एखादं पुस्तक संगीत ऐकल्याचा अनुभव देऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर अर्थातच होकारार्थी आहे. कसलेल्या गायकानं तब्येतीत बड़ा ख्याल रंगवायला घ्यावा, निवांतपणे, रमतगमत रागांच्या प्रदेशातली विविध सौंदर्यस्थळं दाखवत दाखवत कदम- दरकदम पुढे सरकत राहावं, कुठेही पोहोचायची कसलीही घाई असू नये अशा मैफिलीचा अनुभव क्वचितच घेता येतो. तसा अनुभव फ़िराक़ गोरखपुरी या उर्दू-हिंदी वाङ्मय वर्तुळातल्या अतिशय महत्त्वाच्या शायरबद्दल लिहिल्या गेलेल्या फ़िराक़ गोरखपुरी : द पोएट ऑफ इंडियननेस’ या पुस्तकानं दिला. सुरिंदर देओल या मैफिलीचे लेखक. पुस्तक दोन भागांत विभागलेलं. पहिला भाग ‘गझलियत- ए-फ़िराक़ आणि दुसरा ‘रुबाईयत- ए- फ़िराक़.
पहिल्या भागात फ़िराक़ गोरखपुरींच्या निवडक शेर आणि गझलांचं इंग्रजी भाषांतर आणि त्यातील विविध संकल्पनांचा वेध आहे तर दुसर्या भागात त्यांच्या रुबायांचं इंग्रजी भाषांतर आणि त्यातील संकल्पनांचा. मूळ शेर/गझल, रुबाया, पुढे त्यांंचं इंग्रजी भाषांतर आणि मग आशयाबद्दलची चर्चा- अशी पुस्तकाची मांडणी. मात्र हे पुस्तक म्हणजे केवळ त्यांच्या शायरीचं (काव्य) भाषांतर आणि रसग्रहण, त्यातील संकल्पनांची चर्चा एवढ्याच वर्तुळात फिरणारं नाही तर ते फ़िराक़ यांच्या काव्यरचनेतून ठसठशीतपणे आविष्कृत होणार्या ‘भारतीयत्वा’बद्दलचं विधान आहे. त्यांच्या एकूण शायरीचा (काव्याचा) ही संकल्पना मध्यवर्ती ठेवून घेतलेला लेखाजोखा आहे.
‘भारतीयत्व’ म्हणजे ‘भारत’ नावाच्या भूभागाचा एकारलेपणाने केलेला विचार मुळीच नाही. या शब्दाचा, संज्ञेचा लाक्षणिक अर्थ महत्त्वाचा आहे. या भूभागातील निसर्गाचा पर्यायाने दाही दिशांच्या कानाकोपर्यांत निवास करणार्या मानवी जगण्यातल्या वैविध्याचा सन्मान म्हणजे भारतीयत्व. सह- अस्तित्व आणि सलोखा ही त्याची अविभाज्य अंगं. ही अंग जपणं म्हणजे भारतीयत्वाच्या अधिक नजीक जाणं. फ़िराक़ गोरखपुरींच्या शायरीमधून हा भाव येतो-
सर-ज़मीन-ए-हिंद पर अक़्वाम-ए-आलम के ‘फ़िराक़’
काि़फले बसते गए हिन्दोस्ताँ बनता गया
पहिल्या भागाची घडण सप्तसुरांच्या आरोहातून (चढत्या भाजणीनं) आहे. प्रकरणांची शीर्षकंच षड्ज, रिषभ, गंधार, मध्यम, पंचम, धैवत, निषाद – अशी आहेत. या प्रकरणांतून फ़िराक़ यांच्या शायरीतील ‘मेलडी’चा, तीमधील नादमयतेचा ऊहापोह तर आहेच पण त्याबरोबरच त्यांच्या शायरीतून डोकावणार्या इश़्क आणि वि-पश्य (स्वत:त डोकावून पाहणे) या संकल्पनांचाही विविधांगी विचार आहे. जन्म अटळ, मृत्यू अटळ. पण या दोन अटळ क्रियांमधला काळ अर्थपूर्ण तेव्हाच होतो ज्यावेळी माणूस प्रेम करतो. हे प्रेम म्हणजे केवळ ‘इश़्क- ए- ह़की़की’ (परमेश्वरावरील प्रेम) आणि ‘इश़्क- ए- मजाज़ी’ (मानवप्रेम) अशा दोन भागांत विभागलेलं नाही. तर मनुष्यमात्रांवरलं प्रेम हेच अखेर ईश्वरप्रेमात तब्दील होतं, ही खोल शहाणीव बाळगून असणारी सुफियाना शायरी आहे –
कोई समझे तो एक बात कहूँ इश़्क तौ़फी़क है गुनाह नहीं
‘इश़्क’ ने फ़िराक़ यांची शायरी दुथडी भरून वाहती ठेवली आहे, उन्नत केली आहे. त्याचप्रमाणे ती चिंतनशील, अंतर्मुखही केली आहे.
