चित्ततोष खांडेकर, नदी विषयक संशोधक अभ्यासक
जगभर २०-३० वयोगटातील तरुण पिढी अर्थात जेन-झींच्या राजकीय क्रांतींची चर्चा आहे. नेपाळपासून व्हेनेझुएलापर्यंत मोठ्या प्रमाणात जेन-झी क्रांतीनी राज्यसत्तेला दणका दिला. पण या क्रांतींवर होणारी महत्त्वाची टीका म्हणजे त्या फक्त सरकारविरोधी प्रतिक्रिया आहेत, कुठलंही ठोस समाधान देऊ शकत नसल्यामुळे त्या प्रतिरोध (रेझिस्टन्स) होत नाहीत. मग या क्रांतीकडे कसे पाहावे? तसेच नदीसाठी आणि नदीमुळे अशी जेन -झी क्रांती झाली आहे का?
जेन-झी… जागतिकीकरणानंतर जन्माला आलेली, इंटरनेटसोबतच लहानाची मोठी झालेली एक आगळीवेगळी पिढी. आधीच्या पिढ्यांपेक्षा ‘यांची’ भाषा वेगळी. संयम ठेवल्यास सरकारी व्यवस्थेत गोष्टी बदलतात हे या पिढीला मान्य नाही. संयम ठेवणे म्हणजे, आहे ते स्वीकारणे, जैसे थे धोरण अवलंबणे असं या पिढीचं थेट मत. जे सरकार आपल्या समस्या गांभीर्याने घेत नाही, ते सरकार हवंच कशाला? असं सरकार असल्यापेक्षा गेलेलं बरं, हा त्यांचा बेधडक पवित्रा. या पवित्र्यातूनच मग नेपाळ, बांगलादेश, मादागास्कर, पेरू इत्यादी देशांमध्ये झालेल्या जेन-झी क्रांतीतून एकतर राष्ट्राध्यक्षांनी पलायन केलं किंवा सरकार बदललं.
क्रांती म्हणजे काय? त्वरित होणारा बदल ही क्रांतीची ढोबळ व्याख्या. राजकीय क्रांती म्हणजे त्वरित झालेले सत्तांतर किंवा राज्यसंस्था कोसळणे. मग फ्रेंच राज्यक्रांतीत राजेशाही पायउतार होऊन लोकशाही येते, ब्रिटिश लोकशाही पद्धतीची जागा नवी अमेरिकन लोकशाही पद्धती घेते. अशा कमी काळात झालेल्या राजकीय स्थित्यंतरांची अनेक उदाहरणं देता येतील. पण या क्रांतींचं पुढे काय झालं? अमेरिकन राज्यक्रांतीतून आलेली नवीन लोकशाही टिकली, फ्रेंच राज्यक्रांतीतून सत्तेवर आलेल्या लोकशाहीचा मात्र काही वर्षांत अंत होऊन नेपोलियनसारख्या सम्राटाने फ्रान्सचा ताबा घेतला. असंच काहीसं लॅटिन अमेरिकेतील १८व्या शतकातील क्रांतीनंतर झाल्याचं दिसून येतं. एखादी क्रांती जेव्हा केवळ एक सवंग प्रतिक्रिया असते, तेव्हा ती अयशस्वी ठरते का? प्रतिक्रियात्मक क्रांती म्हणजे काय? क्रांतीच्या संदर्भाने प्रतिक्रिया म्हणजे- ‘आहे ते नाकारणे’. आहे ते’ बदलायला कोणताही पर्याय प्रतिक्रिया देत नाही. मग मुबारक सरकार नको म्हणून झालेली इजिप्तमधील क्रांती असो, वा क्विंग राजवट नको म्हणून झालेली चिनी क्रांती असो. या राज्यक्रांतीतून आलेल्या नव्या राजवटी फार काळ टिकल्या नाहीत, कारण त्या निव्वळ प्रतिक्रिया होत्या. कोणताही सक्षम पर्याय त्यांनी दिला नाही.
