हा प्रसंग गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्यादरम्यानचा. कस्तुरबाला घेऊन ते दरबानमधल्या ब्रीच ग्रोव्ह या घरात राहायला आले तेव्हाचा. तुषार गांधींनी अगदी अलीकडे लिहिलेल्या ‘द लॉस्ट डायरी ऑफ कस्तुर, माय बा’ या पुस्तकात सविस्तर नमूद केलेला. कस्तुरबा कमालीच्या कर्मकांड करणार्‍या, शिवाशीव पाळणार्‍या तर आफ्रिकेत राहून गांधींनी हे सोवळ्याचे विषय कधीच त्यागलेले. हे दोघे एकत्र राहू लागल्यावर त्यांच्यात पहिली खडाजंगी झाली ती याच मुद्द्यावर. अखेर गांधींनी बा चे स्वयंपाकघरातले सोवळेपण मान्य केले पण घरातल्या इतर भागात ते म्हणतील तसेच होईल असे जाहीर केले. त्या काळी प्रत्येकाच्या पलंगाखाली शौचाचे भांडे ठेवले जायचे. दररोज सकाळी ज्याचे त्याने ते स्वच्छ करायचे असा अलिखित नियम. गांधींच्या घरी पाहुण्यांची वर्दळ. त्यातले काही पाहुणे ही साफसफाई विसरायचे. मग काय, गांधीच त्यांचे भांडे स्वच्छ करायचे. कधी त्यांना वेळ नसला तर जबाबदारी बा वर यायची. यातून त्यांची चिडचिड वाढत गेली व एक दिवस दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हे अस्पृश्यांचे वा भंग्यांचे काम नाही. हीच खरी सेवा यावर गांधी ठाम होते. बा ला ते मान्य नव्हतेे. भांडण इतके वाढले की गांधींनी चक्क मध्यरात्री कस्तुरबांना घराबाहेर काढले. सुमारे तीन तास त्या रडत बसल्या होत्या. शेवटी गांधींना पश्चात्ताप झाला व बा ला घरात घेतले. नंतर दोघेही भरपूर रडले. हळूहळू या दोघांमधील वादाचे मुद्दे कमी होत गेले. भारतात परतल्यावर १९१७ मध्ये कस्तुरबांनी ‘शिवाशीव’चा खेळ आयुष्यभरासाठी त्यागला. गांधींनी नंतर देशभर राबवलेल्या भंगीमुक्तीची बीजे या प्रसंगात दडली होती.

भारतात फिरताना ठिकठिकाणी त्यांना डोक्यावर मैला घेऊन जाणारे भंगी दिसायचे. हे थांबवायचे असेल तर नव्या तंत्रांनी बनवलेले शौचालय प्रत्येकाच्या घरी हवे. त्यात जमा होणार्‍या मैल्यापासून खतनिर्मिती झाली तर भंग्याचेही काम वाचेल असा विचार समोर आला. लगेच सेवाग्राम आश्रमात त्यावर काम सुरू झाले. गांधींचे शिष्य विनोबांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या मदतीला आले कोकणातले आप्पासाहेब पटवर्धन. त्या काळी सेवाग्रामला बरीच शिबिरे होत. त्यात शेकडो कार्यकर्ते सहभागी होत असत. या सार्‍यांसाठी उभारलेल्या राहुट्यांमध्ये नव्या पद्धतीचे शौचालय बसवण्यात आले. मैला जमा झाल्यावर त्यावर माती टाकली जायची. जेणेकरून त्याचे खतात रूपांतर व्हावे. शौचालयासंदर्भातील या प्रयोगांना खरी गती मिळाली ती गांधी गेल्यानंतर. हे काम केले नाशिकच्या मोरेश्वर ऊर्फ भाऊ नावरेकरांनी. त्यांची व गांधींची कधी भेट झाली नाही, पण १९५० मध्ये नाशिकच्या रुंगठा शाळेतली नोकरी सोडून ते थेट पोहोचले सेवाग्रामला. ‘आपल्या शाळेतला गांधी चालला’ म्हणत विद्यार्थी रडले पण भाऊंनी तेव्हाच ठरवले, उर्वरित आयुष्य शौचालये, गॅस व सफाईसाठी वाहून घ्यायचे. सेवाग्रामला तेव्हा नई तालीमचे प्रशिक्षण सुरू होते. त्यात भाऊ सामील झाले. या अनोख्या शिक्षण प्रयोगाची सुरुवातच सफाईपासून होते. भाऊंना त्यातच रस होता. विनोबांनी या ध्येयवेड्या तरुणामधले गुण हेरले व यात जितके जास्त प्रयोग करता येतील तेवढे कर असा आशीर्वाद दिला.