या शायरीतून उमटणार्या उदासीच्या छटा या काही केवळ वियोग-विरहातून उमटलेल्या नाहीत तर सामाजिक- राजकीय पातळ्यांवर घडणार्या अप्रिय, अनियंत्रित घटनांमुळेही उमटलेल्या आहेत. टराटरा फाटत जाणारं आकाश ठिगळं लावून कसं सांधलं जाणार, अशा स्थितीमुळे विद्ध झालेल्या शायरचं प्रतिबिंब त्यात आहे. भारतीयत्वावर ज्या ज्या वेळी हल्ले झालेले शायरने पाहिले त्या त्या वेळी त्याचा उद्गार शायरीतूनच उमटला.
सकूते शाम मिटाओ बहुत अँधेरा है सु़खन की शमा जलाओ बहुत अँधेरा है
हर इक चरा़ग से हर तीरगी नहीं मिटती चरागे अश़्क जलाओ बहुत अँधेरा है
फ़िराक़ प्रागतिक विचारांचे शायर. त्यांनी शायरीतून आपली भूमिका नि:संदिग्धपणे मांडली. समाजात फूट पाडणार्या शक्तींविरोधात ते कायमच उभे राहिले. ‘भारतीयत्व’ हे इश़्कमुळेच अबाधित राहील; असं नव्हे तर भारतीयत्व आणि इश़्क या दोन कल्पना वेगळ्या नाहीतच, असं शायर सुचवतो. इश़्क हेच तुम्हाला स्वीकारशील करत नेतं, तुमचं अवघं जगणं उन्नत करत राहतं, यावर शायरचा विश्वास आहे. सुरिंदर देओल यांनी शायरीतून व्यक्त होणार्या ‘इश़्क’चा फ़िराक़ यांच्याप्रमाणेच अतिशय काव्यात्म वेध घेतलेला आहे. उत्तरोत्तर तो अधिक रसाळ होत जातो त्यामुळेच पहिला विभाग आरोहाचा आहे. निषाद गाठल्यानंतर पहिला विभाग संपतो.
‘रुबाईयत- ए- फ़िराक़’ या दुसर्या भागात सुंदरम, सत्यम, शिवम या तीन संकल्पनांचं विश्लेषण केलं आहे. शीर्षकंही याच नावाने आणि अनुक्रमाने आहेत. रुबाई म्हणजे चार ओळींचं काव्य. फारसी, उर्दू वाङ्मयातील गझलेप्रमाणेच नियमबद्ध असलेला हा काव्यप्रकार. फ़िराक़ यांनी तो समर्थपणे हाताळला. त्यांच्या रुबायांतून सौंदर्य, सत्य आणि शिव- (पुस्तकातला संकल्पना विस्तार : Ultimate Reality) या संकल्पनांच्या आविष्काराबद्दलंचं विवेचन आहे. ‘सौंदर्य’ संकल्पनेबद्दल बोलताना अपरिहार्यपणे पुनश्च एकवार इश़्कबद्दलची चर्चा होतेच –
पनघट पे गगरियाँ छलकने का ये रंग
पानी हचकोले ले के भरता है तरंग
काँधों पे सरों पे दोनों हाथों में कलस
मद अँखड़ियों में सीनों में भरपूर उमंग
किंवा
फूलों की सुहाग सेज ये जोबन रस
सोते में सुहागनी लुटाती हुई जस
करवट करवट है लहलहाती जन्नत
ये रात ये कुछ हिलते हुए रूप-कलस
निसर्ग, वस्तुमात्र आणि अर्थातच माणसांमधलं सौंदर्य टिपता टिपता ते सौंदर्याकडून सत्याकडे वाटचाल करतात आणि त्यातूनच समता, सलोखा आणि सह-अस्तित्वाचा पुरस्कार आपल्या रुबायांतून कसा करतात, याबद्दल देओल यांनी सविस्तर लिहिलं आहे. फ़िराक़ यांच्या येशू, लक्ष्मी, शिव यांच्या संदर्भानं लिहिलेल्या रुबायांबद्दलंचं विश्लेषण मुळातून वाचावं असं आहे.
