‘‘कमिशन’ की ‘ओमिशन’?’ हा अग्रलेख (२२ सप्टेंबर) वाचला. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबवलेली एसआयआर मोहीम ही ममता बॅनर्जी यांच्या मतदारांच्या खच्चीकरणासाठी सत्ताधार्‍यांच्या इशार्‍यावर राबवल्याचे स्पष्ट दिसते. केंद्रातील सत्ताधार्‍यांना डाव्या विचारसरणीच्या मतांचे खच्चीकरण होणे गरजेचे वाटत असावे, त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाचे आदेश डावलून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीचे अधिकार २०२३मध्ये कायदा करून स्वत:कडे घेतले गेले. शिवाय त्यांना कायद्याचे संरक्षण देऊन मनमानी करण्याची मुभाही मिळवून दिली. परिणामी निवडणूक प्रक्रियेत नि:पक्षपातीपणाच्या चिंधड्या उडत आहेत. २०२३चा कायदा मोडीत काढून निवडणूक आयुक्तांच्या नाकात वेसण घातल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष होऊच शकणार नाही. – किशोर थोरात, नाशिक

विरोधक आक्षेप का घेत नाहीत?

‘‘कमिशन’ की ‘ओमिशन’?’ हा अग्रलेख वाचला. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला एसआयआर करण्यास परवानगी देताना याबाबतचा स्पष्ट आराखडा मागवला नाही, वर्गीकृत पातळीवर छाननी करताना उद्भवू शकणार्‍या संभाव्य समस्यांबाबतसुद्धा प्रश्न उपस्थित केले नाहीत. आयोग ही प्रक्रिया नेमकी कशी पुढे नेणार आहे, याबाबत देश अंधारातच राहिला. देशातील विरोधी पक्षही या प्रक्रियेच्या अंमलबजावणीतील समस्या प्रभावीपणे मांडण्यात अपयशी ठरले. आज विरोधी पक्ष विखुरलेल्या स्थितीत आणि नि्क्रिरय आहे. त्यांना एकत्रितपणे कायदेशीर आणि सार्वजनिक मोहीम उभारण्यात अपयश आले आहे. अशा स्थितीत सत्ताधारी पक्षाने एसआयआरचा स्वत:च्याच फायद्यासाठी वापर करून घेतल्यास नवल नाही. – पराग देशमुख, ठाणे</strong>

त्यापेक्षा खरे प्रश्न जाणून घ्या

‘‘तुळूनाडू’त भाजपला काँग्रेसचे आव्हान’ हा ‘अन्वयार्थ’ (२२ सप्टेंबर) वाचला. तुळू ही बंट समाजाची भाषा असून हा समाज मंगळूरू, उडुपीमध्ये एकवटलेला असला तरी ही भाषा संपूर्ण कर्नाटकात बोलली जाते कारण व्यवसायानिमित्त हा समाज सर्वत्र पसरलेला आहे. परिणामी या निर्णयामुळे काँग्रेसला लोकांचे प्रेम मिळेल, पण हा निर्णय घेऊन काँग्रेसने भाजपला आव्हान दिसे आहे, असा निष्कर्ष काढणे जरा जास्त वाटते. त्यापेक्षा तिथल्या बंट समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर जास्त पाठिंबा मिळेल. – माया भाटकर, बाणेर (पुणे)

विश्वास अभेद्य रहणे गरजेचे

‘टाटांचा वारसा जपायलाच हवा…’ हा लेख (२२ सप्टेंबर) वाचला. ‘टाटा सन्स’ची मालकी रचना ही जागतिक भांडवलशाहीत अत्यंत दुर्मिळ व्यवस्था असून, सर्वोच्च होल्डिंग कंपनीचे दोन तृतीयांश समभाग धर्मादाय विश्वस्त संस्थांकडे असून तो निधी आरोग्य, शिक्षण, पोषण, उपजीविका, वैज्ञानिक संशोधन, कला संस्कृती इ. कामांसाठी वळवला जातो. सर्वोच्च पातळीवरील मालकी परोपकरासाठी बांधील असून देशासाठी संस्थेचे योगदान अभूतपूर्व आहे. १०० वर्षे जपलेल्या विश्वासनिर्मितीचा हा जागतिक विक्रमच ठरला आहे. आज सरकार, कंपन्या, विद्यापीठे, प्रसारमाध्यमे आणि धर्मादाय संस्थांवरील लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर टाटांवरील विश्वास अभेद्य राहणे गरजेचे आहे. – प्रदीप करमरकर, ठाणे

नियम अधिक कठोर हवेत!

‘सागरी किनारा मार्गावर तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू’ ही बातमी (लोकसत्ता- २१ सप्टेंबर) वाचली. भारतात रस्त्यांवरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण चिंताजनक असून ते रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी सर्व वाहनांना वेगनियंत्रक बसवावेत. वाहन चालक परवाना देण्याची वयोमर्यादा वाढवून तो दुचाकीसाठी ३० वर्षे व चारचाकीसाठी ४० वर्षे करण्यात यावा. रस्ते अपघातातील मृत्यूस वाहन चालक जबाबदार असेल तर चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अपघाताला जबाबदार वाहन कायमचे जप्त करावे आणि दोषी आढळलेल्या वाहनचालकाला त्यांच्या वाहनाच्या किमतीच्या दसपट दंड आकारण्यात यावा. दोषी चालकांचा परवाना कायमचाच रद्द करावा. जितकी कठोर शिक्षा तितकेच गुन्ह्याचे प्रमाण कमी राहील, अशी आशा. – आशुतोष साठे, बोरीवली (मुंबई)