- २९ ऑक्टोबर) वाचली. देशात जनगणनेचे काम करण्यासाठी खासगी व्यक्तीची नेमणूक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून सर्व पक्षीय राज्यकर्ते खासगीकरण आणि कंत्राटीकरणाचा अट्टहास धरत आहेत. आधीच एसआयआर प्रकियेचा पुरता गोंधळ उडालेला आहे. या प्रक्रियेची धुरा बीएलओंवर आहे. रेल्वेपासून बँका, तेल कंपन्या सर्वच क्षेत्रांत खासगीकरण आणि कंत्राटीकरण रेटून नेले जात आहे. सरकारकडे लाखो कर्मचारी, अधिकारी असताना, त्यांच्याकडून काम करवून घेणे आवश्यक आहे. खासगी व्यक्तीकडे सरकारी काम दिल्यास गोपनीयता, जबाबदारी याचे काय करायचे? केवळ कमिशन, टक्केवारी, आपली माणसे, आपला कंत्राटदार यासाठी तर जनगणनेचे काम खासगी व्यक्तींकडे दिले जात नाही ना?
अनंत बोरसे, शहापूर जिल्हा, ठाणे</strong>
दुही माजवणारे प्रचारकी कारखाने
‘सनातन’ अवकाशाला कुंपण…’ हा लेख (२९ ऑक्टोबर) वाचला. धर्मांतर करणार्या व्यक्तीची जी अवस्था होते, तशीच तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून सुवेंदु अधिकारींची झाली आहे. हिंदू-सनातनप्रेम जास्तच बोकाळले आहे. हेच लोण देशभर पसरत असल्याचे दिसते.
मध्यंतरी अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथील कानिफनाथ यात्रेत मुस्लिमांना दुकाने लावण्यास मनाईचा एकमुखी निर्णय ग्रामसभेने घेतला आणि तथाकथित नवहिंदुत्ववाद्यांनी या निर्णयाचे समर्थन केले. तसेच मध्यंतरी संदल मिरवणुकीत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीला धूप दाखविण्यास आणि फुले अर्पण करण्यास विरोध दर्शवण्यात आला. मंदिर प्रवेशद्वारावर गोमूत्र शिंपडून ‘शुद्धीकरण’ केले. गुजरातमध्ये हिंदू धर्मस्थळ परिसरात मुस्लीम विक्रेत्यांवर बंदी घातली गेली. अशा धार्मिक विद्वेष पसरवणार्या घटना सातत्याने घडत आहेत. कोल्हापूरच्या बाबूजमल दग्र्याच्या प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती आहे तर सांगलीच्या कडेगावची ताबूत परंपरा भाऊसाहेब देशपांडे यांनी सुरू केली. अशी असंख्य धार्मिक एकोपा साधणारी उदाहरणे पुरोगामी विचारांचा वारसा सांगणार्या महाराष्ट्रात दिसतात. वैष्णोदेवी दर्शनासाठी भाविकांच्या पालखीचे भोई असणारे असंख्य मुस्लीम हिंदू धर्माचरणाशी एकरूप झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये अनेक मुस्लीम नवरात्रोत्सवात सहभागी होतात एवढेच नव्हे तर नवरात्रोत्सव आयोजितदेखील करतात. अशा विविधतेत एकता जपणार्या भारतात दुही माजवणारे प्रचारकी कारखाने अहर्निश सुरू आहेत ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. समाजात असा कोणता समाज आहे, ज्याने धर्म विद्वेषातून प्रगती साधली आहे?
बाळकृष्ण शिंदे, बिबवेवाडी (पुणे)
