अतिमहागड्या लिपस्टिक्स, अन्य सौंदर्यप्रसाधनं, त्वचेला लावायची क्रीम्स, पर्फ्युम्स असं बरंच काय काय विकणाऱ्या कंपनीनं एकदम पाण्याच्या बाटल्या विकायला काढल्या त्यामुळे अनेक जण चक्रावले. खरं तर पहिल्यांदा कळलंच नाही, हे पाणी आहे कोणाचं. त्या कंपनीत नक्की कोणाची गुंतवणूक, उत्पादन कुठनं होतं वगैरे वगैरे…
‘इस्टी लॉडर’ ( Estee Lauder) हा किती मोठा ब्रँड आहे हे उंची सौदर्य प्रसाधनं वगैरे वापरणाऱ्यांना सांगायची गरज नाही. आपले मध्यम, उच्चमध्यमवर्गीय, परदेशातनं येताना झगमगीत ‘ड्युटी फ्री’ दुकानांत ज्या कंपन्यांची उत्पादनं आधी हातात घेऊन त्याची किंमत बघतात त्यातली ही एक. साधारण ४१०० कोटी डॉलर्स इतकं मोल आहे या ब्रँडचं. जगातली दुसऱ्या क्रमाकांची अशी सौंदर्य प्रसाधन कंपनी. खरं तर एरवी अशा बऱ्याच फॅशन उत्पादन कंपन्यांचं मूळ हे फ्रान्स असतं. पण ‘इस्टी लॉडर’ मात्र अमेरिकी. अवघ्या ६०-६५ वर्षांपूर्वी तिची स्थापना झाली. न्यूयॉर्कमध्ये.

तर या कंपनीनं नुकतंच एक बाटलीबंद पाणी लाँच केलं. अत्यंत महागडं. म्हणजे आपल्याकडे कसं हिमालयातल्या झऱ्यातलं पाणी वगैरे असल्याचं सांगत महागड्या पाण्याच्या बाटल्या विकल्या जातात, तसं. ही बाटली त्याहूनही महाग. हजार-दोन हजाराला असेल. नैसर्गिक, दुर्मीळ खनिजं वगैरे वगैरे असतात म्हणे त्यात. जगातल्या अत्यंत दुर्गम भागातलं पाणी असतं या बाटल्यांत. आता अतिमहागड्या लिपस्टिक्स, अन्य सौंदर्यप्रसाधनं, त्वचेला लावायची क्रीम्स, पर्फ्युम्स असं बरंच काय काय विकणाऱ्या कंपनीनं एकदम पाण्याच्या बाटल्या विकायला काढल्या त्यामुळे अनेक चक्रावले.

खरं तर पहिल्यांदा कळलंच नाही, हे पाणी आहे कोणाचं. त्या कंपनीत नक्की कोणाची गुंतवणूक आहे, उत्पादन कुठनं होतं वगैरे काही तपशील माहिती नव्हते कोणाला. मग एका वर्तमानपत्रानं बातमी फोडली. कोणत्या कंपनीचं हे उत्पादन आहे हे जगाला कळलं. पण ही कंपनीही नवी. तिच्याबाबत काहीच माहिती नव्हती कोणाला. मग पहिल्यांदा एका डॅनिश वर्तमानपत्रानं या कंपनीतल्या गुंतवणूकदारांबाबत काहीबाही छापलं. कुजबुज सुरू झाली. नंतर चर्चा. आणि मग अनेकांची तर खात्रीच पटली. नक्की गडबड काय हे उद्याोगजगातल्या अनेकांना कळायला लागलं.

तर झालं असं की ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा अध्यक्षपदी निवडले गेले त्यावेळी त्यांना एक उद्याोगपती भेटायला आला. यात तसं नवीन काहीच नाही. अध्यक्ष आणि उद्याोगपती भेटीगाठी होतातच. आणि हा आता आलेला उद्याोगपती तर ट्रम्प यांचा महाविद्यालय सोबती. दोघेही व्हार्टन स्कूलचे. जगातल्या बड्या शिक्षण संस्थांपैकी एक. तिच्या नावात भले ‘स्कूल’ असेल पण पेनसिल्वेनिया विद्यापीठाच्या अखत्यारीतली ती एक नामांकित संस्था. ट्रम्प तिथले. हे भेटायला आलेले उद्याोगपतीही याच संस्थेतले. या भेटीत महाविद्यालयातल्या दोस्तान्याला उजाळा मिळाला. प्रत्येकाच्या आयुष्यात हा महाविद्यालयीन काळ पहाटेसारखा असतो. एकदाच कधी तरी आपण पहाटे उठलेले असतो, ती रम्यता अनुभवलेली असते, रात्रीचा अंधाराचा पडदा मागे करताना उजळणारा आसमंत आपल्यालाही उजळवून गेलेला असतो. नंतर एकदा जगण्याचा धबडगा सुरू झाला की दिवसाचा रेटा पळायला लावतो. मग पहाट-बिहाट काही नाही. पण जेव्हा केव्हा पहाटेचा विषय निघतो तेव्हा ‘ती’ पहाट आठवते. महाविद्यालयीन कारकीर्द अशी असते. ट्रम्प यांच्याबाबत ती जरा जास्तच रंगीली असणार. तर या गप्पांत त्या सगळ्या आठवणी निघाल्या. मधल्या काळात विरलेला दोस्तान्याचा धागा पुन्हा घट्ट विणला गेला. हा उद्याोगपती ट्रम्प यांच्या जवळच्यांमधला एक मानला जाऊ लागला. परत मालदार. इतका की त्यांनी मग ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी देणग्या द्यायचा सपाटा लावला. पण तरी २०२० सालच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाच्या जो बायडेन यांच्याकडून ट्रम्प यांना पराभव पत्करावा लागला. बाकी काही नाही तरी बायडेन यांच्यापासून हरणं ट्रम्प यांच्या जिव्हारी लागलं. साहजिकच होतं ते. ट्रम्प यांच्यासारखे आत्ममग्न नेते सर्व काही स्वत:च्या पुरुषार्थाशी (?) जोडतात. म्हणजे बायडेन यांच्यासारख्या वरकरणी नेभळट, शामळू इत्यादी इत्यादी असणाऱ्या नेत्याकडून आपण निवडणूक हरलोच कसे, असा त्यांचा प्रश्न. लोकशाहीत कथित शारीरिक सामर्थ्य, ‘क्षमता’ इत्यादी मुद्दे महत्त्वाचे नसतात हे ट्रम्प यांना सांगणार कोण. अशा आत्ममग्न नेत्यांच्या आसपास सगळे खुशमस्करे असतात. या आत्ममग्नाचं सतत कौतुक करत राहायचं इतकाच त्यांचा उद्याोग. कौतुक करणाऱ्यांचा अंत:स्थ हेतू, त्यांचा स्वार्थ इत्यादी मुद्दे काही ट्रम्प यांच्यासारख्या नेत्याच्या डोक्यात शिरत नाहीत. स्तुतिसुमनं उधळणारा प्रत्येक जण जणू सत्यवचनी असं मानून हे नेते चालतात. त्यामुळे आपण खरोखरच चांगले, महान, गुणसंपन्न आणि या देशाच्या उद्धारार्थ पृथ्वीतलावर परमेश्वराने धाडलेले नेते आहोत असं त्यांना वाटायला लागतं. असे नेते मग कौतुक केलं जातंय तसे आपण खरंच आहोत असं मानून वागायला लागतात.

