२२ मार्च २०२०. फक्त सहाच वर्षांपूर्वीचा दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदल्या दिवशीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तमाम भारतीयांनी सकाळी सात ते रात्री नऊ या काळात ‘जनता कफ्र्यू’ पाळला. आणि मोदींनी सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजल्यापासून बहुसंख्य नागरिकांनी टाळ्या, थाळ्या, घंटा आणि जे हातात मिळेल ते वाजवत करोना योद्ध्यांचे कौतुक केले. तो दिवस जणू राष्ट्रीय सण असल्यासारखा साजरा झाला.

जागतिक संकट उरावर बसण्याच्या बेतात असतानाच्या निष्काळजी, नियोजनशून्यता आणि धोरणहीनतेचे उदाहरण म्हणजे २२ मार्चचा तो दिवस. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत पंतप्रधानांनी पुन्हा टीव्हीवर येत ‘आज रात १२ बजेसे पुरे देश में पुरा लॉकडाऊन किया जा रहा है’ असं जाहीर करून २१ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली. जगातला ‘कठोरतम लॉकडाऊन’ म्हणून वर्णन झालेली ती टाळेबंदी, त्याच काळात झालेले फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर, करोनाचा प्रसार, रुग्णशय्यांची कमतरता, ऑक्सिजनचा अभाव, धडाधड मरण पावणारे रुग्ण, अंत्यविधीत येणारे अडथळे, कुठे नदीत तरंगणारे मृतदेह, लशीसाठी लांबलचक रांगा… आजही आपल्याला अगतिक करणार्‍या त्या आठवणी इतक्या कटू की करोनाचा प्रभाव ओसरताच सर्वांनीच त्या ‘विसरण्याजोग्या’ म्हणून मनाच्या कप्प्यांत बंद करून टाकल्या. त्या सलणार्‍या स्मृतींना आता उजाळा देण्याचे कारण म्हणजे ‘फेथ ॲण्ड फ्युरी’ हे पुस्तक.

ज्योती यादव लिखित आणि वेस्टलॅण्ड बुक्स प्रकाशित ‘फेथ ॲण्ड फ्युरी : कोविड डिस्पॅचेस फ्रॉम इंडियाज हिंटरलॅण्ड’ हे पुस्तक म्हणजे भारतातील करोनाकाळाचे दस्तावेजीकरण आहे. ज्योती यादव या ‘द प्रिंट’ या वृत्त संकेतस्थळासाठी कार्यरत तरुण पत्रकार आहेत. मार्च २०२० ते २१ या वर्षभराच्या काळात उत्तर भारतात झालेल्या कामगार स्थलांतराचे फिल्डवर जाऊन वार्तांकन करणार्‍या पत्रकारांत ज्योती यांचा समावेश होतो. या कामगारांचा संघर्ष टिपणार्‍या असंख्य बातम्या ज्योती यादव यांनी दिल्या. या वार्तांकनाबद्दल भारतीय पत्रकारितेतील बहुप्रतिष्ठित रामनाथ गोएंका पुरस्कारासह संयुक्त राष्ट्रांचा ‘लाडली’ पुरस्कार, इंटरनॅशनल प्रेस इ्स्टिटट्यूटचा पुरस्कार ज्योती यादव यांना देण्यात आला. या वार्तांकनादरम्यान त्यांना आलेल्या अनुभवांचे कथन ‘फेथ ॲण्ड फ्युरी’ मध्ये आहे.

टाळेबंदीने अनेक प्रश्न निर्माण केले. नागरिकांना अवघ्या पाच तासांची मुदत देत २४ मार्चच्या रात्री पंतप्रधानांनी पहिली टाळेबंदी जाहीर केली. नागरिक घराबाहेरच पडले नाहीत तर करोना पसरणारच नाही, इतका भोळा विचार त्यामागे असावा. पण हे करण्याआधी देशभरातील शहरांत रोजच्या मोलमजुरीवर पोट भरणार्‍या वर्गाचा विचारच झाला नाही. काम बंद झाल्यामुळे उपासमारीला तोंड देणारा हा मजूरवर्ग शहरांतील करोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे धास्तावला आणि मिळेल त्या मार्गाने गावाकडे निघाला. मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि सर्वच मोठ्या शहरांतून कामगारांचे जथेच्या जथे टाळेबंदीतून नजर चुकवत निघाले. सहाजिकच उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांकडे जाणारे लोंढे सर्वाधिक होते. तिकिटाच्या चौपट-पाचपट पैसे मोजून ट्रकमध्ये स्वत:ला मेंढरासारखे कोंबून घेऊन घर गाठू पाहणारे, पैसे नसल्यामुळे शेकडो किलोमीटरच्या प्रवासाला पायीच निघालेले, शहरातल्या झोपडीत कमावलेली भांडीकुंडी, कपडे-सामानाची गाठोडी आणि मुलेबाळे कडेवर घेऊन निघालेले, नाकाबंदीत सापडल्यास पोलिसांकडून मार पडण्याच्या भीतीने रात्रीअपरात्री महामार्गालगतच्या जंगलातून मजल-दरमजल करणारे, शेकडो किमीच्या प्रवासादरम्यान वाटेत पाण्याचीही सोय नसल्याने तहानभुकेने अर्धमेले झालेले, कडक उन्हाच्या झळांनी मरायला टेकलेले असंख्य कामगार टीव्हीवरील दृश्यांतून आणि छायाचित्रांतून समोर आले. अशाच अनेक दृश्यांना ज्योती यादव यांनी शब्दबद्ध केले आहे. रामपूर, बरेली, लखनऊ, सितापूर, गोरखपूर, गोपालगंज, सितामढी, कटिहार, भागलपूर, पाटणा असा यादव यांच्या प्रवासाचा टप्पा होता. त्यादरम्यान त्यांना स्थलांतरितांचे हाल अगदी जवळून पाहता आले.

