पिअर द कुबर्ता यांच्या पुढाकाराने आणि ग्रीक सरकारच्या पाठबळाने पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन ६ ते १५ एप्रिल १८९६ या काळात ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये करण्यात आले. तो काळ युरोपातील त्या वेळच्या महासत्तांसाठी तसा फुरसतीचा होता. औद्योगिक क्रांतीमुळे तांत्रिक आणि औद्योगिक प्रगतीचे वारे वाहू लागले होते. युद्धे फारशी सुरू नव्हती. अनेक युरोपीय देशांची वसाहतींवरील पकड मजबूत झाल्यामुळे तिथल्या नागरिकांच्या आणि संसाधनांच्या पिळवणुकीतून निधीचा ओघही विनाअडथळा सुरू झाला होता. या स्थैर्यात ऑलिम्पिकची संकल्पना नव्याने जन्माला येऊ शकली नि वाढू शकली. ग्रीसच्या सत्ताधीशांचा आग्रह आणि उत्साह नसता, तर पहिले ऑलिम्पिक पिअर द कुबर्ता यांनी पॅरिसमध्येच भरवले असते. पण तो मान ग्रीसला मिळाला आणि त्यापुढील म्हणजे सन १९००मधील यजमानपद पॅरिसला मिळाले. ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी मैदानाबाहेर इतकी वर्षे इतक्या हालचाली सुरू होत्या. पण सर्वांत महत्त्वाचा मुद्दा होता निधीचा.
क्राऊडफंडिंगमधून ऑलिम्पिक!
ग्रीसची आणि पहिले यजमान शहर म्हणून अथेन्सची निवड बरीचशी भावनिक होती. कुबर्तांनी मूळ स्पर्धा १९००मध्ये पॅरिस येथे, जागतिक औद्योगिक प्रदर्शनाच्या वेळी (एक्स्पोझिशन) भरवावी असे सुचवून पाहिले. ही घटना १८९४मधील सोरबाँ परिषदेच्या वेळची. या सूचनेस कदाचित ग्रीसमधील तत्कालीन आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरली असावी. राजकीय अस्थैर्य होते आणि इतर पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत ग्रीसमध्ये निधीची चणचण होती. ग्रीसमधील लोकनियुक्त सरकारला हा (ऑलिम्पिकचा) खेळ खर्चीक आणि अनावश्यक वाटत होता. पण राष्ट्रवादाने भारलेल्या जनतेतील अनेकांना आणि खुद्द राजे ओटो आणि राजपुत्र कॉन्स्टन्टाइन यांना ऑलिम्पिक भरवण्याची इच्छा होती. सहा वर्षांनी म्हणजे १९००मध्ये ऑलिम्पिक भरवले (फ्रान्स किंवा ग्रीसमध्ये) तर तोपर्यंत या संकल्पनेविषयी उत्साहच मावळेल अशी भीती त्यांना वाटत होती. शहर निश्चित झाले, हाताशी जीर्णोद्धारित पॅनाथेनॅयिक स्टेडियमही होते. पण इच्छा आणि उत्साह असला तरी पैसा आणायचा कुठून याविषयी एकवाक्यता नव्हती, निर्धारही नव्हता. इतर बड्या युरोपीय देशांकडून निधी आणावा म्हटले, तर ते बहुतेक वसाहतवादी देश दानतीच्या बाबतीत मागासच होते. तशात ग्रीसच्या ऑलिम्पिक आयोजन समितीने त्याच दरम्यान सादर केलेल्या अहवालात, स्पर्धेच्या संयोजनाचा वास्तव खर्च निर्धारित बजेटपेक्षा तिपटीने वाढला असल्याचे सांगण्यात आले. तो सादर करून आयोजन समिती सदस्यांनी आपापले राजीनामेही देऊ केले.
