scorecardresearch

Premium

अतिरेक्यांच्या ताब्यातील पाच भीषण वर्षे..

लाहोरमधील सुखवस्तू कुटुंबात वाढलेल्या शाहबाज तासीरचे उझबेक अतिरेक्यांनी अपहरण केले. तब्बल पाच वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. त्याचे अनुभव हा तासीर कुटुंबीयांच्या आशेचा, प्रेमाचा दस्तावेज आहे तसाच दहशतवादी ‘माणूस’ असतात का याचा वेधही..

lost to the world
‘लॉस्ट टू द वर्ल्ड : अ मेमॉयर ऑफ फेथ, फॅमिली अँड फाइव्ह इयर्स इन टेररिस्ट कॅप्टिव्हिटी’ लेखक : शाहबाज तासीर, प्रकाशक : पेन्ग्विन विकिंग पृष्ठे : २७८ किंमत : ५९९ रुपये

जतीन देसाई

शाहबाज तासीर.. एका श्रीमंत घराण्यातील मुलगा. तासीर कुटुंब पाकिस्तानात प्रसिद्ध आहे. २६ ऑगस्ट २०११ ला सकाळी मर्सिडीज कार चालवत तो ऑफिसला निघाला. काही मिनिटांत दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. ही बातमी  पाकिस्तानला धक्का देणारी होती.  त्या देशातील कोणतेही शहर सुरक्षित नाही, हे स्पष्ट करणारी ही घटना आंतरराष्ट्रीय समुदायासाठी चिंतेची होती. अवघ्या सहा- सात महिन्यांपूर्वी शाहबाजचे वडील (तेव्हा पंजाब प्रांताचे गव्हर्नर) सलमान तासीर यांची त्यांचेच सुरक्षा कर्मचारी मुमताज कादरी यांनी इस्लामाबाद येथील बाजारात हत्या केली होती. ईशिनदा खटल्यात आरोपी असलेल्या आशिया बीबी  या ख्रिस्ती महिलेला तुरुंगातून सोडविण्याचा सलमान तासीर यांचा प्रयत्न होता.

transgenders attack in akola, transgender attack on tailor, tailor attacked for 500 rupees
तृतीयपंथीयांनी टेलरवर केला हल्ला; कारण वाचून बसेल धक्का…
women, men, house, home loan
गृहकर्ज घेणं पुरुषांपेक्षा महिलांसाठी अधिक सोपं!
Sanjay Raut Narendra Modi Lotus
संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशांवर कमळाचं फूल, संजय राऊतांचा हल्लाबोल, म्हणाले…
jawan akash adhagle died heroic in leh
शिरपूरच्या जवानाला लेहमध्ये वीरमरण; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जवळपास पाच वर्षे भयंकर अत्याचार सहन केल्यानंतर परत आलेल्या शाहबाज तासीर यांनी जे काही सहन केले, त्यावर ‘लॉस्ट टू द वर्ल्ड: अ मेमॉयर ऑफ फेथ, फॅमिली अ‍ॅण्ड फाइव्ह इयर्स इन टेररिस्ट कॅप्टिव्हिटी’ नावाचे पुस्तक लिहिले. सुरुवातीला तो उझबेक अतिरेक्यांच्या ताब्यात होता आणि नंतर तालिबानच्या. ‘इस्लामिक मूव्हमेन्ट ऑफ उझबेकिस्तान’ (आयएमयू) नावाच्या अतिरेकी संघटनेचा मोहम्मद अली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शाहबाजचा ताबा घेतला. उझबेक दहशतवादी तालिबान्यांपेक्षाही क्रूर असतात, असे तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. अशफाक परवेज कयानी यांचे मत होते. लाहोरमधून शाहबाजचे अपहरण झाले याचा अर्थ उझबेक अतिरेकी तेव्हा पाकिस्तानात मोकळे फिरू शकत होते. 

शाहबाजने आयुष्यात गरिबी पाहिली नव्हती. मोठा बंगला, स्विमिंग पूल, सुट्टीत परदेश सहली अशी त्याची जीवनशैली होती. मित्रही लाहोरच्या श्रीमंत घराण्यांतील होते. त्यांची भाषा इंग्रजीच!  अशा शाहबाजला एका लहानशा कुबट खोलीत ठेवण्यात आले. दहशतवादी नेतील तिथे डोंगर, जंगले तुडवत जाण्याची वेळ आली. पिण्यासाठी  पुरेसे पाणी नव्हते. आंघोळ तर दूरची गोष्ट. मारहाणीमुळे रक्ताळलेले कपडे अनेक दिवस घालावे लागत.  लोकांना मारण्यात, त्रास देण्यात मोहम्मद अलीला आनंद मिळत असे. पोलीस व लष्कर लाहोरच्या बाहेर जाणाऱ्या गाडय़ांची पाहणी करणार, याची जाणीव असल्याने मोहम्मद अलीने अपहरणानंतर काही दिवस शाहबाजला लाहोरमध्येच ठेवले होते.

