एडगर अॅलन पो आणि मार्क ट्वेन यांच्याविषयी मराठी वाचकांना अधिक माहिती व्हावी यासाठी अनेक अनुवादकांनी कष्ट घेतले. म्हणजे साठच्या दशकात युसिसच्या भंडारातून दोन पुस्तकरत्ने अनुवादित झाली. त्यात ट्वेन यांचे ‘भटकबहाद्दर’ आणि मिसिसिपीतील मुशाफिरी आज जुन्या बाजारात थोर किमतीला विकली जातात. याशिवाय मार्क ट्वेन यांचे चरित्र (आता अनुपलब्ध) देखील मराठीत सत्तरीच्या दशकात आलेले. पो यांच्या दीर्घकथांचा मराठी अनुवाद असलेले युसीस कार्यक्रमाअंतर्गत असलेले पुस्तक आज दुर्मीळ. अरविंद गोखले यांच्या ‘काही अमेरिकन कथा’ पुस्तकात पो यांची ‘अशर घराण्याची अखेर’ ही कथा वाचकांच्या स्वागताला दिसते. ‘द गोल्ड बग’ या दीर्घ कथेचे ‘सोनेरी भुंगा’, ‘सोनेरी कीटक’ अशा नावांनी विविध लेखक-प्रकाशकांनी अनुवाद केलेले आढळतात. पो हे आधुनिक डिटेक्टिव फिक्शनचे जनक आणि ट्वेन हे आधुनिक अमेरिकी कादंबरीचे पितामह. त्यांच्याविषयी दोन ताजी आंग्ल पुस्तके उपलब्ध झाली आहेत.
या दोन्ही लेखकांविषयी अमेरिकी वाचकांचा आदर अजरामर असला, तरी संशोधकांचा डिटेक्टिव्हांच्या वरताण तपास त्यांच्यावरील पुस्तकांतून दिसतो. ‘एडगर अॅलन पो अॅण्ड डुपन (/डुपिन) मिस्ट्रीज’ (१९९१), ‘पोज पिम’ क्रिटिकल एक्स्प्लोरेशन’ (१९९२) आदी पुुस्तकांचे कर्ते प्राध्यापक-लेखक रिचर्ड कोप्ले यांनी आपले अर्धे आयुष्य या एकाच लेखकाच्या अभ्यासात घालविले. त्यांचे ताजे पुस्तक ‘एडगर अॅलन पो : ए लाइफ’ पो यांच्या आयुष्याचे संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करते. लहानपणी पाहिलेल्या आप्तांच्या मृत्यूचे लेखनावरील सावट, पुढल्या आयुष्यात मद्यातिरेकाची आवर्तने यांतून लेखनाची झिंग सांभाळणाऱ्या या लेखकाविषयीचे तपशील या ग्रंथात उतरले आहेत. दीडेक वर्षापूर्वी नेटफ्लिक्सवर गाजलेली ‘द फॉल ऑफ द हाऊस ऑफ अशर’ ही मालिका पो यांच्या कथेचे वर्तमानकालीन रूपांतर होते. तासाभराचे आठ भाग पाहणाऱ्यांचे नंतर सहा पानांची मूळ कथा व पो यांच्याविषयीचे कुतूहल शमवणारी ग्रंथसंपदा पुष्कळ उपलब्ध आहे. तरी हे पुस्तक ‘जेन झी’ पिढी ते पो हा लेखक म्हणून माहिती असणाऱ्या सर्वांसाठी ‘पो ज्ञान’ उपलब्ध करून देणारे.
रॉन चरनॉव्ह हे अमेरिकी लेखक, पत्रकार आणि चरित्रकार. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राबद्दल पुलित्झर मिळविणारे. त्यांचे एक हजार दोनशे पृष्ठे इतके गडगंज पानांचे मार्क ट्वेनवरील चरित्र ७४ वर्षांच्या ट्वेन यांच्या आयुष्यातील प्रत्येक महिन्यासह पानांत उतरले आहे. अतिशय वाईट काळातील अमेरिकेच्या फारशा बऱ्या नसलेल्या परिसरात जगणाऱ्या ट्वेन यांच्याविषयीचे तपशील त्यांनी वेगवेगळ्या पुराव्यांसह उभे केलेत. या वर्षी हकलबरी फिन या अभिजात पुस्तकाच्या ‘जेम्स’ या निवेदक-बदली रूपांतराने पर्सिव्हल एव्हरेट यांना गेल्या आठवड्यात पुलित्झर मिळवून दिले. त्या ग्रंथाचे राष्ट्रीय वाचन सुरू असताना ट्वेनचे हजार पानी चरित्र खूपविके होण्यापासून दूर नाही. पो यांच्याविषयीचा कोप्ले यांचा टिपणव्हिडीओ…
https:// tinyurl. com/2 x4 jvbu9
रॉन चरनॉव्ह यांची मार्क ट्वेन यांच्या चरित्रावर ऑडिओचर्चा…
https:// tinyurl. com/ fue28 bsu