‘पाडायचे की पडायचे?’ हा अग्रलेख वाचला. या प्रकरणाचा अधिक गंभीर भाग असा आहे की, मतदार नोंदणी अर्जात बदल करताना त्यासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे आणि नियमांमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे अपेक्षित असते. उपलब्ध वृत्तांनुसार, १९६०च्या मतदार नोंदणी नियमांमध्ये आवश्यक औपचारिक दुरुस्ती किंवा राजपत्रातील अधिसूचना जारी झाल्याचे आढळत नाही. त्याच वेळी, आयोगाने या अतिरिक्त घोषणापत्राला सर्वोच्च न्यायालयाच्या २७ मे २०२६च्या निर्णयाचा आधार असल्याचे म्हटले होते; मात्र न्यायालयाने आता त्या निर्णयाने फॉर्म ६मधील बदलांना मंजुरी दिल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.
म्हणून निवडणूक आयोगाने मनमानीने फॉर्म बदलला, विरोधी पक्षांना पाडण्यासाठी मतदारांचा हक्क हिरावून घेतला आणि हे कोणाच्या इशार्यावर केले, अशी शंका विरोधकांनी व्यक्त केली तर चूक ते काय? न्यायालयाने मंजुरी दिली नसताना न्यायालयीन मंजुरीचा आधार सांगितला गेला असेल, वैधानिक प्रक्रियेविना मतदार नोंदणीच्या अर्जात अतिरिक्त अट घालण्यात आली असेल आणि आयोगातीलच इतर दोन आयुक्तांनी त्या बदलाला अनधिकृत व बेकायदा म्हटले असेल, तर हा निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार आहे. मुळात हा बदल कोणी केला? त्याला कोणाची अधिकृत मान्यता होती? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार कशाच्या जोरावर देण्यात आला? आणि या बदलामुळे सुमारे १३ कोटी पात्र नागरिकांच्या मतदार म्हणून नोंदणीवर आक्षेप घेण्याचा अधिकार यांना कोणी दिला? एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे: मतदार यादी ही लोकशाहीतील नागरिकांच्या मतदानाच्या अधिकाराशी थेट जोडलेली सांविधानिक बाब आहे. त्यामुळे तिच्यातील प्रत्येक बदल कायदेशीर अधिकार, पारदर्शक प्रक्रिया आणि सार्वजनिक उत्तरदायित्व यांच्या कसोटीवरच तपासला गेला पाहिजे. पण आता निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या खोटेपणामुळे या तपासातून विरोधकांना पाडण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात ते स्वत:च पडतील, हे निश्चित. – जगदीश काबरे, सांगली
प्रश्नांची उत्तरे मिळतील का?
‘पाडायचे की पडायचे?’ हा अग्रलेख वाचला. निवडणूक आयोगाच्या निवडीप्रक्रियेत बदल घडवला गेला तेव्हापासून निवडणूक आयोग पक्षपातीच असल्याचे दिसते. आयोगाच्या तीन सदस्यांमध्ये एकमत नाही. फॉर्म-६मधील बदलांमुळे मतदारांना आपल्या पूर्वजांच्या नोंदी, २००२ साली मतदान केल्याचा तपशील भरावा लागत आहे. हा बदल कोणी घडवून आणला याचे उत्तर मिळालेले नाही. एसआयआरमुळे पश्चिम बंगालमधील मतदारांची नावे ज्या प्रमाणात वगळली गेली ते पाहता, तेथील भाजपचे सरकार वैध आहे की अवैध हा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातदेखील लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत विधानसभेच्या निवडणुकांत भरघोस मतदार वाढले होते आणि आता एसआयआर मोहीम सुरू झाल्यावर मात्र दोन कोटी मतदारांची नावे वगळली गेली. त्यामुळे खरे काय आणि खोटे काय