Something in the world forces us to think. This something is an object not of recognition but of a fundamental encounter. What is encountered may be Socrates, a temple or a demon. – Gilles Deleuze
तत्त्वज्ञ- तत्त्वज्ञेतर ही फारकत तत्त्वज्ञानाच्या विद्यापीठीय मांडणींमध्ये अनुस्यूत असते. मात्र वर्तमानपत्रातून तत्त्वज्ञानाची चर्चा करण्याची कसरतच मुळात या प्रस्थापित भेदाला प्रश्नांकित करणारी ठरते. त्यामुळे लेखमालेच्या शेवटच्या लेखाकांत या ऐतिहासिक भेदाची चर्चा करणं गरजेचं आहे. खरंतर, तत्त्वज्ञ- तत्त्वज्ञेतर फारकतीला मध्यवर्ती स्थान देऊन ‘तत्त्वज्ञेतरांची तत्त्वज्ञानात्मक नेणीव’ (philosophical unconscious), ‘तत्त्वज्ञेतरांचं तत्त्वज्ञान’ या संकल्पनांची चिकित्सक चर्चा विसाव्या शतकातला प्रख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ लुई अल्तुसरनं केली आहे.
तत्त्वज्ञेतर म्हणजे नेमकं काय? कशा प्रकारे तत्त्वज्ञेतर एकाचवेळी तत्त्वज्ञानाविषयी उदासीनता आणि नकळतपणे अनिवार्यता मान्य करतात? कशा प्रकारे तत्त्वज्ञानाची भूक पारंपरिक पद्धतीने भागवली जाते? या सारखे मूलभूत प्रश्न उपस्थित करून अल्तुसरनं ‘तत्त्वज्ञेतरांचं तत्त्वज्ञान’ या नावानं होणाऱ्या विरोधाभासी व्यवहाराचं विचारप्रणालीत्मक (ideological) प्रयोजनसुद्धा अधोरेखित केलं.
आतापर्यंत आपण पाहिलं की प्राचीन (उदा.- ग्रीक) काळी तत्त्वज्ञानाला स्वायत्तता आणि प्रतिष्ठा होती. पण मध्ययुगात तत्त्वज्ञानाला धर्मशास्त्राचं अंकितत्व स्वीकारावं लागलं होतं. जवळपास हजार वर्षांनंतर क्वॉत्रोचेन्तोच्या प्रक्रियेत धर्मशास्त्राचं वर्चस्व झुगारून तत्त्वज्ञानानं हरवलेली स्वायत्तता आणि प्रतिष्ठा परत मिळवून आधुनिकतेला वाट करून दिली. त्यात १७व्या शतकापासून वैज्ञानिक प्रगतीमुळे तत्त्वज्ञानाला समृद्धी प्राप्त झाली. (खरंतर, १९व्या शतकापर्यंत इतर विषयाप्रमाणेच विज्ञानाचा सुद्धा अंतर्भाव तत्त्वज्ञानांतर्गत होत असे. त्यामुळे ज्ञानक्षेत्र कुठलं का असेना आजसुद्धा सर्वोच्च पीएच.डी. पदवीमध्ये ‘फिलॉसफी’ हा शब्द टिकून आहे). पाश्चात्त्य जगात १८व्या शतकात उदयाला आलेल्या आणि नंतर वेगानं विस्तार पावलेल्या ‘पब्लिक स्फिअर’मुळे तत्त्वज्ञानाचं लक्षणीय लोकाभिमुखीकरण झालं.
पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या वाटचालीच्या उपरोक्त मांडणीमुळे कदाचित असा भ्रम निर्माण होऊ शकतो की, समग्र पाश्चात्त्य समाज तत्त्वज्ञानमय होऊन आधुनिकपूर्व तत्त्वज्ञ- तत्त्वज्ञेतर फारकत अस्तित्वात नसावी. पाश्चात्त्यांच्या सलग ६०० वर्षांच्या आधुनिकतेच्या वारशामुळे कथित ‘अनैतिहासिक’ पाश्चात्त्येतरांच्या मनात कदाचित असं चित्र निर्माण होऊ शकतं की, आजच्या घडीला ‘प्रगतिशील’, ‘ऐतिहासिक’ पाश्चात्त्य व्यक्ती पूर्णपणे आधुनिक झाल्या असाव्यात. हे कितपत खरं?
पाश्चात्त्य समाजात फिलॉसफीला सार्वजनिक अवकाशात प्रवेश करून आणि औपचारिक शिक्षणाचा विषय बनून अनेक शतकं उलटली आहेत. त्यामुळे फिलॉसफी हा शब्द सर्वसामान्यांसाठी परिचयाचा झालेला आहे.
पण परिचित असणं म्हणजे उमगलेलं असणं नव्हे. उलट, हेगेल लिहितो, ‘परिचित हे परिचित असतं म्हणूनच उमगलेलं नसतं.’ हे विरोधाभासी विधान तत्त्वज्ञान, मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांना अधिक लागू होतं. कारण या ज्ञानक्षेत्रांमधल्या शब्दांचा संकल्पनात्मक अर्थ आणि दैनंदिन व्यवहारातील अर्थ यातील भेद बऱ्याचदा पुसला जातो. फिलॉसफी या शब्दाविषयी सर्वसामान्यांमध्ये अंतर्विरोधात्मक पवित्रा दिसून येतो, ज्याचं विश्लेषण लुई अल्तुसर Initiation à la philosophie या पुस्तकात करून पाश्चात्त्य समाजातलं तत्त्वज्ञानाचं बंदिस्त विश्व आणि तत्त्वज्ञेतरांचं ‘उत्स्फूर्त’, ‘वैयक्तिक’ विश्व यांतला फारकत अधोरेखित करतो.
अल्तुसर नमूद करतो की, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणं म्हणजे अस्तित्वात असलेल्या सिद्धान्तांचं पाठांतर आणि पुनरावृत्ती करून त्यांना श्रद्धेचा विषय बनवणं नसून त्यांची स्वायत्तपणे चिकित्सा करणं होय. अस्तित्वात असलेल्या ज्ञानपरंपरेला मुळापासून प्रश्नांकित करून चिकित्सा करणारी क्रिटिकल परंपरा आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचं प्रमुख लक्षण राहिलं आहे. याच परंपरेला अनुसरून भौतिकवादी अल्तुसर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या चिद्वादी मांडणीला छेद देऊन तत्त्वज्ञानाच्या द्वंद्वात्मक वाटचालीवर बोट ठेवतो.
दीर्घकाळ तत्त्वज्ञानाचं अध्यापन केलेल्या अल्तुसरचं पद्धतीशास्त्र त्याच्या प्रॅक्सिसची परिणती आहे ज्यात तत्त्ववेत्त्यांच्या विश्वात शिरण्याआधी तथाकथित तत्त्वज्ञेतरांच्या तत्त्वज्ञानविषयक धारणांना प्राथमिकता दिली आहे. त्याच्या प्रयोगशील पद्धतिशास्त्राची सुरुवात ‘तत्त्वज्ञान म्हणजे काय?’ या मूलभूत प्रश्नानं होते. अल्तुसर तत्त्वज्ञेतरांना तीन वर्गात विभागून पहिल्या वर्गात कामगार, शेतकरी, तत्सम कर्मचारीसारख्या सर्वसामान्यांचा समावेश करतो ज्यांचा औपचारिक पद्धतीने तत्त्वज्ञानाशी संबंध आलेला नसतो. त्यांना तत्त्वज्ञान म्हणजे काय हा प्रश्न विचारल्यावर त्यांच्या खालील प्रतिक्रिया येतात: ‘आमच्या सारख्यांचा तत्त्वज्ञानाशी काय संबंध? तत्त्वज्ञान वगैरे इंटलेक्च्युअल लोकांचं काम!’
