खेळ, खेळी खेळिया : भूमिका घ्यावी लागते, तेव्हा!

लेखक, कलाकारांनी राजकीय वा सामाजिक वा इतर कोणत्याही प्रश्नावर भूमिका घ्यावी की न घ्यावी, याविषयीच्या चर्वितचर्वणात बहुधा माध्यमांनाच रस अधिक असतो.

alexandra kosteniuk garry linekar
गॅरी लिनेकर, अलेक्झांड्रा कोस्टेनियुक

सिद्धार्थ खांडेकर

काही खेळाडू आपल्या खेळाबाहेरही जिगरबाजपणा दाखवतात..

लेखक, कलाकारांनी राजकीय वा सामाजिक वा इतर कोणत्याही प्रश्नावर भूमिका घ्यावी की न घ्यावी, याविषयीच्या चर्वितचर्वणात बहुधा माध्यमांनाच रस अधिक असतो. हे एक माध्यमकर्मी म्हणून मान्य केल्यानंतर गेल्या काही दिवसांतील घडामोडींविषयी भाष्य करणे थोडे सोपे जाते. लेखक, कलाकारांइतकेच खेळाडूही आपल्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. मनोरंजन विश्वाइतकीच कोटय़वधींची उलाढाल या दुनियेतील प्रमुख आणि लोकप्रिय खेळांमध्ये होत असते. त्यामुळे लेखक, कलाकारांप्रमाणेच खेळाडूंनीही एखाद्या ज्वलंत विषयावर भूमिका मांडायला हवी, मतप्रदर्शन केले पाहिजे अशी अपेक्षा माध्यम आणि वैचारिक वर्तुळातून वरचेवर व्यक्त केली जात असते. भूमिका मांडायला हवी(च), या बाजूचे आणि विरोधातले असे दोन्ही मतप्रवाह असतात. भूमिका मांडण्यात काही व्यावहारिक अडचणी असतात, ज्या खेळाडू आणि कलाकारांसाठी सामायिक असतात. यात सर्वात मोठी अडचण ‘फॅनबेस’ची असते. चाहत्यांना धर्म, जात, राजकीय विचारसरणी, राष्ट्रीयत्व अशी बंधने नसतात. त्यांचे खेळाडू वा कलाकारावर निस्सीम, निरपेक्ष प्रेम असते. परंतु खेळाडूने विशिष्ट विषयावर भूमिका घेतल्यावर बहुतेकदा त्या भूमिकेच्या बाजूने आणि विरोधात असे तट चाहत्यांमध्येच पडतात. उदयोन्मुख वा सक्रिय खेळाडूंसाठी अशी विभागणी फारशी उत्साहवर्धक ठरत नाही. शिवाय हल्ली कॉर्पोरेट पुरस्कर्ते, खेळाडू संलग्न असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांचे नियम व अटी अशा प्रकारच्या मतप्रदर्शनाच्या आड येतात. व्यक्त झालेच पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्या मोठय़ा वर्गाच्या हे फारसे ध्यानात येत नाही. परंतु या प्रकारचे बंधन निवृत्त, माजी खेळाडूंवर नसते. तेव्हा त्यांनी तरी व्यक्त होण्यास काय हरकत आहे, असा नेमस्त सूरही आळवला जातो. या सगळय़ाची चर्चा होण्यास कारणीभूत ठरल्या गेल्या काही दिवसांतल्या घटना.

