प्रबोधनपर्व म्हणजे मध्ययुगीन अंधकाराचा नाश करून समग्र मानवतेसाठी नव्या युगाचं क्षितिज दाखवणारी प्रकाशमय ऐतिहासिक प्रक्रिया. फ्रेंच राज्यक्रांतीमुळे ते क्षितिज दिसलंसुद्धा. पण पुन्हा एकोणिसाव्या शतकाला गडद सावल्यांनी घेरलं…

Bliss was it in that dawn to be alive.

– William Wordsworth

फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्रेक १७८९ मध्ये झाला. जुन्या धर्माधिष्ठित राजवटीचा (L’ Ancien ré gime) शेवट घडवून जगभरातील राजेशाहींना धडकी भरवणाऱ्या या घटनेमुळे फक्त फ्रान्समध्येच नव्हे तर संपूर्ण जगात उत्साहाचं आणि आशावादाचं वातावरण निर्माण झालं. कारण फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे एका राजानं दुसऱ्या राजाची केलेली उचलबांगडी किंवा निव्वळ एक सत्तापालट नसून जगाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी घटना होती. एरवी तटस्थ किंवा खिन्न मानसिकतेत जगणाऱ्या तत्त्वज्ञांमध्येही या युगप्रवर्तक घटनेमुळे उत्सुकतेची आणि उल्हासाची भावना निर्माण झाली होती! पॅरिसपासून शेकडो मैल दूर कनिसबर्गमधील इमॅन्युएल कांटसारख्या जर्मन तत्त्वज्ञाला या घटनेत इतिहासानं टाकलेलं पुढचं पाऊल दिसलं. कांटच्या कठोर शिस्तबद्धतेविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. कांटने मोजून दोनदाच त्याचा सायंकाळचा फेरफटका चुकवला होता असं म्हटलं जातं. पहिल्यांदा रूसोचं पुस्तक वाचण्यात गर्क झाल्यामुळे आणि दुसऱ्यांदा फ्रेंच राज्यक्रांतीच्या बातमीमुळे! खरं तर, कांट फ्रेंच राज्यक्रांतीच्या उदारमतवादी टप्प्याचा समर्थक होता. पण फ्रेंच राज्यक्रांतीनं रोबेस्पिएरच्या नेतृत्वाखाली रक्तरंजित वळण घेतलं तेव्हा फ्रेंच राज्यक्रांती कांटच्या ‘मर्यादित’ ज्ञानक्षमतेपलीकडे जाणारी राजकीय घटना ठरली.

इंग्लंडमध्येसुद्धा थॉमस पेन आणि प्रसिद्ध कवी विल्यम वर्ड्सवर्थसारखे विचारवंत, कवी फ्रेंच राज्यक्रांतीनं भारावून गेले होते. वर्ड्सवर्थनं तर फ्रेंच राज्यक्रांतीचा उल्लेख नव्या युगाची पहाट म्हणून केला आहे. तो म्हणतो, ‘त्या पहाटेचा साक्षीदार असणं परमसुख होतं!’ स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या मूल्यत्रयीचा जगभर प्रसार करण्याचा विडा उचलणाऱ्या नेपोलियनबद्दल प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ हेगेलला तर Weltseele zu Pferde अर्थात जागतिक इतिहासाचा आत्मा अश्वारूढ होऊन आगेकूच करीत आहे असं वाटलं. हेगेलच्या नजरेत प्रबोधनपर्वाच्या मुक्तिदायी विचारांनी प्रेरित नेपोलियनच्या लष्करी मोहिमा म्हणजे साक्षात मानवी स्वातंत्र्याचं आणि स्वभानाचं ऐतिहासिक प्रकटीकरण.

