‘इथे इथे इथेनॉल…’ हा अग्रलेख (३१ मार्च) वाचला. कोणत्याही देशाच्या प्रगतीचा पाया त्याच्या ऊर्जा व्यवस्थापनावर अवलंबून असतो, हे निर्विवाद आहे. सध्या भारताने ई-२० (२० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल) हे धोरण स्वीकारले आहे. यामुळे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचत होते, हा त्याचा सकारात्मक पैलू आहे. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीत काही मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते.
विशेषत: २०२१ पूर्वीच्या वाहनांमध्ये इथेनॉलमिश्रित इंधनासाठी आवश्यक सुसंगतता नसल्याने इंजिन, रबर पार्ट्स आणि मायलेजसंबंधी समस्या निर्माण होत आहेत. या तांत्रिक बाबींची जबाबदारी अखेरीस ग्राहकावरच येते. पाश्चात्त्य देशांप्रमाणे भारतात ग्राहकांना इंधन निवडीची मुभा नाही. ‘एकच धोरण सर्वांसाठी’ अशी भूमिका दिसते. या धोरणाची दुसरी बाजू म्हणजे शेतीवर होणारा परिणाम. भात, मका, ऊस यांसारखी पिके इथेनॉलकडे वळवली जाऊ लागल्यास अन्न विरुद्ध इंधन असा पेच निर्माण होऊ शकतो. हवामानबदल, पाणीटंचाई आणि बाजारातील अनिश्चितता यांचा सामना करणार्या शेतकर्यांसाठी हे जोखीम अधिक वाढवणारे ठरू शकते. त्यामुळे, केवळ इथेनॉल मिश्रण वाढवण्यावर भर न देता पर्यायी ऊर्जा स्रोतांचा शोध, इथेनॉलसुसंगत वाहनतंत्रज्ञानातील संशोधन आणि ग्राहकाभिमुख धोरणांची आखणी आवश्यक आहे. या प्रश्नाचे गांभीर्य केवळ इंधनाच्या टक्केवारीत नसून निवडीच्या हक्कात आणि अन्नसाखळीच्या स्थैर्यात आहे. अन्यथा, हरित ऊर्जेच्या नावाखाली आपण स्वातंत्र्य आणि अन्नसुरक्षा या दोन्हीवर तडजोड करत आहोत, असे चित्र निर्माण होण्याची भीती नाकारता येत नाही.
– तुषार रहाटगावकर, डोंबिवली
वाहनांवर संक्रांत येते त्याचे काय?
‘इथे इथे इथेनॉल…’ हे संपादकीय (लोकसत्ता – ३१ मार्च) वाचले. आता तर सर्वच बाजूंनी देशाची ‘तेल कोंडी’ झाली आहे. पूर्वी निदान रशियाकडून स्वस्त दरात तेल मिळे पण अमेरिकेपुढे मान तुकवल्याने ते ‘तेलही गेले…’. आता रशियाने बाजारभावाने पैसे मोजून तेल विकत घ्या असे सांगितल्यावर सरकारला इथेनॉल आठवण आलेली दिसते. सरकार २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये ३० टक्के इथेनॉल मिसळण्याचा उद्देश ठेवत आहे, बहुधा २०२६मध्येच इतके प्रमाण वापरण्याची वेळ येईल असे चित्र दिसते. हा सारा खटाटोप तेलावर अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी, हे मान्यच, पण सध्याची आयसी इंजिने पारंपरिक इंधनावर चालण्यासाठी तयार केलेली आहेत. इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरल्यास इंजिनांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतात. मात्र यासंदर्भातील वाहनधारकांच्या तक्रारींकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी वाहनांच्या देखभाल आणि दुरुस्ती खर्चात वाढ झाली आहे. वाहने बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. इथेनॉलच्या नादात मूळ वाहनच बंद राहणार असेल तर वाहनचालकांवर ‘इथे इथे इथेनॉल…’ गाणे गात बसण्याचीच वेळ येईल असे दिसते.
– प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर</strong>
धोरण आणि अंमलबजावणीत दरी
डॉ. सुरेश कुलकर्णी यांचा ‘राज्याचे सिंचन क्षेत्र आहे तरी किती?’ हा लेख (लोकसत्ता- ३१ मार्च) वाचला. निव्वळ सिंचन क्षेत्र, स्थूल सिंचन क्षेत्र, सिंचन क्षमता आणि लाभक्षेत्र या चार संज्ञांचा सोयीनुसार वापर करून ४३ टक्क्यांचा आकडा फुगवला जातो, हे वास्तव आहे. परंतु विदर्भ-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. कागदावरचे ४३ टक्के शेतापर्यंत पोहोचले असते तर ही परिस्थिती वेगळी असती.
एफएओच्या निकषांनुसार फक्त प्रत्यक्ष पाणी मिळालेले क्षेत्रच सिंचित म्हणावे हा साधा नियम महाराष्ट्रात लागू झाला तर खरा आकडा किती येईल, हे विचारण्याचे धाडस शासनाने दाखवावे. सिंचनावर हजारो कोटी खर्च होतात, राष्ट्रीय पुरस्कारही मिळतात पण शेतकरी मात्र अजूनही आभाळाकडेच पाहतो. येथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, उपाय माहीत आहेत, पण अंमलबजावणी कोण करणार? एकत्रित डेटाबेस, रिमोट सेन्सिंग सर्वेक्षण, स्वतंत्र ऑडिट यंत्रणा हे उपाय कागदावर वर्षानुवर्षे आहेत. परंतु धोरण आणि अंमलबजावणी यातील दरी बुजवण्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. शेतकरी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक सर्वांनी मिळून हा प्रश्न सातत्याने विचारला, सिंचनाच्या खर्या आकड्यांची मागणी केली, तरच व्यवस्था हलेल. आकड्यांचा हा खेळ थांबवून जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. शेतकर्याच्या शेतात पाणी पोहोचणे हेच खरे यश ठरेल.
