एकनाथ शिंदे
आज संपूर्ण जगात भारताच्या उत्तुंग झेपेविषयी बोलताना, लिहिताना ‘२०१४ च्या आधी’ आणि ‘२०१४ च्या नंतर’ अशा पद्धतीने विचार केला जातो; श्रेय मोदीजींच्या दूरदृष्टीचेच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली बारा वर्षे सतत, अथक आणि अविश्रांत काम करत नवभारताच्या निर्मितीचा ध्यास घेतला आहे. विरोधकांची अत्यंत जहरी अशी द्वेषमूलक टीका, चारित्र्यहननाचे प्रयत्न, ध्रुवीकरणाचे निराधार आरोप, निंदानालस्तीचे शाब्दिक बाण असा चहूबाजूंनी मारा सुरू असतानाही मोदीजींनी कधी लक्ष्यावरून आपली नजर ढळू दिली नाही. देशाच्या प्रगतीचा आलेख काढताना एकेकाळी ‘स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर’ अशी तुलना केली जात असे. आज केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भारताच्या उत्तुंग झेपेविषयी बोलताना, लिहिताना ‘२०१४ च्या आधी’ आणि ‘२०१४ च्या नंतर’ अशा पद्धतीने विचार केला जातो. त्याचे श्रेय मोदीजींच्या काळाच्या पलीकडे पाहू शकण्याच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल. 

भारताने १९४७ नंतरच्या सदुसष्ट वर्षांत अनेक क्षेत्रांत प्रगती केली हे खरे आहे. परंतु ती काळाच्या ओघात कोणत्याही लोकशाही व्यवस्थेने करावी तेवढीच होती. मात्र त्यानंतरच्या १२ वर्षांचा विचार केला तर ती बुलेटच्या वेगाने आणि निश्चित अशा दिशा ठरवून झालेली प्रगती होती. केवळ ‘गरिबी हटाओ’च्या घोषणा करून गरिबी हटत नाही किंवा वीस कलमी कार्यक्रमांची नारेबाजी करून विकास होत नाही हे आधीच्या ६७ वर्षात सिद्ध झाले होते. खादीधारी राजकीय नेत्यांची समाजात जी वाईट प्रतिमा तयार झाली होती, त्याचे कारणही त्या ६७ वर्षांतील काँग्रेसी प्रवृत्तींच्या कारभारात दडलेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जळमटे एकहाती साफ केली, भ्रष्टाचाराची सगळी बिळे बुजवली आणि पुरोगामित्वाच्या नावाखाली काँग्रेसने जागोजागी घातलेले वैचारिक बोळे काढून टाकून देशाच्या स्वाभिमानाचा प्रवाह वाहता केला.

