ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या ‘युवक क्रांती दला’चे (युक्रांद) संस्थापक. डॉ. कुमार सप्तर्षी या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ही विविध रूपे. ‘सत्याग्रही विचारधारे’च्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे असिधाराव्रत घेतलेले संपादक ही आणखी एक महत्त्वाची ओळख. ‘सत्याग्रह हे शास्त्र आहे आणि त्याचा योग्य वापर केला तर यश येतेच,’ यावर श्रद्धा ठेवणारे कुमार सप्तर्षी.

कुमार यांचा जन्म २१ ऑगस्ट १९४१ चा. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून ते ‘एमबीबीएस’ झाले. मंडईतील बुरुड आळीत त्यांनी दवाखानाही सुरू केला. पण, वैद्यकीय व्यवसायातून अर्थार्जन करण्याऐवजी समाजस्वास्थ्य सुधारण्यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले. युवकांना संघटित करून सामाजिक-राजकीय परिवर्तन घडवून आणण्यासाठी १७ नोव्हेंबर १९६७ रोजी सिंहगडावर ‘युक्रांद’ची स्थापना करून त्यांनी हजारो तरुणांना सामाजिक भान, लोकशाही मूल्ये आणि परिवर्तनवादी विचारांची प्रेरणा दिली.

महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण व समाजवादी विचारधारेचा प्रभाव असलेले सप्तर्षी यांनी समाजातील विषमता, अन्याय, भ्रष्टाचार तसेच लोकशाही मूल्यांच्या र्‍हासाविरोधात सातत्याने आवाज उठवला. कर्जत तालुक्याशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे नाते.  शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलनांमुळे अनेक प्रश्न शासनाच्या पातळीवर पोहोचले. आमदार असतानाही त्यांनी सत्तेपेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिले.

कर्जत तालुक्यातील खेड येथे लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नावाने हायस्कूल स्थापन करण्यातही त्यांचा पुढाकार. पुढे या संस्थेचा विस्तार होऊन महाविद्यालयही सुरू झाले आणि हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. १९७४ ते जून १९७५ या काळात राशीन (ता. कर्जत) येथे त्यांनी ‘राशीन कम्यून’ हा ग्रामीण परिवर्तनाचा प्रयोग उभारला.  ग्रामविकास, लोकसहभाग व सामाजिक परिवर्तनाचा हा राज्यभर गाजलेला ‘युक्रांद’ प्रयोग होता.

शेडगाव (श्रीगोंदा ) येथील दत्त मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी मे १९७७ मध्ये त्यांनी केलेले आंदोलन यशस्वी झाले. सामाजिक समतेच्या चळवळीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आणीबाणीच्या काळात भूमिगत राहून लोकशाहीच्या रक्षणाचे काम करणारे डॉ. सप्तर्षी यांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. त्या अनुभवावर प्रकाश टाकणारे ‘येरवडा विद्यापीठातील दिवस’ हे त्यांचे पुस्तक अनेकांना प्रेरणा देत राहिले.

१९८० ते १९८५ या काळात त्यांनी खेडनगर (ता. कर्जत) येथे वास्तव्यास राहून ‘भारतीय समाज विकास व संशोधन संस्था’ या संस्थेमार्फत २६ एकर पडीक जमिनीवर ग्रामीण विकास केंद्र उभारले. येथे शेती, वृक्षलागवड, नर्सरी, मत्स्यपालन, शेळीपालन, गोपालन अशा प्रयोगांद्वारे ग्रामीण विकासाचे प्रारूप उभे केले. समाजवादी विचारधारेवरील निष्ठा कधी ढळू दिली नाही. पण अनौपचारिक गप्पांमध्ये समाजवाद्यांचे कुठे चुकले हेही ते प्रांजळ आणि तटस्थतेने मांडत. तत्त्वांची समीक्षा करणारा हा विरळा कृतिशील समाजवादी होता.