१४ जुलै १७८९ रोजी बास्तीईच्या पाडावानंतर फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात झाली आणि अवघ्या दीड महिन्यात राष्ट्रीय घटनासभेत ‘वैश्विक मानवी आणि नागरिकांच्या हक्कांची घोषणा’ करण्यात आली. ही ऐतिहासिक घोषणा म्हणजे प्रबोधनपर्वाच्या तत्त्वज्ञानात्मक गाभ्याचं राजकीय प्रकटीकरण होय. या घोषणेच्या मानवतावादी तर्कांतर्गत गुलामगिरीच्या प्रथेचं निर्मूलन करणं क्रमप्राप्त होतं. त्यामुळे रोबेस्पियरच्या नेतृत्वाखाली १७९४ मध्ये अधिकृतपणे गुलामगिरीच्या प्रथेचं निर्मूलन करून फ्रेंच वसाहतींमध्ये राबणाऱ्या लाखो गुलामांना मुक्त करण्यात आलं. पण फ्रेंच राज्यक्रांतीनं घेतलेली ही तात्त्विक झेप आणि तत्कालीन वास्तव यांत मोठी दरी होती. अठराव्या शतकात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक रचनेचं केंद्र उमराव वर्गापासून व्यापारी बुर्ज्वा वर्गाकडे सरकलं होतं खरं; पण राजकीय सत्ता मात्र उमराव वर्गाच्या हातातच होती. त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीकडे बुर्ज्वा वर्गानं स्वत:च्या आर्थिक सत्तेला अनुरूप उमराव वर्गाकडून राजकीय सत्ता काबीज करण्याची घटना म्हणून पाहता येतं. त्याअर्थी, फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान झालेला प्रबोधन विचारांचा जागर म्हणजे सर्वार्थानं पिचलेल्या कष्टकरी वर्गाला बुर्ज्वा वर्गानं दाखवलेलं मुक्तीचं गाजर ठरतं.

फ्रेंच राज्यक्रांतीचा संकोच एका ठरावीक स्पष्टीकरणात करणं अशक्य असलं तरी एक गोष्ट मात्र नक्की की, रोबेस्पिएरच्या पतनानंतर बुर्ज्वा वर्ग फ्रेंच राज्यक्रांतीला हवं तसं वळण देण्यात यशस्वी झाला. विशेषकरून, नेपोलियनच्या उदयानंतर बुर्ज्वा वर्गानं प्रबोधनपर्वाचा मानवतावादी प्रकल्प स्वत:पुरता सीमित करून श्रमिक वर्गाला तसंच ताटकळत ठेवलं. एवढंच नव्हे तर १८०२ मध्ये फ्रेंच वसाहतवाद्यांच्या भांडवलवादी तर्कासमोर शरण जाऊन नेपोलियननं अध्यादेश काढून गुलामगिरीची प्रथा परत प्रस्थापित केली. मात्र नेपोलियनच्या या कृतीत त्याचाच एके काळचा विश्वासू लष्करी अधिकारी लुई दलग्रेसला प्रबोधनपर्वाच्या उदात्त तत्त्वज्ञानाचा घात दिसला. त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूल्यांशी प्रतारणा करणाऱ्या नेपोलियनच्या विरोधात दलग्रेसनं बंड पुकारून कॅरिबियनमधील कृष्णवर्णीयांना संघटित करून गुआडालुप बेटावर निकराचा लढा सुरू ठेवला. दलग्रेसचं बंड चिरडून टाकण्यासाठी नेपोलियननं रिशपॉन्स या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली लष्करी कारवाई सुरू केली. शेवटी लुई दलग्रेससह शेकडो कृष्णवर्णीयांना सेंट चार्ल्सच्या किल्ल्यात घेरण्यात आलं. मात्र लुई दलग्रेसनं शरणागती पत्करण्याऐवजी किल्ल्यातल्या दारूगोळ्याला पेटवून Live free or die! च्या घोषणा देत शेकडो समर्थकांसह आत्मदाह केला. लुई दलग्रेसची वैचारिक जडणघडण प्रबोधनपर्वाच्या विचारांमध्ये झाली होती. त्यानं त्याच्या शेवटच्या उद्गारात प्रबोधन-प्रकल्पानं दाखवलेलं मानवमुक्तीचं भव्य स्वप्न आणि वस्तुस्थिती यांमधली दरी अधोरेखित केली आहे. खरं तर, ही घटना आधुनिकतेच्या गर्भपाताचं ठळक उदाहरण समजलं जातं!