टाळेबंदीच्या दुसर्‍या टप्प्यात स्थलांतरित कामगारांसाठी सोडण्यात आलेल्या श्रमिक रेल्वेगाड्या, त्या गाड्यांमध्ये दाटीवाटीने प्रवास करणारे मजूर आणि रेल्वेस्थानकात उतरल्यानंतर घराकडे पोहोचण्यासाठी त्यांना करावी लागलेली पायपीट यादव यांनी  संवेदनशीलपणे टिपली. गावांच्या सीमेवर अडवून ‘क्वारंटाइन’ कक्षात धाडण्यात येणार्‍या मजुरांची आबाळही त्यांनी या पुस्तकातून मांडली आहे. शहरातील रोजीरोटी सोडून परतलेल्या या मजुरांवर गावातही बेरोजगारी आणि उपासमारीचे संकट कसे ओढवले, याचे वर्णनही त्या करतात. अशा काळात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात एमजीनरेगा – जिचे आता नाव व्हीबीजी-रामजी करण्यात आले आहे- मोलाची ठरल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. रोजगार गमावलेल्या या स्थलांतरितांना २० ते ८० टक्के उत्पन्न या योजनेने गावांत मिळवून दिल्याचा अहवाल अझिम प्रेमजी विद्यापीठाने २०२२मध्ये दिला होता, हे विशेष.

लेखिकेने उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांनी केलेली स्थलांतरितांची हेळसांडही मांडली आहे. शेकडो किमीचा पायी प्रवास करून दाखल होणार्‍या मजुरांना पोलिसांकडून होणारा लाठीमार, ‘ई-पास’साठी केली जाणारी त्यांची लूट, ‘डिग्निटी किट’च्या नावाखाली राज्य सरकारांकडून मजुरांना देण्यात आलेले हलक्या दर्जाचे साहित्य, मजुरांची पाठवणी करणार्‍या राज्यांची अनास्था हे सारे तपशील पुस्तकात तुकड्यातुकड्यांत आढळतात. आजारी वडिलांना सायकलवर मागे बसवून गुरुग्राम ते दरभंगा असा बाराशे किमीचा प्रवास करणार्‍या ज्योतीकुमारी या कोवळ्या मुलीची कहाणीही या पुस्तकात आहे. ‘सायकल गर्ल ऑफ बिहार’ म्हणून नावाजल्या गेलेल्या ज्योतीकुमारीचे देशभरात कौतुक झाले. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री आणि प्रतिष्ठित सामाजिक संस्थांनी तिच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली. बिहार सरकारच्या काही योजनांची ती ‘पोस्टर गर्ल’ही झाली. पण आश्वासनांचे हे बुडबुडे करोना लाट ओसरताच कसे ओसरले, हे इथे वाचायला मिळते.

पहिल्या लाटेने स्थलांतराचे संकट आणले, तर दुसर्‍या लाटेने आरोग्य व्यवस्थेच्या उणिवा उघड केल्या. पहिली लाट ओसरल्यानंतर टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यानंतर जणू हे संकट संपले, अशा कल्पनेत नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’ला दूर सारले. आरोग्य यंत्रणाही गाफील राहिल्या. २०२१च्या तिसर्‍या महिन्यानंतर आलेल्या करोना लाटेने या बेफिकिरीची किंमत वसूल केली. प्राथमिक लक्षणे नसताना गंभीर आजारी पडणारे रुग्ण, अचानक घसरणारी रुग्णांची ऑक्सिजन पातळी, ऑक्सिजनअभावी वाढलेले मृत्यू हे चक्र सार्‍या देशाने अनुभवले. मात्र, उत्तर प्रदेशात ही स्थिती किती गंभीर होती, याचे वर्णन यादव यांनी केले आहे. केवळ पॉझिटिव्हचा अहवाल हातात नसल्यामुळे मरायला टेकलेल्या रुग्णांना दाखल करण्याचे पत्र न देणार्‍या अधिकार्‍यांमुळे लखनऊमध्ये निर्माण झालेली आणीबाणी अस्वस्थ करून सोडते. ऑक्सिजनचा सिलिंडर मिळवण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकार्‍याच्या दारासमोर उसळलेल्या गर्दीचे वर्णन वाचताना महाराष्ट्रासारख्या राज्यांनी ही स्थिती अधिक चांगल्या पद्धतीने हाताळल्याची जाणीवही होते.

