वाघांची शिकार, वाघांच्या अधिवासाचा विनाश आणि मानव-वन्यजीव संघर्षामुळे वाघ जेव्हा नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर होते, त्यावेळी म्हणजे १९७३ च्या सुमारास भारताने ‘व्याघ्रप्रकल्पा’ची सुरुवात केली. १८ हजार २७८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील नऊ व्याघ्र संरक्षित क्षेत्रांपासून सुरू झालेला हा प्रकल्प आता ८४ हजार ४८८ चौरस किलोमीटर क्षेत्रातील ५८ संरक्षित क्षेत्रांपर्यंत विस्तारला आहे. भारतात आता २०२२च्या गणनेनुसार तीन हजार ६८२ वाघ आहेत. आज भारतात जगातील सर्वाधिक जंगली वाघ आहेत. यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे ती ‘आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स’चे महासंचालक डॉ. एस. पी. यादव यांनी. अलीकडेच त्यांना प्रतिष्ठित ‘क्रिस्टल कम्पास अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार प्रामुख्याने ‘भूगोलचा ऑस्कर’ या नावानेदेखील ओळखला जातो.
२०१२ मध्ये रशियन भूगोल सोसायटीने याची सुरुवात केली आणि भूगोल, परिस्थितिकी, प्राकृतिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाच्या संरक्षण आणि प्रचार, प्रसार क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला तो दिला जातो. २९ मे रोजी ‘मॉस्को इंटरनॅशनल हाऊस ऑफ म्युझिक’ येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराने डॉ. एस. पी. यादव यांना सन्मानित करण्यात आले. भारतातील वाघांना संरक्षित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी डॉ. यादव यांची प्रमुख भूमिका आहे. वाघांच्या संरक्षणासाठी त्यांनी विविध मॉडेल्स विकसित केली. इतर देशांतदेखील वाघांच्या संरक्षणासाठी लागू करता येतील, अशी ही मॉडेल्स आहेत. यादव यांनी वाघांच्या संख्येत वाढ करण्यात आणि जागतिक स्तरावर व्याघ्रसंवर्धनाला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’चे नेतृत्त्व करताना डॉ. एस. पी. यादव यांनी वाघ, सिंह, चित्ता, बिबट, हिम बिबट, प्युमा आणि जॅग्वार या सात मोठ्या मांजर प्रजातींच्या संवर्धनासाठी ९७ देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
या पुरस्कारामुळे भारताच्या वन्यजीव संवर्धनातील नेतृत्वाला जागतिक मान्यता मिळाली आहे. डॉ. एस. पी. यादव यांनी गेल्या ३५ वर्षांपासून भारतीय वनसेवेत अधिकारी म्हणून काम केले आहे. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयात काम करताना त्यांनी व्याघ्रप्रकल्प विशेषत: वाघ, चित्ता, सिंह आणि हत्तींच्या संवर्धन अजेंडाचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांनी आफ्रिकेतून भारतात चित्त्यांच्या पहिल्या आंतरखंडीय स्थलांतराचे नेतृत्व केले. डॉ. यादव यांनी केंद्र सरकारमध्ये अनेक पदे भूषवली. ते डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे संचालक होते. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिव होते. भारतीय साइट्स व्यवस्थापन प्राधिकरणाचे ते सदस्य होते. केंद्र सरकारने त्यांना वन्यजीव संवर्धनासाठी प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार आणि ग्लोबल टायगर इनिशिएटिव्ह कौन्सिलने संवर्धनातील पहिला जागतिक नेतृत्व पुरस्कार प्रदान केला.
१२ मार्च २०२४ला ते ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’चे महासंचालक म्हणून रुजू झाले. डॉ. यादव यांना डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्था आणि अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्युटकडून व्याघ्रसंवर्धनाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनी याविषयात पीएचडीदेखील संपादन केली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सुरुवातीच्या काळात जवळजवळ सात वर्षे काम करत असताना त्यांनी भारतातील यशस्वी व्याघ्र संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘ग्लोबल टायगर फोरम’मध्ये साहाय्यक महासचिव म्हणून काम करण्याचा मान त्यांना मिळाला आहे, जी जगातील वाघ संवर्धनाच्या क्षेत्रातील एकमेव आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. डॉ. यादव यांना केंद्र सरकारने प्रतिष्ठित राजीव गांधी राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन पुरस्काराने सन्मानित केले. तर आता ‘क्रिस्टल कम्पास अवॉर्ड’ने सन्मानित करताना ‘रशियन अकादमी ऑफ सायन्सेस’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ व्याचेस्लाव रोझनोव्ह यांनीही त्यांचे व्याघ्रसंवर्धनाबाबत कौतुक केले.