दुसऱ्या वर्गातल्या डॉक्टर, इंजिनीअर, अधिकारीसारख्या उच्चशिक्षित लोकांना हाच प्रश्न विचारला तर त्यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया खालीलप्रमाणे येतात: ‘हो, बाकालोरिआ करताना तत्त्वज्ञान विषय होता. तेवढ्यापुरता थोडा परिचय झाला. पण सगळं फारच दुर्बोध आणि अॅब्स्ट्रॅक्ट होतं. आता फारसं आठवत नाही. तसा तत्त्वज्ञानाचा दैनंदिन व्यावहारिक जगण्याशी काय संबंध!’
अल्तुसर तिसऱ्या वर्गात अशा तुरळक लोकांचा समावेश करतो ज्यांना एकेकाळी तत्त्वज्ञानाची आवड असते. दुर्दैवानं नोकरी, कुटुंब वगैरेमध्ये वेळ मिळाला नाही म्हणून त्यांना आपल्या आवडत्या विषयाशी संपर्क ठेवता आला नाही, अशी ते खंत व्यक्त करतात. तत्त्वज्ञानाविषयक पवित्रा मांडताना या स्वयंघोषित तत्त्वज्ञेतरांना जर विचारले की तुमच्या दृष्टीनं तत्त्वज्ञ कोण असतात? तर ते म्हणतात तत्त्वज्ञानाचे प्रोफेसर.
मध्ययुगीन समीकरण बाद
यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पाश्चात्त्य परंपरेत सर्वसामान्यांच्या नजरेत ‘तत्त्वज्ञान म्हणजे धर्मशास्त्र’ हा मध्ययुगीन संबंध निर्णायकपणे संपुष्टात येऊन तत्त्वज्ञान म्हणजे विद्यापीठांमध्ये अध्यापन करणाऱ्या ‘व्यावसायिक- तत्त्वज्ञां’ची मक्तेदारी अशी धारणा प्रस्थापित झाली आहे. (भारतात आजसुद्धा तत्त्वज्ञान म्हणजे धार्मिक परलोकवादी वस्तू असा संबंध दिसण्याचीच दाट शक्यता आहे!)
दुसऱ्या टप्प्यात अल्तुसर स्वत:ला तत्त्वज्ञेतर समजणाऱ्यांच्या प्रतिक्रियांचं विश्लेषण करून त्यांच्या धारणांमधील विसंगती आणि अंतर्विरोध उघड करतो. एका बाजूला ते म्हणतात की ‘छे:! छे:! तत्त्वज्ञान वगैरे आपलं काम नाही!’ दुसऱ्या बाजूला मात्र तत्त्वज्ञानाविषयक ठाम नकारात्मक मतं मांडताना आढळतात. त्यांच्याशी मुक्त संवाद सुरू ठेवल्यावर हळूहळू लक्षात येतं की सुरुवातीचा संकोच बाजूला सारत ते त्यांच्या नकारात्मक, अभावरूप धारणांपलीकडे जाऊन तत्त्वज्ञानाविषयक भावरूप गोष्टी मांडू लागतात.
शेवटी ते मान्य करतात की त्यांचंदेखील स्वत:चं एक वैयक्तिक आणि उत्स्फूर्त तत्त्वज्ञान आहे. म्हणजे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, जगण्याची पद्धत आहे. किंवा आजच्या भाषेत म्हणायचं झालं जीवन तर जगण्याचा फंडा आहे. त्यांच्यापैकी काही तपशिलात जाऊन सांगतात की जीवनात काही गोष्टी प्रत्यक्ष अनुभवलेल्या असतात तर अनेक अनुभवलेल्या नसतात आणि विश्वोत्पत्ती, मृत्यू, धर्म, राजकारण, कलासारख्या क्षेत्रातल्या असंख्य गोष्टी अनुभवातीत राहतात. तरीसुद्धा या सगळ्या ज्ञात/अज्ञात, ज्ञेय/अज्ञेय गोष्टींचं मिश्रण करून प्रत्येकजण एक चित्र तयार करत असतो जे त्याचं वैयक्तिक, नैसर्गिक आणि शीघ्र तत्त्वज्ञान असतं.
