योगेंद्र यादव

देशभरात कुठेही जा, कोणत्याही गल्लीबोळात दिसणारे फ्लेक्स ही आजची राजकीय संस्कृती आहे. कुणाला आवडो.. न आवडो, तिच्यामधून आजच्या भारतीय समाजमानसाचे राजकीय प्रतिबिंब दिसते..

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
secularism in india conception of secularism in indian constitution
संविधानभान : भारतीय धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप
bharat gpt hanumaan
भारत जीपीटीचे ‘हनुमान’ एआय लवकरचं होणार लाँच; तुम्हाला ‘या’ Made In India मॉडेलबद्दल माहीत आहे का?

फ्लेक्स बॅनर्स हे राजकारणाच्या या प्लास्टिक युगाचे प्रतीक आहे. त्यासाठीची साधनसामग्री, तिचा वापर आणि त्यातून मिळणारा संदेश – फ्लेक्सबद्दलची प्रत्येक गोष्ट आपल्या सार्वजनिक जीवनाच्या बदलत्या स्वरूपाचे प्रतीक आहे. याला मी भारतीय राजकारणाचे फ्लेक्सीकरण म्हणतो.‘भारत जोडो यात्रे’तून देशाच्या वेगवेगळय़ा भागांत फिरताना, फ्लेक्स बॅनरची; बहुतेक भारतीय भाषांमध्ये त्याला ‘फ्लॅक्स’ची म्हणतात, सर्वव्यापिता लक्षात येत नाही. रस्त्यांच्या दुतर्फा सर्व आकारांचे फ्लेक्स लावलेले दिसतात. वाढत्या फ्लेक्स अर्थव्यवस्थेत ‘भारत जोडो यात्रे’नेही योगदान दिले आहे. परंतु फ्लेक्स फक्त या ‘भारत जोडो यात्रे’पुरते किंवा एकूण राजकारणापुरते मर्यादित नाही. लहान शहरे आणि अगदी ग्रामीण भागही कोचिंग क्लासेस, शाळा, टाऊनशिप (एनसीआरच्या आसपास), दागिने (केरळमध्ये), कपडे आणि तुमच्याकडे काय आहे अशा जाहिरातींनी भरून गेला आहे. प्रत्येक दुकान, अगदी तुमच्या जवळचा सलूनवालादेखील आता ग्राहकांना आमंत्रित करण्यासाठी फ्लेक्स लावतो.

स्वस्त, सोयीस्कर फ्लेक्स
प्रत्येक पावलावर फ्लेक्सच्या माध्यमातून राजकारणाच्या खुणा दिसत राहतात. पूर्वीचे राजे आपल्या विजयाची स्मारके उभारत, तसेच आजचे राजकीय नेते त्यांची दिनचर्या फ्लेक्सवरून लोकांपर्यंत पोहोचवत असतात. अगदी लहानातले लहान उद्घाटन, छोटेखानी समारंभ किंवा सभा किंवा अगदी वाढदिवसाच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर एक फ्लेक्स असतो. पक्षाच्या नेत्यांच्या छायाचित्रांची मांडणी कशी केली आहे, यातून पक्षात कोणाचे काय स्थान आहे ते समजते. राजकीय विचारसरणी फ्लेक्सवर मावेल अशा पद्धतीने मांडलेली असते. फ्लेक्सच्या माध्यमातून राजकीय नेता आपली प्रतिमानिर्मिती करत असतो. इंग्रजी बोलीभाषेत ‘फ्लेिक्सग’ या शब्दाचा अर्थ आहे दिखावा करणे. राजकारणी लोकांनी केलेला फ्लेक्सचा वापर तो अर्थ सार्थ करतो.
नवीन राजकीय बाजारपेठेच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी फ्लेक्सचा शोध लावला गेला. दहा रुपये किंवा त्याहूनही कमी प्रति चौरस फूट हा फ्लेक्सचा दर खूपच स्वस्त आहे. जुन्या पद्धतीच्या कापडाच्या फलकापेक्षा फ्लेक्स अधिक टिकाऊ आणि पटकन तयार होणारे आहे. ते धातू किंवा फायबरग्लास बिलबोर्डपेक्षा स्वस्त आणि हलके आहे. भिंतीवर लिहिण्यापेक्षा फ्लेक्स तयार करणे आणि हाताळणे सोपे आहे. ते वर्षभर त्याच भिंतीवरून तुमच्याकडे टक लावून पाहत तुमच्या गेल्या वर्षीच्या तुमच्या राजकीय विचारसरणीची आठवण करून देत नाहीत. एकदा उपयोग संपला की एखाद्या गरीब माणसाच्या दारातले पायपुसणे किंवा घरातला आडोसा म्हणून त्याचा वापर सुरू झालेला असतो. यातून फ्लेक्स गरिबांना राजकारणाच्या उपयुक्ततेची आठवण करून देत असतात. नावाप्रमाणेच, ते भारतीय राजकारणाला आज आवश्यक असलेली लवचीकता प्रदान करतात. भाजपला हेवा वाटेल अशा पद्धतीने फ्लेक्सने आपल्या सर्व स्पर्धकांवर मात केली आहे, यात कसलेच आश्चर्य नाही.