प्रतिरोधाचे (resistance) तसे नाही. प्रतिरोध फक्त आहे ते केवळ नाकारतच नाही, तर त्याला तेवढाच उत्तम, वास्तविक आणि सक्षम पर्याय देतो. त्यासाठी प्रतिरोधाला ता्त्विवक आणि राजकीय विचारांचे अधिष्ठान असते. अमेरिकन राज्यक्रांतीला जॉन लॉक याच्या तत्त्वज्ञानाचे, तसेच जेमस मिल आणि थॉमस पेन यांच्या राजकीय विचारांचे अधिष्ठान होते. त्यातूनच नवीन अमेरिकन लोकशाहीचा सक्षम पर्याय आला. म्हणून तो प्रतिरोध ठरला. फ्रेंच राज्यक्रांतीला रुसोच्या ता्त्विवक विचारांचे अधिष्ठान असेलही, पण त्याच्या राजकीय विचारांतील लोकशाही काही त्यांना वास्तवात आणता आली नाही. ती प्रतिक्रियाच उरली. सारांश, जिथे राज्यक्रांती यशस्वी झाली, तिथे हे ता्त्विवक-राजकीय विचारांचे अधिष्ठान ठळकपणे दिसते. जिथे क्रांती अयशस्वी होते तिथे एकतर अराजकाचा काळ येतो किंवा कोणीतरी भलतेच सत्तेवर चढते. त्यातून नवे सृजन होत नाही.
पण मग प्रतिक्रिया महत्त्वाची नाही? असे अजिबात नाही. प्रतिक्रिया हीच कोणत्याही प्रतिरोधाची सुरुवात असते. आहे ते नाकारल्याशिवाय नव्याचे सृजन होणार कसे? तसेच प्रतिक्रिया या हवेतून येत नाहीत. जनतेला झालेल्या त्रासाचे, तिच्या खंगलेल्या आणि भंगलेल्या मनोवस्थेचे, बराच काळ धुमसत असलेल्या जनक्षोभाचे प्रकटीकरण म्हणजे या राजकीय प्रतिक्रिया असतात. एखादी तात्कालिक घटना प्रतिक्रियेला फक्त वाट मोकळी करून देते. त्या घटनेतून उभे राहिलेले राजकीय प्रश्न तिचे माध्यम होतात. मग एखादी नदी असे माध्यम बनू शकते?
या प्रश्नाचे उत्तर अनेक दुर्मीळ प्रजाती ज्या नदीच्या कवेत विसवतात ती अल्बानियातील व्हिजोसा नदी देते. एका आकडेवारीनुसार, प्राण्यांच्या आणि वृक्षांच्या संपत चाललेल्या तब्बल ११०० प्रजाती या नदीच्या २७० किमी लांबीच्या नदीपात्रात सापडतात. या अलौकिक जैवविविधतेमुळेच तिला २०२३ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचाही दर्जा देण्यात आला. याच नदीच्या मुखात विजोसा-नारटा पाणथळ प्रदेश आहेत. समुद्राला नदीशी जोडणार्या नारटा लगून (’ंॠःःल्ल) आणि विजोसा या नदीच्या मुखातील सुंदर प्रदेशात फ्लेमिंगो, पेलिकन असे असंख्य पक्षी स्थिरावतात.
२०२१ मध्ये अमेरिकेतील एक श्रीमंत उद्योगपती आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर आपल्या पत्नीसोबत सुट्टीमध्ये या प्रदेशात आले. इथे फिरत असताना विजोसा-नारटा पाणथळ प्रदेशात एक रिसॉर्ट तसेच श्रीमंत लोकांसाठी आलिशान हॉटेल आणि सफारी उभी करावी असे या जोडप्याच्या मनात आले. तो विचार घेऊन ते अमेरिकेला परतले. तीन वर्षं उलटली. अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुका लागल्या. या निवडणुकांमध्ये राष्ट्रपती बायडेन यांचा पराभव झाला, आणि कुशनर यांचे सासरे डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आले. या महत्त्वाच्या राजकीय स्थित्यंतरानंतर कुशनर आणि त्यांची पत्नी इव्हांका अल्बानियाला परत आले. राष्ट्राध्यक्ष एडी रामा यांच्याशी त्यांनी आपल्या मनातील रिसॉर्टबद्दल त्यांनी चर्चा केली. एव्हाना संपूर्ण व्हिजोसा नदी राष्ट्रीय उद्यान घोषित झाली होती. त्यामुळे रिसोर्ट बांधणे कायदेशीररीत्या शक्य नव्हते. मग करायचे काय? लागलीच रामा यांनी राष्ट्रीय उद्यानासंदर्भातील कायद्यात घटनादुरुस्ती केली आणि मंजुरी मिळवून दिली. अर्थात त्या रिसोर्टला पर्यावरणासंदर्भातील काही कायदेशीर बाबींची पूर्तता करणे तरीही बंधनकारक होते.
