भारतातील कापूस इंग्लंडमध्ये नेऊन ब्रिटिश प्रचंड नफा कमावत आहेत हे सर्वांत आधी देशाच्या लक्षात आणून दिले ते दादाभाई नवरोजींनी. विणकरांना त्रास देण्याच्या घटनांची मालिका सुरू झाली तेव्हा आवाज उठवला तो लोकमान्य टिळकांनी आणि यातून निर्माण झालेल्या असंतोषाला विधायक रूप दिले ते ‘अ. भा. चरखा संघा’च्या माध्यमातून गांधींनी.
तशा या गोष्टी जुन्या पण संदर्भासाठी आवश्यक असलेल्या. ब्रिटिशांनी अतिशय पद्धतशीरपणे भारतावर ताबा मिळवल्यानंतर त्यांच्या डोळ्यात खुपला तो इथला वस्त्रोद्योग. तेव्हा या देशात तयार होणार्या हातमागावरील कापडाची चर्चा जगभर होती. यातून होणारा व्यापारही मोठा. देशभर पसरलेले विणकरांचे जाळे या उद्योगाचा कणा होते. ब्रिटिशांनी तोच मोडून काढायचे ठरवले. तेही अतिशय हुशारीने. यामागचे कारण एकच. त्यांच्या देशातल्या कापड उद्योगाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देणे. सर्वात आधी त्यांनी कापूस लागवडीसाठी उपयुक्त असलेली काळ्या मातीची जमीन जिथे जिथे आहे तिथले जंगल, चराऊ कुरणे नष्ट करून शेतीला प्रोत्साहन दिले. यामुळे अनेक ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढासळला. चारा नष्ट झाल्याने गुरांवर संकट ओढवले. याची साद्यंत हकीगत नोंदवली गेली आहे ती लक्ष्मण सत्या यांच्या पुस्तकात. अमेरिकेतील लॉक हेवन विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक असलेले सत्या मूळचे आंध्रचे. त्यांनी शोधनिबंधासाठी हा विषय निवडला. त्यावर आधारित पुस्तकाचे मराठी भाषांतर केले नंदा खरेंनी- ‘कापूस कोंड्याची गोष्ट’- या नावाने.
तर देशात तयार होणारा हा अतिरिक्त कापूस इंग्लंडला जाऊ लागला व तिथून तयार झालेले कापड इथे विक्रीसाठी येऊ लागले. तरीही दर्दी ग्राहकांची पसंती विणकरांनी विणलेल्या तलम कापडालाच. ही साखळी मोडून काढण्यासाठी विणकरांनाच धडा शिकवण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. मग कधी क्षुल्लक कारणावरून तर कधी अकारण त्यांना मारहाण करण्याचे प्रकार सुरू झाले. यावरून उद्रेक झाला तो बंगालमध्ये. हा भाग तलम कापडासाठी प्रसिद्ध. कलकत्त्यात विणली गेलेली साडी (ढाका मखमल) इतकी मऊशार असे की अंगठीतून आरपार निघत असे. याच रागातून मारहाण सुरू झाली. मुख्यत्वे विणकरांच्या हातांवर मारहाण केली जाऊ लागली. हे लक्षात आल्यावर पहिल्यांदा याविरुद्ध आवाज उठवला तो लोकमान्य टिळकांनी. त्यांनी ‘केसरी’त सलग सहा अग्रलेख लिहून ब्रिटिशांवर टीका केली. शब्द अर्थातच जहाल. यामुळे विणकरांना धीर मिळाला. टिळक त्यांच्यात कमालीचे लोकप्रिय झाले.
बंगालमधील मुस्लीम विणकरांनी त्यांना ‘बडेदादा’ अशी पदवी बहाल केली. त्यांचे पुतळे उभारले. यातून एक गोष्ट ठळकपणे देशभरातील सर्वांच्या लक्षात आली ती म्हणजे ब्रिटिशांनी त्यांच्या कापड उद्योगासाठी भारतात लूट चालवली आहे. यामुळे विणकरांचा स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग लक्षणीयरीत्या वाढला. टिळक वारले व गांधीपर्व सुरू झाले. गोखल्यांच्या सल्ल्यानुसार ते देशभर फिरू लागले. मदुराईत ते लोकांशी संवाद साधत असताना एका झोपडीचे दारच उघडेना. कस्तुरबांनी चौकशी केल्यावर कळले की घरात चौघे आहेत पण अंग गुंडाळण्यासाठी कापड एकच. म्हणून कुणी समोर आले नाही. ही घटना १९२१ ची. त्याचक्षणी गांधींनी पंचा व धोतर नेसण्याचा निर्णय घेतला. टिळक व गांधींशी संबंधित दोन घटनांमध्ये चरखा व खादीच्या जन्माचे मूळ सामावलेले आहे.
स्वातंत्र्यलढा सर्वंकष करायचा असेल तर केवळ आंदोलने करून भागणार नाही. हा लढा चळवळीत रूपांतरित करायचा असेल तर त्याला विधायक व रचनात्मक रूप देणे गरजेचे आहे, हे सर्वांत आधी ओळखले ते गांधींनी. तरीही त्यांच्या डोक्यात कुठलीही योजना आकार घेत नव्हती. १९१७ला ते साबरमती आश्रमात राहात असताना सूत कातणार्या पारंपरिक चरख्यांची माहिती त्यांना मिळाली. कार्यकर्त्यांना पिटाळून त्यांनी असे चरखे आश्रमात आणण्यास सांगितले. ते सर्व मोठ्या चाकाचे व स्टँडवर उभे राहणारे होते. मग मगनलाल, प्रभुदास व कृष्णदास गांधींनी खूप खटपट करून तसेच पण लहान आकाराचे चरखे तयार केले. त्यावर सूत कातण्यास सर्वप्रथम सुरुवात केली ती गांधींनी. या कामात स्वत: तरबेज झाल्यावर त्यांनी देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले.
