साहित्य, संगीत, नृत्य, चित्रपट, बालकारण आणि मानसशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान देणार्‍या डॉ. श्यामला वनारसे या खर्‍या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व. लेखन, वाचन, मनन आणि चिंतन स्वान्तसुखाय नव्हे, तर समाजामध्ये मिसळून ‘शहाणे करून सोडावे सकळ जन’ या वृत्तीचे असल्याने रंगकर्मींमध्ये त्यांना आदराचे स्थान होते.

श्रीधर राजगुरू यांच्या ‘शिशुरंजन’ या बालनाट्य संस्थेमध्ये वासुदेव पाळंदे, दत्ता टोळ, सरिता पदकी आणि मंगेश पदकी, नेमिनाथ उपाध्ये, भा. रा. भागवत, लीलाताई भागवत अशा अनेक व्यक्ती येत. तेथे चित्रकला, गायन, वादन, भाषा आणि नाट्य कार्यशाळांमध्ये श्यामलाताई हसत-खेळत शिबिरे घेत असत. पैसे कमावणे यापेक्षाही त्यातून मूल्य रुजवण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या घरी मदतीला जाणार्‍या युवा कलाकारांनी पुस्तके, चित्रपट आणि संगीतविषयक गप्पांची मेजवानी भेळ खाता खाता अनुभवली आहे. त्यांच्या चेहर्‍यावर सदैव आत्मविश्वास देणारे स्मितहास्य असे. ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटकात अनुमामी पंचपात्रेंचे काम त्यांनी केले होते. त्या ‘पीडीए’ (प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन) या नाट्यसंस्थेत भालबा केळकर, डॉ. जब्बार पटेल आणि डॉ. श्रीराम लागू यांच्यासह काम करत होत्या. ‘प्रोग्रेसिव्ह’ असणे म्हणजे काय, हे त्यांच्या जगण्यातून कळत असे. त्यांनी लिहिलेली ‘प्रतिज्ञा’ ही एकांकिका लोकशाही, अन्याय, हक्क, समानता व सहभाव याविषयी भाष्य करून आपल्या देशाच्या प्रतिज्ञेचा नेमका अर्थ सांगणारी होती.

पती डॉ. सुधीर वनारसे यांच्या समवेत त्यांनी औद्योगिक मानसशास्त्र या विषयांतर्गत अनेक उद्योगांबरोबर काम केले. या दोघांनी एकत्र लिहिलेल्या ‘स्वभावाला औषध असते’ या पुस्तकाला राज्य पुरस्कार लाभला. श्यामलाताईंच्या ‘सत्यजीत राय आणि भारतीय मन्वंतर’ या पुस्तकालाही राज्य पुरस्कार मिळाला. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत विपुल साहित्य निर्मिती करणार्‍या श्यामलाताईंचा गरवारे बालभवन, कलाछाया सांस्कृतिक केंद्र, अक्षरनंदन अशा अनेक संस्थांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता.

नाटक/ चित्रपटांची समीक्षा त्या मानसशास्त्राच्या अंगाने करत. वसंत बापट यांच्या कवितेवर त्यांनी ‘पक्षी’ नावाचे नाटक साकारले होते.आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेला पु. शि. रेगे यांच्या कवितांवरील ‘आनंदभाविनी’ हा विलक्षण प्रयोग होता. श्यामलाताईंनी ‘स्वप्न’ नावाचे नाटुकले लिहिले होते. श्यामलाताईंनी त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अतुल पेठे यांच्यावर सोपवली होती.

‘घाशीराम कोतवाल’ नाटकाची वेगळीच अभ्यास समीक्षा त्यांनी केली. नाटकामध्ये प्रत्येक वाक्य, गाणे कसे आणि किती वेळा आळवले जाते, याचा तो लिखित आलेख होता. त्यात वाद्य का, कधी, कशी येतात आणि रागांचे स्वरूप कसे उमलत जाते, अशी मांडणी होती. श्यामलाताई आणि कथक नृत्यगुरू प्रभा मराठे या दोघी नृत्य विषयावर संवाद करत. त्यांची नृत्यविषयक जाण, ‘घाशीराम’ मधील पदन्यासाच्या नोंदीही त्या पुस्तकात आहेत. अशी आवश्यक; पण किचकट कामे करण्यासाठीचा दमसास श्यामलाताईंकडे होता. आधुनिक विचार आणि ज्ञानमार्गी आस्थेचे होते. हेच बाळकडू घेऊन त्यांचा मुलगा प्रसाद रंगभूमी क्षेत्रात कार्यरत आहे.