चित्ततोष खांडेकर, नदी विषयक संशोधक अभ्यासक
बिहारमधले पूर, पश्चिम बंगालमधल्या ‘चार’बेटांना जलसमाधी… ते अगदी बांगलादेेशींचे स्थलांतर हे सारे प्रश्न फराक्का बांधाशी संबंधित कसे काय?
कोलकात्याचे हुगळी बंदर हे नदीवर उभे असलेले मोठे बंदर आहे. पूर्व आणि उत्तर भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार याच बंदराहून होतो. पण वाढते शहरीकरण आणि इतर कारणांमुळे हुगळीतील पाणी आणि तिचे पात्र कमी होऊ लागले. त्यामुळे, ‘जर नदीत पाणीच उरले नाही तर बंदर कुठे उभे राहणार? आणि जर बंदरच नाही, तर कोलकात्याच्या औद्योगिक बाजारेपेठेचे आणि त्यावर अवलंबून असलेल्यांचे काय होणार?’ – हा प्रश्न विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सरकारसमोर आ वासून उभा होता. तेव्हा याचे समाधान म्हणून गंगेचे पाणी वळवून हुगळी नदीत आणायचे असा निर्णय इंग्रजांनी घेतला. स्वातंत्र्यानंतर तो भारत सरकारने आमलात आणला. त्यासाठी पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादजवळ फराक्का येथे नदीवर मोठ्ठा बांध (बराज) १९७५मध्ये बांधण्यात आला. या बांधाच्या भिंतींमुळे गंगेच्या प्रवाहाचा मोठा भाग आधी अडवला गेला, आणि मग कालव्यामार्गे हुगळी नदीमध्ये वळवला गेला. प्रवाहाच्या उरलेल्या छोट्या भागातून, गंगेचे पाणी सागराकडे मार्गक्रमण करत राहिले. पण यामुळे फराक्काच्या भिंतीच्या अल्याड आणि पल्याड काय नदीकारण उभे राहिले आणि त्याचा परिणाम आजही आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय राजकारणावर कसा होतो आहे, हे आजच्या लेखात समजून घेऊ.
फराक्काच्या या बांधाचे वेगवेगळे परिणाम बिहार, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशमध्ये दिसून आले. बिहार ही तर गंगेची नैसर्गिक पूर मैदाने. त्यामुळे नदीच्या प्रवाहात (रिव्हर बेड) , आणि पुराच्या काळात गंगा जितकी रुंदावते तितक्या पात्रात (रिव्हर बेल्ट) कोणीही वस्ती, जंगलतोड किंवा कुठल्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे कौटिल्य चाणक्यांनी अर्थशास्त्रात लिहून ठेवले आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना चाणक्य गुन्हाच मानत असत, गंगेचे अभ्यासक डी. के. मिश्रा सांगतात. नदीच्या पाण्याला अडवले तर विनाशकारी पूर येतील हे त्या काळापासून माहीत होते. शिवाय पात्र ओलांडूनही नदीचे पाणी येऊ शकते हे जाणूनच पात्राच्या आसपास रस्ता थोडासा सखल केला जाई. जेणेकरून त्यावरून नदीचे पाणी आरामात वाहून जाईल. शेतांजवळ नदीला जोडणारे कालवे बांधून, या कालव्यातून पुराचे पाणी सिंचनासाठी शेतांत वळते केले जाई. दुष्काळ पडला तरी या कालव्यांत वर्षानुवर्षे जमा झालेले पाणी शेतीला उपयोगी पडे.
पण ही पूर व्यवस्थापनाची व्यवस्था समजून न घेता इंग्रजांनी गंगेला येऊन मिळणार्या कोसीवर नेपाळमध्ये उंच धरणे बांधली, तर गंगेचा पूर अडवायला पात्रात दोन्ही बाजूला मोठ्या भिंतींचे बंधारे (एम्बॅन्कमेंट्स) बांधले. पाऊस जास्त झाला की धरणाचे दरवाजे उघडले जाऊन मोठ्या प्रमाणात कोसी आणि इतर उपनद्यांचे पाणी गंगेला येऊन मिळू लागले, आधीपेक्षा पाणी प्रचंड वाढले आणि नदीकाठचे उंच बंधारे फोडून गावांमध्ये शिरायला लागले. यामुळे शेतांचा, गावांचा भयंकर विनाश गंगा करू लागली. तेव्हा हे उंच बांध तोडून जुनीच पूर व्यवस्था अमलात आणावी यासाठी ‘गंगा बाढ मुक्ती आंदोलन’ बिहारमध्ये उभे राहिले. ते आजही सरकारशी चर्चा करून आणि बांधांचा निषेध करून लढते आहे. पण फराक्काच्या बांधाने ही पुराची समस्या अधिकच गडद केली.