ि़फरा़क यांचे मूळ उर्दू शेर, रुबाया यांचं इंग्रजी भाषांतर त्याच तीव्रतेनं करता येणं अवघडच आहे! इंग्रजी भाषेचा ताल, नाद वेगळा आहे. तरीही भाषांतर करताना देओल अनुभवाच्या जवळ पोहोचल्याचं मात्र निश्चितच म्हणता येतं. फ़िराक़ यांच्या शायरीची सांगीतिकता जशीच्या तशी भाषांतरात आणणं शक्य नसलं तरी आशय मात्र नेमका आला आहे. ज्येष्ठ समीक्षक गोपीचंद नारंग यांची दीर्घ प्रस्तावना या भाषांतराला लाभलेली आहे. त्यात ते म्हणतात- ‘या पुस्तकाचे लेखक सुरिंदर देओल हे उर्दू कवींच्या रचनांचे भाषांतर काही आज करत नाहीयेत. मिर्झा गालिब, मीर त़की मीर, फैज़ अहमद फैज़, साहिर लुधियानवी आणि इतर अनेक शायरांच्या त्यांनी केलेल्या भाषांतरांना वाचक आणि समीक्षकांकडून प्रचंड प्रशंसा मिळाली आहे. इतर गझलकारांच्या तुलनेत, फ़िराक़ यांच्या कार्याकडे भाषांतरकारांनी फारसे लक्ष दिलेले नाही. सुरिंदर ही उणीव भरून काढतात. त्यांनी निवडलेल्या फ़िराक़ गझल व रुबाया, आणि त्यांचं भाषांतरही उत्कृष्ट आहे. एक महान कवी भाषेच्या सीमा ओलांडतो; जर त्याची रचना वाचकाच्या हृदयाला स्पर्श करत असेल, तर तो कोणत्याही भाषेत त्या कवितेचा आनंद घेईल. म्हणूनच आजच्या परस्परांशी घट्टपणे जोडल्या गेलेल्या जगात, आपण रुमी आणि हाि़फज़ यांच्यासारखे पर्शियन कवी, पाब्लो नेरुदा यांच्यासारखे स्पॅनिश कवी आणि गालिब, फैज़ आणि साहिर यांच्यासारखे उर्दू कवी इंग्रजीमध्ये वाचतो. आता आपण या यादीत फ़िराक़ यांच्या नावाचाही समावेश करू शकतो. फ़िराक़च्या गझल-रुबायांमध्ये खोलवर रुजलेली करुणा अनुभवताना आपल्या मनावर एक तीव्र ठसा उमटतो. सुरिंदरने या शायरीमध्ये दडलेली ही भावना टिकवून ठेवण्याचा आणि व्यक्त करण्याचा प्रशंसनीय प्रयत्न केला आहे.’
‘पोएट्री इज म्युझिकॅलिटी’ याचं प्रत्यंतर फ़िराक़ यांची शायरी वाचल्यानंतर येतं. सुरिंदर देओल या शायरीच्या, त्या शायरीतून अभिव्यक्त होणार्या आशयाच्या, तितल्या नादमयतेच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. त्यांनी ते अतिशय असोशीनं या पांडित्यद्वारे वाचकांना सांगितलेलं आहे. ते लिहिताना त्यांनी पांडित्य प्रदर्शन केलेलं नाही. अतिशय नाजूक गोष्ट आपण प्राणपणाने जपतो आणि एका टप्प्यावर ती वारसा म्हणून इतरांकडे सोपवतो, तसं हे कथन आहे.
मानवीयता मूल्यानं परिपूर्ण असलेली त्यांची शायरी सत्य, सौंदर्य आणि शिव ही त्रितत्त्व आपल्यात सहज सामावून घेते आणि ‘भारतीयत्व’ चढत्या क्रमानं वैश्विक करत राहाते. आज भारतीयत्व संकल्पनेचं विद्रुपीकरण होत असताना, अवमूल्यन होत असताना, फ़िराक़ गोरखपुरी यांची शायरी वाचणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उर्दू साहित्याला पहिला ज्ञानपीठ सन्मान मिळाला तो फ़िराक़ गोरखपुरी यांच्या रूपानं. त्यांची शायरी आता इंग्रजीत आल्यामुळे उर्दू जाणत नसलेल्या एतद्देशीय आणि परकीय वाचकांनाही ती जाणून, समजून घेता येईल आणि स्वत:च्या जाणिवांच्या कक्षा विस्तारता येतील, हे या पुस्तकाचं अमोलपण आहे.
