मोरोक्कोच्या पंतप्रधानपदी फातिमा मन्सुरी यांची नुकतीच नियुक्ती झाली. त्या तेथील पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. अरब जगतात एखाद्या महिलेवर अशी सर्वोच्च जबाबदारी सोपवली जाण्याचे हे केवळ तिसरे उदाहरण. पेशाने वकील असलेल्या फातिमा यांना राजकारणाचा सुमारे दोन दशकांचा अनुभव आहे. मोरोक्कोच्या इतिहासातील हा अतिशय सकारात्मक आणि आश्वासक टप्पा असला, तरीही आघाडी सरकारचा कारभार हाकताना फातिमा देशापुढील अनेक आव्हानांचा सामना कसा करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
फातिमा यांचा जन्म माराकेश या शहरातील राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली घराण्यात ३ जानेवारी १९७६ रोजी झाला. वडील अब्देरहमान अल मन्सुरी हे माराकेश प्रांताचे ‘पाशा’ म्हणजेच उप-राज्यपाल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये मोरोक्कोचे राजदूत होते, पण ते मूळचे वकील. मामा अब्दुल्ला मन्सुरी कर्नल. फातिमा यांच्यावर बालपणापासूनच वडिलांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांना न्यायालयात वाद-प्रतिवाद करताना पाहात त्या मोठ्या झाल्या आणि कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी फ्रान्सला गेल्या. तिथून परल्यावर मात्र त्यांचे देशाच्या राजकारणातील स्वारस्य वाढत गेले.
फातिमा यांचे दूरचे नातेवाईक असलेले फुआद अली अल हिमा यांनी २००८मध्ये ‘ऑथेंटिसिटी अँड मॉडर्निटी पार्टी’ (पीएएम) स्थापन केली आणि फातिमा यांनी त्या पक्षाचे सदस्यत्व घेतले. २००९ मध्ये त्या माराकेशच्या महापौरपदी निवडून आल्या. महापौरपदी विराजमान होणार्या त्या मोरोक्कोतील पहिल्या महिला ठरल्या होत्या. पुढे त्या संसदेत सलग दोन कार्यकाळांसाठी निवडून आल्या. या काळात त्यांना संसदीय कामकाजाचा अनुभव मिळाला.
ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांची पंतप्रधान अझीझ अखन्नौश यांच्या मंत्रिमंडळात ‘राष्ट्रीय प्रादेशिक नियोजन, शहरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी धोरण’ मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या पदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. गृहनिर्माण साहाय्य कार्यक्रम, नगररचना व प्रादेशिक विकासाशी संबंधित सुधारणा आणि २०२३ मधील ‘अल हौज’ भूकंपबाधितांचे पुनर्वसन असे महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी तडीस नेले.
अलीकडेच झालेल्या संसदीय निवडणुकीत त्यांच्या पक्षाने सर्वाधिक ९७ जागा जिंकल्या. त्यामुळे तेथील राजे मोहम्मद पाचवे यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले. मात्र मोरोक्कोच्या संसदेत एकूण जागा आहेत तब्बल ३९५. त्यामुळे आघाडीचे सरकार चालवण्याची कसरत फातिमा यांना करावी लागणार हे स्पष्ट आहे. त्यात महागाई आणि बेरोजगारी ही संकटे त्या देशापुढे आ वासून उभी आहेत. शिवाय २०३० मध्ये मोरोक्कोत ‘फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा’ही होऊ घातली आहे. या स्पर्धेच्या तयारीचा अंतिम टप्पा फातिमांच्याच कार्यकाळात येईल. त्याचा आर्थिक भारही मोरोक्कोच्या अर्थव्यवस्थेवर पडण्याची शक्यता आहे.
समतेचे तत्त्व जगातील बहुतेक देशांनी खूप पूर्वीच स्वीकारले असले, तरी आजही एखाद्या देशाच्या सर्वोच्चपदी महिला विराजमान होणे हे कौतुकाचेच ठरावे, एवढाच त्या समतेचा प्रसार झाला आहे. पंतप्रधानपदाची धुरा स्वीकारल्यानंतर फातिमा यांनीही, ‘हा केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील सर्व महिलांसाठी अभिमानाचा क्षण आहे,’ असे म्हटले. ते खरेच, पण हा पहिलेपणाच्या कौतुकाचा भर ओसरल्यानंतर त्या हे सर्व प्रश्न आघाडीची कसरत करता करता किती प्रभावीपणे हाताळतात यावर त्यांचे मूल्यमापन केले जाईल. फातिमा यांना त्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे.