फ्लेक्सच्या बाजारपेठेत भरपूर वैविध्य पाहायला मिळते. चार बाय सहा आकाराचे लहान लहान फलक आता इतिहासजमा झाले आहेत. आता आपण महाकाय होर्डिगच्या युगात आहोत. दक्षिण भारतीय चित्रपटांची ज्या पद्धतीने कटआऊट्सचा वापर करून जाहिरात केली जाते, तसे आता सुरू झाले आहे. त्याच्या पोताप्रमाणेच त्याच्या प्रकाशयोजनेचेही विविध पर्याय मिळतात. एखाद्याला भडक, चमकदार फ्लेक्स आवडत नसेल तर त्याला मॅट फिनिशचा पर्याय असतो. एखाद्या सुपरमार्केटमध्ये किंवा राजकारणाच्या बाजारपेठेमध्ये, निवडीला भरपूर वाव असतो, तेव्हा त्या विविध उत्पादनांमध्ये खरोखरच काही फरक असतो का आणि त्यामुळे खरोखरच त्या निवडीला काही महत्त्व असते का, असा प्रश्न पडतो.

संदेशवाहक हाच संदेश
या फ्लेक्सरूपी ‘बगिच्या’मधून अर्थ काय शोधायचा असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडू शकतो. पण तसा तो पडणे व्यर्थ आहे. कारण समस्या फ्लेक्समध्ये नाही, तर तुमच्यात आहे. शेवटी अर्थ हा पाहणाऱ्याच्या डोळय़ात असतो. एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा कालावधी दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. त्यामुळे अशा या युगात फ्लेक्सही दहा सेकंदांत राजकारणाबद्दल सांगतात. साहजिकच, मजकुरावर मर्यादा येते. त्यामुळे प्रतिमाच जास्त महत्त्वाच्या ठरतात. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे छायाचित्रांचा कोलाज. त्याला आपण चित्रहार म्हणू या. मी एकदा एका फ्लेक्समध्ये २०० हून अधिक छायाचित्रे मोजली होती. त्यामुळे अर्थाच्या दृष्टीने एक छायाचित्र एक हजार शब्दांच्या बरोबरीचे असते, ही जुनी म्हण आता उलट करून हजार चित्रे एका शब्दाच्या तोडीची आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे की काय, असे तुम्हाला वाटू शकते.

कारण या चित्रहारातून दिला जाणारा सूक्ष्म संदेश तुम्ही वाचत नाही. त्यात हिंदी कॅलेंडरच्या प्रतिमाशास्त्राचे अनुसरण केलेले असते. महत्त्वाच्या व्यक्ती अत्यंत काळजीपूर्वक त्या फ्लेक्सच्या वरच्या भागात असतात. प्रतिमांचा क्रम नीट पाहिला तर, त्यातून दिला जाणारा वैयक्तिक आणि गटनिष्ठ राजकीय संदेश समजतो. ‘भारत जोडो यात्रे’संदर्भातील बहुतेक फ्लेक्समध्ये राहुल गांधी यांचे छायाचित्र आकाराने सगळय़ात मोठे आणि त्या फ्लेक्सच्या मध्यभागी आहे. खाली सर्व ‘निष्ठावंतां’ची छायाचित्रे असतात, पण त्यातही फ्लेक्ससाठी पैसे देणाऱ्यासाठी मोक्याची जागा असते. एकात एक अशीही कट-आऊट असतात (उदा. राहुल गांधी यांचे मोठे कट-आऊट आणि त्यांच्या आतल्या बाजूला स्थानिक नेते दीपेंद्रसिंग हुडा यांचे कट-आऊट). त्यातून कोणाचे स्थान काय आहे, हे लक्षात आणून दिले जाते. काही वेळा, राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करणारे फ्लेक्सही दिसतात. पण अनेकदा संदेशवाहकच संदेश असतो.

पक्षांतर्गत संदेश देण्याव्यतिरिक्त या फ्लेक्सचा काही उपयोग असतो का, असा तुम्हाला प्रश्न असेल तर पुढे वाचा. आजकाल लोकांचा सार्वजनिक वावर कमी होऊन टीव्हीच्या पडद्याकडे ओढा वाढला आहे, मोबाइल वगळता सार्वजनिक लक्ष वेधून घ्यायचे खूपच कमी मार्ग उपलब्ध आहेत. फ्लेक्स हा सार्वजनिक व्यासपीठावर तुमचे अस्तित्व दाखवून देण्याचा एक मार्ग आहे. फ्लेक्स म्हणजे एखाद्याच्या स्वारस्याची अभिव्यक्ती; फ्लेक्स म्हणजेआगामी निवडणुकांसाठी दाखल केलेला एक प्रकारचा उमेदवारी अर्ज; फ्लेक्स म्हणजे विशिष्ट राजकीय पक्षाशी, गटाशी असलेला आपला संबंध जाहीर करणारे विधान; फ्लेक्स म्हणजे तुमच्या राजकीय अस्तित्वाचा पुरावा; फ्लेक्स म्हणजे ग्रीटिंग कार्ड; फ्लेक्स म्हणजे आभार मानण्याचे माध्यम; फ्लेक्स म्हणजे प्रसिद्धिपत्रक; फ्लेक्स म्हणजे कारवाईची सूचना; फ्लेक्स म्हणजे आजच्या बाहुबलींचा सार्वजनिक जीवनाच्या चकचकीत आणि कमकुवत पृष्ठभागावर कोरलेला एक प्रकारचा शिलालेखच.. भारतातील आजच्या राजकारणाचे तो प्रतिनिधित्व करतो.

लेखक ‘जय किसान आंदोलन’ आणि ‘स्वराज इंडिया’चे संस्थापक आहेत.
yyopinion@gmail.com