फराक्कामुळे काय झाले?
कारण कितीही पूर आला तरी पूर्वी हे पाणी समुद्रात वाहून जाई. पण फराक्काच्या भिंतीमुळे हे पाणी अडते. खूपच जास्त प्रवाह असेल, तर भिंतींना धडकन उलटून येते. याचाच अर्थ बिहारमध्ये पाऊस झाला नाही तरी, बंगालमधील पावसामुळे बिहारमध्ये गंगेकाठी पूर येतो. भिंतींमुळे नदीचा गाळ आता समुद्रात जात नाही तर नदीपात्रात जमा होतो आणि या गाळामुळे नदीची उंची प्रचंड वाढली आहे. त्यात पूर आला की पाहायलाच नको. बिहारमधील शहरे पुरात पाण्याखाली जायची कारणे या फराक्काच्या भिंतींत दडली आहेत. या सगळ्याच प्रश्नांविरोधात ‘गंगा बाढ मुक्ती आंदोलन’ गेली ४० वर्षे लढा देते आहे.
बिहारमधील हेच प्रश्न पश्चिम बंगालमध्येही मुर्शिदाबादच्या अलीकडे दिसतात. पण त्याला जोड आहे ‘चार’ भूप्रदेशांची. हिमालयापासून आणलेला सगळा गाळ नदीच्या प्रवाहात फराक्काच्या अलीकडे जमा होतो. या गाळाची माती खूप मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी साचली की नदीत बेटं तयार होतात. या बेटांना गंगेच्या खोर्यात ‘चार’ (चारलॅण्ड्स) म्हणतात. येथील सुपीक माती शेतीसाठी वरदान असते. हे बेट तयार झाले की बंगालमधील शेतकरी त्यांच्यावर जाऊन शेती सुरू करतात. जमिनीचे सातबारे मिळवतात. पण जी नदी गाळ जमा (डिपॉझिशन) करते, तीच नदी माती वाहूनसुद्धा नेत असते (इरोजन). दशकभरात एखादा जोरदार पूर येतो आणि गंगा हेच बेट वाहून नेते. त्या बेटाची उरलेली माती पुन्हा नदीखाली जाऊन नदीची उंची वाढते. आता यामुळे ज्या शेतकर्यांचे नुकसान होते, त्यांच्या जमिनी तर जातातच पण कोणतीच नुकसान भरपाईही मिळत नाही. ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून स्थानिक शेतकर्यांच्या संघटना सरकारशी बोलत आहेत आणि लढतही आहेत.