मोदीजी ७ ऑक्टोबर २००१ ते २१ मे २०१४ या काळात गुजरातचे मुख्यमंत्री होते. सलग तीन वेळा त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. या काळात त्यांच्यावर आरोपाची राळ उडवण्यात आली, त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले आणि हरप्रकारे त्यांचा मनोभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यावर मात करीत मोदीजींनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात ‘गुजरात मॉडेल’ विकसित केले आणि विकासाची नवी बाराखडी लिहिली. राज्यात कृषी क्रांती घडवून आणली, शेतकर्‍यांना २४ तास वीज पुरवली आणि ‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूकही आणली. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी ई-गव्हर्नन्ससारख्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला. देशाचे पंतप्रधान झाल्यावरही मोदीजींनी ‘कोणी निंदा, कोणी वंदा, देशाचा विकास हाच माझा अजेंडा’ या वृत्तीने कामाचा धडाका लावला. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हणतात, मोदीजींच्या बाबतीत तर निंदकांच्या कॉलनीच्या कॉलन्या उभ्या राहिल्या, परंतु देशाच्या प्रगतीच्या झंझावातात पुढे त्या उद्ध्वस्त झाल्या.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार, गेल्या १४ वर्षांत भारताने गरिबी कमी करण्यात प्रचंड यश मिळवले आहे. २०११-१२ मध्ये देशातील सुमारे २७ टक्के लोकसंख्या गरिबीत जगत होती, आता केवळ पाच ते सहा टक्के लोक गरिबीच्या रेषेखाली आहेत. ‘जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करणार आहे तेच बोलतो असा नेता’ अशी त्यांची प्रतिमा गेल्या १२ वर्षांत झाली ती त्यांच्या कृतिशीलतेमुळेच. आपल्या कार्यकाळात किती पत्रकार परिषदा घेतल्या यावर एखाद्या देशाच्या प्रमुखाचे यश मोजणारे अविचारी टीकाकार केवळ भारतातच असू शकतात. मोदीजी पत्रकारांसमोर गर्जना आणि वल्गना करण्यात वेळ घालवत नाहीत, कारण गेल्या ६७ वर्षांत काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्याच विचारांच्या सरकारांनी केलेली घाण त्यांना साफ करावी लागत आहे. अर्थात स्वच्छतेचा संकल्पच केला असल्याने त्यांनी ती घाण साफ करण्यासाठी रात्रंदिवस एक केला. शब्दांचे बुडबुडे काढण्यात वेळ घालवायचा नाही, काय उत्तर द्यायचे ते आपले कामच देईल, अशी त्यांची वृत्ती आहे.

सामाजिक बदलांपासून ते राजकीय बदलांपर्यंत आणि देशाची जागतिक प्रतिमा उंचावण्यापासून तर सांस्कृतिक पुनरुत्थानापर्यंत अनेक अंगांनी गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचा विचार करता येईल. परंतु काही प्रमुख गोष्टींचा उल्लेख करायचा झाला तर जन धन योजना, स्वच्छ भारत अभियान, जीएसटीची अंमलबजावणी, आयुष्मान भारत योजना, डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधांमधील भरभराट, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला मान्यता, आत्मनिर्भर भारत मोहीम, तिहेरी तलाक कायदा, कलम ३७० रद्द करणे, सरकारी योजनांचा पैसा थेट लाभार्थींच्या खात्यात, अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराची निर्मिती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि नवीन संसद भवनाचे निर्माण या सांगता येतील. यापैकी प्रत्येक बाबीवर स्वतंत्रपणे लेख लिहावा लागेल एवढ्या त्या महत्त्वाच्या आहेत. शेतकर्‍यांसाठी ‘पीएम किसान सन्मान निधी’, महिलांसाठी लखपती दीदी आणि उज्ज्वला योजना अशा अनेक यशस्वी योजनांचा उल्लेखही यात करावा लागेल. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महायुती सरकारने जी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राबवली, त्याची प्रेरणा आम्हाला मोदीजींच्या ‘लखपती दीदी’ या संकल्पनेतूनच मिळाली.

आज देशात सहा पदरी, आठ पदरी महामार्गांचे जे जाळे उभे राहिलेले आहे, त्याचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदीजींच्या विकासाच्या दूरदृष्टीला द्यावे लागेल. आपल्या देशात सात दशकांत साधी चांगल्या रस्त्यांची व्यवस्थासुद्धा झाली नव्हती हे किती लाजिरवाणे होते? याउलट,  २०१४ नंतर आतापर्यंत तीन लाख ७५ हजार किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते बांधले गेले. रस्ते हे देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचे खरे वाहक असतात आणि सामान्यांचीही ती अगदी प्राथमिक गरज आहे याचे भान यायला देशाला एवढी वर्षे जावी लागली.

‘नमामि गंगे प्रकल्प’ हा नरेंद्र मोदी सरकारचा एक प्रमुख पर्यावरणीय उपक्रम म्हणावा लागेल. या प्रकल्पात गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी आणि संवर्धनासाठी व्यापक काम करण्यात आले. नद्यांच्या स्वच्छतेविषयी संपूर्ण देशातच त्यामुळे जागृती झाली. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे ऐतिहासिक कामही मोदीजींनी मार्गी लावले. स्थानकांचे नूतनीकरण, नवीन गाड्या सुरू करणे आणि हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प यामुळे प्रवाशांना दर्जेदार आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळत आहे. ‘वंदे भारत’सारख्या आधुनिक ट्रेन्स आणि प्रमुख शहरांतील मेट्रोंचे जाळे यामुळे भारतीयांचे दैनंदिन आयुष्य सुखाचे झाले आहे.