विविध दहशतवादी संघटना मग ती आयएमयू असो, तालिबान असो वा इस्लामिक स्टेट (आयएस) कशा प्रकारे लोकांमध्ये दहशत निर्माण करतात, त्यांचे परस्पर संबंध कशा स्वरूपाचे असतात, हे समजण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे. शाहबाजला आपण जिवंत परत जाणार नाही, असे वाटत होते. त्याला तसे सांगितले जात होते. सुरुवातीला शाहबाजला वाटले की अपहरणकर्ते आपल्या कुटुंबाकडून काही कोटी रुपये घेऊन आपल्याला सोडून देतील कारण अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत. पण अनेक महिने मोहम्मद अलीने तासीर कुटुंबाशी संपर्कदेखील केला नाही तेव्हा त्याची चिंता वाढली. सलमान तासीर यांची हत्या आणि त्यानंतर शाहबाजच्या अपहरणामुळे तासीर कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते.

या कुटुंबाचे अनेक व्यवसाय आहेत. त्यांच्या मालकीचे एक  वर्तमानपत्र व साप्ताहिकही आहे. शाहबाजची आई आमना तासीर यांनी या काळात प्रचंड हिंमत दाखविली. शहरयार हा शाहबाजचा भाऊ आणि बहीण शेरबानो तर पत्रकार. सलमान यांचा संबंध पाकिस्तान पीपल्स पार्टीशी (पीपीपी) होता. सलमान यांची हत्या व लगेच शाहबाजच्या अपहरणामुळे पाकिस्तान आणि तेथील पोलीस व लष्करावर सर्व स्तरांतून टीका होत होती. लष्कराने शाहबाजला शोधण्याची जबाबदारी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपविली होती. त्यांच्याकडून प्रयत्न होत होता, पण शाहबाजचा पत्ता लागत नव्हता. एक-दोनदा तर लष्कराची टीम पोहोचण्याच्या काही वेळापूर्वी मोहम्मद अली आणि त्याची गँग शाहबाजला घेऊन दुसरीकडे रवाना झाली होती.

शाहबाजचा छळ सुरूच होता. हाताची नखे खेचून काढणे, पाठीच्या मांसाचे लचके तोडून वर मीठ चोळणे.. मोहम्मद अली रात्री येऊन उद्या तुझ्यावर अत्याचार करण्यात येणार, असे सांगत असे. त्यामुळे रात्रीपासूनच शाहबाजला भीती वाटू लागे. अशा वेळी त्याला वडिलांची खूपच आठवण येई. सलमान विद्वान होते. इतिहास, कला, लोकशाही इत्यादी विषयांवर त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यांना सत्ताधाऱ्यांनी अनेकदा तुरुंगात टाकले होते. हुकूमशहा झिया उल-हकच्या विरोधात त्यांनी निदर्शने केली होती. सलमान आणि आमना यांच्या लग्नानंतर काही महिन्यांतच लाहोरच्या कुप्रसिद्ध किल्ल्यात सलमान यांना चार महिने कैदेत ठेवण्यात आले होते. काही आठवडे सलमान कुठे आहेत याची माहितीदेखील देण्यात आली नव्हती. एका चौकीदारामार्फत सलमान यांनी आमनाला चिठ्ठी पाठवली आणि आपण कुठे आहोत ते कळवले. ‘मी काही लेचापेचा नाही,’ असे वाक्य त्यात होते. तेच वाक्य शाहबाजलाही हिंमत देणारे ठरले. सलमान तासीर यांच्या हत्येनंतर अमेरिकन दूतावासाचे काही अधिकारी तासीर यांच्या घरी गेले होते आणि त्यांनी तासीर कुटुंबाला अमेरिकेत राजकीय आश्रय देण्याची तयारी दाखवली होती, पण तासीर कुटुंबाने ती नम्रपणे नाकारली.

