लंडनमधील फोलिओ सोसायटी या प्रकाशन संस्थेकडून तयार होणारे अभिजात आणि समकालीन ग्रंथ हे सध्या जगातील परमोच्च पुस्तकनिर्मितीचा नमुना म्हणून पाहिले जातात. देखण्या, पुठ्ठाबांधणीच्या खास चित्रे काढून घेतलेल्या आणि अभ्यासकांच्या नव्याच प्रस्तावनेसह साकारलेल्या या ग्रंथप्रती प्रचंड महागड्या असल्या तरी जगभरात ऑनलाइन खपतात. अमेरिकेच्या अडीचशेव्या स्वातंत्र्यवर्षाच्या निमित्ताने या संस्थेने नुकतेच जगभरातील आपल्या अनुयायी वाचकांना सर्वोत्तम अमेरिकी कादंबरी कोणती, याची विचारणा केली. सर्वाधिक उत्तरे आली ती हर्मन मेलविलच्या ‘मोबी डिक’बाबत. त्यामुळे फोलिओ सोसायटीने मोबी डिकची ७५० प्रतींची आपली खास आवृत्ती सादर केली. या प्रतीची किंमत आहे ६१० पौंड (सुमारे ७८,०८० रुपये)! वॉशिंग्टन पोस्टच्या बुक सेक्शनमध्ये कैक दशके सदर चालवणारे समीक्षक मायकल डर्डा यांच्या प्रस्तावनेसह आणि भरपूर चित्रांसह ती सादर झालीय. पुस्तक महागडे असले तरी डर्डा यांची संपूर्ण प्रस्तावना आणि पुस्तकाच्या आतील काही चित्रे असा ऐवज पहिल्या दुव्यावर मोफत वाचता येऊ शकेल. फोलिओ सोसायटीच्या पुस्तकांचा खासगी संग्रह असलेल्या यूट्यूबरच्या व्हिडीओत (दुसरा दुवा) या पुस्तकांविषयी भरपूर दृश्यमाहिती मिळेल. या संस्थेच्या कामाबद्दल अद्याप अनभिज्ञ असल्यास एका लेखाचा (तिसरा) दुवा उपयुक्त ठरेल.

https://tinyurl.com/mpsnwthw n https://tinyurl.com/2wczdrez

n https://tinyurl. com/4ujk25tf

एआय आणि कथा-कादंबर्‍या…

इंग्रजी भाषेत शैक्षणिक लिखाणापासून जाहिरातींपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून भाषिक उत्पादने तयार केली जातायत. यात सध्या विविध प्रादेशिक भाषा अद्याप अद्ययावत व्हायच्या असल्या तरी त्यांत चॅट जीपीटीवर कविता-कथा लिहिण्याचे खेळ-उद्योग आपापल्या पातळीवर चालताहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाइतकी कल्पक बनू शकणार नाही यावर एकमत आहेच; पण सध्या तर ही कृत्रिम बुद्धिमत्ता कशी चुकीच्या आणि हास्यास्पद/ गमतीशीर भाषेचा वापर करते, या निष्कर्षावर बरेच प्रादेशिक भाषिक समुदाय ठाम आहेत. पुुढल्या काळात प्रादेशिक भाषाही एआय समरसतेने शिकेल. पण सध्या वृत्त-वाहिन्यांवर सर्रास ऐकू येणार्‍या प्रादेशिक भाषेसारखी ती होईल का? भाषा अभ्यासक, कथा-कादंबरीकार यांनी ‘एआय’ बदलत असलेल्या आणि रूढ करीत असलेल्या भाषेबद्दल गार्डियनमध्ये आलेल्या लेखात चर्चा केली आहे.

एआय वाद आणि कथाचर्वण…

गेल्या महिन्यापूर्वी कॉमनवेल्थ पारितोषिकासाठी निवडण्यात आलेली जमीर नजीर यांची कथा ही ‘एआय’चा वापर करून तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आल्यानंतर नवा वाद उफाळून आलेला. गेल्या आठवड्यात ही कथा पूर्णपणे एआयरहीत आणि निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला गेला. लेखकाने आपल्या कथेबाबत दिलेल्या स्पष्टीकरणावरून ‘स्लेट’ने घडवलेली चर्चा, येथे वाचता येईल.

https://tinyurl.com/bdd7sere