पहिली अर्थातच बहुतांच्या कानावर, वाचनात आलेली. विख्यात माजी फुटबॉलपटू आणि विश्लेषक गॅरी लिनेकर विरुद्ध बीबीसी हे ते प्रकरण. गॅरी लिनेकर हे इंग्लंडमधील फुटबॉल दैवत. कारकीर्दीत कधीही पिवळे कार्डही मिळाले नाही. इंग्लंडचा राष्ट्रीय संघ आणि इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये गोलांचे विक्रम रचले. १९९०मध्ये इंग्लंड विश्वचषकाच्या उपान्त्य फेरीपर्यंत पोहोचले, ते त्यांच्याच प्रयत्नांनी. १९८६ मध्ये त्यांनी विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सहा गोल झळकावत ‘गोल्डन बूट’ पटकावला. निवृत्त झाल्यानंतर बीबीसी वाहिनीवर ‘मॅच ऑफ द डे’ या फुटबॉलविषयक लोकप्रिय कार्यक्रमाचे विश्लेषक, सादरकर्ते म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. याच कार्यक्रमात परवा त्यांच्या सहभागावर बीबीसीने तात्पुरती स्थगिती लादली आणि वाद उद्भवला. ब्रिटनमधील सत्ताधारी हुजूर पक्षाच्या निर्वासित नियंत्रण प्रस्तावावर ट्विटरच्या माध्यमातून लिनेकर यांनी कडवट शब्दांत केलेल्या टीकेला बीबीसीने आक्षेप घेतला. राजकीय मुद्दय़ांवर भूमिका घेता येणार नाही, बाकी लिनेकरने व्यक्त होण्यास आमची ना नाही, अशी काहीशी संदिग्ध भूमिका बीबीसी व्यवस्थापनाने घेतली. लिनेकर यांनी यापूर्वीही अनेकदा काही विषयांवर परखड मतप्रदर्शन केलेले आहे. निर्वासितांविषयी त्यांची भूमिका नेहमीच उदारमतवादी राहिली. त्यांनी काही वेळा स्वत:च्या घरात निर्वासितांना आश्रयही दिलेला आहे. ब्रिटिश सरकारचा प्रस्तुत प्रस्ताव नाझी काळाची आठवण करून देणारा असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले होते. ते बीबीसीचे सल्लागार आहेत, कर्मचारी नाहीत. पण त्यांना कार्यक्रमातून तात्पुरते वगळण्याच्या निर्णयाविरोधात बीबीसीतील स्थायी कर्मचारीही उभे राहिले. अखेरीस बीबीसीनेच या प्रकरणात माघार घेतली. लिनेकर यांची भूमिका योग्य होती की अयोग्य होती, यावर मतमतांतरे असू शकतात. पण त्यांनी भूमिका घेतली हे स्पष्टच आहे. बीबीसीवरील सर्वात लोकप्रिय फुटबॉल शोवर पाणी सोडावे लागले, तरी बेहत्तर. पण मनाला जे योग्य वा अयोग्य वाटते, ते मांडण्याची इच्छाशक्ती आणि हिंमत लिनेकर यांनी दाखवली. त्याचा कोणताही तोटा त्यांना झाला नाही. कदाचित संबंधित वाहिनी बीबीसीऐवजी आणखी कोणती असती, किंवा हा सगळा प्रकारच ब्रिटन सोडून इतर कोणत्या देशात घडला असता तर त्याचा असा सुखान्त संभवला नसताही. पण त्याची फिकीर लिनेकर यांनी केली नाही.

