जयराज साळगावकर, सह-संस्थापक, संपादक, प्रकाशक, कालनिर्णय
टोनी जोसेफ यांचे ‘अर्ली इंडियन्स द स्टोरी ऑफ अवर ॲन्सेस्टर्स अँड व्हेअर वुई केम फ्रॉम’ हे पुस्तक भारताच्या आद्यपूर्वजांचा इतिहास कथन करते. हडप्पा संस्कृतीतील लोक कोण होते? आर्य भारतात स्थलांतरित झाले का? जातसंस्था कधी सुरू झाली? अशा अनेक मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे. पुस्तक आजच्या दक्षिण आशियायी लोकांच्या पूर्वजांवर भाष्य करते. ६५ हजार वर्षांपूर्वी मानवाने आफ्रिकेतून भारतीय उपखंडात पहिल्यांदा प्रवेश केला, त्यावर पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.
जोसेफ यांचे हे पुस्तक इतिहास, पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, लोकसंख्या अनुवंशशास्त्र आणि शिलालेखशास्त्र तसेच आजच्या विज्ञानशाखेचा एक मुख्य भाग असणार्या डीएनए शाखेतील संशोधनाच्या निष्कर्षांवर आधारित आहे. पुस्तकात भारतातील हडप्पा संस्कृतीचे लोक, इराणमधील कृषक, मध्य आशियाई स्टेप्पे (आर्य)मधील इंडो-युरोपीय भाषक पशुपालक आणि इतर अशा चार प्रागैतिहासिक स्थलांतरांची चर्चा केली आहे. त्या काळच्या या उपखंडीय समाजाची रचना स्पष्ट करण्यासाठी रूपक म्हणून ते पिझ्झाचे उदाहरण देतात. जोसेफ सांगतात, आजच्या भारताची- खरे तर दक्षिण आशियाच्या लोकसंख्येची रचना समजून घेण्याचा एक मार्ग म्हणजे एक पिझ्झा अशी कल्पना करणे. यात ‘फर्स्ट इंडियन्स’ हा त्याचा पाया अर्थात बेस आहे. पिझ्झाच्या काही भागांचा क्रस्ट पातळ असते, तर काही भागांचा जाड, पण सर्व भागांना बेस आवश्यक असतो.
बेसशिवाय पिझ्झा अस्तित्वात नसतो. त्यानंतर संपूर्ण पिझ्झावर सॉस आणि चीज व टॉपिंग्ज पसरले जातात. ही उपमा वेगवेगळ्या काळातील उपखंडात आलेल्या लोकांसाठी वापरली जाते. वेगवेगळ्या स्लाइसवर चीज आणि टॉपिंग्स सारखी नसतात. काही स्लाइसवर टोमॅटोचे अतिरिक्त टॉपिंग असते, काहींवर शिमला मिरची, तर काहींवर भरपूर मशरूम. भारतीय पिझ्झावर आढळणारा सॉस, चीज किंवा टॉपिंग्स हे अनन्य नाहीत; ते जगाच्या इतर भागांतही आढळतात – काही पश्चिम आशियात, काही आग्नेय आशियात आणि काही युरोप व मध्य आशियात. पण पिझ्झाचा बेस मात्र भारतासाठी अनन्य आहे. आफ्रिकेशिवाय इतक्या पातळीची विविधता असलेला पिझ्झा तुम्हाला कुठेही सापडणार नाही, असे ते सोदाहरण स्पष्ट करतात. सिंधू संस्कृती आणि सुरुवातीच्या वैदिक संस्कृतीमधील समानता आणि फरकांची चर्चा या पुस्तकात केली गेली आहे. इंडो-युरोपीय भाषा भारतात आणणार्या आणि या प्रदेशात आधीच स्थायिक असणार्या रहिवाशांमधील परस्परसंवादातून आर्य संस्कृती इथे रुजली असल्याचा अंदाज ते व्यक्त करतात.
भारतातील विविध वंशांबद्दल गेली अनेक शतके वाद सुरू आहे. ‘मेरी साडी तेरी साडीसे सफेद है’ असा अहंभाव दर्शवणार्या या चर्चा आणि हे विवाद आहेत. यात मुख्यत: आर्य आणि द्रविड हा वाद हिरिरीने मांडला जातो. काहींचे म्हणणे आर्य हल्ला करून आले, तर काहींचे म्हणणे त्यांचे आगमन हे टप्प्याटप्प्याने काळाच्या ओघात झाले. तर काही लोकांचे म्हणणे असे आहे, की आर्य बाहेरून आलेच नाहीत, ते इथलेच. पण हा शेवटचा दावा काहीसा अतिरंजित वाटतो. कारण मानवी संस्कृतीत स्थलांतर हा नागरिकीकरणातील अनिवार्य भाग असतो. त्यात वावगे काही नाही.