बांगलादेशावर परिणाम
भिंतीच्या अल्याड असे, तर भिंतीच्या पल्ल्याड नदीच्या प्रवाहातील पाणी आणि नदीसोबत वाहून येणारा गाळही प्रचंड कमी झाला. म्हणजेच, नदीकाठची सुपीक माती सागरात वाहून जात राहिली पण गाळाची माती येणे बंद झाले. प्रवाहातील पाणी कमी झाले, आणि सुपीक मातीही नाहीशी झाली, यामुळे बांगलादेशमधील गंगेकाठच्या सात ते आठ जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणची शेतीच नष्ट झाली. शिवाय बांगलादेशमध्ये गंगेचे मुख आहे. मुखाजवळ गंगा अनेक वितरक नद्या (डि्ट्रिरब्यूटरीज) तयार करते. या नद्याच गंगेला सागराशी जोडतात. त्यामुळे गंगेचे गोडे आणि सागराचे खारे पाणी या नद्यांमध्ये असते. पण गंगेतलेच पाणी कमी झाल्यामुळे या वितरक नद्यांना मिळणारे गोड पाणी कमी झाले. त्यांच्यातील सागरातून येणार्या खार्या पाण्यात प्रचंड वाढ झाली. पर्यायाने पद्मा आणि इतर वितरक नद्यांच्या खोर्यातील शेती, सिंचन, मासेमारी सार्यातच विलक्षण घट झाली. कृषिप्रधान बांगलादेशमध्ये बर्याच ठिकाणी शेतीच उऱली नाही. शिवाय नदीच्या पाण्यावरच बांगलादेशमधील वस्त्रोद्योग उभे आहेत. त्यांनाही याचा फटका बसला. नदीचे पाणी कमी झाल्यामुळे बांगलादेशमध्ये लोक भूजलाचा वापर करू लागले. पण बांगलादेशच्या भूजलात नैसर्गिकरीत्या आर्सेनिकसारख्या विषारी धातूचे क्षार आहेत. भूजलाचा वापर प्रचंड वाढल्याने पाण्यातून विषबाधा होऊन पिके मेली, तर अनेक ठिकाणी शेकडोंना कर्करोग जडले. थोडक्यात बांगलादेशची गंगा खोर्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोलमडली. एवढा अनर्थ भारताच्या फराक्काच्या बांधाने झाला, असे म्हणतच बांगलादेशमधील भारतविरोधी भावना प्रचंड दृढ झाली. आजही भारताचा जो राग बांगलादेश करतो त्याच्या कारणांपैकी एक ठळक कारण फराक्काच आहे.
या सगळ्या विनाशाची चाहूल १९७०च्या दशकात बांगलादेशातील नेत्यांना लागली होती. त्यामुळे ‘फराक्काहून जास्त पाणी बांगलादेशात सोडण्यात यावे अन्यथा तो बांध फोडून गंगेला पूर्ववत करावे’- अशी मागणी गांधीवादी नेते मौलाना भसानी यांनी केली. तसे पत्रच त्यांनी भारताच्या पंतप्रधानांना लिहिले. त्यावर काही उत्तर न आल्याने हजारोंच्या संख्येने निषेध मोर्चा भसानींनी काढला. हा मोर्चा फराक्काचा बांध उद्ध्वस्त करायला मुर्शिदाबादच्या दिशेने चालू लागला. हे आंदोलन इतके मोठे झाले की दोन्ही देशांना आपापल्या सैन्याच्या साहाय्याने ते थांबवावे लागले. जनभावना पाहता बांगलादेश सरकारने फराक्का बांधाविरोधात संयुक्त राष्ट्रांत धाव घेतली. पण भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे संयुक्त राष्ट्रांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. हा प्रश्न भारताशी चर्चा करून सोडवा असे सांगण्यात आले.
इथून पुढली २० वर्षे हा प्रश्न धगधगत राहिला आणि १९९६ मध्ये गंगा करारावर भारत-बांगलादेशने स्वाक्षर्या केल्या. त्यानुसार बांगलादेशला वाढीव पाणी फराक्कातून सोडण्यात यावे या मागणीस भारताने ३० वर्षांकरिता मान्यता दिली. काही प्रमाणात बांगलादेशात होणारे नुकसान कमी झाले. हा ३० वर्षे मुदतीचा करार या वर्षी संपतो आहे. त्यामुळे भारत आता हे वाढीव पाणी सोडणे कमी करेल? पुढे काय? हा प्रश्न बांगलादेशसमोर ‘आ’वासून उभा आहे.
या सगळ्याचा भारताच्या राजकारणावरही परिणाम झाला. ग्रामीण अर्थव्यवस्थाच कोसळल्यामुळे बांगलादेशातून मजुरांनी पोटा-पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतात स्थलांतर करण्यास सुरुवात केली. आज भारतामध्ये उभ्या राहिलेल्या बांगलादेशी स्थलांतरितांच्या राजकारणाची पाळेमुळे या फराक्काच्या भिंतीमध्येच आहेत. भिंतीच्या अल्ल्याड आणि पल्ल्याड आज गंगेचे नदीकारण हे असे आहे. पण या सार्याच समस्या सोडवायला सरकारने काय केले? हे पुढच्या लेखात समजून घेऊ.
