गिरीश कुबेर

फ्रान्सचे धडे – १

पॅरिसच्या रोलँड गॅरो स्टेडियममध्ये जाणवलं की खऱ्या आनंदाला धर्म, देश, जात अशा मानवी सीमा नसतात..

आपल्याला कळू लागलेल्या वयात पाहिलेल्या प्रतिमा मनात कायम घर करून असतात. त्यातली एक आहे टेनिसपटू बियाँ बोर्ग याची. गावस्कर हे पुरुषांमधले बोर्गच! आणि तारुण्याची जाणीव होण्याच्या काळात पाहिलेल्या ख्रिस एव्हर्टनंतर तिच्या घराण्यातल्या ट्रेसी ऑस्टीन, स्टेफी ग्राफ, गॅब्रिएला साबातिनी वगैरे. (माझा माज़ी सहकारी प्रवीण टोकेकर याची त्यावेळची टिप्पणी आणि ती कल्पना अजरामर आहे. ‘‘स्टेफी मैत्रीण असावी आणि गॅब्रिएला तिची शेजारीण’’.) अशा या प्रतिमांच्या गर्दीत डोक्यातनं जात नाही तो बोर्ग.

पॅरिसच्या रोलँड गॅरो स्टेडियममधे लाल मातीच्या कोर्टवरचा त्याचा वावर आजही तसाच मनातल्या मनात दिसतो. बोर्गचं टेनिस आणि त्याचं वागणं यातलं नक्की जास्त काय आवडतं, हा प्रश्न कोणी विचारलाच तर क्षणभर बुचकळय़ात पडल्यासारखं होईल. त्याचा स्वभाव आणि त्याचा खेळ एकच होते जणू. प्रतिस्पर्धी आदळआपट करतोय, हातवारे करतोय आणि समोर बोर्ग ढिम्म शांतपणे खेळतोय. एखादा पॉइंट गेला तरी काही नाही आणि घेतला तरी ‘येस्स’ असं म्हणत हवेत गुद्दा वगैरे मारण्याचा अभिनिवेश नाही. (हल्ली तर कौटुंबिक किंवा पर्यटकी फोटोतही माणसं दोन बोटांनी ‘व्ही’ची खूण करत असतात. त्यांचा तो बिनडोक उत्साह पाहून कोणावर, कसली व्हिक्टरी..असं काही त्यांना विचारण्याची हिंमतही होत नाही. असो.) प्रतिक्रिया फक्त एकदाच. सामन्याच्या शेवटी. हरला तर शांतपणे निघून जाणार. आणि जिंकला तर जिंकून देणाऱ्या पॉइंटनंतर दोन अजानबाहू फैलावत गुडघ्यावर बसणार. चिडचिडणाऱ्या प्रतिस्पर्धकांना पैचीही किंमत द्यायची नसते असा व्यवस्थापकीय धडा देणारा बोर्ग काय दिसायचा तेव्हा! खांद्यापर्यंत रुळणारे लांब केस, सरळ नाक, अर्धीमुर्धी दाढी, डोक्याला पट्टी आणि रुंद पण लवलवीत शरीर!! ख्रिस्ताचा टेनिसी अवतार हा.

