Our age is the age of critique, to which everything must submit. – Emanuel Kant
‘क्रिटीक ऑफ प्युअर रीझन’ (१७८१), ‘क्रिटीक ऑफ प्रॅक्टिकल रीझन’ (१७८७), ‘क्रिटीक ऑफ जजमेंट’ (१७९०), या तीन ग्रंथांचा लेखक जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट याचा ‘क्रिटीक’ या शब्दाशी इतका घनिष्ठ संबंध आहे की, ‘क्रिटीक’ असं म्हणताच इमॅन्युएल कांटचं नाव नजरेसमोर येतं. ‘क्रिटीक ऑफ प्युअर रीझन’ (१७८१) ग्रंथात कांट नमूद करतो की ‘आपलं युग चिकित्सेचं युग आहे…’ असं युग जिथं कुठलाही अपवाद न करता ‘सगळ्या गोष्टींची कठोर चिकित्सा झाली पाहिजे. पावित्र्याच्या आडून धर्म आणि भव्यतेच्या आडून राज्यसंस्था चिकित्सेपासून स्वत:ची सुटका करण्याचा प्रयत्न करते. पण असे प्रयत्नच त्यांच्याविषयी संशय निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. धर्मसंस्था आणि राज्यसंस्था बिनशर्त आदरासाठी आग्रह धरतात; पण आदर अशाच गोष्टींना मिळू शकतो ज्या सार्वजनिक सत्यशोधनाच्या कसोटीवर टिकतात.’
याआधीही आपण पाहिलं की Was ist Auflä rung या छोटेखानी निबंधात प्रबोधनाची व्याख्या करतानासुद्धा sapere aude अर्थात चिकित्सा करून जाणून घेण्याचं धाडस करा, या ब्रीदवाक्याने कांट चिकित्सेला मध्यवर्ती स्थान देतो. कांटनं sapere aude या प्रबोधनपर्वाच्या ब्रीदवाक्यात ‘चिकित्सेसाठी धाडस अनिवार्य आहे’ हे निदर्शनास आणून, ‘तत्त्वज्ञानाची सामाजिक आणि राजकीय जीवनापासून फारकत करता येणार नाही’, हेही अधोरेखित केलं आहे. थोडक्यात, चिकित्सा मध्यवर्ती मानणाऱ्या कांटनं ‘क्रिटिकल फिलॉसफी’ची मुहूर्तमेढ करून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाला ऐतिहासिक वळण दिलं. कांटच्या भाषेत सांगायचं तर, त्यानं वयाच्या ५७व्या वर्षी पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात ‘कोपर्निकन क्रांती’ घडवून आणली. (सूर्य पृथ्वीभोवती नव्हे, पृथ्वीच सूर्याभोवती फिरते- हे कोपर्निकसनं १६ व्या शतकात सिद्ध केलं होतं).
कांटची कोपर्निकन क्रांती समजून घेण्यासाठी प्रस्तुत लेखात तिची पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. त्याआधी कांटविषयी थोडं : १७४० मध्ये प्रशियाच्या पूर्व भागातल्या कनिसबर्ग या शहरात श्रमिक आणि श्रद्धाळू कुटुंबात जन्मलेल्या इमॅन्युएल कांटची आई निरक्षर आणि वडिलांचं शिक्षण जेमतेम प्राथमिकपर्यंतच होतं. वयाच्या आठव्या वर्षी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था अतिशय शिस्तप्रिय वातावरणात करण्यात आली. लहानपणी अंगवळणी पडलेली शिस्तप्रियता कांटने मरेपर्यंत सोडली नाही. त्याला लहानपणीच लॅटिन कविता तोंडपाठ करण्याची आवड होती. तर निसर्गाविषयीची आवड, संवेदनशीलता त्याच्या आईनं रुजवली होती. तो १३ वर्षांचा असतानाच त्याच्या आईचा मृत्यू झाला.
