आयफेल टॉवरच्या कर्मचार्यांनी सोमवारी ‘काम बंद’ आंदोलन केल्याने पर्यटक खोळंबले, याची बातमी झाली. पण यामागच्या घटनाक्रमाकडे फ्रेंच राज्यक्रांतीतून जगाला मिळालेली आधुनिक मूल्ये आणि सध्याच्या भारतातील एका प्रभावशाली धार्मिक गटाची रूढीग्रस्त मूल्ये यांचा सौम्यसा संघर्ष म्हणून पाहाता येईल. ‘बोचासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण’ संस्थेने (बीएपीएस) पॅरिसच्या पूर्व उपनगरात बांधलेल्या स्वामीनारायण मंदिराचे रविवारी, ६ सप्टेंबर रोजी उद्घाटन झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतून दूरदृश्य प्रणालीद्वारे हे उद्घाटन केले आणि भाषणही केले. उद्घाटन सोहळ्यासाठी पॅरिसला आलेला ‘बीएपीएस’ साधूंचा १०० जणांचा गट आदल्या दिवशी आयफेल टॉवर पहायला गेला. त्यापूर्वी त्यांनी त्याचे व्यवस्थापन पाहणार्या कंपनीकडे या साधूंचा महिलांशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घेण्याची विनंती केली आणि विशेष म्हणजे कंपनीने ती मान्य केली. त्यानुसार, हे साधू तिथे असताना महिला कर्मचार्यांना तेथून हटवण्यात आले. या घटनेचे पडसाद सोमवारी उमटले. आयफेल टॉवरच्या संतप्त कर्मचार्यांनी बंद पुकारला आणि जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेले हे ठिकाण दिवसभर बंद राहिले. सर्वसामान्य फ्रेंच नागरिकांपासून माजी अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद ते अतिउजव्या मरी ले पेन या विविध पक्षीय नेत्यांपर्यंत सर्वांनी या प्रकाराचा निषेध केला.
या तीन दिवसांतील घडामोडींमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामध्ये आधुनिक मूल्ये विरुद्ध रूढीप्रिय मूल्ये; कंपनीचा व्यावसायिक दृष्टिकोन आणि कर्मचार्यांमध्ये मूल्यांविषयी जागरूकता; धार्मिक कारणांचे निमित्त करून स्त्रियांबद्दल भेदभाव बाळगण्याची मानसिकता, धर्माचे अर्थकारण असे मुद्दे आहेत. फ्रान्समध्ये अठराव्या शतकात (१७८७ ते १७९९) झालेल्या फ्रेंच क्रांतीमुळे इतिहासाने कलाटणी घेतली.
संपूर्ण जगाला आधुनिक दृष्टी बहाल करणार्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित लोकशाही तत्त्व या क्रांतीतून मिळाले. ‘बीएपीएस’च्या साधूंसाठी आयफेल टॉवरवरील महिला कर्मचार्यांना काही काळासाठी हटवण्याची मागणी मान्यही करण्यात आली, तेव्हा समतेच्या मूल्याला मात मिळाली का, असा प्रश्न उपस्थित झाला. पण त्याचे उत्तर अगदी दुसर्या-तिसर्या दिवशीच मिळाले. आयफेल टॉवरच्या कर्मचार्यांनी या प्रकाराचा निषेध केला आणि संपही केला.
यापूर्वी आयफेल टॉवर कधी बंद राहिलाच नव्हता, असे नाही. वित्तीय व्यवस्थापन आणि देखभाल यासारख्या मुद्द्यांवर तिथे संप झाले आहेत, पण लिंगाधारित भेदभावामुळे हे पर्यटन स्थळ बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुर्दैवाने त्याला कारणीभूत ठरलेला धार्मिक गट भारतातील आहे. एकीकडे ‘सीईटीई’ने केवळ व्यावसायिक हेतू डोळ्यासमेर ठेवून ‘बीएपीएस’ची मागणी मान्य केली. पण ही भूमिका इतरांना मान्य झाली नाही. त्यामुळे फ्रान्समधील मूल्ये अजूनही टिकून आहेत, असा दिलासा वाटून घ्यायला हरकत नाही. दुसरे म्हणजे, ‘बीएपीएस’सारखी राजकीय वरदहस्त असलेली धनाढ्य धार्मिक संघटना आपल्या राजकीय, आर्थिक ताकदीचा वापर करून ते अन्य देशांमधील समाजनियम बदलण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत का, हा प्रश्नही आहेच. याबरोबरच स्वत:ला साधूसंत म्हणवणार्यांच्या धार्मिक आचरणाचाही विचार करणे आवश्यक आहे.
‘बीएपीएस’चे सदस्य कठोर ब्रह्मचर्य व्रताचे पालन करतात म्हणून त्यांना स्त्रियांचा संपर्क नको असा युक्तिवाद केला जातो. पण इंद्रियांवर, मनावर संयम राखणे म्हणजे ब्रह्मचर्य- त्याचे व्रत ‘बीएपीएस’च्या साधूसंतांनी स्वीकारले असेल तर, त्याचे पालन ‘करू देण्याची जबाबदारी’ इतरांवर- इथे महिला कर्मचार्यांवर- कशी काय येते? ब्रह्मचर्याचे पालन करण्याची जबाबदारी व्रत स्वीकारण्याचीच आहे.
स्वत:वर पुरेसा संयम असेल तर समोर महिला आहे वा नाही यातून फरक कसा काय पडू शकतो? एखाद्याने हे व्रत स्वीकारले आहे आणि समोर एखादी स्त्री आल्याने त्याच्या व्रतात अडथळा निर्माण होत असेल, तर त्याच्या संयमावर प्रश्न उपस्थित करायला हवा. या वर्तनाला ब्रह्मचर्य का म्हणावे, असा प्रश्न विचारला पाहिजे. अशा वेळी एका महिलेला नदी ओलांडण्यासाठी मदत म्हणून कोणताही विचार न करता तिला खांद्यावर घेऊन नदीपलीकडे नेणारा संन्यासी आणि त्या स्त्रीला स्पर्शही न करता त्याच घटनेचा निषेधात्मक विचार करत राहणारा दुसरा संन्यासी यांची कथा आठवत राहते!