याआधी आपण पाहिलं की, तत्त्वज्ञानाचं लोकाभिमुखीकरण हे प्रबोधनपर्वाचं महत्त्वाचं योगदान समजलं जातं. कारण प्रबोधनपर्वात मानवमुक्तीच्या विचारांची चर्चा आणि चिकित्सा करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची ऐतिहासिक मोहीम राबवण्यात आली होती. त्यामुळे प्रबोधनपर्व आधुनिकतेचा परमोच्च बिंदू ठरतो. एका बाजूला स्वातंत्र्य, समता, बंधुतासारख्या आधुनिकतेच्या मूल्यांविषयी जनतेच्या जाणिवेत वाढ झाली; पण दुसऱ्या बाजूला मात्र भौतिक वास्तव ठामपणे विषमतावादीच राहिलं.

त्यापुढल्या शतकात…

एकोणिसाव्या शतकात तर पाश्चात्त्य भांडवलवादी, वसाहतवादी, साम्राज्यवादी सत्तारूढ वर्गानं प्रबोधन प्रकल्पाचं (Project of Enlightenment) अपहरण केलं आणि आधुनिक मूल्यव्यवस्थेचा वापर नव्यानं उदयाला येणाऱ्या विषमतावादी व्यवस्थेचा नैतिक बुरखा म्हणून करण्यात आला. ही आधुनिक विषमता धर्माधिष्ठित नसली तरी तिला भेदताना माणसांमधील मानवतेचा चुराडा कसा होतो याचं चित्रण बाल्ज़ाक, एमिल झोला, चार्ल्स डिकन्स यांच्यासारख्यांच्या साहित्यात दिसतं.

सोबतच एकोणिसाव्या शतकात कार्ल मार्क्स, सिग्मंड फ्रॉईड, फ्रेडरिक नित्श्चे, चार्ल्स डार्विन, फर्डिनांड द सोस्यूर यांच्यासारख्यांनी प्रबोधन-प्रकल्पाच्या मुळाशी असलेल्या एकजिनसी कार्टेशियन ‘स्व’च्या सार्वभौमत्वाच्या आणि स्वामित्वाच्या भावनेला जोरदार तडाखे दिले. प्रबोधनाचं तत्त्वज्ञान एकजिनसी विवेकशील व्यक्तीच्या विचारशीलतेला अग्रक्रम देतं. पण एकोणिसाव्या शतकातल्या या विचारवंतांनी दाखवून दिलं की, व्यक्तींच्या वर्तनाला नेणिवेतल्या विविध गोष्टी प्रभावित करत असतात. उदाहरणार्थ, कार्ल मार्क्सच्या नजरेत व्यक्तींच्या जीवनाला मुळात आर्थिक संरचना आणि हितसंबंध प्रभावित करत असतात. त्यामुळे त्यांची सार्वभौम विवेकशीलता भ्रांतमय ठरते. डार्विनच्या दृष्टीनं ‘मानव’ ही संकल्पना सतत प्रश्नांकित केली पाहिजे; कारण आपल्यातला पशू ( animal) मरत कधीही नसल्यानं आपलं जनावर ( beast) होऊ शकतं. डार्विनचे विचार प्रसिद्ध फ्रेंच लेखक एमिल झोलाच्या La bê te humaine अर्थात The Human Beast या दीर्घ साहित्यकृतीत प्रतिबिंबित होतात.

