खामगावच्या दाट लोकवस्तीतून मार्ग काढत कसेबसे शहराबाहेर निघाल्यावर एका विस्तीर्ण जागेत इमारतींचा एक समूह दृष्टीस पडतो. मुख्य इमारत कशीबशी तग धरून उभी असलेली. अनेक ठिकाणी तिचा रंग उडालेला. आतल्या भागातील अनेक लहान इमारती खचलेल्या. काही अजूनही उभ्या पण त्यावर अवकळा पसरलेली. हे दृश्य न्याहाळत असतानाच शिक्षकांचा एक समूह समोर येतो. त्यातले सारेच्या सारे खादीधारी. डोक्यावर गांधीटोपी. त्यांना बघितल्यावर आताचे स्मार्ट व गॉगलधारी शिक्षक नजरेसमोर येतात, पण क्षणकाळच. हे शिक्षक टिळक राष्ट्रीय शाळेत अध्यापन करणारे. अजूनही गांधीवादाचा वसा जोपासणारे. मग त्यातला एकेक जसा बोलू लागतो तसा या शाळेच्या निर्मितीचा व सोबतच स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा पट उलगडत जातो.

स्वातंत्र्यलढ्याला आणखी व्यापक करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, बहिष्कार, स्वदेशी व राष्ट्रीय शिक्षण अशी चतु:सूत्री जाहीर केली. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात नगर, खामगाव, अकोला व तुमसर अशा चार ठिकाणी राष्ट्रीय शाळांना सुरुवात झाली. ही शाळा सुरू केली पारसनीस व पुरवार या दोन खामगावकरांनी. १९२१ ला. शाळेला खरा आकार दिला तो मुकुंद श्रीकृष्ण पंधे या ध्येयवेड्या तरुणाने. त्यांच्या येथील आगमनाची कथाही मोठी विलक्षण. हे पंधे मूळचे नागपूरचे.

आरंभापासून त्यांना शिल्पकलेचे वेड. त्यामुळे मुंबईच्या जेजेमध्ये प्रवेश घ्यायला गेले. तिथल्या इंग्रज प्राचार्याने खादीचे कपडे घातले म्हणून प्रवेश नाकारला. यामुळे संतापलेले पंधे गेले थेट रवींद्रनाथ टागोरांकडे. शांतीनिकेतनमध्ये त्यांनी शिल्पकलेचे जुजबी शिक्षण घेतले. ते घेताना त्यांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची ओढ स्वस्थ बसू देईना! तिथून ते घरी परतले तेव्हा वडील मृत्युशय्येवर शेवटच्या घटका मोजत असलेले. त्याही स्थितीत त्यांनी रक्ताने एक पत्र लिहिले. ‘देशसेवेसाठी घर सोडून जात आहे.’ १९२४ ला ते या शाळेत आले व ‘पंधे गुरुजींची शाळा’ नावारूपाला येऊ लागली. पंधे तसे टिळकवादी. लोकमान्य गेल्यावर गांधींच्या सहवासात आले. त्यांच्यासारखे हजारो तरुण तेव्हा घरदार सोडून बाहेर पडले होते. या सार्‍यांना आधार व प्रेरणा दिली ती गांधींनी. १९२७ व ३१ असे दोनदा गांधी या शाळेत आले. मुक्काम करून गेले. तेव्हापासून गांधी विचारांवर चालणारी ही शाळा आता कशीबशी तग धरून आहे. या परिसरात फिरताना एक देखणी इमारत लक्ष वेधून घेते. वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत उभारली पंधेंनी. त्यात सुरू झाले चित्रशिल्पकला महाविद्यालय. याचा अभ्यासक्रमही गुरुजींनीच तयार केला. तो तत्कालीन कलाकौशल्यविषयक शैक्षणिक सहमतीपेक्षा निराळा नसला तरी, भारतीय कला विचार समजून घेण्यावर यात दिलेला भर लक्षवेधी ठरतो. त्याची माहिती देणारी पुस्तिका आजही या शाळेने जतन करून ठेवलेली आहे. त्यांच्या कार्यकाळात देशभरातील शेकडो विद्यार्थी येथून शिक्षण घेऊन गेले. त्यातल्या अनेकांनी पुढे शिल्पकार म्हणून नाव कमावले. त्यातलेच एक कांतीभाई पटेल. त्यांना सरकारने पद्मश्री दिली. मात्र पंधे जिथे होते तिथेच राहिले. त्यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शनही नाकारले. शाळेच्या शिल्पकला विभागात त्यांनी साकारलेले अनेक पुतळे आजही धूळखात पडून आहेत. ते चित्रकलेतही माहीर होते. त्यांनी काढलेली चित्रे ठिकठिकाणी भिंतीला टांगलेली दिसतात. त्याची योग्य ती निगा राखावी असे शिक्षकांच्या मनात आहे. तसे ते बोलूनही दाखवतात पण त्यासाठी लागणारा पैसा आणायचा तरी कुठून या प्रश्नाचे उत्तर कुणाकडे नाही.

