गल्लोगल्ली नाही तरी गावोगावी आणि शहरांच्या विविध भागांत आता ‘टू-डी इको’ची सोय असते… कुठे महाग तर कुठे तुलनेने स्वस्त इतकाच फरक! पण हृदयक्रियेच्या तपासणीची ही पद्धत युरोप-अमेरिकेत १९५० ते १९७२ या काळात धीम्या गतीने विकसित होत राहिली, ती भारतात पहिल्यांदा आणण्याचे श्रेय डॉ. जी. विजयराघवन यांना दिले जाते. हृदयविकारांवरील संशोधनासाठी नावाजलेले आणि वैद्यकीय सेवेसाठी २००९ मध्ये ‘पद्मश्री’ मिळवणारे डॉ. विजयराघवन गेल्या रविवारी (२० सप्टेंबर) वारले.

पाश्चात्त्य देशांत १९७५ पर्यंत सर्रास उपलब्ध असलेले ‘टू-डी इकोकार्डिओग्राफी यंत्र-संच’ भारतातही उपलब्ध व्हावेत, यासाठी अमेरिकेची ‘ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी’ (एटीएल) आणि भारतातली ‘इंडकेम लॅबोरेटरीज’ यांच्यात करार होण्यापासून प्रत्येक टप्प्यावरला पाठपुरावा आणीबाणीनंतरच्या ‘जनता पार्टी सरकार’च्या काळात डॉ. विजयराघवन यांनी केला, त्यामुळे तिरुवनंतपुरमच्या वैद्यकीय महाविद्यालयात पहिले ‘टू-डी इको’ यंत्र आले आणि लगोलग मुंबईच्या पोर्ट ट्रस्ट रुग्णालय, केईएम यांसह अनेक महत्त्वाच्या रुग्णालयांतही पोहोचले. पण हे यंत्र आणणे एवढेच काही डॉ. विजयराघवन यांचे साध्य नव्हते. प्रतिबंधात्मक हृदयरोगशास्त्र ही शाखा प्रगत व्हावी, हृदयविकारांचे निदान आणि उपचार अधिकाधिक अचूक व्हावेत, या जणू ध्येयानेच केरळमधीुल या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात ते कार्यरत होते. ‘टू-डी इको’च्या आधी, १९७६ मध्ये त्यांनी तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज आणि लंडनमधील ब्रॉम्पटन हॉस्पिटल यांच्या सहकार्याने त्यांनी ‘एंडोमायोकार्डियल फायब्रोसिस’ – म्हणजे हृदयातील ‘भिंतीं’ना आतून येणारी सूज किंवा होणारे छेद- या विषयावर संशोधन केले होते. रुग्णांमधील ही स्थिती शोधण्यासाठी ‘टू- डी इको’ उपयुक्त ठरेल, हे त्यांच्या लक्षात तेव्हा आले. याहीनंतर ‘डॉप्लर’ तंत्र विकसित झाले; तेव्हा त्याचा अभ्यास करून डॉ. विजयराघवन यांनी त्यावर पाठ्यपुस्तक लिहिले. एव्हाना- १९८४ पासून- केरळ विद्यापीठात हृद्रोगांशी संबंधित पीएच.डी. संशोधन करणार्‍या अनेक डॉक्टरांचे ‘गाइड’ म्हणूनही ते काम करत होते.

वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. ब्रिटनचे ‘रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स’ आणि ह्य्अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’ यांचे ते मानद फेलो होते, तर ‘इंडियन ॲकॅडमी ऑफ इकोकार्डिओग्राफी’, ‘इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’ आणि ‘कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या तीन्ही महत्त्वाच्या संस्थांनी त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिले होते. तिरुवनंतपुरमच्या वैद्यकीय महाविद्यालयातून १९९८ मध्ये हृदयरोग विभागाचे प्रमुख या पदावरून निवृत्ती घेऊन त्यांनी कुवेत युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक आणि दुबईतील वेलकेअर हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभाग प्रमुख म्हणूनही काम केले.

डॉ. विजयराघवन यांनी अनेक विद्यार्थी तयार केले. त्यांना ८४ व्या वाढदिवसानंतर तिसर्‍याच दिवशी मृत्यूने गाठले.