अशा परिस्थितीत कुबर्ता आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पहिले अध्यक्ष दिमित्रियस विकेलास यांनी प्रयत्न सुरू केले. आयोजन समितीच्या अध्यक्षपदी ग्रीकचे राजपुत्र कॉन्स्टंटाइन यांना नेमण्यात आले. कॉन्स्टन्टाइन यांनी निधीसंकलनासाठी जनतेकडे जायचे ठरवले. त्या काळातील ते अत्यंत लक्षवेधी ‘क्राऊडफंडिंग’ ठरले. जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ३,३०,००० ड्राकमा (ग्रीसचे तत्कालीन चलन- तेव्हाची त्याची किंमत स्वातंत्र्यपूर्व रुपयापेक्षाही थोडी कमीच) गोळा झाले. विशेष टपाल तिकिटे विक्रीस काढण्यात आली, त्यातून ४,००,००० ड्राकमा मिळाले. तिकीटविक्रीतून २,००,००० ड्राकमा हाती आले. राजपुत्र कॉन्स्टन्टाइन यांच्या विनंतीवरून जॉर्ज ॲव्हरॉफ या उद्योगपतींनी ९,२०,००० ड्राकमा ओतले. ऑलिम्पिकसाठी निधी जमवणे कसे जिकिरीचे असते नि निव्वळ भावनिक मुद्द्यांंच्या अधीन राहिल्यास ते कसे अशक्यप्राय बनते याची ती आद्य प्रचीती होती. इव्हान्जेलिस झपास यांनी रचिला पाया आणि ॲव्हरॉफ बनले कळस असाच साधारण प्रकार. फ्रान्स, ब्रिटन, एकत्रित जर्मनी, एकत्रित इटली, रशिया, अमेरिका यांपैकी कोणीही ऑलिम्पिकसाठी निधी देण्यास पुढे पुढे आले नाही. ग्रीसच्या राजेमंडळींनीही ‘फक्त लढ म्हणण्या’ची पोक्त जबाबदारी पार पाडली. ऑलिम्पिकचे पुनरुज्जीवन करण्याची संकल्पना कुबर्ता यांनी मांडली, पण ती साकारण्याची जबाबदारी खासगी उद्योजक आणि उत्साही जनतेनेच पेलून दाखवली हेही दखलपात्र.
खेळ आणि खेळाडू
पहिल्या ऑलिम्पिकमध्ये २४० खेळाडू उतरले. सगळेच पुरुष. यजमान ग्रीससह फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, स्वीडन, डेन्मार्क, बल्गेरिया, हंगेरी, ऑस्ट्रिया असे युरोपीय देश; अमेरिका, चिली आणि ऑस्ट्रेलिया एसे युरोपबाहेरील देश. एकूण १४. ऑलिम्पिक व्हिलेज हा प्रकारच त्या वेळी अस्तित्वात नव्हता. त्या परंपरेला सुरुवात झाली १९३२ मधील लॉस एंजलिस ऑलिम्पिकपासून. नऊच खेळांचा समावेश होता. यात पारंपरिक ॲथलेटिक्स, कुस्ती, वेटलिफ्टिंग आणि तलवारबाजीबरोबर सायकलिंग (त्या वेळेस ती नवलाई खरीच), जिमनॅस्टिक्स, नेमबाजी, जलतरण, टेनिस (हीदेखील नवलाई) या खेळांच्या स्पर्धा झाल्या. सगळेच खेळाडू हौशी. काही त्या काळात सुट्टीनिमित्त अथेन्सला गेले होते. ब्रिटिश दूतावासातील काही कर्मचार्यांनी खेळाडू म्हणून भाग घेतला. ॲथलेटिक्समध्ये अमेरिकेने सर्वाधिक नऊ सुवर्णपदके जिंकली, तरीदेखील ग्रीसने मॅरॅथॉन प्रकारात जिंकलेले एकमेव सुवर्णपदक त्या देशात विशेष कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरले. मॅरॅथॉनशी असलेले ग्रीकांचे भावनिक नाते त्यानिमित्ताने चर्विले आणि चर्चिले गेलेच.
