गांधींचा विचार महत्त्वाचाच, पण त्यावर मार्गक्रमण करताना काळाच्या ओघात आवश्यक बदलही करावेच लागतील, हे सूत्र समोर ठेवून चालवले जाणारे उरळी कांचनचे निसर्गोपचार केंद्र आजही जोमाने सुरू आहे, त्याला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे…

ही दक्षिण आफ्रिकेतील गोष्ट. सत्याग्रह केला म्हणून गांधी तुरुंगात होते. तिथे त्यांना कळले कस्तुरबांना रक्तक्षय झालेला. बांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे कळताच अस्वस्थ होत गांधींनी एक पत्र लिहिले. बा तसेच आश्रमवासीयांना. तिच्या इच्छेविरुद्ध ॲलोपॅथीचे उपचार करू नका. काही दिवसांनी सुटका होताच ते थेट रुग्णालयात गेले. आहे त्या स्थितीत बाला घेतले व आश्रमात परतल्याबरोबर निसर्गोपचार सुरू केले. भारतात परतल्यावर सततचा प्रवास, होणार्‍या दगदगीमुळे गांधी आजारी पडले. तेव्हाही त्यांनी ॲलोपॅथी नाकारली. यामुळे ते मृत्यूच्या दारात पोहोचले पण नकार कायम होता. शेवटी डॉक्टर व त्यांच्यात शेळीच्या दुधावर तडजोड झाली.

निधनाच्या दोन दिवस आधी कस्तुरबांना हृदयविकाराचे दोन झटके आले. तेव्हा गांधींनी आयुर्वेदिक उपचाराला तेवढी परवानगी दिली. शेवटच्या टप्प्यात बांची शुद्ध हरपली तेव्हा पेनिसिलीनचे इंजेक्शन देण्याचा आग्रह देविदासने धरला पण गांधींनी तो अमान्य केला. निसर्गोपचारांवर त्यांचा गाढा विश्वास. बा असोत की मुले. कुणीही आजारी पडले की शरीरावर मातीचे लेप लाव, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेव असे प्रयोग गांधी स्वत: करत. शुश्रूषा हा तर त्यांचा छंद! त्या काळात ॲलोपॅथी तेवढी विकसित झाली नव्हती हे खरे पण गांधी ही पॅथी ती महागडी आहे म्हणून नाकारत. सर्वसामान्य व आर्थिक दुर्बळ पंचमहाभूतांच्या चिकित्सेने बरे होऊ शकतात तर आपण का नाही हा त्यांचा सवाल. गरिबांना जे परवडते त्याचाच स्वीकार आपण करायला हवा असा त्यांचा आग्रह.

कस्तुरबांच्या निधनानंतर पुण्यात तुरुंगात असतानाच गांधींचा परिचय झाला डॉ. दिनशा मेहतांशी. ते त्या काळातले निसर्गोपचारातले तज्ज्ञ. त्यांच्याशी चर्चा करताना गांधींच्या डोक्यात आले, एखादे निसर्गोपचाराचे केंद्र सुरू करायला काय हरकत आहे. लगेच त्यांनी सहकार्‍यांसमोर ही कल्पना बोलून दाखवली. मग जागेचा शोध सुरू झाला. पुण्याच्या आजूबाजूचेच असे गाव निवडा जिथे रेल्वेमार्ग असेल, रस्ता असेल, बँक तसेच पोस्ट ऑफिस असेल. या सोयी कशासाठी तर तेव्हा स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात होता व देशभरात कुठे काय सुरू आहे ते गांधींना कळावे तसेच कुठे जायची गरज पडली तर त्यांना जाता यावे.