प्रशिक्षण पूर्ण केल्यावर करायचे काय असा प्रश्न उभा ठाकला. तेव्हा महात्मा गांधी स्मारक निधी ही संस्था खेड्यात काम करणार्‍या सेवक कार्यकर्त्यांच्या शोधात होती. या निधीच्या ग्रामसेवा केंद्राची जबाबदारी भाऊंनी खांद्यावर घेतली व त्यासाठी निवडले नायगाव हे सिन्नर तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे गाव. आज शौचालये, सफाईच्या क्षेत्रात देशाने बरीच प्रगती केली असली तरी १९६० च्या दशकात नायगावचा खतघराचा प्रयोग देशपातळीवर चर्चेत आला तो भाऊंमुळे. त्या काळी टोपलीचे संडास गावात वापरले जायचे. भाऊंनी गावांना प्रारंभी ‘चराचे संडास’ कसे तयार करायचे ते शिकवले. गावकरी नाक मुरडायचे. त्यात जमा होणार्‍या मैल्यापासून खत ही कल्पनाच त्यांना पटायची नाही. शेवटी भाऊंनी नायगावात एक घर घेतले व तिथे ही खतघराची संकल्पना राबवून दाखवली. या पद्धतीच्या शौचालयातून तीन ते पाच महिन्यांत चांगले खत तयार झाले. ते त्यांनी गावकर्‍यांना दिले तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला. यदुनाथ थत्तेंनी या प्रयोगावर ‘साधना’त सविस्तर लेख लिहिला. त्यात भाऊंचा उल्लेख ‘सफाईचा विश्वकोश’ असा केला. या नायगाव खतघराची दखल शासनाने घेतली. राज्यातील अनेक गावांमध्ये हा प्रयोग राबवण्यात आला पण याचे जनक असलेल्या भाऊंचे पोट कसे भरते याकडे कुणी लक्ष दिले नाही.

त्यांच्या भगिनी नलिनी नावरेकर यांनी त्यांच्या आयुष्यातील चढउतार दाखवणारे एक पुस्तक लिहिले आहे. ‘एका ब्राह्मण भंग्याची गोष्ट’ असे त्याचे शीर्षक. त्यात हा सारा तपशील आहे. साठच्या दशकात गांधी विचारापासून प्रेरणा घेऊन राज्यात दोन सफाई विद्यालये सुरू झाली. त्यातले एक नाशिकला. कृष्णदास शाह त्याचे प्रमुख. त्यांनी भाऊंना शिक्षकाची नोकरी देऊ केली. ‘समग्र सफाई, गोबर गॅस व मैला गॅस प्लांट’ हे त्यांचे शिकवण्याचे विषय. यात सार्‍या देशातून विद्यार्थी यायचे. नंतर हे विद्यालय शाहांनी गुजरातमधील व्याराला स्थलांतरित करण्याचे ठरवले. भाऊ पुन्हा रिकामे झाले. मग पुन्हा खतघराचा प्रचार. देशभरात आयोजित होणार्‍या सर्वोदयींच्या संमेलनात हजेरी लावायची. या प्रयोगाची माहिती उपस्थितांना द्यायची. कुण्या गावाने पुढाकार घेतला तर तिथे जाऊन मुक्काम ठोकायचा. केंद्र व राज्य सरकारने हा प्रयोग राबवणार्‍यांना अनुदान देणे सुरू केले. भाऊ मात्र तसेच राहिले. कफल्लक. शास्त्रीय संगीताची आवड असलेल्या भाऊंना एकदा पैसे नाही म्हणून हार्मोनियम विकावे लागले. ते कातरकाम करत. गणपतीच्या मूर्ती तयार करत. पोटासाठी कातरकामाची प्रदर्शने लावत. गणपती विकले. मग भाऊंनी जनता गॅस प्लांट तयार करण्याचे तंत्र विकसित केले.

