‘गांधीयन वे आऊट ऑन एन्व्हायन्र्मेंटल इश्यूज: एक्सप्लोअरिंग गांधी ॲज ॲन अर्ली एन्व्हायन्र्मेंटलिस्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच नागपुरातील सर्वोदय आश्रमात झाले. डॉ. अपरूप अडावदकर यांनी हे पुस्तक लिहिलेले असून गांधी विचार आणि तत्त्वज्ञान यांचे वेगळ्या पद्धतीने केलेले आकलन, उपयोजन यात आहे. अनेक भारतीय तसेच परदेशी लेखकांच्या ग्रंथांचा आधार घेऊन हे आकाराने लहान पण विचार आणि आशयाने समृद्ध असे पुस्तक वाचकांना आता उपलब्ध झाले आहे. पुस्तकातली भाषा सोपी, सरळ आणि भावणारी आहे हेदेखील त्याचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.

पर्यावरण या विषयावर आजदेखील जगभरात फार वरवरची मांडणी केली जाते आणि तात्कालिक उपाय शोधण्यावरच त्यात भर दिलेला दिसतो. यामुळे तात्पुरती मलमपट्टी होते पण शाश्वत उत्तर आणि समाधान मिळत नाही. प्रश्नाच्या मुळापर्यंत जात नाही तोपर्यंत समाधानकारक तोडगा निघणे शक्य नाही. त्यासाठी गांधी विचारांचा आधार घेण्याची गरज आहे; हे पुस्तकात नमूद विविध उदाहरणे आणि केस स्टडीजद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

समाज स्वास्थ्य आणि सामाजिक विकासाच्या, नैतिक मूल्यांच्या उत्कर्षासाठी काय आवश्यक आहे हे सांगायला जे धैर्य आणि नैतिक बळ लागते ते गांधीजींपाशी होते म्हणून ते अतिशय ठामपणे काही मते मांडतात. ती विशिष्ट मते आज संपूर्ण मानवजातीला पर्यावरण समस्येवर योग्य दिशा दाखवतात आणि आपण त्यापैकी बहुतांश अंगीकारू शकतो.

उपभोगावर नियंत्रण, खादीचा वापर, शरीरश्रम, यंत्रांचा मर्यादित वापर आणि अहिंसा यांचा अंगीकार निसर्ग आणि पर्यायाने पृथ्वीचा नाश वाचवू शकेल हे गांधीजींनी सप्रमाण दाखवून दिलेलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतदेखील हा विषय/ विचार मांडलेला आहे. सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या आणि तंत्रज्ञानाचा अतिरेकी वापर करण्याच्या काळात एक वेगळा, शांततेला अनुकूल असा दृष्टिकोन वाचकांना हे पुस्तक वाचून मिळेल. प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला हवे; जे आपल्या विचारांना निश्चितपणे योग्य दिशा देईल हा विश्वास वाटतो.