– संदीप देवरे, मुंबई</strong>
केरोसिन मिळूनही प्रश्न तसाच
‘केरोसिन उपलब्ध, पण स्टोव्ह आहेत कुठे?’ हे वृत्त (लोकसत्ता- ३१ मार्च) वाचले. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर, वस्तूंची आयात-निर्यात बंद झाल्यामुळे नागरिकांना गॅसटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून गॅसची टंचाई नसल्याचे सांगितले जात आहे. तरीही नागरिक रांगा लावून का उभे आहेत? सिलिंडरची मागणी नोंदवल्यावर तो मिळण्यासाठी २५ ते ४५ दिवस का लागत आहेत? गॅसला पर्याय म्हणून रेशनवर सध्या प्रत्येकाला तीन लिटर केरोसिन मिळण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे; परंतु स्टोव्हही बाजारात उपलब्ध नाहीत. ते मोडीत निघाले आहेत. काही जणांकडे स्टोव्ह आहेत, पण त्यांचा कित्येक वर्षांत वापर न केल्यामुळे ते बाद झाले आहेत. परिणामी केरोसिन मिळाले तरी ते वापरायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खेडोपाडी अनेकांकडे मातीच्या चुली आहेत. त्यांच्यात लाकडी सरपण टाकले की काम होते. यातून जुन्या वस्तू अडगळीत टाकून न देता वा भंगारात न काढता त्या जपून ठेवणे गरजेचे आहे, याची जाणीव या युद्धामुळे होऊ लागली आहे.
– गुरुनाथ मराठे, बोरिवली (मुंबई)
रुपयाबाबतचे विधान ही निव्वळ दिशाभूल
‘रुपया अगदी ठणठणीत!’ ही बातमी (लोकसत्ता- ३१ मार्च) वाचली. २०१४ पूर्वी रुपयाच्या घसरणीवरून सत्ताधार्यांना अक्षरश: धारेवर धरणारे आवाज आज पूर्णपणे बदललेले दिसतात. तेव्हा ‘देशाची पत घसरते आहे’ असा आक्रोश करणारे नेते आज रुपया ९५ च्या पुढे जाऊन ऐतिहासिक नीचांक गाठूनही ‘रुपया ठणठणीत आहे’ असा निर्वाळा देतात. ही विसंगती त्यांच्या बौद्धिक प्रामाणिकतेवर प्रश्न निर्माण करणारी आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्येही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘रुपया गडगडत नाही, डॉलर मजबूत होत आहे’ असे तांत्रिकदृष्ट्या अर्धसत्य मांडले होते. कारण सामान्य नागरिकासाठी महागाई, आयात खर्च, इंधन दर आणि परकीय कर्जाचा भार हे सर्व थेट रुपयाच्या मूल्याशी जोडलेले असतात; डॉलर मजबूत झाला की आपोआप रुपया कमकुवत ठरतो, हे वास्तव झाकून चालत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी केलेले ‘‘दोन रुपयांची नोट आणली तर डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढेल’’ हे विधान अर्थशास्त्राच्या प्राथमिक तत्त्वांनाही हरताळ फासणारे होते. चलनाची किंमत ही नोटेच्या आकड्याने ठरत नसून देशाची उत्पादन क्षमता, व्यापार तूट, परकीय गुंतवणूक, चलनवाढ आणि वित्तीय धोरणे यावर अवलंबून असते.
अशी विधाने स्वत:च्या मनाशीही अप्रमाणिक असणार्या नेत्यांकडून जनतेची दिशाभूल करण्यासाठी केली जातात. त्यातूनच आज रुपयाच्या घसरणीला सकारात्मक रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. इतर विकसनशील देशांच्या तुलनेत आपण कमी वाईट आहोत, असे सांगून समाधान मानले जात आहे. ही तुलना नापासांच्या वर्गात ३४ गुण मिळवणार्याने स्वत:ला हुशार समजण्यासारखी आहे. आर्थिक धोरणांची खरी कसोटी ही इतरांपेक्षा थोडे बरे आहोत का यावर नसून, नागरिकांचे जीवनमान, महागाई नियंत्रण, रोजगारनिर्मिती यावर अवलंबून असते. सत्तेत असताना एक भूमिका आणि विरोधात असताना पूर्णपणे उलट भूमिका घेणे, हे राजकीय सोयीचे असले तरी ती जनतेच्या बुद्धीची क्रूर थट्टा ठरते. लोकशाहीत मतदारांनी केवळ घोषणांवर नव्हे, तर अशा विधानांमागील तर्क आणि वास्तव तपासण्याची सवय लावणे गरजेचे आहे. अन्यथा, रुपया ठणठणीत की अशक्त, याचा निर्णय वास्तवावर नव्हे तर राजकीय भाषणांवरच अवलंबून राहील, आणि हीच खरी धोक्याची घंटा आहे.
– जगदीश काबरे, सांगली