तेव्हा नाशिकला चंद्रशेखर भावे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते या तंत्राने फारच प्रभावित झाले. जिल्हा परिषदेत त्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली. नंतर राज्य शासनाने हा प्रयोग योजना म्हणून स्वीकारला. शासनाने योजना तर स्वीकारली, पण गॅस प्लांटच्या उभारणीसाठी तज्ज्ञच नव्हते. त्यासाठी भाऊंना बोलावणे येत असे. ते पदरमोड करून गावोगावी फिरत. घरात पत्नी, मुले, त्यांचे शिक्षण या सर्वांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न भाऊंना पडत असे, पण उत्तर सापडत नव्हते. अखेर त्यांच्या चाहत्यांनी कुठेतरी जमीन मिळवा व तिथेच प्रयोग सुरू करा असा आग्रह धरला. शोध सुरू झाला. गंगापूरजवळच्या वडनेरमधील जमीन त्यांना सरकारने दिली. तिथे ‘निर्मलग्राम निर्वाण केंद्र’ उभे झाले. १९८३ ला. त्यानंतर दोनच वर्षांनी भाऊ वारले. त्यांच्या भगिनी व मुलगा श्रीकांत आता हा वारसा समर्थपणे चालवतात. युनिसेफच्या विजया चव्हाण यांच्या मदतीने या केंद्राने कमी पाणी लागणारी शौचालये विकसित केली. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात या केंद्राने भरपूर काम केलेले. केंद्र व राज्य सरकारने ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. त्याची नोडल एजन्सी म्हणून त्या केंद्राची निवड करण्यात आली. हे अभियान राबवणार्‍या अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणे, त्यानुसार काम होत आहे की नाही याची पाहणी करणे अशी कामे या केंद्राकडून केली जातात. १९९० ते २०२० अशी तीस वर्षे या केंद्रातून हजारो अधिकारी व कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिले गेले. त्याचा मोठा फायदा हे अभियान यशस्वी होण्यात झाला अशी अनेक राज्यांची प्रशस्तीपत्रे या केंद्रात लागलेली आहेत.
निर्मलग्राम हे केवळ भाऊंच्या स्वप्नातून उभे झाले. त्यामुळे या संस्थेत बाहेरचे कुणी घेतलेले नाही. परिणामी संस्थात्मक वादापासून आम्ही दूर राहिलो. आजही गांधींच्या तत्त्वाने सारी कामे चालतात असे नलिनी नावरेकर अभिमानाने सांगतात. गांधी विलायतेतून शिक्षण घेऊन भारतात आल्यावर त्यांना सांगण्यात आले की आईचे निधन झाले. ही १८८८ सालची गोष्ट. तेव्हा घरच्यांच्या विनंतीला मान देत गांधी नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वरला आले होते. शुद्धीकरण विधीसाठी. बरोबर शंभर वर्षांनंतर त्याच नाशिकमध्ये भाऊंनी सफाईतून शरीर व मन शुद्धीकरणाचा प्रयोग राबवला. तो अजूनही अव्याहत सुरू आहे.