असा संभ्रम निर्माण झाला आहे. यावर भाजपच्या प्रवक्त्या स्मृती इराणी म्हणतात, मृत आणि दुबार मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करायची का? तशी मागणी कोणीही केलेली नसताना इराणी त्यावर का बोलत आहेत? जंतर-मंतरवरील आंदोलकांवर पेलेट गन्स चालवण्याचा आदेश कुणी दिला, याचे उत्तर सरकारकडून अद्याप मिळालेले नाही. आता फॉर्म- ६ मधील बदल कोणाच्या आदेशाने करण्यात आले, हे स्पष्ट नाही. या प्रश्नांची उत्तरे मतदारांना कधीतरी मिळतील का? – शुभदा गोवर्धन, ठाणे</strong>
ही वावटळ लोकशाहीसाठी आवश्यक
‘पाडायचे की पडायचे?’ (६ ऑक्टो.) हे संपादकीय वाचले. यापूर्वी निवडणूक आयोगावर इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षपातीपणाचे आरोप झालेले नव्हते. ते आता होत आहेत. या घटनेच्या संदर्भाने इतिहासातील दोन राज्यकर्त्यांचे स्मरण होते. एक, एप्रिल १९२४ मध्ये मुसोलिनीची फॅसिस्ट पार्टी बहुमताने विजयी होऊन, मुसोलिनी सत्तारूढ झाला. त्या निवडणुकीत मतपत्रिका व मतमोजणीत मुसोलिनीने ‘ब्लॅकशर्टस’मार्फत मोठा घोटाळा केला होता. त्यामुळे अनेकांनी ती निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी केली. त्यातील प्रमुख तक्रारदार नेता जिआकोमो मॅत्तेओतीची मुसोलिनीने हत्या घडवून आणली. नंतर मुसोलिनीने स्वत:च्या मृत्यूपर्यंत खुल्या निवडणुका होऊन दिल्या नाहीत. दुसरे उदाहरण हिटलरचे आठवते. मार्च १९३३ मध्ये हिटलर-गोबेल्स यांनी एस. एस., एस. ए. यांच्या साहाय्याने बनावट मतदान घडवून आणले. त्यावर उमेदवार व पक्षांनी आक्षेप घेतले. पण राईशटॅग फायरने पेटवलेल्या द्वेषाच्या आगीने मध्यमवर्गाने त्या घोटाळ्याकडे दुर्लक्ष केले. आपला निवडणूक आयोग राबवत असलेल्या एसआयआरमुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येणार आहे. पूर्वी मतदारांना त्यांचे सरकार निवडण्याचा अधिकार होता, आता एसआयआरच्या माध्यमातून सरकार आपले मतदार निवडू लागले आहे. त्यामुळे विद्यमान केंद्र सरकार व निवडणूक आयोगाविरोधातील रस्त्यावरची वावटळ लोकशाहीसाठी आवश्यक आहे. – ॲड. सौरभ बागडे, पुणे
व्यवस्थेचीच साफसफाई करणे गरजेचे
‘पाडायचे की पडायचे?’ हे संपादकीय (लोकसत्ता- ६ ऑक्टोबर) वाचले. प्रश्न असा आहे, की आयोग या सर्व उचापती का करत आहे? कशासाठी? कोणासाठी? निवडणूक आयुक्त केवळ गंमत म्हणून कोट्यवधी नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळत असतील? या मागील हेतू काय? या सर्वांतून कार्यभाग कोणाचा साधला जात आहे? या प्रश्नांची उत्तरे सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ असताना केवळ आयोगावर टीकास्त्र सोडून काय साध्य होणार? आयोगात जे काही घडले तो देशद्रोहाचा नसेल, तर काय होते? सद्यस्थिती अशी आहे की, मतदार याद्यांची साफसफाई थांबवून आयोग व आयोगातील कठपुतळ्यांचे नियंत्रण करणार्या धन्यांची साफसफाई आधी करावी लागेल. आपल्या स्वातंत्र्याकरीता संपूर्ण देशाला, नागरिकांना, संस्थांना आपली कंबर कसून सडक्या व्यवस्थेची साफसफाई आता हाती घ्यावीच लागेल. – ललित अंबळकार, अकोला</strong>
विष्णुगुप्तास हाकलून द्यायचे?