कांटच्या विद्यापीठीय शिक्षणाची सुरुवात झाली त्याच वर्षी- १७४० मध्ये प्रशियात दुसरा फ्रेडरिक अर्थात फ्रेडरिक द ग्रेट सत्तेवर आला. कांट कधीही दरबारी तत्त्वज्ञ झाला नाही. मात्र अप्रत्यक्षपणे उदारमतवादी ‘प्रबुद्ध फ्रेडरिक’ची राजवट त्याच्या चिकित्सक तत्त्वज्ञानासाठी पूरक ठरली. कांटची ठाम भूमिका होती की सोन्याची साखळी असो वा लोखंडी साखळदंड शेवटी साखळी ही बेडीच ठरते! आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कांटला खासगी शिकवणी करून दोन पैसे कमवणं भाग होतं. कांटची शरीरयष्टी नाजूक. सव्वापाच फूट उंची आणि तुलनेनं डोक्याचा आकार मोठा असलेली ही लहान मूर्ती नीटनेटक्या पेहरावामुळे उठून दिसे. वयाच्या ३१ व्या वर्षी कांट प्रिव्हाटडोचन्ट अर्थात विद्यापीठीय व्याख्याता झाला. तो कधीही प्रशियाच्या बाहेर पडला नाही. त्याच्या शिस्तबद्ध दिनचर्येविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. न चुकता सकाळी पाच वाजता उठून कांटचं दैनंदिन जीवन म्हणजे अध्ययन, अध्यापन, लिखाण, विश्रांती, चिंतन. सगळ्या गोष्टींचं नियोजन एखाद्या जर्मन यंत्राप्रमाणे चाले. फिरायलाही तो ठरावीक मार्गानंच, ठरावीक वेळीच जायचा. तब्बल ४० वर्षांत त्याचं फिरायला जाणं दोनदाच चुकलं – एकदा रूसोचं Emile पुस्तक वाचत असताना आणि मग, फ्रेंच राज्यक्रांतीची बातमी कानावर पडली तेव्हा. कांटनं अविवाहित राहून, दीर्घ आयुष्य तत्त्वज्ञानाला समर्पित केलं.
अध्ययन, अध्यापन, चिंतनात कित्येक वर्षं वेचल्यावर कांटला मानवी बुद्धीनं ( Human reason) आतापर्यंत साधलेल्या प्रगतीत मूलभूत अंतर्विरोध जाणवला. ‘क्रिटीक ऑफ प्युअर रीझन’ ग्रंथात बुद्धिवादी आणि अनुभववादी तत्त्वप्रवाहांचं वर्णन करताना कांट लिहितो की, इंद्रियगोचर वास्तवाशी फारकत घेऊन मानवी बुद्धीनं केलेल्या धाडसी परिकल्पना म्हणजे मानव मनाची बाल्यावस्था. या अवस्थेत संवेदनक्षमता, आकलनक्षमता, विचारक्षमता, स्मरणक्षमता, कल्पनाशक्ती या बौद्धिक क्षमतांची भेसळ आढळते. बाल्यावस्थेत टाकलेल्या या पहिल्या पावलात कांटला dogmatism दिसतं. या अनुभवपूर्व आणि अनुभवनिरपेक्ष बुद्धिवादाचं वर्णन करताना कांटचा अप्रत्यक्ष रोख लायबनिचच्या बुद्धिवादावर दिसतो. पहिलं पाऊल झापडबंद बुद्धिवादी; पण या पावलाला वास्तव जगाच्या अनुभवातून गती/ चेतना देणारं दुसरं अनुभववादी पाऊल अनिवार्यपणे संशयवादाकडे नेतं. त्यामुळे, न्यूटोनियन विज्ञान आणि वैश्विक नीतिशास्त्रालाही ठोस आधार देता येत नाही, असा पेच (क्रायसिस) उद्भवतो. त्या पेचात कांटला ‘स्कॅन्डल ऑब रीझन’ दिसलं.
ज्ञान क्षेत्रातील बुद्धिवादी आणि अनुभववादी पावलांमुळे मूलभूत अंतर्विरोध निर्माण होऊन मानवी बुद्धी संकटग्रस्त अवस्थेत सापडली आहे हे त्यानं अचूकपणे ओळखलं. या पेचातून बाहेर पडण्यासाठी तिसरं पाऊल टाकण्याची आवश्यकताही त्यानं हेरली. त्यानं सुचवलेलं तिसरं पाऊल म्हणजे ठोस वैश्विक तत्त्वांच्या आधारे मानवी बुद्धीची कठोर चिकित्सा. फक्त मानवी बुद्धीच्या आशयद्रव्याचीच नव्हे तर सर्वांगाने मानवी बुद्धीच्या क्षमतेची आणि अनुभवपूर्व परिकल्पनांची चिकित्सा. कांट स्पष्ट करतो की, या तिसऱ्या पावलाचं प्रयोजन मानवी बुद्धीला पायबंद घालणं नसून बुद्धीची चिकित्सा करणं आहे जेणेकरून आधुनिक विज्ञानाचे शोध आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक- नैतिक व्यवहार यांच्यातल्या संबंधाचा उलगडा करता येईल. थोडक्यात, कांटला मानवी बुद्धीच्या चालचलनाची कठोर चिकित्सा करणं अनिवार्य वाटलं. पण इथं नमूद करणं आवश्यक आहे की कांटच्या लिखाणात मानवी बुद्धी विरुद्ध धर्मश्रद्धा किंवा भावनावाद असा झगडा नाही. प्रगल्भ, उमद्या बुद्धीनंच बुद्धिवादाची ही चिकित्सा तो करतो आणि मानवी बुद्धीत आत्मचिकित्सेची क्षमता दडलेली असतेच, यावरचा विश्वास दृढ करतो.
