चित्ततोष खांडेकर
पचाममा ही इक्वेडोरमधील मूळनिवासींची जगन्माता. तेलमाफियांनी आपल्या हव्यासापोटी निसर्गाशी तिथल्या लोकांचे असलेले नातेच उद्ध्वस्त करून टाकले होते. सामाजिक चळवळीतून पुढे आलेल्या राफेल कोरिआ या मुत्सद्दी नेत्याने पचाममा कायदा करून हे नाते पुन्हा जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म।
भेदाभेदभ्रम अमंगल ।।
तुकोबांचा हा अभंग फक्त भक्तीची परिसीमा सांगत नाही.. तर अद्वैताचे तत्वज्ञान मांडतो. सारे जग ईश्वराने भरलेले आहे. त्यामुळे मी आणि तू असा भेद करणे चुकीचे आहे. तुकाराम महाराजांचे हे वैश्विक तत्वज्ञान ऐकायला चांगले वाटत असले तरी हे तत्वज्ञान वास्तवात आणता येते? त्यावर एखादी शासन व्यवस्था उभी करता येते? नदीच्या हक्कांच्या अनुषंगाने या प्रश्नाचे उत्तर आज शोधूया…
दक्षिण अमेरिकेतील मूळनिवासी समूह एक लोककथा सांगतात. एक गरुड आणि एक गिधाड संपूर्ण आसमंतात उडत असतात. त्या दोघांचं संपूर्ण विश्वावर राज्य असतं. पण एक दिवस गिधाड आणि गरुडाचे मार्ग वेगळे होतात. गिधाड अवकाशात एका बाजूला जाऊन पूर्णपणे नाहीसे होते, तर गरुड पूर्ण आसमंतात एकटाच उंच भरारी घ्यायला लागतो. तो गरुड म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आधुनिकता आहे.
मूळनिवासी समूह या आधुनिकतेला मानवाची विजयगाथा मानतात – जगातली इतर सर्व सजीवांवर आणि निर्जीवांवर सत्ता गाजवण्यासाठी मिळालेली शक्ती. ५०० वर्षे तो गरूड आसमंतात एकटाच भरारी घेत राहतो. म्हणजेच आधुनिकतेतून औद्योगिकीरण – त्यातून नागरीकरण – विकास – आजचं सगळ जग या सार्या प्रक्रियेतून उभं राहणं ही मानवाची ‘गरुडभरारी’ आहे. पण या गरुडभरारीचे परिणाम काय झाले?
या प्रश्नाचे उत्तर इक्वेडोरमधील स्थानिकच चांगल्याप्रकारे देतील. निसर्गसंपन्नतेने भरून पावलेल्या, ॲण्डीसच्या पर्वतरांगानी सजलेल्या, अमेझॉनच्या उपनद्यांनी बहरलेल्या प्रदेशांनी इक्वेडोर तयार झाला. तिथे मुळात निसर्ग असा वेगळा नव्हताच काही. या जमाती निसर्गाच्या अविभाज्य घटकच होत्या. झर्यातून खळाळणारे पाणी छोट्या नद्यांना मिळते, या छोट्या नद्या अमेझॉनसारख्या मोठ्या नदीला मिळतात, अमेझॉन सागराला मिळते, सागराकाठी हिमपर्वतातील पक्षी येऊन वस्ती करतात, तर हिमपर्वतांच्या शिखरांवर सागरगोटे सापडतात. हे निसर्गातील गुंतागुंतीचे नाते, त्याची अगाधता ते पहात होते. त्यांच्याकडे दुर्बिणी नव्हत्या, प्रयोगशाळा नव्हत्या. होती ती रानं, फुलं, नद्या, पर्वत, त्यांची निरीक्षणं आणि न संपणारी कल्पनाशक्ती.
याच कल्पनाशक्तीतून त्यांनी विश्वाची एक संकल्पना रचली. त्या संकल्पनेचे नाव ‘पचा’… पचा म्हणजे विश्वाचे हे गूढ नाते – घागरीत सागर आहे आणि सागरात घागर आहे, बिंदुतच सिंधु सामावला आहे आणि सिंधूच बिंदू आहे. जगात दुसरे असे काहीच नाही – सारे एकातच सामावले आहेत… तुकाराम महाराजांचे अद्वैत ते हेच, दुसरे काय? निसर्ग असं वेगळं काही नाही – एक गुंतागुतीचे विश्वाचे नाते आहे, ज्यात मानवही सामावला आहे. या गुंतागुंतीने भरलेल्या विश्वाला जोडणारे सूत्र म्हणजे विश्वाची आई – पचाममा अर्थात जगन्माता, जिने हे विश्व निर्माण केले. या विश्वात ती भरून आहे. सजीवात-निर्जीवात सामावली आहे. मानवही त्याला अपवाद नाही.