तो हल्ली पुन्हा नव्यानं आवडायला लागलाय. झालं काय तर तो अवघ्या काही महिन्यांपूर्वी भारतात होता. बंगलोरला. प्रदर्शनीय सामन्यांसाठी. तिथं विजय अमृतराजबरोबर त्याला जीवनगौरव दिला जाणार होता. (इतकी विनोदी कल्पना आपल्याशिवाय कोणाला सुचणंच शक्य नाही) कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते. सत्काराची वेळ झाली तरी ते आलेच नाहीत. बोर्गनं अर्धा तास वाट पाहिली आणि सरळ तो निघून गेला. पलीकच्या टेनिस कोर्टावर जाऊन तो खेळायला लागला. मुख्यमंत्री दोन तासांनी आले. अमृतराज आणि सरकारी अधिकारी गेले बोर्गला बोलवायला. पठ्ठय़ा फिरकलाही नाही. तो नंतर काही शौर्ययुक्त, औद्धत्यपूर्ण बोलला असंही नाही. शांतपणे खेळत राहिला; पण सत्काराला नाही म्हणजे नाही गेला. केवळ सत्ता आहे म्हणून अधिकारस्थ उच्चपदस्थांना हे असं अनुल्लेखानं मारता येतं ही त्याची ‘एस’ आताच दिसली.त्यानं गाजवलेल्या रोलँड गॅरोसवर एक अख्खा दिवस काढायचा हे इथून निघतानाच ठरवलेलं होतं. पॅरिसला स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यासाठी भल्या सकाळीच तिथं थडकलो.. मनातल्या उत्सुकतेच्या कडेलोटाची वेळ आलेली. इतकी वर्ष टीव्हीवर पाहिलेल्या त्या वातावरणात शिरायला कधी मिळेल, असं झालं होतं.पण धक्का असा की अशीच मनोवस्था असलेले हजारो तिथं होते. अनेक तर स्थानिक आणि सहकुटुंब. आपल्याकडे क्रिकेट प्रशिक्षणात जसं उद्याच्या सचिन तेंडुलकरांना घेऊन आलेले अनेक असाहाय्य पालक दिसतात; तसं तिथलं दृश्य. फरक इतकाच की तिकडच्या पालकांवर पाल्यांचं करिअर घडवण्याची जबाबदारी नसल्यानं सगळेच आनंद घेण्यासाठी आलेले..!

आणि तो इतका होता की सांगण्याची सोय नाही. पायऱ्या उतरून आत गेल्या गेल्या सेंटर कोर्टची ती लोभस बिल्डिंग. तिच्या एका कोपऱ्याच्या दोन बाजूस खालपासून वपर्यंत फक्त रोलँड गॅरोस अक्षरं वेगवेगळय़ा आकारात धातूत कोरून लिहिलेली. संपूर्ण परिसरात मुसमुसलेली मोठमोठी हिरवी झाडं. त्यांची पालवी वातावरणातल्या तारुण्याशी स्पर्धा करणारी. समोर अतिशय श्रीमंतीनं जोपासलेली मोठी हिरवळ. लँडस्केप्ड. त्यामधून दोन पायवाटा. एक जाते डावीकडे. तिच्यासमोर भलामोठा टीव्ही स्क्रीन. त्यावर आतल्या काही सामन्यांचं प्रक्षेपण. ते पाहात बसायला खुच्र्या. दुसरी पायवाट कमरेच्या कमनीय लचकीसारख्या वेलांटीत वळून उजवीकडे लेकॉस्टच्या प्रेक्षणीय दुकानाकडे गेलेली. आणि मध्ये?

तिथला कोणता तरी बँड अप्रतिम संगीतधुना वाजवत होता. सॅक्साफोन, गिटार, कीबोर्ड, मोठय़ा व्हायोलिनच्या आकाराचं, जमिनीवर ठेवून वाजवायचं चार तारांचं चेला, टय़ुबा, हॉर्न, ट्रोंबोन वगैरे वाजवणारे वादक. एकेक वाद्याचा एकेक तुकडा. तो वाजवणारा पुढे येणार आणि मागनं त्याला सगळे साथ देणार. इतका सुंदर वाद्यमेळ आणि तितकंच त्या वादकांचं आनंद घेत घेत वाजवत राहाणं. पॅरिसच्या मानानं कडक वाटावं असं आणि इतकंच ऊन, त्याला जास्तीत जास्त देहात मुरवून घेता यावं अशा कपडय़ातली गर्दी, हलक्या हलक्या वाऱ्याच्या झुळका, वातावरणात अपूर्व उत्साह, आनंद आणि जगातल्या सर्व चिंता मिटल्यात असं वाटायला लावणारा तो वाद्यमेळ. ते सगळं इतकं कमालीचं आनंदमयी होतं की पलीकडे स्टॉल्सवर आईस्क्रीम विकणाऱ्या तरुणीही आईस्क्रीमचे कोन त्या तालावर नाचत नाचतच भरत होत्या आणि घेणारेही सम साधत ते आपल्या हाती घेत होते. रस्त्यावर पाठीवरच्या चौकोनी सॅकमधून बीअर विकणारी मुलंमुली. तेही मागच्या संगीतावर हातवारे करत नाचत-मुरडत हिंडणारे. त्यांच्या कमरेला लटकवलेले प्लास्टिकचे ग्लास त्या तालावर हिंदूकळत होते.