सहकार्‍यांनी या सर्व सोयी बघून गाव निवडले उरळी कांचन. तुरुंगातून सुटका झाल्यावर गांधी या गावात पोहोचले, तो दिवस होता २२ मार्च १९४६. जोवर हे निसर्गोपचार केंद्र सुरू होणार नाही तोवर येथून हलणार नाही अशी जाहीर प्रतिज्ञा केली. या गावात रेल्वे कंत्राटदार असलेल्या दातारांचा बंगला होता. गांधी तिथेच उतरले. पहिल्याच दिवशी त्यांनी गावकर्‍यांची सभा घेतली. मनोरथ सांगितला. गावचे पाटील महादेव कांचन यांनी गावालगतची स्वत:ची सात एकर शेती त्यांना देऊ केली. मग एकेक शेतकरी उभा राहात गेला व जागा दान करत गेला. बघता बघता ३५ एकर जागा गांधींच्या झोळीत पडली.

उत्साहात आलेल्या गांधींनी हे निसर्गोपचार केंद्र कसे असेल याचा आराखडा तयार करायला घेतला. म्हणजे उपचार केंद्र, निवास व्यवस्था, वैद्यकांची निवासस्थाने कुठे असतील हे गांधींनी ठरवले. तसा नकाशा तयार केला, जो आजही या केंद्राच्या दर्शनी भागात फ्रेम करून लावलेला आहे. आठेक दिवस झाले असतील. अचानक गांधींना निरोप आला. दिल्लीहून इंग्रजांनी चर्चेसाठी बोलावल्याचा. त्यांना उरळी कांचनवरून नेण्यासाठी तीन डब्यांची रेल्वेगाडी पाठवण्यात आली. ते निघाले.

जाताना त्यांच्याबरोबरच्या तीन सेवकांवर त्यांनी केंद्र उभारणीची जबाबदारी सोपवली. मणीभाई देसाई, श्रीकृष्णचंद्र अग्रवाल व विनोबांचे बंधू बाळकोबा भावे. या तिघांसाठी गांधींचा शब्द म्हणजे जीव की प्राण. तिघेही मृत्यूपर्यंत केंद्रात राहिले. वाढवलेल्या दाढीत वावरणारे बाळकोबा अवलियाच दिसायचे. स्वभावही थोडा रागीट. मात्र संस्कृतवर कमालीचे प्रभुत्व. शंकरभाष्य हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. क्षयरोग झाला तेव्हा मणीभाईंनी त्यांची सेवा केली. ते १९८१ ला तर मणीभाई १९९३ला वारले.

हे केंद्र केवळ गरिबांवरील उपचारांसाठी असेल, यात श्रीमंतांना प्रवेश नको. शिवाय उपचारही मोफत असे गांधी जाताना बजावून गेलेले. हा आदेश पाळायचा असेल तर केंद्राचा आर्थिक डोलारा सांभाळायचा कसा असा प्रश्न या कर्त्याधत्र्यांसमोर उभा ठाकला. मग बाळकोबा देणगी गोळा करण्यासाठी देशभर फिरायचे. १९७३ ला या केंद्राची आर्थिक अवस्था खूपच नाजूक झालेली. तेव्हा या तिघांनी प्रचंड पायपीट करून देणग्या गोळा केल्या. मग मणीभाईंनी डॉ. नारायण हेगडेंना सोबत घेत उरळी कांचनच्या परिसरातच बायफ नावाची संस्था सुरू केली.

कृषी, दुग्धव्यवसाय व सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणार्‍या या संस्थेने केंद्राला मोठा आधार दिला. आजही याच संस्थेतून केंद्राला दूधदुभते पुरवले जाते. मणीभाईंच्या निधनानंतर मूळचे आयआयटीयन असलेल्या हेगडेंकडे या केंद्राचे कार्यकारी विश्वस्तपद आले. आजही त्यांच्या नेतृत्वात हे केंद्र दमदारपणे वाटचाल करत आहे.

