‘अभ्यासक कसा असावा याचा ते वस्तुपाठ होते’ असे एडगर मोरँ यांच्याबद्दलच काय, कोणाही अभ्यासकाबद्दल म्हणता येणार नाही- येऊही नये- कारण अभ्यासक अखेर आपापल्या परिस्थितीतच घडत असतात. हे परिस्थितीतून घडण्याचे भान म्हणजे काय, याचा वस्तुपाठ जर कुणाला हवाच असेल, तर मात्र १०४ वर्षे जगलेल्या एडगर मोरँ यांच्याकडे पाहावे लागेल! पहिल्या महायुद्धानंतर, ८ जुलै १९२१ रोजी पॅरिसमध्ये जन्मलेल्या एडगर यांची आई १९३१ मध्ये वारली. तेव्हापासून एडगर वाचनात रमू लागले. शैक्षणिक प्रगती उत्तम असताना, आपण केवळ ग्रीसहून स्थलांतर केलेल्याच नव्हे तर ज्यू कुटुंबातील आहोत याचा साक्षात्कार एडगर यांना हिटलरी सत्ताकांक्षेने करून दिला. मग फ्रान्सच्या दक्षिण भागात राहून त्यांनी इतिहास, भूगोल आणि कायदा यांच्या पदव्या घेतल्या. महायुद्धकाळात ‘रेझिस्टन्स’ चळवळीत सहभागी होताना त्यांनी नाहोम हे मूळ आडनाव टाकून ‘मोरँ’ हे उपनाव घेतले. तुलूजहून पॅरिसपर्यंत धडक मारणार्‍या कम्युनिस्ट तुकडीत ते सहभागी झाले आणि महायुद्ध संपल्यानंतर मात्र पॅरिसमध्ये समाजशास्त्र शिकू लागले. पुढे १९५० च्या दशकात, तेव्हा नव्याने उदय होत असलेल्या ‘फिल्म स्टडीज’कडेही वळले (सिनेमा ऑर द इमॅजिनरी मॅन- १९५६; द स्टार्स- १९५७). सिनेमा हे आजचे माध्यम आहे, याची खात्री असल्यानेच नंतर त्यांनी ‘तुम्ही सुखी आहात असे तुम्हाला वाटते का?’ हा प्रश्न पॅरिसच्या रस्त्यांवरील अनेकांना विचारून उत्तरे मिळवणारी एक फिल्मही केली. पण त्याआधी १९५९ मध्ये, ‘ऑटोक्रिटीक’ या पुस्तकातून त्यांनी आपलाच कम्युनिस्ट भूतकाळ पारखून, तो त्यागणेच का बरे होते यांची मीमांसा त्यांनी केली. त्यांना ‘तत्त्ववेत्ता’ मानले जाऊ लागले, ते या पुस्तकानंतर.

त्यांची सुमारे १२ पुस्तके इंग्रजीत उपलब्ध असली, तरी १९७७ ते २००४ दरम्यान प्रकाशित झालेल्या ‘मेथड’चे सहा खंड अद्याप तरी फ्रेंचमध्येच आहेत, अन्य सुमारे नऊ पुस्तकेही इंग्रजीत आलेली नाहीत. ‘मेथड’ हे ‘सामान्य माणसालाही तत्त्वविचाराकडे वळवणारे पुस्तक’ ठरले. स्ट्रक्चरॅलिझम, डीकन्स्ट्रक्शन ही फ्रेंच भाषाभ्यासकांच्या तत्त्वचर्चेची वाट न धरता, तसेच वसाहतोत्तर, उत्तराधुनिक असे भेदही न मानता एडगर मोरँ यांनी विचारमंथन केले. आयुष्याच्या १०४ पैकी पाऊणशे वर्षांत युरोप आणि विशेषत: दक्षिण अमेरिकेतील २० विद्यापीठांच्या अर्जित किंवा मानद ‘पीएच.डी.’ पदव्या, ‘सांत्र नास्योनाल दे ला रिचेर्चे सायंटिफीक’ (सीएनआरएस) या विख्यात फ्रेंच अभ्यास केंद्रात सुप्रतिष्ठ प्राध्यापकपदच नव्हे तर या केंद्राच्या एका शाखेला त्यांचे नाव; असे मानमरातब त्यांच्या अभ्यासाने मिळवले.

‘तत्त्वचिंतक म्हणजे समाजाची सदसद्विवेकबुद्धी’ ही आधुनिक काळापर्यंतची अपेक्षा एडगर मोरँ यांच्यामुळे वेळोवेळी पूर्ण झाली. त्यांनी अल्जिरियाच्या (फ्रेंचांविरुद्ध १९६२ पर्यंत सुरू असलेल्या) मुक्तियुद्धाला पाठिंबा दिलाच, पण पुढेही सरकारविरोधी त्रागा कुठे योग्य ठरतो हे नेमके सांगण्याचे काम केले. अगदी २०१९ मधल्या ‘यलो व्हेस्ट निदर्शनां’ना त्यांनी ‘हताशेतून आलेली चिडचिड’ ठरवून लोकांची बाजू घेतली होती. उत्तरायुष्यात ‘पृथ्वीचा पक्ष हवा’ अशी पर्यावरणनिष्ठ राजकीय भूमिका त्यांनी घेतली. ‘सेव्हन कॉम्प्लेक्स लेसन्स इन एज्युकेशन फॉर फ्यूचर’ हे ‘युनेस्को’च्या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध असणारे पुस्तक वाचणे, ही त्यांना आदरांजली ठरेल.