फारा वर्षांपूर्वी व्यंकटेश माडगूळकरांचा एक अप्रतिम लेख वाचला होता. ‘लेखकाचं घर’ असा. माधव आचवलांनी व्यंकटेशअण्णांच्या घराचं आरेखन केलं होतं. वास्तुविशारदांनाही ज्या गोष्टी दिसायच्या नाहीत त्या आचवल आपल्याला दाखवायचे. आचवल आणि व्यंकुअण्णा दोघेही युनिक. असो. ते एका लेखकाचं घर होतं.
प्राग हे असं एका लेखकाचं गाव आहे. हा लेखक अर्थातच फ्रान्झ काफ्का. याआधीही कलावंतांची गावं खूप पाहिली. शेक्सपियरचं स्ट्रॅटफोर्ड, वर्डस्वर्थचं लेक डिस्ट्रिक्टमधलं ग्रासमेअर, चित्रकार क्लॉड मोनेचं फ्रान्समधलं गिव्हर्नी, व्हॅन गॉगचं नेदरलँडमधलं झंडेर्ट वगैरे. यातला प्रत्येक कलाकार वेगळा. त्यांचं गाव वेगळं. काफ्काचंही तसंच.
जुन्या प्रागच्या गल्ल्यातनं हिंडताना काफ्काच्या ‘मेटामॉर्फोसिस’मधल्या झुरळसदृश किड्याची बाधा आपल्याला झाली की काय असं वाटत राहतं. कॉलेजात अपयशांशी दोन हात करत असताना ‘मेटामॉर्फोसिस’ वाचली तर दुसर्या दिवशी जाग येताना आपलंही रूपांतर असं किड्यात झालं तर काय काय करावं लागेल, कोणकोणत्या प्रोफेसर्सना आपल्याला चावता येईल असा विचार आला होता. अनेकांनी अशी काफ्क्सता अनुभवलेली असेल कधी ना कधी. काफ्काच्या प्रागमध्ये मुक्त हिंडताना मनातल्या मनात ही सगळी टिंबं जोडली जात होती. काही चुकलेले बिंदू प्रागमध्ये पाय ठेवायच्या आधी जोडले जातील असा प्रयत्न केलेला. त्याचं जे वाचलेलं नव्हतं ते मुद्दाम वाचलं. विदर्भ साहित्य संघानं काफ्का विशेषांक काढल्याचं कळल्यावर अभिमानच वाटला. नागपुरातले गिरीश गांधी, प्रफुल्ल शिलेदार यांच्यामुळे तो अंक हाती पडला. या सगळ्याच्या परिणामी प्रागमध्ये शिरण्याआधीच मन काफ्कामय झालेलं.
गंमत अशी की काफ्काचे आणि प्रागचे संबंध अजिबात बरे नव्हते. एक तर तो धर्मानं यहुदी. म्हणजे ज्यू. त्यात जर्मन भाषक. आणि मुक्काम शुद्ध कॅथलिक अशा प्रागमध्ये. हे म्हणजे एखादा ब्राह्मण उर्दू-भाषक असावा आणि त्याच्यावर वाराणसीत मुक्काम करायची वेळ यावी; तसं. असं असलं तरी काफ्का प्रागमध्ये अडकला. पुरता अडकला. त्यानं लिहिलेलंही आहे तसं… ‘‘प्राग तुम्हाला सोडत नाही… कबजात घेतं’’. त्याचं म्हणणं खरं आहे. काही तरी वेगळी गंमत आहे प्रागच्या जुन्या परिसरांत. त्या अरुंद वळणवाटी गल्ल्या. मध्येच मोकळे कलात्मक चौक. त्याच्या चारी बाजूंनी कॅफे. गावाला विभागणारी नदी. जुना; पण अजिबात जुनाट नाही असा पूल. मधूनच अगदी एखादी जुनी मोटार आपल्या शेजारून झर्रकन जाते… असा सगळा अगदी जुन्या इंग्रजी चित्रपटातला वाटावा असा माहोल. तो अनुभवला की काफ्काचं म्हणणं किती खरं आहे ते जाणवतं. प्राग तुमच्यावर गारूड करतं…!
काफ्का या प्रागमध्ये गुंतला. त्याच्या त्या विख्यात गंडासह. आपल्याकडेच असं नाही; एकंदरच जगात बर्याच ठिकाणी माणसांना मोठं होण्यासाठी मरावं लागतं. अशी माणसं हयात असतात तोपर्यंत त्यांचं मोठेपण लक्षात येत नाही. ती जातात… मग जगात कुठेतरी, कोणीतरी त्यांच्या मोठेपणाविषयी बोलतं…आणि मग एव्हाना आपल्यातून कायमचा/कायमची निघून गेलेल्याच्या मोठेपणाच्या खुणा शोधायला सुरुवात होते. काफ्काबाबतही काही वेगळं घडलं नाही. आता भले जग त्याच्या नावानं कढ काढत असेल, उसासे सोडत असेल… पण काफ्का हयात होता तोपर्यंत त्याला कोणीही विचारत नव्हतं. राजकारणाचा संबंध कसा असतो आपल्याशी त्याचं हे उदाहरण. सोविएत रशियात गोर्बाचोव यांचा उदय झाला.
