सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना साष्टांग दंडवत. त्यांनी वेळीच हस्तक्षेप करून माझी विटंबना थांबवली. अन्यथा माझ्यावर पहुडलेला तो तथाकथित उमेदवार माझ्यासकट थेट निवडणूक अधिकार्‍यांच्या कक्षातच पोहोचला असता. आजकाल प्रसिद्धीसाठी कोण कशाचा आधार घेईल हे सांगता येत नाही हेच खरे! ज्यांचे जीवनातले मार्ग संपलेले असतात तेच माझ्यावर पहुडतात. हा महाभाग त्याच्या राजकीय जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी मला घेऊन निघाला होता. आजचा काळच उफराटा. त्यामुळे या उपटसुंभाला दोष तरी किती द्यायचा? काय तर म्हणे, सगळे नेते मेलेले आहेत. त्यांना जागे करण्यासाठी माझा प्रतीकात्मक वापर करायचा आहे म्हणून. अरे महाभागा, सगळेच नेते मेले असतील तर याच नेत्यांना फोन करून, त्यांच्याशी झालेले संभाषण ध्वनिमुद्रित करून ते समाजमाध्यमावर टाकण्याचा धंदा तरी तू का करतोस? तुझ्या फोनच्या जाळ्यात जे अडकतात ते आत्मे आहेत की हाडामांसाचे जीव? एकदा हे स्पष्ट करून सांग ना जरा! एकीकडे नेत्यांना फोन लावून त्यांना बदनाम करण्याचा धंदा जोमात करायचा व दुसरीकडे ते मेलेले म्हणत निवडणुकीच्या रिंगणात उडीही घ्यायची यातला विरोधाभास तरी कळतो का तुला?

तू या जगातला पहिला माणूस आहेस जो जिवंतपणी मेल्याचे सोंग घेत माझ्यावर आडवा झाला. हा तुझा उपद्व्याप मी का म्हणून सहन करायचा? भलेही दोन मोठे बांबू व दहा-वीस कामट्यांनी मला आकार येत असेल पण मलाही काही इज्जत आहे की नाही? माझे साकार होणे अल्पकाळासाठीचे. माझा मार्गही ठरलेला. मृताच्या घरापासून स्मशानापर्यंतचा. त्यापलीकडे मला भविष्य नाही. मात्र माझे अस्तित्व मुक्तीच्या मार्गाकडे नेणारे अशी तमाम लोकांची श्रद्धा. त्याला तडा देऊन तुला साधायचे तरी काय?

स्वत: मरण्याचे नाटक करून तू व्यवस्थेला जिवंत करण्याचा प्रयत्न करतोस. हा तमाशा आहे, हे तुझ्या लक्षात येत नाही काय? मी मृत्युपर्वात वापरले जाणारे निमित्तमात्र साधन. सर्वसंगपरित्यागानंतरच्या अंतिम प्रवासातले. त्याचा वापर करून तू राजकारणात चैतन्य आणू पाहतोयस, हे कसे शक्य आहे याचा विचार तरी कधी केला आहेस का? माझ्याविषयी तुला एवढेच ममत्व असेल तर त्या शकुंतला परांजपेंची कथा वाच! माझ्यावर लिहिलेली. मग कळेल तुला माझी किंमत व गांभीर्यसुद्धा! अरे, माझे अस्तित्व जरी अल्पकाळासाठी असले तरी लक्ष असते माझे जगरहाटीकडे. निवडणुकीचा अर्ज भरायला लोक कधी हत्तीवर स्वार होतात, तर कधी घोड्यावर. आता रथाची फॅशन आहे. महागडी कार व सजवलेले ट्रक हे तर नित्याचेच. हे सगळे विसरून तुला माझा वापर करण्याची बुद्धी कुठून झाली?

त्या तिकडे पुण्यानगरीत पवारांच्या रोहितने कुणा आयोगाच्या अध्यक्षाची अंत्ययात्रा काढण्यासाठी माझा वापर केला म्हणे! अरे, हे चाललेय काय? माझा वापर करून राजमार्ग गाठता येतो असे अनेकांना वाटू लागले की काय? तुम्हाला तुमचे राजकीय उट्टे काढायचे असेल तर जरूर काढा. माझी काही ना नाही त्याला. पण, उगीच माझ्याभोवती असलेल्या गांभीर्याच्या वलयाची चेष्टा का करताय? थांबवा रे हे उद्योग. कलेवरांना अनंतात विलीन करण्याचे काम सुखाने करू द्या की मला.