आणि अशा भारीत अवस्थेत समोरच्या दरवाजातनं दिसणाऱ्या पायऱ्या चढून सेंटर कोर्टच्या गॅलरीत प्रवेश केला आणि काही क्षण आ वासलेल्या अवस्थेतच गेले. एकतर खेळाडूंच्या बऱ्यापैकी जवळच्या रांगेत जाता आलं आणि समोरचे खेळणारे. ते अल्काराझ आणि वाविरका होते. सगळं वातावरण प्रत्यक्ष सामन्यासारखंच. टाळय़ा वाजवणारे प्रेक्षक. मधेच खेळाडूंच्या भाषेत काहीतरी घोषणा देणारा एखादा. नव्हते ते ‘मेस्सी’ म्हणत सर्वाना शांत बसायचं आव्हान करणारे पंच. खरं तर फ्रेंच ओपनला जाणार आणि नादालनं नेमकी माघार घेतलेली. हा योगायोग काहीसा खट्टू करणारा होता. पण ते दु:ख नादालच्याच देशबंधु अल्काराझनं दूर केलं. महत्त्वाच्या खेळाडूंना दोन दोन तास दिलेले असतात. नंतर मेदवेदेवही खेळला. आणि कहर म्हणजे पुढच्या सत्रात चक्क गोरान इवानेसेविच आणि त्याचा शिष्य जोकोविच खेळताना पाहायला मिळाले. हे म्हणजे एकाच दिवशी ज्युलिआ रॉबर्ट्स, सँड्रा बुलक, जेनिफर लॉरेंन्स, मेरील स्ट्रीप, हेल बेरी अशा एका पाठोपाठ एक समोर याव्यात. त्यात लक्षात राहिली ती सरावातही एकही पॉइंट न देण्याची जोकोविचची वृत्ती.

योगायोग असा की तोच दिवस फ्रेंच ओपनच्या ड्रॉचा होता. बाहेर पडद्यावर कोण कोणाशी खेळणार याचा तपशील भरला जात होता. त्यावरही अनेक चित्कारत होते. अनेकांचे ओह् शि* कानावर पडत होतं. काहींच्या अमुक-तमुकच्या सामन्याला यायलाच हवं च्या आणाभाका तर काहींची बरं झालं..आजच आलो ही भावना.

पण कुठेही कसलीही नकारात्मकता, कटुपणा नाही. तिथे असणाऱ्यांच्या अंगावरचे सदरे (फारच कमी होते ते) सुखी माणसांचे म्हणून वाटायला हवेत.. असं वाटावं असा माहोल. लोकं गंगाजल, झमझम, होली ॲश वगैरे भरून आणतात; तसं वातावरण भरून नेता आलं असतं तर..? असो.पण या सगळय़ात लक्षात घ्यावी अशी एक बाब. या संपूर्ण स्पर्धेत खेळणारा/खेळणारी, विजेतेपदाच्या जवळ जाऊ शकेल असा/अशी एकही फ्रेंच खेळाडू नाही. तरीही स्थानिक फ्रेंचाच्या मनात त्याचा कसलाही खेद नव्हता. परदेशांतून आपल्या अंगणात येऊन खेळणाऱ्यांच्या आनंदात ही फ्रेंच मंडळी जणू घरचंच कार्य असावं अशा उत्साहानं सहभागी झालेली. फ्रेंच ‘ओपन’चा हा नवाच अर्थ तिथं गवसला. तो पुढे वारंवार समोर येणार होता. खऱ्या आनंदाला धर्म/देश/जात अशा मानवी सीमा नसतात. आपल्या नसेल पण शेजारच्या अंगणातल्या प्राजक्ताच्या सडय़ाचाही आनंद घेता येणं म्हणजे फ्रेंच ओपन.दिवस संपवून संध्याकाळी हॉटेलवर परतल्यावर भारतातल्या बातम्या ‘वाचत’ होतो. एका पक्षाच्या यशासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्यानं व्यक्त केलेल्या आनंदावर तिसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या प्रतिक्रियेची ती बातमी होती. आनंद व्यक्त करणाऱ्या ‘त्या’ नेत्यास याचा प्रश्न होता: शेजारच्याच्या घरी पाळणा हलला म्हणून तुम्हाला का आनंद होतोय ?

खरं फ्रेंच ओपन अनुभवल्याच्या आनंदाला मायदेशातनं आलेला हा उतारा !

girish.kuber@expressindia.com

twitter:@girishkuber

Story img Loader