विसाव्या शतकाच्या मध्यास मराठी कवितेने आपली कूस बदलली. ती नवकाव्य म्हणून सर्वपरिचित होऊ लागली. कुसुमाग्रज, अनिल आणि प्रा. बा. सी. मर्ढेकरांनी वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या कविता लिहून मराठी नवकविता विकसित केली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी वाङ्मय परिषद, बडोदे आयोजित मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी (२० नोव्हेंबर, १९५३) आपल्या अध्यक्षीय समारोप भाषणात ‘नवकविता’ विषय केंद्रित करून केलेले भाषण मराठी कवितेच्या अंतरंगाला उजाळा देणारे ठरले.

यात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले की, ‘‘नवी कला वा काव्य उदयाला येते, ते त्या युगाला नवी पार्श्वभूमी प्राप्त झाल्यावर. शिवाय युगाच्या मूलभूत श्रद्धेत फरक पडणे ही अशा मन्वंतराची पूर्वअट असते. जुने संकेत कालबाह्य होतात, तसे नवे संकेत निर्माण होणे अनिवार्य होऊन जाते. मानवी संवाद नव्या शैलीची अपेक्षा करू लागतो. भावनिक चेतना, परंपरा, वैशिष्ट्य (एथॉस), प्रतिभा, नवे रूप अपेक्षू लागते आणि मग काव्य अथवा कलेत नवउषा प्रकटते.’’

गेल्या अडीच हजार वर्षांतील मानवी समाज हा भिन्न भिन्न विघटनांच्या अवस्थेतून अग्रेसर होत आहे. यातून जगात नवी मूल्ये, कल्पना अस्तित्वात येत आहेत. मानवी जीवन घातक संघर्षातून वाट काढत असताना नवरचना, नवी स्वप्ने त्यास आपसूक दृष्टोत्पत्तीस येऊ लागतात. ज्या जुन्या मूल्य नि नैतिक कल्पनांना मानव कवटाळत आला होता, त्याचे आधार तो जेव्हा ढासळताना अनुभवतो, तेव्हा त्यास नव्याची आस खुणावू लागते.

या पार्श्वभूमीवर मराठी कवितेत आलेल्या परिवर्तनाकडे सकारात्मकतेने पाहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन तर्कतीर्थ करतात. जुने गूढ उकलले; पण त्याची जागा घेणारे नवे गूढ शतपटीने अनाकलनीय होत आहे. आजचे प्रश्न केवळ बौद्धिक नसून ते भावना व श्रद्धा यांना थेट भिडणारे आणि भेडसावणारे आहेत. मूल्यांची अंतिमस्थाने धोक्यात आली आहेत. मानवी कर्तृत्वाची क्षितिजे असीम झाली आहेत. निसर्गशक्तींना आवाहन देणारा नवा मनू वा मानव तयार झाला आहे.

या पार्श्वभूमीवर मराठी कवितेने टाकलेली कात स्वाभाविकच म्हटली पाहिजे. या नवकवितेचे तीन मुख्य प्रवाह दिसून येतात. पहिला कुसुमाग्रज यांच्या काव्याचा आहे. नाशिकच्या गोदातीरावरील हा जागृत कवी अशांत व क्षुब्ध आहे. ‘विशाखा’, ‘किनारा’ काव्यसंग्रहातील त्यांच्या कविता रात्र आशेची असल्याचे सांगत ती साफल्याचे प्रतीक बनवितो आहे, तर दुसरीकडे दिवस कष्ट व निराशेचे प्रतीक बनून पुढे येतो हे लक्षात आणून देतो. ‘आकाशात निखारा फुटू द्या, ओतून आपली आग तयावर, त्या स्वप्नांचा विस्तार करा!’’ सांगणारी ही कविता क्रांती, परिवर्तनाची अनिवार्यता सूचित करते.

दुसरा प्रवाह समाजवादी व मार्क्सवादी विचारकाव्याचा म्हणून सांगता येतो. कवी अनिल मानवाचे भवितव्य मानवाच्याच हाती आहे, हे बजावत देव, दैव, पाप, पुण्य नाकारत ‘अपना हाथ जगन्नाथ’ असल्याचे समजावत इहवाद, जडवाद, भौतिकवाद हे वर्तमानाचे विचारविश्व असल्याचे अधोरेखित करतात. ‘भग्नमूर्ती’ काव्यसंग्रहातील कविता ‘पेर्ते व्हा’चा संदेश देतात. ना. ग. जोशींच्या ‘विश्वमानव’मध्ये मानवतावादी परिणीत भावनेचे सुंदर आविष्करण अनुभवास येते.

तिसरा प्रवाह प्रा. बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेचा. ते कवीशिवाय टीकाकार व तत्त्वज्ञ होत. त्यांच्या कवितेत शब्दांचे तोटकेपण आहे खरे; पण जीवनाचे बीभत्स रूप त्यांनी कवितेतून ज्या तीव्रतेने व प्रभावीपणे मांडले त्यातून मांगल्याची आस जागते, हे नाकारता येत नाही. अश्लीलतेचा आरोप या कवितेवर झाला; पण ती अस्थानी नसल्याने तोवर तसा आरोप करता येणार नाही. तिच्यावर कायद्याने बंदी येता कामा नये. तर्कतीर्थ मराठी कवितेचे त्रिविध नवरूप आपल्या भाषणातून व्यक्त करत मराठी कवितेची आपली समज ज्या शब्दांत व्यक्त करतात, हे लक्षात घेता हा गृहस्थ तर्कशास्त्री, तत्त्वज्ञ असूनही मानवी तरल काव्याचा पण आस्वादक समीक्षक असल्याची खात्री पटते. आपल्या विवेचनात तर्कतीर्थ शेवटी अभिनव गुप्त यांचं ललित लक्षण उद्धृत करतात- ‘अपूर्ववस्तूविरचनक्षमा प्रज्ञा प्रतिभा’ तेव्हा समजून चालायचं की, तर्कतीर्थांना काव्यशास्त्र व नाट्यशास्त्रातही वेदांइतकीच गती होती.