जोसेफ यांचे हे पुस्तक आफ्रिकेतून आधुनिक मानवांचे स्थलांतर ते वेदांच्या काळापर्यंत अर्थात प्राचीन भारतीय इतिहासाच्या आरंभकाळातील टप्प्यांचा सुलभरीत्या आढावा घेते. प्राचीन जनुकांच्या अभ्यासासह अनेक वैज्ञानिक क्षेत्रांतील पुरावे जोसेफ इथे सादर करतात. हा अभ्यास भारताबरोबरच युरोप, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका यांच्याही प्राचीन इतिहास संशोधनात क्रांती घडवत आहे. त्या अभ्यासावर आधारित कथित आर्य लोकांच्या उगम आणि प्राचीन भारतातील त्यांच्या नागरीकरणाचा मुद्दा जोसेफ स्पष्ट करतात. गेल्या काही वर्षांत राजकीय हेतूंनी प्रेरित राहिलेल्या या मुद्द्याला जोसेफ यांनी निकालात काढले आहे. शैक्षणिक परंपरेप्रमाणे, प्रत्येक प्रश्नावर किंवा निष्कर्षावर (उदा. सिंधू संस्कृतीचे स्वरूप आणि द्रविड भाषकांच्या उगमाशी तिचे नाते) सर्व शास्त्रज्ञांचे एकमत होईलच असे नाही. तथापि, संशोधनामुळे प्राचीन भारताचा इतिहास लिहिण्यासाठी आता एक पाया घातला गेला आहे. विविध विज्ञानशाखा आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून अंतर्दृष्टीच्या प्रकाशाकडे नेतात. असेच काहीसे काम जोसेफ यांच्या या पुस्तकाने केले आहे. अतिशय कुशलतेने आणि प्रभावीपणे जनुकशास्त्रातील नव्या शोधांचा सारांश ते मांडतात.
ज्या काळात प्राचीन मानवाने पृथ्वीवर कशी वस्ती केली, हा विषय गुंतागुंतीचा आहे, त्या काळाबद्दल टोनी जोसेफ यांनी संशोधन केले आहे. मानवी अवशेषांवरील प्राचीन डीएनए अभ्यासातील अलीकडील घडामोडींमध्ये खोलवर शिरून आर्यांचे स्थलांतर या प्रश्नाचा सखोल ऊहापोह त्यांनी या पुस्तकात केला आहे. काही वंशशास्त्रज्ञांच्या मते, रामायणातील राम-रावणाचे युद्ध आर्य-अनार्य युद्ध हा या संघर्षाचा परमोच्च बिंदू होता. हा एक गुंतागुंतीचा आणि सहज निष्कर्ष काढता न येणारा विषय असला तरी पुरातत्त्वशास्त्र, भाषाशास्त्र, जनुकशास्त्र आणि साहित्य अशा विविध शाखांतील माहिती एकत्र करून जोसेफ यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले आहे. आर्यांच्या अस्तित्वाचा वाद मांडण्याची ही कदाचित सर्वांत वैज्ञानिक पद्धत असेल.
‘लँड ऑफ द सेव्हन रिव्हर्स’ हे संजीव संन्याल (नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार) यांचे पुस्तक महत्त्वाचे ठरते. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, भारतावर जेव्हा टोळ्यांचे राज्य होते, तेव्हा ‘भारत’ नावाची सगळ्यात मोठी टोळी आता जिथे गुडगाव आहे त्या भागात सरस्वती नदीच्या काठी राज्य करत होती. इतर टोळ्यांपैकी नऊ टोळ्यांनी एकत्र येऊन ‘भारत’ टोळीवर हल्ला केला. ‘भारत’ टोळी बलाढ्य होती. त्यांनी हा हल्ला मोडून काढला. तेव्हा हल्लेखोर टोळ्या खैबर खिंडीमधून इराण (पर्शियाचा काही भाग)ला निघून गेल्या आणि टप्प्याटप्प्याने परत आल्या. हे लोक तिथून पुन्हा भारतात येताना त्यांच्या जीवनमानात बदल घडत गेले. त्या संकरित झाल्या. ही प्रक्रिया काही शतके चालू असावी. आता डीएनएच्या पुराव्यानुसार संकरित झालेल्या या उत्तरेकडील वंशात असे दिसून आले आहे की, ७० ते ८० टक्के भाग हा पुरुषांच्या डीएनएचा आहे आणि उरलेला ्त्रिरयांचा. म्हणजे एकतर या पुरुषांनी ्त्रिरयांशी लग्न करून संबंध ठेवले किंवा केवळ संबंध ठेवले किंवा तिसरी शक्यता म्हणजे बलात्कार केले. हा प्रकार मुख्यत: उत्तर हिंदुस्थानात दिसतो, तर दक्षिण हिंदुस्थानात पुरुषांच्या डीएनएचे प्रमाण दहा टक्केच दिसते. त्यामुळे हा वर्णभेद उत्तर व दक्षिण भारतात (केस, डोळे, त्वचा याबाबतीत) उठून दिसतो.