सिग्मंड फ्रॉईडसुद्धा प्रबोधन-प्रकल्पाच्या कार्टेशियन कर्ता आणि ज्ञाताच्या मुळावर प्रहार करतो. मनुष्याच्या जाणिवेच्या पातळ आवरणापलीकडे नैसर्गिक प्राण्याचं दमन झालेलं असल्याने मनुष्याची दृश्य प्रतिमा त्याच्या वास्तव अस्तित्वाविषयी फार कळू देत नसते. सोस्यूरची भाषाविषयक मांडणीसुद्धा सार्वभौम कार्टेशियन ज्ञाता आणि वक्त्याच्या स्वातंत्र्याविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित करते. त्याच्या मांडणीनुसार – भाषा म्हणजे दोन स्वतंत्र विवेकशील व्यक्तींमधल्या संवादाचं पोकळ साधन नसून भरीव वास्तव आहे. सामाजिक व्यवस्था म्हणून भाषा तुमचं पूर्वनिर्धारित स्थान निश्चित आणि मर्यादित करू पाहते.

‘फ्रॅन्कफर्ट स्कूल’ची टीका

खरं तर, प्रबोधनपर्वात आकाराला आलेल्या मूल्यांची चौफेर चिकित्सक चर्चा होऊन टोकाचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. उदा.- विसाव्या शतकातल्या फ्रॅन्कफर्ट स्कूलच्या अडोर्नो आणि होर्कायमर यांसारख्या विचारवंतांनी तर Dialectics of Enlightenment या ग्रंथात प्रबोधनपर्वाच्या मध्यवर्ती दाव्यालाच छेद देऊन प्रबोधनपर्वाच्या तत्त्वज्ञानानं मानवतेचा उत्कर्ष साधण्याऐवजी साम्राज्यवाद, वसाहतवाद, भांडवलवाद, बकाल शहरीकरण, महायुद्ध, ज्यूंचं शिरकाणसारख्या अनिष्ट गोष्टी शक्य करून मानवतेला विनाशवादी खाईत लोटलं असा युक्तिवाद केला आहे. दुसऱ्या बाजूला मात्र हेसुद्धा विसरता येणार नाही की हिटलर सत्तारूढ होताच त्याचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स १९३३ मध्ये रेडिओवरल्या प्रक्षोभक भाषणात जाहीर करतो की, ‘१७८९ हे वर्ष इतिहासातून पुसून टाकलं जाईल!’ कारण फ्रेंच राज्यक्रांतीचे मानवी हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही तत्त्वे नाझी राजवटीत अप्रस्तुत ठरतात!

थोडक्यात, आधुनिकतेच्या केंद्रभागी असलेल्या कार्टेशियन ‘स्व’च्या सार्वभौमत्वाच्या आणि स्वामित्वाच्या भावनेला झालेल्या जखमांमुळे एकोणिसाव्या शतकात आधुनिकता पूर्णपणे संकटग्रस्त झाली. मात्र याच काळात, प्रबोधन तत्त्वज्ञानाच्या पाश्चात्त्यकेंद्री दृष्टिकोनाला बाद करून इतर परंपरांमधील प्रबोधन तत्त्वज्ञानांचं उत्खनन करण्यात आलं. कारण प्रबोधन-प्रकल्पातल्याच विचारांप्रमाणे मानवमुक्तीचं तत्त्वज्ञान कुण्या एका स्थळकाळाची मक्तेदारी असू शकत नाही. तशी मक्तेदारी मानणं हे विषमतावादीच. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाश्चात्त्य साम्राज्यवादी, वसाहतवादी, भांडवलवादी शक्तींनी प्रबोधन तत्त्वज्ञानाचा विपर्यास केला म्हणून प्रबोधन-प्रकल्पातील लोकशाहीचे विचार पूर्णपणे बाद करता येत नाही. कारण तसं करणं म्हणजे throwing the baby out with the bathwater ठरेल.

या लेखात उपस्थित केलेल्या प्रबोधनोत्तर पैलूंची सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यासाठी आणखी एक लेखमाला आवश्यक आहे. तूर्तास पुढल्या- २९ डिसेंबरच्या लेखापर्यंत थांबू.