‘सीएसएल’प्रकरणी आज सुनावणी’ ही बातमी (लोकसत्ता- ५ ऑक्टोबर) वाचली. सेंट्रल विस्ताअंतर्गत शास्त्री भवन हे जुने केंद्रीय सचिवालय ग्रंथालय येत्या काही दिवसांत पाडले जाणार आहे. हे एकप्रकारे राज्यकर्त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचेच लक्षण आहे. विश्वगुरू व्हायचे असेल तर ज्ञानोपासना करावी लागते, त्याकरिता ग्रंथ लागतात, याच विसरच राज्यकर्त्यांना पडलेला दिसतो.
प्राचीन काळी भारतात समृद्ध ग्रंथालये होती. नालंदा विद्यापीठात रत्नसागर, रत्नोदधी व रत्नरंजक या तीन इमारतींचे मिळून एक ग्रंथालय होते. इ.स. ११९३ मध्ये बख्तियार खिलजीच्या आक्रमणात हे ग्रंथालय जाळले गेले. मुघलांनीही समृद्ध ग्रंथालये उभारली. सम्राट अकबर याचेही भव्य ग्रंथालय होते. अकबर स्वत: निरक्षर असला तरी त्यास पुस्तके वाचून दाखवण्यासाठी अभिवाचक नेमलेले होते, तसेच १७ व्या शतकात तामिळनाडूतील तंजावर येथे राजे सरफोजी भोसले यांनी स्थापन केलेले सरस्वती महाल ग्रंथालय हे उत्तम उदाहरण आहे.
आधुनिक काळात ब्रिटिश सरकारने विविध प्रकारची ग्रंथालये स्थापन केली. १७८१ मध्ये स्थापन झालेले कलकत्ता कॉलेज असो, १७९२ मध्ये जोनाथन डंकन यांनी स्थापन केलेले बनारस संस्कृत कॉलेज असो वा १८०० मधील कलकत्ता फोर्ट विल्यम कॉलेज, या प्रत्येक कॉलेजचे स्वत:चे ग्रंथालय होते. भारताचे आजचे ‘राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकाता’ची १८३६ मधील स्थापना देखील ब्रिटिशांचेच कर्तृत्व आहे. केंद्रीय सचिवालय ग्रंथालयबाबतीत सरकारचे धोरण पाहता मला राहुल मित्रा लिखित ‘द बॉय फ्रॉम पाटलीपुत्र’ या ऐतिहासिक कादंबरीतील प्रसंग आठवला तो असा- तक्षशिला नरेश अम्बी राजा विद्यार्थ्यांकडून व प्रजेकडून होणार्या सततच्या आंदोलनांमुळे वैतागून त्याच्या गुरूंना विचारतो, ‘गुरुजी, ही आंदोलने माझ्याच काळात का होत आहेत? माझे आजोबा सम्राट असताना असे कधीच झाले नाही.’ त्यावर गुरू उत्तरतात, ‘राजा, तुझ्या आजोबांच्या काळात प्रजा शिक्षित नव्हती, राजा जे काही देईल ते प्रजेला खूप वाटायचे. आज विद्यापीठाचे कुलगुरू विष्णुगुप्त शिक्षणाचा प्रसार करीत आहेत. शिक्षित लोक हक्कांबाबत जागरूक होतात व आंदोलने करतात. तुला निरंकुश सत्ता गाजवायची असेल तर विद्यापीठ बंद कर आणि त्या विष्णुगुप्तास हाकलून दे.’ – ॲड. श्रीराम जाधव, पुणे (सदस्य- इंडियन लायब्ररी असोसिएशन)
loksatta@expressindia.com