अफगाणिस्तानला लागून असलेल्या नॉर्थ वजिरिस्तानच्या मिर अली गावात शाहबाजला नेण्यात आले. आता नॉर्थ वजिरिस्तान खैबर-पख्तुनख्वा प्रांतात आहे. येथील रहिवासी पश्तुन (पठाण) आहेत. ऑक्टोबरात शाहबाजकडून राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांसाठी पहिला व्हिडीओ तयार करून घेण्यात आला. त्यात ‘माझे अपहरण करून मोहम्मद अलीने ते किती प्रभावी आहेत. हे सिद्ध केले आहे,’ असे शाहबाजकडून वदवून घेण्यात आले. त्यात अतिरेक्यांच्या मागण्यांचा उल्लेख नव्हता. हा व्हिडीओ शाहबाजच्या आईने लष्करप्रमुख कयानी यांना दाखवला. कयानी यांच्या लक्षात एक वेगळीच गोष्ट आली. उर्दू व्हिडीओत अपहरण करणाऱ्याला शाहबाज इंग्रजीतून ‘ओके?’असे विचारतो. याचा अर्थ अपहरण करणारे स्थानिक उर्दू किंवा पश्तू नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. शाहबाजच्या मागे उभे असलेल्या अतिरेक्यांचे कपडे पठाणांपेक्षा थोडे वेगळे होते. त्यातून निष्कर्ष काढला गेला की अतिरेकी तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचे (टीटीपी) नाहीत, ते उझबेक आहेत.

शाहबाजवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव होता. तो मॅन्चेस्टर युनायटेडचा चाहता होता. त्याला मॅन्चेस्टर युनायटेडचा चाहता असणारा एक अतिरेकी भेटला- सलीम. इतर कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा पद्धतीने तो अधूनमधून मॅन्चेस्टर युनायटेडची मॅच शाहबाजला दाखवत असे. खरेतर अशी धार्मिक कट्टरता असलेले लोक खेळाच्या विरोधी असतात, पण त्यात काही अपवाद असतात आणि सलीम असा अपवाद होता. आयुष्यात प्रथमच शाहबाजने पवित्र कुराण गंभीरतेने वाचण्यास सुरुवात केली. काही महिन्यानंतर मोहम्मद अलीने शाहबाजला  आईशी फोनवर बोलण्यास सांगितले. त्याने शाहबाजच्या बदल्यात चार अब्ज पाकिस्तानी रु. व जवळपास ३० दहशतवाद्यांना तुरुंगातून मुक्त करण्याची मागणी केली. त्यात सर्वात पहिले नाव होते सलमान तासीर यांची हत्या करणाऱ्या मुमताज कादरी याचे. आश्चर्य म्हणजे २९ फेब्रुवारी २०१६ ला शाहबाजला मुक्त करण्यात आले  त्याच दिवशी रावळिपडी येथे या कादरीला फाशी देण्यात आली.

शाहबाजच्या आई आमना तासीर यांच्या प्रयत्नांमुळे हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेच्या हाजी खलील उर-रेहमान यांनी मध्यस्थी केली. मोहम्मद अलीच्या माणसासह झालेली ती बैठक निष्फळ ठरली, मात्र हाजीने त्या बैठकीतच स्पष्ट केले की, ‘तालिबानमुळे तुम्ही येथे आहात ते विसरू नका. तुम्हाला संपवायला आम्हाला वेळ लागणार नाही.’ त्यानंतर मोहम्मद अली घाबरला. ४ जून २०१२ ला अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा मोठा नेता अबू याह्य अल-लिबी मारला गेला. त्याशेजारच्याच घरात शाहबाजला लपवण्यात आले होते. स्थानिकांकडून आयएसआयला माहिती मिळाली, की शाहबाजही मारला गेला. पाकिस्तानात सर्व वाहिन्यांनी शाहबाज मारला गेल्याची बातमी दिली. मात्र शाहबाजच्या आईचा त्यावर विश्वास नव्हता. मोहम्मद अलीने लगेच शाहबाजला आपल्या घरी हलवले. ते त्याची सासू आया जान यांचे घर होते. आयएमयूच्या संस्थापक मोहम्मद ताहीर फारूक याच्या त्या पत्नी. फारूक आधीच मारला गेला होता. तिथेही त्याच्यावर अत्याचार सुरूच होते. पण आया जान यांनी तो आपला पाहुणा आहे, म्हणत हे अत्याचार थांबवले.