कांटनं दिलेल्या क्रिटिकल वळणाचं स्वरूप समजून घेण्यासाठी ‘क्रिटीक’ या शब्दाचा नेमका अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. खरंतर, critique, crisis, criterion या शब्दांच्या मुळाशी ग्रीक क्रियापद krinein आहे. आजच्या घडीला या शब्दांचे अर्थ अनुक्रमे चिकित्सा, संकट वा पेच, निकष असे होतात. पण तत्त्वज्ञानात या तीनही शब्दांमध्ये आंतरिक संबंध आहे. ग्रीक krinein क्रियापदाचा अर्थ नकारात्मक नसून रचनात्मक आहे. krinein म्हणजे डोळसपणे निवड करणं, फरक करणं, निर्णय घेणं, वळण घेणं. त्या अनुषंगानं, क्रायसिस म्हणजे अशी गुंतागुंतीची परिस्थिती जिथं क्रिटीक – चिकित्सा करणं- अनिवार्य ठरतं, जेणेकरून प्राप्त संकटग्रस्तावस्थेतील पेच सोडवता येतो. पण कुठल्याही प्रकारची चिकित्सा करण्यासाठी क्रायटेरियन अर्थात निकष आणि तत्त्वं नमूद करणंसुद्धा आवश्यकच. प्रबोधनपर्वाचा महामेरू समजल्या जाणाऱ्या इमॅन्युएल कांटच्या तत्त्वज्ञानात १४व्या शतकाच्या उत्तरार्धातल्या प्रबोधनपर्वाचा क्रायसिस (संकटग्रस्तावस्था), क्रिटीक (चिकित्सा) आणि क्रायटेरियन (निकष) या तीन्ही पैलूंची शिस्तबद्ध चर्चा आढळून येते.
समग्र मानवी व्यवहाराला कवेत घेण्याची क्षमता फार कमी तत्त्वज्ञांच्या लिखाणात आढळते. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात ज्यांच्या नावानं स्वतंत्र विचारप्रवाह उदयास आला, असे दिग्गज तर अगदीच मोजके. जर्मन तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट हा त्या मोजक्यांपैकी एक; कारण ‘कांटवादा’त मानवी व्यवहाराची समग्रलक्ष्यी मांडणी आढळते. पण कांट स्वत: कांटवादी कधी आणि का झाला याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. खरंतर, कांट देकार्तच्या बुद्धिवादी ( rationalism) चौकटीत असल्यानं कार्टेशियन होता. वयाच्या ५७ व्या वर्षी, १७८१ मध्ये कांट ‘क्रिटीक ऑफ प्युअर रीझन’ या ग्रंथात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची पुनर्मांडणी करून ‘कांटवादी’ होतो. तोवर प्रख्यात स्कॉटिश तत्त्वज्ञ डेव्हिड ह्यूम वैज्ञानिक ज्ञानाला ‘केवळ संभाव्य (probable) ज्ञाना’चा दर्जा देऊन दुसऱ्या बाजूला तत्त्वज्ञानाची निरर्थकताही निदर्शनास आणतो, तेव्हा मात्र कांटची जणूकाही झोपच उडते! दुसऱ्या बाजूला, रूसोचा शक्तिशाली भावनावाद तत्कालीन बुद्धिवादाच्या अपुरेपणाला अधोरेखित करतो. त्यात रूसोनं केलेलं ‘स्व’ सूक्ष्म निरीक्षण ज्ञानाच्या व्यवहारातल्या ज्ञाता आणि ज्ञेय यांमधल्या प्रस्थापित संबंधाला प्रश्नांकित करायला भाग पाडतं. ‘वस्तुनिष्ठता’ या संकल्पनेच्या पुनर्मांडणीची आवश्यकता भासते. थोडक्यात, १८व्या शतकाच्या उत्तरार्धातील सैद्धान्तिक झटापटींमुळे ज्ञानाच्या व्यवहाराला सैद्धान्तिक रणभूमीचं ( Kampfplatz der Metaphysik) स्वरूप प्राप्त होतं. संकटग्रस्तावस्थेत सापडलेल्या समग्र ज्ञानव्यवहाराची कांट कठोर चिकित्सा करून, पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची पुनर्मांडणीच करतो. कांटच्याच शब्दांत सांगायचं तर तो पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात ‘कोपर्निकन क्रांती’ घडवून आणतो. तिची तपशीलवार चर्चा पुढल्या लेखात.
शरद बाविस्कर (जेएनयूतील अध्यापक)
sharadcrosshuma@gmail.com