‘नेचर’ म्हणजे मानव सोडून सगळे ही पाश्चिमात्य संकल्पना त्यांना मान्य नाही. पचाममा हीच सारं जग व्यापून आहे, त्या पचाममातलं रोजचं जीवनच सण होतात, पीक आलं की आनंदाच्या नद्या ओसंडून वाहतात आणि दुष्काळ पडला की दु:खाचे सागर! अशा या जग्नमातेची प्रार्थनास्थळं इक्वेडोरमध्ये ठिकठिकाणी सापडतात.
सतराव्या शतकाच्या सुरुवातीला इथे स्पॅनिश सेना येऊन धडकली. त्यांना पचाममा वगैरे काही मान्यच नव्हते. त्यांना मान्य होतं मानवाचे – पुरुषांचे राज्य. पुरुषांची स्त्रियांवर आणि संपूर्ण जगावर सत्ता. हे जग त्यातील सजीव-निर्जीव सारेच या पुरुषांच्या उत्कर्षाची साधनं, ही स्पॅनिश धारणा. माणसाचा हा पुरुषी अहंकार, त्याची जग पादाक्रांत करण्याची वृत्ती येथील मूळनिवासींना गरुडासारखी वाटते. म्हणूनच आधुनिकता त्यांच्या लोककथेत गरूड होते, तर पचाममा ही जगन्माता त्यांचा कथेत गिधाड होते. गिधाड नाहीसे होणे, म्हणजे पचाममाचे महत्त्व मानवाच्या मनात संपणे. जगन्माता सजीव-निर्जीव सगळ्यांची काळजी घेते. कोणाचीच हानी होऊ देत नाही. गरुडाचे तसे नाही. तो स्वत:च्या स्वार्थासाठी सगळ्यांची हानी करतो. पण ही अशी संकल्पना या मूळनिवासींच्या मनात का रुजली?
इक्वेडोरमध्ये अनेक खनिजं सापडतात.. पण सगळ्यात महत्त्वाचे खनिज म्हणजे तेल. शंभर-दीडशे वर्षांपूर्वी तेलाचा शोध लागला, नंतर तेलाचे खाणकामही ठिकठिकाणी सुरू झाले. आधुनिक जगाचे इंधन म्हणजे तेल. हवा तितका पैसा तेलातून मिळतो. त्यामुळे इक्वेडोरच्या तेलावर स्थानिक व्यापार्यांची आणि राजकारण्यांची तर नजर होतीच पण बहुराष्ट्रीय कंपन्यांची आणि अमेरिकेसारख्या शेजारी राष्ट्रांचीही नजर होती. त्या तेलाच्या व्यापारावर ताबा मिळवण्यासाठी एक जीवघेणी स्पर्धाच सुरू झाली. यातून इक्वेडोरमध्ये गृहयुद्ध झाले.
शेजारच्या पेरूशी झालेल्या युद्धात देशाचा बराचसा भाग गमवावा लागला. या देशावर आपले नियंत्रण राहावे यासाठी अमेरिकेने भरपूर प्रयत्न केले. अमेरिकेला पूरक काम करणारा राज्यकर्ता नसेल तर लगेच लष्कर बंड करायचे आणि लष्करशाही यायची. लष्कर अमेरिकेच्या विरोधात गेले की पुन्हा लोकशाही येई. अमेरिकेचे इक्वेडोरमधील तेलावर नियंत्रण राहावे म्हणून हा सगळा खेळ आलटून-पालटून १९७९ पर्यंत सुरूच राहिला.
तेलाच्या या जीवघेण्या स्पर्धेत मूळनिवासींच्या जमिनी तेल-कंपन्यांनी हडपल्या, खाणमाफिया आणि त्यांच्यातील युद्धाने अशांतता निर्माण झाली, नद्या आणि पाण्याचे स्रोत प्रदूषित झाले, प्रचंड जंगलतोड झाली. या सार्यावर अवलंबून असलेले शेतकरी आणि भटक्या-विमुक्त जमाती बहुतांशी मूळनिवासी होत्या. दारिद्र्य, अशांतता, भूकबळी आणि टंचाई एवढेच त्यांच्या नशिबी आले. त्यांच्या मते हा पचाममाचा – जगन्मातेचा कोप आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसर्यांची हानी करणार्या गरूडाचे हे दुष्टचक्र आहे.