मग हळूहळू चरख्याला लोकप्रियता मिळू लागली. यातून तयार झालेल्या सुतापासून स्वदेशी कापड विणले तर मोठी आर्थिक चळवळ उभी राहू शकते. प्रत्येकाच्या घरात काम मिळू शकते व ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणालाही शह देता येऊ शकतो हे गांधींच्या लक्षात आले पण या चळवळीचा वेगाने विस्तार करायचा असेल तर जास्त उत्पादन देणारा चरखा हवा. त्यासाठी त्यांनी देशभरातील तंत्रज्ञांना आवाहन केले. जो चांगला चरखा विकसित करेल त्याला पाच हजारांचे बक्षीस. त्याला प्रतिसाद मिळाला पण एकही चरखा त्यांना पसंत येईना! मग त्यांनी बक्षिसाची रक्कम १ लाख केली. यातली लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ही पुरस्काराची रक्कम १९२९ मधली आहे. दुर्दैव हे की असा चरखा हाताळण्याचे भाग्य त्यांना त्यांच्या हयातीत लाभले नाही.
गांधींना हवा तसा चरखा विकसित झाला १९५०ला व तो गांधींना हवा तसाच आहे, यावर शिक्कामोर्तब केले विनोबांनी. अंबर चरखा हे त्याचे नाव व तो विकसित करणारे होते एकांबरनाथन्! ज्येष्ठ पत्रकार सुहास कुळकर्णींच्या ‘असे होते गांधी’ या पुस्तकात हा प्रसंग सविस्तर नोंदवण्यात आला आहे. मात्र जिवंत असेपर्यंत गांधींनी साबरमतीत विकसित केलेल्या त्याच जुन्या चरख्याचा आधार घेत या चळवळीला राष्ट्रीय रूप दिले. यातून मोठ्या प्रमाणावर स्वदेशी कापडाची निर्मिती होऊ लागली. इतकी की ब्रिटिश हादरले.
ही चळवळ दीर्घकाळ टिकवण्यासाठी तिला संस्थात्मक स्वरूप देणे आवश्यक आहे हे गांधींनी ओळखले व त्यातून जन्म झाला ‘अखिल भारतीय चरखा संघा’चा. हे साल होते १९२५. आजही अनेकांचा समज असा आहे की गांधी विज्ञान व तंत्रज्ञानद्वेष्टे होते. तो पूर्णपणे खोटा. याच चरखा संघावर तसेच नंतर स्थापन झालेल्या ग्रामोद्योग संघावर गांधींनी नेमणूक केली ती सी. व्ही. रमण, जगदीशचंद्र बोस यांच्यासारख्या शास्त्रज्ञांची. ही चळवळ पुढे न्यायची असेल तर त्याला सतत बदलत जाणार्या तंत्रज्ञानाची जोड हवीच यावर गांधी ठाम होते. चरखा संघाच्या स्थापनेनंतर या आर्थिक चळवळीला निश्चित आकार आला. कापूस, चरखा, सूत, कापड, खादी अशी साखळी व त्यातून एक व्यवस्था तयार झाली. त्याचा परिणाम दिसून आला व या चळवळीने देश व्यापला. ब्रिटनमधून आयात कापडाच्या विक्रीत कमालीची घट झाली. यावरून वसाहतवाद्यांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. नंतर गांधी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले. तेव्हा तिथे त्यांना मँचेस्टरमधील कापडगिरणी कामगारांचे एक शिष्टमंडळ भेटण्यासाठी आले. ‘तुमच्या चळवळीमुळे आमच्या गिरण्या बंद करण्याची वेळ आली आहे. आमच्या पोटावर पाय का देता,’ असा प्रश्नही या कामगार नेत्यांनी गांधींना विचारला. ‘मी माझ्या देशबांधवांचा विचार करणार,’ असे म्हणत गांधी हसले फक्त.
गांधींनी या चळवळीला प्रेरणा देणे सुरू केले तेव्हा प्रारंभी देशभरात अडीच लाख लोक चरख्यावर सूत कातत होते. नंतर काही वर्षांत हा आकडा २० लाखांवर गेला. भारतातील कापूस इंग्लंडमध्ये नेऊन ब्रिटिश प्रचंड नफा कमावत आहेत हे सर्वांत आधी देशाच्या लक्षात आणून दिले ते दादाभाई नवरोजींनी. त्यानंतर विणकरांना त्रास देण्याच्या घटनांची मालिका सुरू झाली तेव्हा आवाज उठवला तो लोकमान्य टिळकांनी- अग्रलेखासोबतच परदेशी कापडाची होळी करून. यातून तयार झालेल्या असंतोषाला विधायक रूप दिले ते गांधींनी. ‘घर घर मे चरखा, गाव गाव मे चरखा’ ही त्यांची घोषणा होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्याची धुरा समर्थपणे खांद्यावर पेलणारे हे तीनही नेते किती द्रष्टे होते याचीच साक्ष यातून पटते. चरखा, खादी स्वातंत्र्यलढ्याच्या केंद्रस्थानी आल्यावर हा लढा अधिक व्यापक होत गेला. त्यात लोकसहभाग वाढला. चरखा व खादीच्या जन्माची कथा आहे ती अशी. स्वातंत्र्यानंतर याला कसे वळण मिळत गेले, हा प्रयोग सरकारमुक्त असावा असे गांधी व त्यानंतर विनोबांना वाटत होते, तसे का घडले नाही, याचा सविस्तर ऊहापोह पुढच्या भागात.