पुस्तकाच्या तिसर्‍या टप्प्यात यादव यांनी साथीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या आप्तेष्टांच्या वेदनांना वाचा फोडली आहे. करोना चाचणीचा अहवाल नसल्यामुळे रुग्णशय्या नाकारण्यात आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र, त्यांच्या कुटुंबीयांना अंत्यविधीही करू न देता त्यांची ‘क्वारंटाइन’ केंद्रात पाठवणी केली जात होती. वाराणसीच्या घाटांवर ‘बेवारस’ मृतदेहावर अंत्यविधी करणार्‍यांशीही यादव यांनी संवाद साधला. मुक्तीसाठी वाराणसीच्या घाटावर आणलेल्या मृतदेहांची विटंबनाही या प्रकरणातून दिसून येते.

करोनाचा कहर सुरू असताना झालेला कुंभमेळा, उत्तर प्रदेशातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका, होळी या कारणांनी टाळेेबंदीचे नियम सरकारी पातळीवरच झुगारण्यात येत होते. त्याचे परिणाम सर्वसामान्यांना कसे भोगावे लागले, याची उदाहरणे या पुस्तकात जागोजागी आहेत. त्यापैकीच एक कल्याणी अग्निहोत्री ही शिक्षिका. गर्भवती असतानाही तिला निवडणूक ड्युटी लावली गेली. महत्प्रयासाने मिळालेली नोकरी निसटू नये म्हणून त्या अवस्थेतही ३२ किमी लांबच्या मतदान केंद्रावर कल्याणीला १२ तास ड्युटी करावी लागली. परतल्यानंतर दहा दिवसांत तिचा मृत्यू झाला. ‘कल्याणीला एकदाही न भेटता माझे तिच्याशी घट्ट नाते असल्यासारखे मला जाणवते. तिची स्वप्ने, महत्त्वाकांक्षा नोकरी करणार्‍या लाखो महिलांशी साधर्म्य साधतात’ असे यादव म्हणतात.

या प्रवासात महिला म्हणून यादव यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. पाळीदरम्यान ‘पॅड’ बदलण्यासाठीही स्वच्छतागृहे मिळाली नाहीत, असे त्यांनी नमूद केले आहे. हॉटेले बंद असल्याने झालेले हाल पुस्तकात ओघानेच येतात. यादव त्याचे भांडवल करत नाहीत.

‘फेथ ॲण्ड फ्युरी’ हे पुस्तक आपल्या शीर्षकाला पुरून उरते. लाखोंचे जीवन उद्ध्वस्त करणार्‍या करोना महामारीतही ‘हे दिवस जातील’ या भावनेने एकमेकांना मदत करणार्‍या ग्रामीण भागातल्या जनतेत तो ‘विश्वास’ दिसून येतो, तर अशी बिकट परिस्थिती हाताळण्यास असमर्थ ठरलेल्या यंत्रणांबद्दलचा ‘संताप’ही पुस्तकातून डोकावतो.

‘करोना’ हा त्या काळात सर्वाधिक उल्लेखला गेलेला शब्द. या साथीवर प्रचंड प्रमाणात लिखाण झाले. अर्थात त्यात आरोग्यव्यवस्थेतील त्रुटींपासून अर्थव्यवस्थेच्या हानीपर्यंतच्या असंख्य विषयांचा समावेश आहे. मात्र, त्यातील बहुसंख्य विषय हे शहरांभोवती फिरताना दिसतात. मात्र, यादव यांचे पुस्तक ग्रामीण भागातील करोनाकाळावर प्रकाश टाकते. ज्या काळात शहरवासीयांना रोजच्या भाजीची चिंता भेडसावत होती, त्या काळात हजारो मजूर घोटभर पाण्यावर तासनतास ढकलत होते, हे वास्तव अस्वस्थ करणारे आहे.

कटू आठवणी पुन्हा कशाला, असा प्रश्नही विचारला जाऊ शकेल. पण हे पुस्तक केवळ करोनाबद्दलचे नाही. या निमित्ताने व्यवस्थेत आढळणार्‍या अनेक त्रुटींवर हे पुस्तक बोट ठेवते. योग्य नियोजन, धोरण, संवेदनशीलता आणि दूरदृष्टी यांचा अभाव असल्यास संकट अधिक तीव्र कसे होते, हे सांगण्याचा लेखिकेचा प्रयत्न आहे. यातून धडा घेणे आवश्यकच आहे. आणि त्यासाठी त्या काळातील प्रश्नांची वेळोवेळी उजळणी व्हायलाच हवी.

फेथ ॲण्ड फ्युरी

लेखिका- ज्योती यादव

प्रकाशक- वेस्टलॅण्ड बुक्स

किंमत- ५९९ रु., पृष्ठे- २८०

asif.bagwan@expressindia.com