चित्रकलेच्या ज्या शैली आणि त्या शैलींमागचे विचार हे दोन्ही साधारण १८७२ पासून ते १९८०च्या दशकापर्यंत कालसुसंगत मानले जायचे, त्याला युरोपात ‘आधुनिक कला’ म्हटलं जातं. त्यानंतर युरोप खंडात आणि अमेरिकेतही कलाविचार बदलला आणि मग शैलींच्या पलीकडे जाणार्‍या दृश्यकलेला ‘समकालीन कला’ हे नाव मिळालं. अर्थात हे कालखंड मानीव आहेत, कारण कोणीही कोणत्याही काळात कोणत्याही विचारानं कला़कृती करू शकतं. हे लक्षात घेतलं तर, बेसेलिट्झ हा जर्मन चित्रकार १९८० नंतरही ‘आधुनिक’ ठरतो. या जॉर्ज बेसेलिट्झ यांचं निधन नुकतेच ३० एप्रिल रोजी, वयाच्या ८८ व्या वर्षी झालं. लहानपणीच दुसर्‍या महायुद्धाच्या झळा लागलेल्या कुटुंबात आणि महायुद्धानंतरच्या पूर्व जर्मनीत ते वाढले. पण ऐन तरुण वयात १९५६ मध्ये- म्हणजे बर्लिनची भिंत बांधली जाण्याच्या आधीच पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत येऊ शकले. महाविद्यालयीन वयातच पारितोषिकं मिळवणारे बेसेलिट्झ १९५० मध्ये त्या वेळचे अमूर्तशैलीत काम करणारे विल्हेम डीकूनिंग आणि कासिमिर मेलविच यांच्या विचारांनी प्रभावित झाले.

‘जेश्चरल ॲबस्ट्रॅक्शन’ ही चित्रपद्धत बेसेलिट्झ यांनी जपली, वाढवली. शिंतोडे उडवणं, फराटे मारणं यांतून मनुष्याकृती तयार करणार्‍या बेसेलिट्झ यांची सर्वांत मोठी खासियत म्हणजे, ही मानवाकृती चित्रं ‘खाली डोकं, वर पाय’ अशा स्थितीत त्यांनी १९६५ पासून प्रदर्शित केली. त्यामुळे माणसाकडे पाहाण्याऐवजी चित्रासाठी चित्रकारानं केलेल्या हालचालींकडे (जेश्चर) अधिक लक्ष जातं, असं त्यांचं म्हणणं. याला ‘नव अभिव्यक्तीवाद’ (निओ एक्स्प्रेशनिझम) असंही म्हटलं गेलं. अगदी अलीकडे- २०२२ मध्ये त्यांनी केलेलं ‘फोक डान्स लाइक इन द ईस्ट’ हे चित्रच फक्त आडव्या मनुष्याकृतींमुळे जरा निराळं होतं. २०२० नंतरच्या चित्रांमध्ये महिलांच्या ‘स्टॉकिंग्ज’ कॅनव्हासवर चिकटवण्याचा प्रयोगही त्यांनी केला. ही चित्रं सध्या साल्झबर्गच्या ‘म्यूझियम ऑफ द मॉडर्न’मध्ये प्रदर्शित झाली आहेत.

बेसेलिट्झ हे जन्मगावाचं नाव त्यांनी उपनाम म्हणून वापरायला सुरुवात केली. त्यांचं मूळ नाव हान्स-जॉर्ग ब्रूनो कर्न. लोकांना धक्के देणं हा आधुनिक चित्रकारांचा बाणा त्यांनी नावाच्या निवडीबरोबरच चित्रांतूनही जपला. तरीही चित्रांतली ताकद लोकांना जाणवे. हे फराटे, हे शिंतोडे अतीव दु:ख-दैन्य पाहिल्यावरच आले असणार, असा काहींचा अभिप्राय, तर काहींनी यात फक्त बंडखोरीच पाहिली. पण मानवजन्माचं दु:ख हा बेसेलिट्झ यांचा चित्रविषय ठरला. काही वेळा स्वत:च्या प्रिय पत्नीची चित्रंही त्यांनी याच प्रकारे केली. त्याही चित्रकार होत्या, पण नवर्‍यासाठी त्यांनी चित्रं काढणंच सोडलं असं नंतर काहीजणांनी शोधून काढलं.

‘परेड’ या रॅचेल कस्क लिखित कादंबरीची पहिली तीन प्रकरणं जॉर्ज बॅसेलिट्झ यांची खिल्ली उडवतात. याचं कारण २०१३ मध्ये ‘महिलांना कला येत नाही’ हे बेसेलिट्झ यांनी २०१३ मधल्या एका मुलाखतीत केलेलं विधान. पण यानंतरही त्यांच्या कलाकृतींना- चित्रांप्रमाणेच लाकडातून घडवलेली शिल्पं, रेखाटनं, मुद्राचित्रं या सर्वांना- प्रेक्षक आणि संग्राहक यांनी उदार आश्रय दिला. व्हेनिसच्या ‘अकाडेमिया’ संग्रहालयात जिवंत चित्रकाराची चित्रं मांडण्याची प्रथा त्यांच्या सिंहावलोकनापासून (२०१९) सुरू झाली. लिलावातल्या किमती ९० लाख डॉलरपर्यंत गेल्या. त्यांच्या निधनाने शैलीप्रधान आधुनिक कलेचा एक दुवा निखळला आहे.