पण गरुडाची आणि गिधाडाची ही कथा इथेच संपत नाही. मूळनिवासी म्हणतात, त्यांचे पूर्वज सांगत की गरुडाची ही गरुडभरारी फक्त ५०० वर्षं चालेल, त्यानंतर मग गिधाड परत आसमंतात येईल, गरुडाला पुन्हा गिधाडासोबत फिरावे लागेल. अन्यथा गरुडाचा स्वार्थ त्याचाच नाश करेल… ती ५०० वर्षं आता संपली आहेत, यावर इक्वेडोरमधील मूळनिवासींचा ठाम विश्वास होता. त्यातूनच निसर्ग वाचवायच्या – नदी सांभाळायच्या चळवळी मूळनिवासींनी सुरू केल्या. त्यांची मागणी एकच, पचममाचा कायदा मानणारे संविधान इक्वेडोरमध्ये हवे.
पचाममाचा कायदा काय सांगतो – सजीव-निर्जीव, आजच्या भाषेत मानव-निसर्ग, सारेच विश्वाचे अविभाज्य घटक आहेत, सगळेच देशाचे नागरिक आहेत, देशाच्या साधनसंपत्तीवर सगळ्यांचा समान हक्क आहे, कुणाचेही नुकसान व्हायला नको. या मूळनिवासींची भावना तुकोबांच्या शब्दात सांगायची तर, ‘‘कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे’’.
इथे सर्वेश्वराची जागा पचाममा घेते एवढंच. १९९७ पासून अशा निसर्गाच्या आणि मानवाच्या हक्कांना मान्यता देणारे संविधान हवे म्हणून मूळनिवासींच्या स्वयंसेवी संस्थांनी चळवळ उभी केली. पण त्या संविधानात या हक्कांना जागा मिळाली नाही. मूळनिवासींनी पचाममाचा कायदा वास्तवात आणण्याचे आंदोलन सुरूच ठेवले. इक्वेडोरमध्ये राजकीय अस्थिरता वाढत गेली. १० वर्षांत आठ राष्ट्राध्यक्ष बदलले. मूळनिवासींच्या पाठिंब्याशिवाय स्थिर सरकार येऊ शकत नाही, हे एव्हाना राजकारण्यांच्या लक्षात आले. पण त्यांचे बोट पकडले राफेल कोरिआ या मुत्सद्दी नेत्याने.
राजकीय पक्षातून नाही, तर सामाजिक चळवळीतूनच हा नेता मोठा झाला होता. मला निवडून दिले तर पचाममाचा कायदा आणणारे संविधान निर्माण करीन असा विश्वास त्यांनी मूळनिवासींना दिला. या आश्वासनावरच २००७च्या सार्वत्रिक निवडणुकांत कोरिआ विजयी झाले. जिंकल्यावर त्यांनी संविधान सभा स्थापन केली. मूळनिवासींच्या आणि इतर समूहांच्या प्रतिनिधींना बोलावले. आणि २००८ मध्ये पचाममाचा कायदा वास्तवात आला. निसर्गाला – नदीला, पर्वतांना जगण्याचा, पुन्हा वाहण्याचा, शोषणापासून थांबवण्याचे हक्क देणारे जगातले पहिले संविधान तयार झाले.
इक्वेडोरचे संविधान म्हणजे २१व्या शतकातील लोकशाहीसाठी वास्तुपाठच. यातील कलम १० निसर्गाला संविधानिक हक्क आहे हे मान्य करते. कलम ७१ पचाममाचे तत्वज्ञान मान्य करते आणि त्यानुसार मानवाने जगण्याची तरतूद करते. निसर्गाची कोणत्याही प्रकारे हानी झाली, पचाममाचा कायदा मोडला, तर कोर्टात धाव घेता येईल हेही हे कलम सांगते. कलम ७२ निसर्गाला – आणि पर्यायाने नद्यांना पुनरुज्जीवनाचा मुलभूत हक्क देते. तर पुढचे कलम राज्यसंस्था पचाममाचा कायदा मोडणार नाही, निसर्गाचे शोषण होणार नाही याची काळजी घेईल, असे तत्व मांडते. कलम ७४ निसर्ग आणि मानवी समूह परस्पर फायद्याचे वर्तन करतील – जगा आणि जगू द्या – ही सांविधानिक जबाबदारी आहे – असे अधोरेखित करते. लोकशाहीची इतकी व्यापक व्याख्या करणारे हे जगातील पहिले संविधान ठरले आहे.
अद्वैताची संकल्पना सजीव-निर्जीव सार्यांमध्ये समभाव बघते. त्याआधारे निसर्गालाही मानवासारखेच समान हक्क देणारे नवीन संविधान इक्वेडोरने दिले. पण असे संविधान नद्यांचे हक्क खरंच राखू शकते? पुढच्या भागांत पाहू या.
नदी विषयक संशोधक अभ्यासक
chittatoshresearch@gmail.com