थोडक्यात, तत्त्वज्ञेतरांनी दिलेल्या अंतर्विरोधात्मक प्रतिक्रियांची चिकित्सा केल्यावर ठरावीक प्रश्नसंच ( problé matique) दिसतो. ‘ईश्वराचं अस्तित्व’, ‘आत्म्याचं अमरत्व’, ‘जगाची सुरुवात’, ‘सुखी जीवन’सारख्या आदिम गोष्टी तत्त्वज्ञेतरांच्या तत्त्वज्ञानात्मक नेणिवेला प्रभावित करत असतात ज्यांचा सखोलपणे विचार करण्यासाठी सगळ्यांकडे वरकड क्षण नसतात.
अल्तुसर म्हणतो की प्रातिनिधिक तत्त्वज्ञेतरांना जर प्रश्न विचारला की या तुमच्या तत्त्वज्ञानाचा उपयोग तरी काय? तर तो आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर म्हणेल की जगण्याला दिशा दाखवण्याचं माझं स्वत:चं जीपीएस. अशा प्रकारे स्वयंघोषित तत्त्वज्ञेतर स्वत:चं तत्त्वज्ञान मांडून तत्त्वज्ञानाच्या निरर्थकतेपासून उपयुक्ततेपर्यंत येऊन पोहोचतात. तत्त्वज्ञेतर आपल्या तथाकथित वैयक्तिक आणि नैसर्गिक तत्त्वज्ञानाचे तपशील देतात; पण त्यांच्या नियामक तत्त्वापर्यंत पोहोचत नाहीत. कारण ते त्यांचं नसतं म्हणून त्यांच्यासाठी अदृश्य असतं! त्याअर्थी तत्त्वज्ञान म्हणजे फक्त विखुरलेले, गतिशील, चंचल तपशील नव्हेत तर जगण्यातील तपशिलांची व्यवस्था लावणारं आणि नियंत्रित करणारं नियामक तत्त्व जे सहजासहजी स्वयंघोषित तत्त्वज्ञेतरांनी स्वत: घडवलेलं नसून नकळत आत्मसात केलं असतं, याचाच अल्तुसर philosophical unconscious अर्थात तत्त्वज्ञेतरांची तत्त्वज्ञानात्मक नेणीव असा उल्लेख करतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका विशिष्ट सामाजिक अवकाशामधल्या तत्त्वज्ञेतरांच्या वैयक्तिक, नैसर्गिक आणि शीघ्र तत्त्वज्ञानांचा एकत्रितपणे विचार केला तर असं दिसून येतं की ते फक्त वरवरच्या तपशिलांबाबतीत वैयक्तिक आणि उत्स्फूर्त असतात. त्या तपशिलांची व्यवस्था लावणाऱ्या आणि नियंत्रित करणाऱ्या नियामक तत्त्वाच्या बाबतीत ते वैयक्तिक नसून अवैयक्तिक अर्थात सामूहिक असतात. हे व्यवस्था लावणारं, नियंत्रित करणारं आणि दिशा देणारं पण तत्त्वज्ञेतरांसाठी अदृश्य राहणारं तत्त्व किंवा philosophical unconscious येतं कुठून? त्याचा तत्त्वज्ञानातल्या विविध प्रवाहाशी काय संबंध आहे? या प्रश्नांचा विचार पुन्हा कधीतरी…
(जेएनयुतील अध्यापक)
sharadcrosshuma@gmail.com
[ सदर समाप्त]
