वर्तमानातील आपली अमानवी कृत्ये, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि भयावह परिस्थिती याला पूर्वजांनी केलेली दुष्कर्मे आणि संचित पाप कारणीभूत आहे, असे मानून कुटुंबाच्या पुरातन पार्श्वभूमीचा घेतलेला शोध, त्यातून उलगडणारी एका गूढ व्यक्तिमत्त्वाची कृष्णकृत्ये आणि रहस्यमय भूतकाळ… टी. डी. रामकृष्णन यांच्या ‘फ्रान्सिस इटी कोरा’ या मूळ मल्याळम कादंबरीत असा काल्पनिक इतिहास मांडण्यात आला आहे. प्रिया के. नायर यांनी इंग्रजीत अनुवाद केलेल्या या कादंबरीत तथ्य व मिथक यांची गुंतागुंत चित्रित असली, तरी एकूण कथानक एक पर्यायी व समांतर इतिहास सादर करते.
फ्रान्सिस इटी कोरा या १५ व्या शतकातील केरळमधील प्रसिद्ध मसाला व्यापार्‍याभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. फ्रान्सिसचा वारसा गुंतागुंतीचा आहे. त्याचा रहस्यमय इतिहास त्याचा वंशज झेवियर इटी कोराच्या प्रवासातून उलगडत जातो. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहत असलेला झेवियर हा इराकच्या युद्धातील माजी सैनिक. लैंगिक शोषणासारख्या असंख्य गुन्हेगारी कृत्यांमुळे व्यथित असलेला झेवियर केरळमधील ‘आर्ट ऑफ लव्हमेकिंग’ संस्थेतील रेखा नावाच्या मल्याळी मुलीशी संवाद साधतो. ‘इंटरनेट चॅट ट्रान्सक्रिप्ट’ने सुरू झालेली ही कादंबरी उत्तरोत्तर गूढता वाढवत नेते. चॅट सत्रे आणि ईमेलच्या मालिकेद्वारे झेवियर त्याची जीवनकहाणी आणि त्याला भेडसावणार्‍या सध्याच्या समस्या सांगतो. झेवियरची आई इटालियन होती. तिचे पूर्वज १५ व्या शतकातील केरळमधील कुन्नमकुलम येथे मसाला व्यापारी होते, जे नंतर इटलीतील फ्लोरेन्समध्ये स्थायिक झाले. त्यांचे नाव फ्रान्सिस इटी कोरा.

रेखा आणि तिच्या काही जवळच्या सहकार्‍यांसह झेवियर त्याचा पूर्वज फ्रान्सिस इटी कोराचा शोध घेतो. या शोधातून फ्रान्सिस इटी कोराची अद्भुत माहिती मिळत राहते. जगातील बहुतेक सर्व खंडांमध्ये पसरलेल्या १८ कुटुंबांचा एक समूह आहे, जे इटी कोराचे थेट वंशज आहेत. त्याच्या काही वंशजांकडे काही प्राचीन पुस्तके व हस्तलिखिते आहेत. मात्र ती कुटुंबाबाहेर कुणालाही वाचण्यास मनाई आहे. मोठ्या प्रयासाने ही पुस्तके मिळवून, काही गणित संशोधक व अभ्यासकांना भेटून फ्रान्सिस इटी कोरा यांचे एक विस्तृत चित्र समोर येते आणि फ्रान्सिस हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असल्याचे उलगडत जाते.

केरळमधील व्यापारासाठी प्रसिद्ध शहर असलेल्या कुन्नमकुलममध्ये फ्रान्सिसचा जन्म होतो. त्याच्याकडे असलेल्या विशाल लाकडी जहाजांमुळे तो मलबारच्या मसाल्यांचा व्यापार जगभर पोहोचवतो. यातून मलबारचा मसाले बाजार भरभराटीस येतो. फ्रान्सिसला गणित आणि खगोलशास्त्राचे उत्तम ज्ञान आहे. तो मलबार राजांना त्याच्या जहाजांचा ताफा वापरण्यास देतो. त्यामुळे जगभरात व्यापारविस्तार होऊन राजे अधिक संपन्न होतात आणि त्यांच्या प्रतिष्ठेतही भर पडते. राजांची प्रतिष्ठा वाढवणारा फ्रान्सिस लवकरच एक महान नायक म्हणून ओळखला जाऊ लागतो. पश्चिमेकडील राजे आणि राजपुत्र त्याचे त्यांच्या राजवाड्यांत जोरदार स्वागत करू लागतात. पुढे एका इटालियन महिलेशी विवाह करून तो इटलीतच स्थायिक होतो.

