अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पारंपरिक फुटबॉलमध्ये फार रस आहे याविषयी सबळ पुरावे सापडत नाहीत. त्यांना अमेरिकन फुटबॉल किंवा चिलखती रग्बीविषयीसुद्धा कितपत आस्था आहे याविषयीदेखील पुरेसे संशोधन झालेले नसावे. अमेरिकेसह मेक्सिको आणि कॅनडात यंदाची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे. यात अर्थातच अमेरिकेतील सामन्यांचे प्रमाण आणि सहयजमान असले तरी अमेरिकेचेच वजन अधिक. पण उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत स्पर्धा सरकली तोवर तरी एकाही सामन्याला ट्रम्प यांनी यजमान म्हणूनही हजेरी लावलेली नव्हती.

ही स्पर्धा आणि ट्रम्प यांचा ऐंशीवा वाढदिवस जवळपास एकाच काळात आले. पण वाढदिवस साजरा करण्यासाठी ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधील एका दालनात कुस्तीचा पिंजरा उभारून तेथे सहकुटुंब कसल्याशा फ्रीस्टाइल कुस्ती लढतीचा आस्वाद घेतला. आता वाढदिवस साजरा कसा करावा हा त्यांचा निर्णय, पण सांगण्याचा मुद्दा असा की त्यांना त्यांच्याच देशात सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेविषयी कसलेच ममत्व नव्हते. तरीदेखील स्पर्धेशी संबंधित एका प्रकरणात ट्रम्प यांना चक्क हस्तक्षेप करावासा वाटला, आणि त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात ‘फिफा’ने तो शिरसावंद्य मानून ट्रम्प यांची मर्जी राखण्याची खबरदारी घेताना चक्क नियमाला बगल दिली.

अमेरिकेचा संघ या स्पर्धेत बर्‍यापैकी खेळत होता आणि बोस्नियाविरुद्ध ‘राउंड ऑफ ३२’ टप्प्यातील सामन्यात त्यांनी चमकदार विजयही मिळवला. पण त्या सामन्यात अमेरिकेचा आक्रमक फोलारिन बॅलोगन याला नियमबाह्य धसमुसळ्या खेळाबद्दल लाल कार्ड दाखवण्यात आले. बॅलोगनने बोस्नियाच्या तारिक मुहारेमोविचला रोखण्याच्या प्रयत्नात त्याच्या घोट्यावर स्वत:चा बूट रोवला. प्रतिस्पर्धी खेळाडूला गंभीर इजा होईल अशा प्रकारची ही कृती नियमबाह्य आणि शिक्षापात्र मानली जाते.

सामन्यातील ब्राझिलियन पंच राफाएल क्लाउस यांनी तरीदेखील बॅलोगनच्या फाऊलची खातरजमा व्हिडीयो सहायकामार्फत (व्हीएआर) केली आणि मगच बॅलोगनला लाल कार्ड दाखवले. अशा पद्धतीने थेट लाल कार्ड मिळाल्यानंतर विश्वचषकासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संबंधित खेळाडूला पुढील सामना खेळता येत नाही. याविषयी नियम स्पष्ट आहे. बंदी किमान एका सामन्यासाठी असते नि तात्काळ लागू होते. फाऊल गंभीर असेल तर बंदी एकापेक्षा अधिक सामन्यांसाठीही घातली जाऊ शकते. येथे चर्चा किंवा वाटाघाटींना स्थान नाही. कोणाच्या मर्जीवरून त्यात बदल होऊ शकत नाही.

खेळाडू कितीही मोठा असला नि पुढील सामना कितीही महत्त्वाचा असला तरी बंदीची अंमलबजावणी अटळ आणि अनिवार्य असते. ट्रम्प यांना हे ठाऊक नसावे, पण फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फान्टिनो यांना हे नीटच माहीत होते. मात्र प्रस्तुत पदापेक्षाही ट्रम्प यांची ‘हांजी-हांजी’ करणारे क्रीडा संघटक ही ओळख त्यांना अधिक महत्त्वाची वाटली. बॅलोगनवर घातलेली एका सामन्याची बंदी रद्द करावी असा विनंतीवजा इशारा ट्रम्प यांनी देण्याचाच अवकाश, इन्फान्टिनो यांनी त्या बंदीचे प्रलंबित बंदीमध्ये रूपांतर करून बॅलोगनचा पुढील सामन्यात (वि. बेल्जियम) खेळण्याचा मार्गच मोकळा केला!

‘आपण आदेश दिला नव्हता, केवळ इच्छा व्यक्त केली होती’ असे ट्रम्प नंतर म्हणतात. पण इन्फान्टिनोंसारख्या कृपार्थींना तेवढेही पुरेसे असते. गेले वर्षभर ट्रम्प यांच्या कंपूत कुठे तरी आणि कसे तरी स्थान मिळावे यासाठी ही व्यक्ती झटत आहे. त्यामुळेच फिफा विश्वचषकाच्या यजमान देशांनी पाहुण्या संघातील खेळाडूंचा सन्मान करायचा असतो या मूलभूत तत्त्वाची अमेरिकेकडून पायमल्ली होत असताना इन्फान्टिनो गप्पच राहिले.

कधी एखाद्या सोमाली पंचांचा व्हिसा ऐन वेळी रद्द होतो, कधी इराणसारख्या ‘शत्रुराष्ट्रा’च्या खेळाडूंना सराव विरामासाठी अमेरिकेची भूमी नाकारली जाते, कधी त्या देशाच्या संघातील सहायकांना व्हिसा नाकारला जातो हे सारे होऊनही फिफाकडून आवाजच उठवला गेलेला नाही. युरोपीय फुटबॉल संघटना, बेल्जियन फुटबॉल संघटना यांनी निर्भीडपणे फिफावर मर्यादाभंगाचा आरोप केला. इन्फान्टिनोंवर याचा जराही परिणाम झाला नाही. अखेरीस आटापिटा करून ज्या सामन्यात दोषी खेळाडूला खेळवले गेले, तो सामना अमेरिकेने १-४ अशा मोठ्या फरकाने गमावला. या हास्यास्पद प्रकाराबद्दल ट्रम्प यांना नव्हे, तर फिफालाच दोष द्यावा लागेल.