केंद्र दीर्घकाळ टिकवायचे असेल तर उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांकडून वाजवी शुल्क घेतल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यावर आकारणी सुरू झाली. तरीही आर्थिक डोलारा नीट चालेना. शेवटी श्रीमंतांनाही प्रवेश देण्याचा निर्णय व्यवस्थापनाला घ्यावा लागला. गरिबांसाठी कमी तर श्रीमंतासांठी जास्त दर अशी येथील शुल्करचना. तीनशे रुपयांपासून साडेतीन हजारांपर्यंत असे त्याचे स्वरूप. देशात इतरत्र असलेल्या निसर्गोपचार केंद्रापेक्षा हे दर आजही कमी आहेत. अलीकडे तर निसर्गोपचारांसाठी लागणारी साधने कमालीची महागलेली. इतर केंद्रांनी हा उपचारच महागडा करून टाकलेला. याचे एकमेव कारण म्हणजे श्रीमंतांचा या उपचार पद्धतीकडे वाढलेला ओढा. त्या तुलनेत आम्ही बरीच स्वस्त सेवा देतो असे व्यवस्थापनाचे म्हणणे.

गांधींचा आदेश मोडला नसता तर हे केंद्र केव्हाच बंद पडले असते. काळाच्या ओघात रचनेत बदल करून गांधींचे स्वप्न जिवंत ठेवणे हेच आमच्या हातात होते. त्यामुळे आजही या केंद्रात गर्दी ओसंडून वाहते. रुग्णांसाठी तीन-तीन महिन्यांची प्रतीक्षा यादी असते असे व्यवस्थापनाचे म्हणणे. ते पटतेही. या केंद्राचा संपूर्ण परिसर अगदी स्वच्छ. सव्वाशे कर्मचारी व नऊ डॉक्टर इथे कायमस्वरूपी झटत असतात. वर्षाला तीन हजार रुग्ण उपचार घेऊन जातात. रोज दीडशे रुग्णांना प्रवेश दिला जातो. ही क्षमता तीनशेपर्यंत वाढवण्याची योजना आता आखली जात आहे.

येथे परदेशी रुग्णांचीही गर्दी खूप. प्रामुख्याने इटलीहून दरवर्षी शेकडो रुग्ण येतात. उरळी कांचनमधील लोकांना ५० टक्के सवलतीत उपचार मिळतात. गांधी तेव्हा म्हणाले होते. येथे उपचार घेऊन गेलेला रुग्ण परत आरोग्याची तक्रार घेऊन यायला नको. हे जमले तरच केंद्र यशस्वी. या सूत्राचे पालन आजही येथे कसोशीने केले जाते. येथे ६० वर्षांवरील रुग्णांना मदतनीस आणण्याची मुभा आहे. अशी मुभा इतर केंद्रांत नाही. त्यामुळे वृद्धांची गर्दी जरा जास्तच.

हे केंद्र नॅशनल इ्स्टिटट्यूट ऑफ नॅचरोपॅथी या सरकारी संस्थेशी संलग्न आहे. याच संस्थेची संलग्नता घेऊन निसर्गोपचारचे अभ्यासक्रम देशभरात चालवले जातात. अशा महाविद्यालयांची संख्या दक्षिणेत जास्त. त्यामुळे त्या भागातले विद्यार्थी येथे प्रशिक्षणार्थी म्हणून येतात. ‘बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स’ (बीएनवायएस) अशी पदवी घेतलेले. अलीकडे वजन कमी करण्याचे फॅड खूप वाढलेले. अनेकजण कोणताही आजार नसताना केवळ या कारणासाठी केंद्रात दाखल होतात. अशांना आम्ही नकार देत नाही पण ‘वजन कमी करून मिळेल,’ असे आश्वासनही देत नाही असे व्यवस्थापनाचे म्हणणे. केवळ गांधीविचार हेच सूत्र ध्यानात ठेवून या केंद्राची आखणी केलेली.

स्वच्छता, कमालीची शांतता, सा्त्विवक आहार व उपचारांत कसलाही गोंधळ न होता सर्व कामे पार पडतात. गांधी किती द्रष्टे होते याची प्रचीती या केंद्राला भेट दिल्यावर येते. गांधीविचाराने चालणार्‍या अनेक संस्था डबघाईला येत असताना हे केंद्र मात्र दिमाखात उभे आहे व या विचारांशी इमान राखून आहे.

devendra.gawande@expressindia.com