विज्ञानवादाची त्यांनी समाजाशी सांगड घातली. विकास म्हणजे नक्की काय, हा प्रश्न सरकारला निर्भीडपणे विचारता यावा, यासाठी त्यांनी जनतेला विकासशिक्षित केले. विकासाचे विकेंद्रित प्रारूप तयार करून डाव्या पक्षाची खप्पा मर्जी ओढवून घेतली. चौथ्या जगाच्या सिद्धांतावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली. मात्र, वैज्ञानिक विचारांशी, तत्त्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, असे विख्यात शास्त्रज्ञ, लेखक, साम्यवादी विचारवंत डॉ. एम. पी. परमेश्वरन यांचे नाव विज्ञाननिष्ठ समाजसुधारणावादी म्हणून नेहमीच घेतले जाईल.

डॉ. परमेश्वरन यांचा जन्म केरळमध्ये त्रिशूर जिल्ह्यात १८ जानेवारी १९३५ रोजी झाला. तिरुअनंतपुरम येथून त्यांनी विद्युत अभियांत्रिकीमध्ये पदवी घेतली. त्यानंतर तत्कालीन सोव्हिएत संघामध्ये ‘मॉस्को पॉवर इ्स्टिटट्यूट’ येथून आण्विक अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट केली. भाभा अणुसंशोधन केंद्रात १९५७ ते १९७५ पर्यंत त्यांनी काम केले. या द्रष्ट्या विचारवंताने चाळीशीत समाजासाठी अणुसंशोधन केंद्रातील नोकरी सोडली. विज्ञानवादाची फळे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा निर्धार होता. या निर्धाराशी ते शेवटपर्यंत कटिबद्ध होते.

वैचारिक आधारावर, विज्ञानाच्या तर्ककठोर मुद्द्यांवर चळवळ उभारणे तसे दुरापास्त. मात्र, या मार्गावरून वाटचाल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नुसत्या पुस्तकी ज्ञानाचे पांडित्य न मिरवता या ज्ञानाला सक्रिय चळवळीची जोड देऊन समाजातील प्रत्येक जण सामाजिक विषयांची मांडणी विज्ञाननिष्ठपणे करेल, यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. नोकरीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून जनचळवळ उभारली. विकासाच्या विकेंद्रित, समाजाभिमुख प्रारूपाचा त्यांनी आग्रह धरला.

सामान्य लोकांत विज्ञानवाद रुजवला. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी उद्युक्त केले. ‘सायलेंट व्हॅले’ येथील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाविरोधात त्यांचा विज्ञाननिष्ठ समाजाभिमुख विरोध सर्वांच्या कायमच लक्षात राहील. या प्रकल्पाविरोधातील मोठ्या जनआंदोलनाची दखल तत्कालीन केंद्र सरकारला घ्यावी लागली आणि हा प्रकल्प रद्द करावा लागला.

डाव्या विचारसरणीशी निगडित पक्षधारेमध्ये त्यांचे विचार परखड होते. डाव्या विचारवंतांमध्ये त्यांचे नाव ठळकपणे घेतले जात असे. मात्र, त्यांच्या या परखड विचारांचीच मोठी किंमत त्यांना पक्षामध्ये मोजावी लागली. त्यांनी ‘फोर्थ वर्ल्ड: ड्रीम अँड रिॲलिटी’ या पुस्तकातून सत्तेचे आणि विकासाचे विकेंद्रित रूप मांडले. विकास हा मध्यवर्ती सत्तेच्या प्रारूपातून न होता, तो थेट समाजाच्या तळातील स्तरापर्यंत नेऊन विकेंद्रित स्वरूपात अधिक नीट होऊ शकतो, अशी त्यांनी मांडणी केली. मध्यवर्ती सत्तेचा आग्रह धरणार्‍या डाव्या विचारांना हा तसा सुरुंगच. डाव्या विचारधारेशी संबंधित असूनही डॉ. परमेश्वरन यांनी विकेंद्रित सत्तेचे, विकासाचे प्रारूप परखडपणे मांडले. याची किंमत म्हणून त्यांची २००४ मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. गुंतागुंतीचे विज्ञान सर्वसामान्यांना मातृभाषेतूनच समजावे, यासाठी त्यांनी मल्याळी भाषेत पुस्तके लिहिली. मल्याळी भाषेत त्यांनी २९ आणि इंग्रजीत दोन पुस्तके लिहिली. अनेक लेख लिहिले. विज्ञान आणि साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. राज्य सरकारनेही त्यांचा ‘केरळ श्री’ पुरस्कार देऊन गौरव केला. त्यांच्या निधनामुळे विज्ञानाची समाजवादी मांडणी करणार्‍या एका प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचा अस्त झाला आहे. विज्ञानवादी सामाजिक चळवळीचा आधारवड हरपला आहे. त्यांचे या देशाप्रति, समाजाप्रतिचे योगदान लोकांच्या चिरंतन स्मरणात राहील.