या रिसॉर्टमुळे नदीपात्राला धक्का बसणार होता. फ्लेमिंगो पक्ष्यांचा अधिवास नष्ट होणार होता. मुख्य म्हणजे ही स्थानिकांची नदी एका खासगी उद्योजकाच्या घशात जाणार होती. स्थानिकांचा नदीशी आणि फ्लेमिंगो पक्ष्यांशी असणारा अतूट संबंध तुटणार होता. यामुळेच स्थानिकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी या रिसॉर्टला विरोध केला. पर्यावरणासंदर्भातील कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता केल्याशिवाय तो प्रोजेक्ट सुरू होणार नाही, असं रामा यांनी ठासून सांगितलं. पण तरीही सगळ्या प्रक्रिया धाब्यावर बसवून मे २०२६ मध्ये नदीपात्रात बुलडोझर घुसले. रिसॉर्टच्या बांधकामासाठी एक कुंपण उभं राहिलं. या कुंपणासमोर संतप्त स्थानिकांनी निदर्शनं करण्यास सुरुवात केली. त्यांची ‘समजूत’ काढायला पोलीसही तिथं आले. पण स्थानिकांचे आंदोलन काही शमेना, तेव्हा कंपनीचे सुरक्षारक्षक पुढे आले आणि काही आंदोलकांना फरफटत घेऊन गेले. त्यांना मारहाणही करण्यात आली. हे सारं होत असताना पोलीस मात्र तिथेच पुतळ्यासारखे गपगुमान उभे होते!
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि अल्बानियातील जेन-झींचा संताप अनावर झाला. ‘अल्बानिया कोणत्या खासगी कंपनीची मालकी नाही’ असा सूर सर्वत्र उमटू लागला. खासगी कंपनीच्या गुंडांसमोर गुडघे टेकणारे पोलीस आणि त्यांचे सर्वेसर्वा एडी रामा हे कुशनर यांचे हस्तक असल्याची चर्चा होऊ लागली. पाहता पाहता राजधानी तिराना आणि इतर शहरांत तरुणाई जमली आणि देशभर जनप्रक्षोभ उसळला. पण या सार्यावर विरोधी पक्षनेते साली बेरीशा यांनी कमालीचे मौन बाळगले होते. यामुळेच ज्यांनी देश विकायला काढलाय त्या रामा यांचे सरकारही नको आणि त्यांना विरोध न करणारे बेरीशाही नको, सगळी संसदच बरखास्त करा अशी मागणी तरुणाई करू लागली. पण हे सारे कशासाठी? तर व्हिजोसा आणि तिचे फ्लेमिंगो वाचवण्यासाठी. यामुळेच या क्रांतीला ‘फ्लेमिंगो क्रांती’ असे नाव मिळाले.
रामा यांचा भ्रष्टाचार, देशातील बेरोजगारी, पर्यावरणाचे प्रश्न आणि त्याला लुटुपुटुचा विरोध करणारे साली बेरीशा या सगळ्याला लोक कंटाळले होते. कुशनरच्या कंपनीच्या कृत्यासाठी या दोघांचा भ्रष्टाचारच जबाबदार असल्याची लोकांची खात्री पटली. यामुळेच या दोन्ही महाभागांना थेट तुरुंगात टाकावे आणि नव्या पक्षांसह पुन्हा लोकशाही स्थापन करावी, या मागणीने जोर धरला. गेले तीन महिने रोज रात्रीची आंदोलने, संसदेवरील धडक मोर्चे यामुळे राज्यकर्ते हैराण झाले आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुराचा वर्षाव करूनही तरुणाई मागे हटली नाही. रिसॉर्टला तात्काळ स्थगिती मिळाली असली, तरी आंदोलन अजूनही थांबलेले नाही. रामा ‘तुरुंगात’ गेल्याशिवाय बहुतेक थांबणारही नाही. पण रामा आणि त्यांच्या धोरणांना पर्याय काय, याचे मात्र उत्तर फ्लेमिंगो क्रांतीकडे नाही.
फ्लेमिंगो क्रांती ही जेन-झींची ज्वलंत प्रतिक्रिया आहे. विजोसा नदी आणि फ्लेमिंगो पक्षी या प्रतिक्रियेचे थेट माध्यम झाले. नदीच्या माध्यमातून येणार्या अशा प्रतिक्रियांचा नदीच्या संवर्धनासाठी सृजनात्मक प्रतिरोध कसा करावा? हा भविष्यातील नदीकारणासमोरचा प्रश्न आहे. असा प्रतिरोध कुठे झाला आहे का? त्याबद्दल पुढील लेखांत.
(अल्बानियामध्ये गेले तीन महिने रोज रात्री जेन-झींची आंदोलने, संसदेवरील धडक मोर्चे सुरू आहेत.)