दुसरे उदाहरण काही रशियन बुद्धिबळपटूंचे. त्यांतला एक अलेक्सी सराना. याचे नाव फार जणांना ठाऊक असण्याची शक्यता कमीच. पण नुकताच तो युरोपियन बुद्धिबळ विजेता ठरला. वय वर्षे २३. याने काही महिन्यांपूर्वी साक्षात मॅग्नस कार्लसनला ब्लिट्झ जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत अवघ्या ९० सेकंदांमध्ये हरवले होते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या विरोधात जाहीरपणे बोलणाऱ्यांपैकी तो एक होता. गतवर्षी मार्च महिन्यात ४४ रशियन बुद्धिबळपटूंनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना पत्र लिहिले, त्यात सरानाही होता. त्यावेळी तो फार नावाजलेलाही नव्हता. ‘आमच्या राजवटीने सध्या जे काही चालवले आहे, ते निंदनीय आहे. मला ते अजिबात मान्य नाही आणि त्याविषयी मी काही करूही शकत नाही,’ असे तो त्यावेळी म्हणाला होता. रशियन बुद्धिबळ व्यवस्थेमध्ये पुतिन आणि त्यांच्या समर्थकांचा वावर मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणे ही सोपी गोष्ट नाही. युद्ध सुरू करून रशियाने स्वत:च्या अर्थव्यवस्थेचेही मातेरे करून घेतलेच आहे. परंतु युद्धापूर्वी पुतिन राजवटीच्या आशीर्वादाने बुद्धिबळ संघटना आणि बुद्धिबळपटू बऱ्यापैकी सुस्थिर होते. परंतु तरीही अनेकांनी रशिया सोडून इतरत्र जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यापैकीच एक आहे अलेक्झांड्रा कोस्टेनियुक. ही रशियाची माजी जगज्जेती आणि अजूनही एक उत्तम बुद्धिबळपटू. जवळपास दोन दशके खेळूनही पहिल्या दहात असते. रॅपिड प्रकारातही ती जगज्जेती होती. याशिवाय रशियन महिलांच्या गेल्या काही वर्षांतील अनेक सांघिक अजिंक्यपदांमध्ये तिचा वाटा मोठा आहे. ती येथून पुढे रशियाऐवजी स्वित्र्झलडकडून खेळेल. गेल्या वर्षी तिनेही युद्धविरोधात भूमिका घेतली. युद्धामध्ये कोणीही विजेता नसतो, असे तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. ‘रशियाने आजवर कधीही कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही, असा इतिहास आम्हाला सांगितला जातो. हा इतिहास आता बदलला याचे दु:ख वाटतेच,’ असे ती मागे म्हणाली होती. कोस्टेनियुक किंवा सराना हे अजूनही खेळत आहेत. परंतु अत्यंत कळीच्या मुद्दय़ावर ठोस भूमिका घेण्याची गरज त्यांच्यासाठी खेळापेक्षा मोठी ठरली.

विख्यात माजी बुद्धिबळ जगज्जेता गॅरी कास्पारॉव हा गेली कित्येक वर्षे पुतिन राजवटीविरुद्ध लढतो आहे. या विरोधापायी त्याने तुरुंगवासही भोगला. पुतिन राजवटीने त्यांच्या विरोधकांचा काटा काढण्याचे सत्र रशियाबाहेरही चालवले, हे लक्षात असूनही कास्पारॉव आजही युद्धविरोधात, युद्धखोरांविरोधात आणि लोकशाही भंजकांविरोधात लढतो आहे.

रशियाचा अखेरचा बुद्धिबळ जगज्जेता व्लादिमिर क्रॅमनिक याच्याही भूमिकेचा उल्लेख जाताजाता करायला हरकत नाही. अत्यंत नेमस्त आणि बुद्धिमान असे हे व्यक्तिमत्त्व. बिकट प्रसंगातही फार विचलित न होणारे. कोणत्याही युद्धाच्या मी विरोधातच आहे, असे क्रॅमनिकने एका मुलाखतीत सांगितले. ‘परंतु युद्धाला विरोध करणारे खरोखरच त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत, की त्यांना स्टंटबाजीत रस आहे? आम्ही योग्य त्या बाजूचे आहोत हे त्यांना जगाला दाखवून द्यायचे आहे का? यातून अधिकाधिक सहानुभूती आणि लोकप्रियता पदरात पाडून घेण्याचा प्रयत्नही असू शकतो. मला एकच प्रश्न विचारायचा आहे. इराक, सीरियामध्येही अशीच घनघोर युद्धे झाली. तेव्हा ही ‘युद्धविरोधी’ मंडळी कुठे दिसली नाहीत! प्रतिमा उजळून घेण्यापलीकडे प्रत्यक्ष युद्ध थांबवण्यासाठी, युद्धग्रस्तांना मदतीसाठी यांतील कितीजण पुढे आले? तेव्हा ही निषेधजत्रा आवरा. युद्ध थांबवण्यासाठी, वाटाघाटींसाठी पर्याय सुचवा..’ हीदेखील एक भूमिकाच. वेगळी, पण नेमकी. नि:संदिग्ध. एका खेळाडूने व्यक्त केलेली. म्हणून स्वागतार्ह. आणि आम्ही..? आयपीएलच्या प्रतीक्षेत!

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 00:03 IST
Next Story
चाहूल : पाकिस्तानची समाजदर्शक..
Exit mobile version