ख्रिस्तपूर्व ४९० मध्ये फीडिपिडेस याने पहिल्यांदा मॅरॅथॉन ते अथेन्स अशी ४० किलोमीटरची धाव पूर्ण केली होती, तोच मार्ग पहिल्या ऑलिम्पिकमध्येही मॅरॅथॉन स्पर्धेसाठी निर्धारित करण्यात आला. लुइस स्पायरीडॉन या २४ वर्षांच्या ग्रीक तरुणाने ही स्पर्धा जिंकली. फीडिपिडेसवर वेगळी जबाबदारी होती. ग्रीसने पर्शियाविरुद्ध लढाई जिंकल्याची आनंदवार्ता त्याला अथेन्सवासीयांना कळवायची होती. पण थकून, कसाबसा निरोप सांगून मृत्यू पावल्याने त्या आनंदवार्तेचा शेवट दु:खद झाला. स्पायरीडॉनवर अर्थातच तशी वेळ आली नाही. चांदीचे पदक मिळाल्याने त्याच्या धावकथेचा शेवट सुखात्म झाला. अमेरिकी खेळाडूंनी ट्रॅक ॲण्ड फील्डमधील बहुतेक स्पर्धा गाजवल्या. पण रविवारी खेळावे लागल्याबद्दल बरीच खळखळही केली. जलतरण स्पर्धा पिरेअस समुद्रात घेण्यात आल्या. त्या वेळी यासाठी स्वतंत्र जलतरण तलाव वगैरे बांधण्याची कल्पना रुजली नव्हती. पण सायकलिंगसाठी खास ट्रॅक बनवण्यात आला होता आणि त्यासाठी प्रेक्षकांचा उत्साहही दांडगा होता. तो ट्रॅक त्या काळाच्या तुलनेत खरोखरच आधुनिक होता. टेनिसचे सामने रेस ट्रॅकच्या मधोमध खेळवले गेले. तो रेस ट्रॅकही अलौकिक होता. अंडाकृतीपेक्षा चौकानाकाराकडे जाणारा होता. त्यामुळे जोरदार पळण्याच्या स्पर्धांमध्ये काटकोनी वळणावर धडपडू नये म्हणून धावपटू गती कमी करायचे! कुस्तीच्या सामन्यांना कालमर्यादा नव्हती. ते अंधार पडल्यानंतरही सुरू राहायचे. वेटलिफ्टिंगसाठी एकहाती आणि दोन हाती असे दोन प्रकारे होते. तर जलतरणात केवळ फ्रीस्टाइलचाच समावेश होता. ॲथलेटिक्समध्ये अमेरिकेचा, सायकलिंगमध्ये फ्रान्सचा आणि जिमनॅस्टिक्समध्ये जर्मनीचा दबदबा दिसून आला. सायकलिंग, कुस्ती, जलतरण आणि ॲथलेटिक्स हे पहिल्या पहिल्या स्पर्धेपासून होते, ते अखंड कायम राहिले.
‘बझ’ तर झालीच…
आधीच्या तथाकथित ऑलिम्पिक स्पर्धांप्रमाणेच या स्पर्धेतही हवशा-नवख्यांचीच गर्दी होती. नियम फारसे निर्धारित नव्हते. विजेत्यांना चांदीचे पदक देण्यात आले. याशिवाय ऑलिव्हच्या फांदीचा मुकुट आणि प्रमाणपत्रेही देण्यात आली. आज या सगळ्याकडे पाहताना अनेक बाबी गमतीशीर वाटतात. पण कुबर्तांनी रुजवलेली संकल्पना ग्रीकांनी आपुलकीने आणि निगुतीने वाढवली आणि पुढे नेली. त्या पहिल्या स्पर्धेत आणि पहिल्या टप्प्यात अनेक अडचणींना तोंड देत स्पर्धा रेटण्यात आली. स्पर्धांचे वार्तांकन ब्रिटन आणि फ्रान्समुळे पुढे त्यांच्या वसाहतींपर्यंत पोहोचले. अमेरिकेतही पोहोचले. तेव्हा अथेन्समध्ये जे काही घडले, ते अद्भुत होते याची चर्चा जगभर सुरू झाली. ती सत्याधारित किती आणि अतिरंजित किती हा मुद्दा महत्त्वाचा नाही. पण जागतिक स्पर्धेची जागतिक ‘बझ’ निर्माण झाली हे महत्त्वाचे.
siddharth.khandekar@expressindia.com