भारताच्या श्रेष्ठतेला आणि लष्करी सज्जतेला साजेल असे उत्तर देण्याची हिंमतही मोदीजींनी सर्जिकल स्ट्राइकमधून केली. ‘घर मे घुसकर, उधम मचाकर भागेंगे’ या वृत्तीने पाक पुरस्कृत दहशतवादी गेली अनेक दशके भारतात कारवाया करत होते. गेल्या १२ वर्षांत या दहशतवाद्यांच्या घरात घुसून भारतीय लष्कराने त्यांना पळता भुई थोडी केली. त्याच वेळी नक्षलवाद्यांचा देशांतर्गत दहशतवादही पूर्णत: निपटून काढला.

प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक स्तरावर देशाला नवी दिशा देणार्‍या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्नेह मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला लाभला हे माझं परम् भाग्य आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मृत्यूमुळे आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली होती, ती भरून काढण्यास मोदीजींच्या माझ्यावरील विश्वासाची आणि प्रेमाची मोठीच मदत झाली. प्रत्येक भेटीच्या वेळी ‘कैसे है एकनाथजी’ असे विचारत ते खांद्यावर हात ठेवतात तेव्हा एक नवा विश्वास प्राप्त होतो, नवी उमेद निर्माण होते आणि राज्याच्या प्रगतीसाठी झोकून देण्याचे बळ मिळते. मी दोन वेळा माझ्या संपूर्ण कुटुंबासह त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी ज्या आस्थेने सगळ्यांची विचारपूस केली, वेळ दिला, ते पाहून नम्रता आणि मार्दव हे श्रेष्ठत्वाचे खरे अलंकार असतात याची जाणीव झाली. श्रीकांतला सलग दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, याचे श्रेय मोदीजींच्या मार्गदर्शनालाच जाते. एक प्रसंग अगदीच अलीकडचा आहे. कोलकाता येथे पश्चिम बंगालमधील पहिल्यावहिल्या भाजप सरकारचा शपथविधी सोहळा झाला. व्यासपीठावर नेत्यांची मांदियाळी होती. मीही त्यात होतो. मी त्यांना नमस्कार केला. तेव्हा जराही वेळ न दवडता त्यांनी माझी विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी वादळामुळे माझे हेलिकॉप्टर भरकटले होते. ते लक्षात ठेवून त्यांनी मला त्याबद्दल आवर्जून विचारले आणि प्रवासात काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्यांच्या अतिशय व्यग्रतेतही त्यांनी ती गोष्ट लक्षात ठेवून त्याबद्दल न विसरता चौकशी करावी, हे त्यांचे मोठेपण.

मोदीजींचा आजवरचा राजकीय प्रवास टीकेच्या अग्निपथावरूनच झालेला आहे. तरीही ते शपथ घेतल्यासारखे रात्रंदिवस देशासाठी काम करत आले आहेत. त्यामुळेच त्यांना पाहून मला नेहमीच हरिवंशराय बच्चन यांची कविता आठवत राहते-

तू न थकेगा कभी,

तू न थमेगा कभी,

तू न मुड़ेगा कभी,

कर शपथ, कर शपथ, कर शपथ!

अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

वैयक्तिक टीका, द्वेष आणि असूयेच्या अग्निपथावरून चालताना मोदीजी यापुढेही तसेच दिमाखात पावले टाकत राहतील, विरोधक, टीकाकारांच्या द्वेषाच्या मातीत, मोदीजी विकासाच्या बागा फुलवत राहतील याची मला खात्री आहे.

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र