टिळक, गांधींची शाळा म्हणून काही ठिकाणाहून पुतळ्यांच्या ऑर्डरी मिळतात. चार पैसे साचतात पण त्यातून खर्च भागत नाही. आता शिल्पकलेचे शिक्षण घेणारे विद्यार्थीही कमी झाले. कधी पाच तर कधी दहा विद्यार्थी असतात. १९९५ पासून सरकारने या कला महाविद्यालयाला अनुदान देणेही बंद करून टाकले. शिक्षक आहेत ते केवळ दोन. ही शाळा न्याहाळताना एक चोरकप्पा दृष्टीस पडतो. त्यावर नजर जाताच शिक्षक उत्साहाने सांगू लागतात. हीच ती स्वातंत्र्यसैनिकांची लपण्याची जागा. एका भिंतीला कोरून तयार केलेला हा कप्पा दरवर्षी रंगरंगोटी करून स्वच्छ ठेवला जातो. स्वातंत्र्यलढ्यात धरपकड सुरू झाली की अनेक लोक पंधे गुरुजींच्या आश्रयाला यायचे. पोलीस आले की ते या सार्‍यांना कप्प्यात लपवून ठेवायचे. एकेकाळी ही निवासी शाळा संपूर्ण वर्‍हाडात नावाजलेली. दरवर्षी पाचशे ते सहाशे विद्यार्थी इथे शिक्षणासाठी यायचे.

वस्त्र स्वावलंबन हा शाळेचा मुख्य नियम. प्रत्येक विद्याथ्र्याने प्रवेश घेतल्यावर १० मीटर कापड तयार करायचे. त्यातून दोन गणवेश तयार व्हायचे. तिसर्‍याची मुभा नाही. ती मिजास समजली जायची. शाळेचे खादी भांडार होते. तेलाचा घाणा होता. आवारातच सेंद्रिय शेती होती. त्यात विद्यार्थ्यांनी काम करायचे. हा ‘कमवा व शिका’ योजना अमलात येण्याच्या आधीचा काळ. यातून जी कमाई होईल त्यात विद्याथ्र्याने खर्च भागवायचा. रोज दोन तास सर्वोदय विचार शिकवला जायचा. त्यासाठी लागणारी तीन क्रमिक पुस्तके शिक्षकांनीच तयार केलेली. त्याची परीक्षा व्हायची. राज्यातल्या या चारही शाळांना शिक्षण खात्याने ‘स्पेशल स्कूल’ असा दर्जा दिलेला. १९९२ ला पंधे गुरुजींचे देहवसान झाले व दुसर्‍याच वर्षी हा दर्जा सरकारने काढून टाकला. या शाळा माध्यमिक शालांत मंडळाकडे वर्ग करण्यात आल्या. त्या क्षणापासून या शाळांमधून गांधींच्या स्वप्नातले शिक्षण हळूहळू बाद होत गेले. तरीही येथील शिक्षकांना सर्वोदय विचार शिकवणे, त्याची परीक्षा घेणे व त्यात मिळालेले गुण मंडळाकडे पाठवून ते विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत समाविष्ट करायला लावणे सुरूच ठेवले. २०१५ ला यावरून वरिष्ठ स्तरावर चक्रे फिरली. दहावीची परीक्षा देणार्‍या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत एकवाक्यता असावी म्हणून सर्वोदय विचार अभ्यासक्रम बंद करण्यात येत आहे असे पत्र निघाले व या शाळेतला हा अभ्यासक्रम कपाटात बंद झाला तो कायमचा.