फ्रान्सिस इटी कोरा धाडसी, हुशार आहे. गणित हा त्याचा हातखंडा विषय आहे, पण त्याच वेळी तो अतिशय धूर्त आहे. लैंगिक वासनांनी बरबटलेला आहे. त्याचा शोध आणि त्याचे साहस हा या कादंबरीचा गाभा आहे. १५ व्या शतकातील या व्यापार्‍याचा शोध घेताना काही अनपेक्षित रहस्ये उलगडत जातात. भूमिगत स्वरूपात कार्यरत असलेल्या एका जाळ्याची जगभरात पसरलेली मुळे यातून उघड होतात. ही कादंबरी तथ्य, गूढ, मिथक आणि कल्पनारम्य इतिहासाचे परिपूर्ण मिश्रण आहे. टी. डी. रामकृष्णन यांनी स्पष्ट केले आहे की, हा इतिहास नाही. निव्वळ कल्पना आहे. ऐतिहासिक घटना आणि काल्पनिक कथा यांचा मिलाफ साधत एक दीर्घ कथा साकारण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. मात्र वर्णने इतकी चपखल आहेत की कादंबरी फ्रान्सिस इटी कोरा नावाची व्यक्ती खरोखरच इतिहासात अस्तित्वात असावी, असे वाचकाला वाटल्यास नवल नाही आणि हेच या कादंबरीचे यश आहे.

इतिहासात वास्तवात अस्तित्वात असलेल्या अनेकांची चरित्रे आणि ऐतिहासिक घटनांची तपशीलवार वर्णने कादंबरीत आहेत. वास्को द गामा, हायपेटिया, अलेक्झांडर ग्रोथेंडिक, लॉरेंझो दे मेदिची ही ऐतिहासिक पात्रे कादंबरीत येतात. कादंबरी वास्तवाचा आभास निर्माण करते ती या संदर्भांमुळे. कादंबरीतील एका प्रकरणात गणिताविषयी चर्चा असून केरळमधील १५ व्या शतकातील गणितज्ज्ञांवर ‘हायपेशियन स्कूल’चा प्रभाव असल्याची माहिती लेखक देतो.

कादंबरीत नरभक्षण, वेश्या व्यवसाय आणि मसाला व्यापार या विषयांची विस्तृत वर्णने आहेत. त्याचबरोबर विज्ञान आणि गूढवादाच्या छेदनबिंदूंचा शोध घेण्याचा प्रयत्न यात दिसतो. लेखकाने वास्तविक ऐतिहासिक व्यक्तिरेखा, गणितीय सिद्धांत आणि सांस्कृतिक टीका हे घटक एका आकर्षक कथेत गुंफले आहेत. कादंबरीतील मुख्य पात्र असलेल्या झेवियरची प्रवृत्ती क्रूर, हिंसक आणि अमानुष आहे आणि याचा संबंध तो आपल्या या पूर्वेतिहासाशी जोडताना दिसतो.

कादंबरीत इतिहासाचे संदर्भ असले, तरीही ती वाचकाला मानवी जीवनाच्या वर्तमानावर विचार करण्यास भाग पाडते. आपल्या सभोवताली घडणार्‍या घटनांचा अर्थ लावण्यास प्रवृत्त करते. कथानकातील वळणे, गुंतागुंत आणि आकर्षक पात्रे यांमुळे या मूळ मल्याळम कादंबरीत कल्पना आणि इतिहासाची भट्टी जुळून आली आहे.

फ्रान्सिस इटी कोरा
मूळ लेखक : टी. डी. रामकृष्णन
इंग्रजी अनुवाद : प्रिया के. नायर
प्रकाशक : हार्पर फिक्शन
किंमत : ३९९ रु., पृष्ठे : ३०४

sandeep.nalawade@expressindia.com