इतर काही लोकांच्या मते, ज्यांना आपण आर्य म्हणून संबोधतो ते मुख्यत: बलुचिस्तानमधून आले होते, पण संन्याल यांच्याशी प्रत्यक्ष झालेल्या एका चर्चेत अमर्त्य सेन यांच्या पुस्तकाच्या नावाप्रमाणे आम्ही दोघे (जयराज साळगावकर, संजीव संन्याल) ‘ऑर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ म्हणजेच वाद घालणारे भारतीय ठरलो. वाद घालणे हा यम-नचिकेत वादापासूनचा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. आर्य कुठूनही आले नाहीत, ते इथलेच अशी नवी भूमिका संन्याल यांनी आग्रहाने मांडली. आपल्या स्वत:च्या पुस्तकात केलेल्या आर्य वंशाच्या दाव्याविरुद्ध अशीच काहीशी त्यांची भूमिका होती म्हणून वाद झाला.
कुठल्याही देशाचा इतिहास हा कायमच गुंतागुंतीचा असतो. भारतात इतिहासपूर्व काळातील मुद्द्यांबाबतही वर्षानुवर्षं वाद सुरू आहेत. सिंधू संस्कृतीतील लोक कोण होते, सिंधू संस्कृती वैदिक संस्कृतीच्या आधीची की नंतरची, आर्य बाहेरून भारतात आले की ते भारतातलेच, हे त्यातले काही ज्वलंत विषय. पण गेल्या काही वर्षांमध्ये पुरातत्त्वशास्त्र, पुराहवामानशास्त्र आणि विशेषत: लोकसांख्यिकी अनुवंशशास्त्रांत झालेल्या संशोधनामुळे या प्रश्नांना शास्त्रीय उत्तरे मिळाली आहेत. ‘बिझनेस वर्ल्ड’सारख्या मासिकाचे माजी संपादक असलेल्या जोसेफ यांनी हे पुस्तक लिहिण्यामागचे कारण म्हणजे देशाच्या इतिहासपूर्व काळात त्यांना असणारा रस! हडप्पा संस्कृतीबद्दल जाणून घेण्याच्या ओढीने त्यांनी भारतातील हडप्पाकालीन स्थळांना भेटी दिल्या. या क्षेत्रातील भारतातील आणि जगभरातील महत्त्वाचे पुरातत्त्वज्ञ, इतिहासतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, अनुवंशशास्त्राचे अभ्यासक यांनी लिहिलेले प्रबंध वाचून, त्यांना प्रत्यक्ष भेटून अधिक माहिती जाणून घेतली.
हडप्पा संस्कृतीतील लोक कोण होते? त्यांचे आजच्या मानवाशी जनुकीय नाते आहे का? ही संस्कृती लयाला गेल्यावर ते लोक कुठे गेले? अशा प्रश्नांची उत्तरे जनुकीय संशोधनामुळे (डीएनए) मिळू लागली आहेत. ६५ हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून आलेल्या आपल्या पूर्वजांचा अंश भारतातल्या कोणत्या भागांत किती आढळतो? अशा सगळ्याच प्रश्नांवर आता संशोधन झाले असून हे सर्व ‘अर्ली इंडियन्स’ या पुस्तकातून वाचायला मिळते. भारतीयच नव्हे, तर जगात आज अस्तित्वात असलेली मानवजात ही आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या होमो सेपियन्सची वंशज आहे, हे आता जनुकीय संशोधनातून सिद्ध झाले आहे. उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणार्या चार्ल्स डार्विनने संपूर्ण मानवजातीचे मूळ आफ्रिकेत आहे, असे १८७१ मध्येच सांगितले होते. पण त्या त्या देशातले लोक त्या त्या ठिकाणच्या आदिमानवांचे वंशज असू शकतात, असा सिद्धांत काही वर्षांपूर्वीपर्यंत जगात प्रचलित होता. आपण इथेच जन्मलेल्या पूर्वजांचे वंशज आहोत आणि आपले पूर्वज बाहेरून आलेले नाहीत, असाही एक मतप्रवाह आपल्याकडे पूर्वी होता. पण हा सिद्धांत तितकासा बरोबर नसल्याचे शास्त्रज्ञांनी संशोधनाने आणि पुराव्यानिशी दाखवून दिले आहे.
दक्षिण आशियाच्या इतिहासातील जुने प्रश्न निर्णायकपणे सोडवतानाच आपल्यापैकी सर्वजण स्थलांतरित आहोत आणि अखेरीस एकमेकांचे वंशशास्त्रीयदृष्ट्या नातेवाईक आहोत, सगळीकडचा मानव हा एकच आहे हे जोसेफ दाखवून देतात. पण काही धूर्त लोक मात्र त्याचे राजकारण करतात, तर काही अर्थकारण!
अर्ली इंडियन्स
लेखक- टोनी जोसेफ
प्रकाशक- जगरनॉट बुक्स
पृष्ठे : २५६,
किंमत : ४९९/-