अलीकडचा काळ गांधींचे फक्त नाव घेण्याचा. त्यांच्या विचारांना मूठमाती कशी मिळत गेली ते या उदाहरणावरून लक्षात येते. काहींचा युक्तिवाद असा असू शकतो की आताच्या युगात हा विचार व त्यातून येणार्‍या कृतिशील शिक्षणाला काही अर्थ उरला नाही. मात्र, हे युक्तिवादकर्ते कृतिशील शिक्षण, स्वावलंबन याला कोणत्याही काळात तेवढेच महत्त्व आहे ही बाब लक्षात घेत नाहीत. अलीकडे पाठांतरकर्ते विद्यार्थी घडवण्यावर सार्‍यांचा भर. त्यात ही शाळा मागे पडत गेली. एकेकाळी येथे चर्मालय होते. मृत पशू निकास केंद्र होते. पंचक्रोशीत कुठलेही जनावर मेले की लोक बैलगाडीत टाकून ते शाळेत आणून सोडायचे. त्याची कातडी सोलण्यापासून वस्तू तयार करण्यापर्यंतची कामे शाळेतले शिक्षक व विद्यार्थी करायचे. आता हाही विभाग बंद झाला. हे ठाऊक नसलेले लोक अजूनही कधी कधी जनावरांचे मृतदेह घेऊन येतात. त्यांची समजूत काढून त्यांना परत पाठवावे लागते असे शिक्षक सांगतात.

पंधे गुरुजींच्या निधनानंतर मधुकरराव चौधरी शाळा संचालित करणार्‍या संस्थेचे अध्यक्ष झाले. स्वातंत्र्यानंतर या शाळेच्या संदर्भात घडलेली ही एकमेव दिलासा देणारी बाब. ते राजकारणात सक्रिय असल्याने शाळा पुन्हा रुळावर आली. चौधरींनी शाळेला शंभर एकर शेतजमीन मिळवून दिली. ती गांधीविचारांचे कार्यकर्ते व शिक्षक कसतात. त्यातून चांगले उत्पन्न येते व अन्नधान्याचा वापर शाळेत शिकणार्‍या गरीब मुलांसाठी करण्यात येतो. शाळेला शिक्षकांच्या वेतनाशिवाय सरकारकडून काहीच मिळत नाही. मग दरवर्षी शिक्षक व विद्यार्थी गांधींची ‘मुष्टीफंड’ योजना राबवतात. शहरभर फिरतात. लोक स्वेच्छेने देणगी देतात. त्यावर ही शाळा कशीबशी तगून आहे.

ही सारी माहिती शिक्षकांकडून ऐकता ऐकता सायंकाळ झालेली. तेवढ्यात चाळीसेक विद्यार्थी जमले व सार्‍यांची जायची लगबग सुरू झाली. मग लक्षात आले आज गांधी पुण्यतिथी. तेवढ्यात हातातली काठी टेकत सरूताई सेवक आल्या. त्या पंधे गुरुजींच्या मानसकन्या. शाळेत राहतात. मग सार्‍यांचा काफिला शहरातल्या गांधी पुतळ्याकडे निघाला. तिथे फक्त हे विद्यार्थी व शिक्षक. आजूबाजूने जाणारे त्याकडे कानाडोळा करत असल्याचे बघून मनात खिन्नता दाटून आली. श्रद्धांजलीचा कार्यक्रम आटोपल्यावर सरुताईंना पुन्हा शाळेत सोडून परतताना ‘जग बदलले रे बाबा’ हे वाक्य मनात घर करून राहिले.