बर्लिनमधली भिंत पडली, साम्यवादाचा पाडाव झाला आणि नंतर काफ्काच्या साहित्याचं महत्त्व सगळ्यांना कळायला लागलं. तोपर्यंत जे जे जर्मन त्या प्रत्येकाला विरोध होत होता झेकोस्लोवाकियात. नंतर हा देशही दुभंगला आणि जगताना दुभंग अनुभवणार्या काफ्काची लोकप्रियता वाढू लागली. अमेरिका खंडातल्या लुई बोर्जेसपासनं ते फ्रेंच जॉ पॉल सार्त्रपर्यंत अनेक देशांतील अनेक, लेखक कलावंतांवर काफ्काचा प्रभाव आहे. पण तो हयात होता तोपर्यंत त्याला यातलं काहीही माहीत नव्हतं. आपण जगण्याच्या लायकीचे नाही, आपलं साहित्य किती टाकाऊ आहे… कुठली तरी भुक्कड नोकरी का आपण करतोय… असं काय काय त्याला वाटत राहिलं. तरी तो लिहीत राहिला. तीच त्याची उसंत होती. काफ्का लेखक म्हणून आपल्याला भावतो… कारण या भावनांनी छळल्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला असतो. काफ्का जणू आपलीच वेदना मांडत असतो…
काफ्का आणि प्राग यांच्या संबंधांचे भले आता गोडवे गायले जात असतील. पण त्यात एक काव्यात्म न्याय आहे. प्रागची ही एक वाहती जखम आहे. झालं असं की दुसर्या महायुद्ध काळात जर्मन सैन्य घुसलं प्रागमध्ये. अनेकांची कत्तल झाली. एक व्यक्ती कशीबशी पळाली प्रागमधनं. बरोबर पत्नी आणि एक बोचकं. ही व्यक्ती म्हणजे मॅक्स ब्रॉड. काफ्काचा मित्र. ज्याच्यामुळे काफ्काचं साहित्य प्रसिद्ध झालं. त्याच्या जवळच्या बोचक्यात होती काफ्काची हस्तलिखितं. बायको आणि ही हस्तलिखितं घेऊन तो पळाला इस्रायलमध्ये. तेल अविवला. तिथनं त्यानं काफ्काची पुस्तकं प्रकाशित केली. आज ही सारी हस्तलिखितं इस्रायलच्या राष्ट्रीय वाचनालयात आहेत. प्रागनं ती गमावली.
हे सगळं इतिहासाचं आणि काफ्काच्या साहित्याचं ओझं घेऊन आपण त्याचं स्मृती संग्रहालय पाहायला जातो. आणि दारातच स्वत:च्या देशाच्या नकाशावर लघवी करणार्या दोघांचे पुतळे आपल्याला विचारात पाडतात. स्वत:च्या देशाच्या राजकीय/सामाजिक व्यवस्थेवर, अवस्थेवर अनेकांनी कधी तरी मनातल्या मनात दिलेली प्रतिक्रिया तिथे वाहत असते. झेक प्रजासत्ताकाच्या राज्यकर्त्यांना अजून यात देशाचा अपमान वगैरे कसा वाटत नाही, या प्रश्नाचा भुंगा घेऊन आपण त्या स्मारकात शिरतो…
सत्यजित रे यांच्या चित्रपटातलं किंवा जीए कुलकर्णींच्या ‘पिंगळावेळ’मधल्या ‘स्वामी’तलं वातावरण कसं असेल… तसं आतलं रूप. काळं-पांढरं आणि मध्येच लाल भडक रंगाची एखादी पायवाट. ठिकठिकाणी काफ्काची वचनं. त्यातली बरीचशी आपल्या आयुष्यातली… आपलीच वाटावीत अशी. वडिलांच्या दहशतीच्या कटू आठवणी… दुरावा कसा झाला ते सांगणारी… एके ठिकाणी तो म्हणतो… ‘‘माय एज्युकेशन हॅज डन मी ग्रेट हार्म’’… हे कोण नाकारेल? ‘‘द लाइफ ऑफ सोसायटी मूव्हज इन अ सर्कल’’, ‘‘द मसीहा विल ओन्ली अराईव्ह व्हेन वुई नो लाँगर नीड हीम’’… अशी सगळी जळजळीत सत्यं. आपण सुन्न होऊन बाहेर पडतो.
नंतर कुठे एका भल्या मोठ्या मॉलसमोर आपल्याला तो काफ्काचा… आरशा-आरशांनी बनलेला फिरत्या चेहर्याचा पुतळा दिसतो. आपल्या डोक्यातले विचार असेच उलट-सुलट फिरत असतात… बाहेरनं भले आपला चेहरा एकसंध दिसत असेल…आतनं तो असाच हलत असतो…
काफ्काच्या लिखाणानं आधीच छळलेलं असतं आपल्याला. आता त्या छळणुकीला प्रागचं म्हटलं तर रम्यउदास; मोहक असं कोंदण मिळालेलं असतं. त्या महिरपीतल्या काफ्काकडे बघत असताना प्रश्न पडतो… आपण आपल्यातल्या काफ्कांना-चिं. त्र्यं. खानोलकर ‘आरती प्रभू’, रॉय किणीकर, जीए, महेश एलकुंचवार-असं भेटतो का? उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्रास देतो… आणि मग प्राग आपल्याला अधिकच आवडू लागतं…!
इस शहर के लिए कोई दीवाना चाहिए… असं निदा फाजली म्हणालेत ते प्रागसाठी असेल का, हा प्रश्न हे शहर सोडताना मनात रेंगाळत राहतो. (समाप्त)
girish.kuber@expressindia.com
@girishkuber