१ नोव्हेंबर २०१३ ला मिर अलीपासून जवळ असलेल्या मिरानशहा येथे ड्रोन हल्ल्यात टीटीपीचा महत्त्वाचा नेता हकीमुल्ला मेहसुद ठार झाला. त्यापूर्वी २९ मे रोजी टीटीपीचा वली उर-रेहमान मारला गेला होता. आयएसआयने शाहबाजच्या सुटकेसाठी आमना यांचा वली उर-रेहमानशी संपर्क करून दिला होता. तोच मारला गेल्याने सुटकेची आशा धूसर झाली. मिर अली येथे लष्कराने केलेल्या कारवाईच्या विरोधात टीटीपी आणि आयएमयूने ८ जून २०१४ रोजी कराची विमानतळावर हल्ला केला. त्यात उझबेक दहशतवादी जास्त होते. लष्कराने मिर अली, मिरानशहा येथील आयएमयूच्या अड्डय़ांवर बॉम्ब टाकले. शेवटी आयएमयूच्या अनेक अतिरेक्यांनी अफगाणिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद अली मात्र तिथेच थांबला. या काळात इस्लामिक स्टेटचा (आयएस) प्रभाव वाढत होता. मुल्ला दाऊदुल्लाच्या प्रयत्नांमुळे मोहम्मद अली आयएसमध्ये सामील झाला. त्या दोघांनी तालिबानला आयएसमध्ये सामील होण्याची गळ घालण्याचा प्रयत्न केला. तालिबानला ते मान्य नव्हते. ८ नोव्हेंबर २०१५ ला तालिबानने आयएमयूच्या अड्डय़ांवर हल्ले केले. त्यात अनेक उझबेक अतिरेकी मारले गेले. शाहबाजने तालिबानपुढे शरणागती पत्करली.

तालिबानने शाहबाज आणि इतरांना उरुझगान येथे आणून तुरुंगात टाकले. आपण आयएमयूचे दहशतवादी नसून शाहबाज तासीर आहोत असे सांगितले तरी कोणी विश्वास ठेवणार नाही, म्हणून त्याने स्वत:ची ओळख युसूफ ब्रिटानिया म्हणून करून दिली. तुरुंगातच असलेल्या तालिबानच्या एका नेत्याला हे समजावून सांगण्यात शाहबाजला प्रयत्नांती यश आले. शेवटी त्याला सोडण्यात आले, मात्र तेथून पाकिस्तानला जाणे सोपे नव्हते. मालंग नावाच्या त्या तालिबानी अतिरेक्याने शाहबाजला मोटरसायकलवरून क्वेट्टाला पोहोचविण्याची व्यवस्था केली. तो सात दिवसांचा अतिशय कठीण प्रवास होता. क्वेटाच्या अलीकडे त्याला उतरवण्यात आले. तेथून तो कुचलक येथे आला. तेथील हॉटेलातून त्याने आईला फोन केला. तो दिवस होता ८ मार्च २०१६. आमना यांनी लगेच लष्कराशी संपर्क साधला. ५० मिनिटांत लष्कराचे जवान हॉटेलवर पोहचले आणि जवळपास पाच वर्षांनंतर शाहबाज पाकिस्तानात परतला. त्याला  लष्करी विमानातून लाहोरला आणण्यात आले.

अशा कठीण काळातही प्रेम माणसाला हिंमत देते हे, शाहबाजच्या शब्दांतून सतत जाणवत राहते. वडील सलमान आपल्याला हिंमत ठेवण्याचा सल्ला देत आहेत, असे त्याला हरक्षणी जाणवत असे. अत्याचार करणाऱ्या काहींचीही मदत झाल्याची नोंद त्याने या पुस्तकात केली आहे. शाहबाजचे अपहरण झाल्यानंतर लाहोरला गेलो असताना मी मुद्दाम शाहबाजच्या घरी गेलो होतो. त्याच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणे आणि तो परत येईल, याबद्दल विश्वास असणाऱ्या कुटुंबाला पाठिंबा देणे, हा माझा उद्देश होता. तासीर कुटुंबीयांना भेटल्यानंतर, त्यांच्यात एकमेकांबद्दल असलेले प्रेम पाहिल्यानंतर, त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश येईल, अशी मला खात्री होती, मात्र तसे होण्यास सुमारे पाच वर्षे जावी लागली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Five terrible years in the custody of militants lost to the world ysh

First published on: 30-09-2023 at 02:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×