ट्रम्प यांच्या बाबत त्यांच्या स्तुतिपाठकांतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे हा उद्याोगपती. जवळपास वीसेक लाख डॉलर्सहून अधिक देणगी त्यांनी आपल्या या अध्यक्ष मित्राच्या निवडणुकीसाठी दिली असेल. ट्रम्प यांचा पराभव झाला आणि हा सगळाच खटाटोप वाया गेला. पण या उद्याोगपतीनं काही हाय खाल्ली नाही. एक तर त्याची कंपनी खोऱ्यानं पैसा ओढत होती. या उद्याोगपतीची संपत्ती त्यामुळे २९०० कोटी डॉलर्सचा टप्पा ओलांडून पुढे गेली होती. अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाला म्हणून या उद्याोगपतीनं ट्रम्प यांची साथ सोडली नाही. ट्रम्प यांच्या बरोबरीनं ट्रम्प यांच्या ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ म्हणजे ‘मागा’ मोहिमेसाठीही हा उद्याोगपती देणग्या देऊ लागला. ट्रम्प आणि त्यांच्या अन्य उद्याोगांच्या दिशेनं देणग्यांचा रोख अबाधित राहील याची काळजी घेतली त्यांनी. हेतू हा की एक पराभव झाला म्हणून आम्ही काही तुमची साथ सोडणाऱ्यातले नाही हे आपल्या वर्तनातून ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचत राहावं! त्यांना ठाऊक होतं ट्रम्प हार मानणाऱ्यातले नाहीत. ते या पराभवाला आव्हान देतील, रान उठवतील आणि आज ना उद्या पुन्हा जिंकतील. तसंच झालं. स्वत:च्या पराभवाविरोधात ट्रम्प यांनी ‘कॅपिटॉल हिल’वर समर्थकांचा हल्ला घडवून आणला, दंगल घडवली आणि अभूतपूर्व गोंधळ घातला. त्यामुळे निवडणूक निकाल खरं तर बदलणार नव्हता. पण ट्रम्प आपल्या समर्थकांमधल्या आदिम भावनांना यातून चुचकारत होते. ‘माय डॅडी स्ट्राँगेस्ट’ असं काही फक्त लहान मुलांनाच म्हणावंसं वाटतं असं नाही. डोक्यानं लहान असलेल्या मोठ्यांचीही आपल्या नेत्याविषयी अशी भावना असू शकते. अमेरिकेत ते दुर्दैवानं दिसून आलं. जगातल्या सर्वात रसरशीत लोकशाही देशातल्या नागरिकांमधल्या जंगली भावनांना ट्रम्प यांनी हात घातला होता. त्यांची अमेरिकेला पुन्हा महान करण्याची (?) हाक अनेकांना चेतवू लागली.

आणि ट्रम्प पुन्हा निवडून आले. मोठा सोहळा झाला. हा उद्याोगपती त्यांना पुन्हा भेटायला गेला. व्हाइट हाउसवर. गेल्या वेळच्या भेटीच्या आठवणी निघाल्या. हा उद्याोगपती परतला. दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी विधान केलं: ग्रीनलँडवर पुन्हा अमेरिकेची मालकी हवी.

रोनाल्ड लॉडर खूश झाले. ‘इस्टी लॉडर’ ही त्यांची कंपनी. महागडं बाटलीबंद पाणी बाजारात आणण्यामागे हीच तर कंपनी होती. हे पाणी ग्रीनलँडमधलं. या बर्फाळलेल्या भूमीखाली दडलेल्या अन्य अनेक दुर्मीळ खनिजांत ‘इस्टी लॉडर’ला रस आहे.

फॅशन ब्रँड कंपनीचा मालक आणि आपले अध्यक्ष यांच्यातला संबंध अमेरिकेला आता कळलाय.

‘उद्याोगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी’… हे गाण्यात ठीक. प्रत्यक्षात हल्ली उद्याोगपतींच्या घरी राजकारणही वास करत असतं. राजकारणही उद्याोगपती चालवतात. देश बदलतो फक्त…