‘एपिग्राफी’ म्हणजे पुरालेखविद्या किंवा जुने शिलालेख वाचणे/ त्यांचा अर्थ लावणे याचे शास्त्र. भारतात अनेक लिप्या, त्यातही काही कालौघात लुप्त झालेल्या; त्यामुळे या शास्त्राची गरज अधिक. भारतीय पुरालेखशास्त्रज्ञ व्ही. व्यंकय्या (१८६४-१९१२) यांनी महाबलिपुरमच्या शिलालेखांचा अर्थ लावण्यासह अनेक महत्त्वाची कामे केली; त्यांच्या स्मृत्यर्थ ‘तमिळ हेरिटेज ट्रस्ट’तर्फे देण्यात येणारा ५० हजार रु. रोख आणि मानपत्र अशा स्वरूपाचा,‘व्ही. व्यंकय्या पुरालेखविद्या पुरस्कार’ यंदा प्रा. सी. सोमसुंदर राव यांना जाहीर झाला होता. येत्या २९ ऑगस्ट रोजी प्रा. राव यांना पुरस्कार देण्याचा समारंभ ठरला होता आणि त्या सोहळ्याचा मुख्य भाग म्हणजे पुरस्काराच्या मानकरी विद्वानाचे व्याख्यान; त्याचा विषय ‘आंध्रातील पुरालेखांमधील कालनिश्चितीच्या पद्धती’ असा ठरला होता… पण यापूर्वीच, १८ ऑगस्ट रोजी राव यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे देहदान करण्यात आले आहे.
‘तेलुगु लिपी ब्राह्मीपासूनच तयार झाली. विजयनगर साम्राज्याच्या काळात तेलुगु- कन्नड लिपी निरनिराळी नव्हती, तिलाही ब्राह्मी लिपीचाच आधार होता’ हे गृहीतक किंवा अभ्युपगम म्हणून सर्वांनाच मान्य असले तरी, त्याचा कसून अभ्यास सोमसुंदर राव यांनी केला. ब्राह्मी आणि विद्यमान तेलुगु लिप्यांचा संबंध सिद्ध करण्यासाठी मधल्या सर्व काळांतली अक्षरे अभ्यासणे गरजेचे होते, ते त्यांनी केले! त्यासाठी शिलालेख, नाणी, ताम्रपट, हस्तलिखिते असे सर्व प्रकारचे नमुने तपासले आणि साधारणपणे भक्कम निष्कर्ष मांडला. प्रा. राव यांचे कार्य विविधांगी होते. मुळात, ते काही सरकारी पुरातत्त्व खात्यात नव्हते; त्यामुळे अमुकच स्थळावर काम करण्याचे बंधन त्यांच्यावर नव्हते. प्रामुख्याने (अविभाजित) आंध्र प्रदेश किंवा लोपलेल्या विजयनगर आणि काकतीय साम्राज्यांचा भाग हा त्यांच्या अभ्यासाचा भौगोलिक प्रदेश. परंतु या साम्राज्यांचे व्यापार, त्यांचे आंतरराष्ट्रीय संबंध यानिमित्ताने गंगेपर्यंतच्या टापूतील नाणी, ताम्रपट त्यांनी अभ्यासले. इनाम जमिनींचे ताम्रपट आणि साम्राज्याचा र्हास यांच्यात काही अंत:संबंध सापडतो का, याविषयीही त्यांना कुतूहल होते. सरकारी खात्यातल्या पुरातत्त्ववेत्त्यांचे काम महत्त्वाचे असतेच, पण स्वतंत्रपणे- आपले कुतूहल आणि विद्यार्थ्यांचा कल यांचा मेळ घालून नवनव्या प्रश्नांचा होणारा विद्यापीठीय अभ्यास अखेर पुरातत्त्वशास्त्राला दिशा देणारा ठरतो.
चेल्लपिल सोमसुंदर राव यांचा जन्म १९४० सालचा. त्यांनी ‘इ.स. १५६५ नंतरचा विजयनगरचा इतिहास’ (विजयनगरचे र्हासपर्व) या विषयावरील प्रबंधासह इतिहासात पदव्युत्तर पदवी मिळवली आणि १९७७ मध्ये ‘गौतमीपुत्र सातकर्णी आणि त्याचा काळ’ या विषयावर पीएच.डी. प्राप्त केली. त्यांनी १९६३ पासून आंध्र विद्यापीठाच्या इतिहास आणि पुरातत्त्व विभागात सेवा बजावली; १९८५ मध्ये ते प्राध्यापक झाले आणि २००२ पर्यंत अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले.
‘एपिग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया’, ‘साउथ इंडियन न्यूमिस्मॅटिक सोसायटी’, ‘आंध्र प्रदेश हिस्ट्री काँग्रेस’ आणि ‘साउथ इंडियन हिस्ट्री काँग्रेस’ य संस्थांचे अध्यक्षपद भूषवले होते, तसेच ‘इंडियन हिस्ट्री काँग्रेस’च्या ‘प्राचीन भारत’ विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांच्या जाण्याने, या क्षेत्रातील महत्त्वाचा विद्वान भारताने गमावला आहे.
