जंगलं कापल्याशिवाय, डोंगर पोखरल्याशिवाय, सिमेंट ओतल्याशिवाय, कोट्यवधी रुपयांची कंत्राटं काढल्याशिवाय आणि मुख्य म्हणजे कोणते ना कोणते विक्रम नोंदवल्याशिवाय विकास काही साध्य होऊच शकत नाही, यावर ठाम विश्वास असणार्यांचा हा काळ. आज रस्त्यांच्या लांबी-रुंदी-उपयुक्ततेपेक्षा अधिक चर्चा होते ती त्यांच्यावर उधळल्या जाणार्या निधीची. अशा काळात दोन खेड्यांना जोडणारे, स्वस्त-टिकाऊ पूल उभारणार्याचा मृत्यू हा फारसा चर्चेचा विषय न ठरणं स्वाभाविकच. पण या पुलांमुळे ज्यांचे प्राण वाचले असतील, ज्यांना आपलं शिक्षण पूर्ण करता आलं असेल आणि ज्यांच्यासाठी बाजारपेठेचं गाव काही किलोमीटरने जवळ आलं असेल, ते सर्वजण आज ‘सेतुबंधू’ गिरीश भारद्वाज यांच्या स्मृतींना नक्कीच उजाळा देत असतील.
भारद्वाज खरे तर मेकॅनिकल इंजिनीअर. मैसूर विद्यापीठाचे पदवीधर. शिक्षणानंतर सरकारी नोकरीत चिकटण्याचा त्यांचा विचार वडिलांनी हाणून पाडला. आपल्या गावातल्या शेतकर्यांचं खडतर जीवन सुसह्य करता आलं नाही, तर मिळवलेल्या ज्ञानाचा काय उपयोग, हा त्यांचा प्रश्न गिरीश यांना पटला. त्यांनी १९७३ मध्ये काही मित्रांच्या मदतीने गावात एक कृषी सेवा केंद्र सुरू केलं आणि दोन वर्षांनी ‘रॅशनल इंजिनीअरिंग इंडस्ट्रीज’ नावाची स्वत:ची कंपनी स्थापन केली. सिंचनासाठीचे पंप आणि गोबर गॅस संयंत्रांशी संबंधित काम या कंपनीत केलं जात असे.
त्यांचं मूळ गाव म्हणजे कर्नाटकातलं अरंम्बूर. पावसाळ्यात नदीला येणार्या पुरामुळे पलीकडच्या तटाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटत असे, त्यामुळे गावकर्यांना झुलता पूल बांधून हवा होता. ते भारद्वाज यांच्याकडे आले, पण ते मेकॅनिकल इंजिनीअर. सिव्हिल इंजिनीअरिंगचा काहीच अनुभव नव्हता. हातावर हात घेऊन बसण्यापेक्षा प्रयत्न करून पाहू या या विचाराने ते मंगळूरुला गेले. तिथून पूल बांधणी संदर्भातली पुस्तकं खरेदी केली. काही काळ त्यांचा अभ्यास केला. निसर्गाचं फारसं नुकसान न करता भक्कम झुलता पूल बांधण्यासाठी कशी रचना करता येईल, कोणतं साहित्य वापरता येईल यावर मंथन केलं आणि लोकवर्गणीतून पूल बांधण्याचं काम १९८९मध्ये हाती घेतलं. अवघ्या काही महिन्यांत झुलता पूल वापरासाठी तयार झाला.
आपल्या गावातला हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी कर्नाटकातल्या अन्यही गावांना असे पूल बांधून देण्यास सुरुवात केली. पुढे केरळ, तेलंगणा, ओदिशात अशाच पुलांची उभारणी केली. आज त्यांनी उभारलेल्या पुलांची संख्या १४०च्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन ते सहा महिन्यांत आणि अतिशय कमी खर्चात उभारलेले हे पूल कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय पूर्ण करण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक लांबीचा २३० मीटरचा पूल कर्नाटकातील आहेत. भारद्वाज यांनी बांधलेल्या पुलांमुळे केवळ दोन गावं वा वस्त्या जोडल्या गेल्या नाहीत तर अनेक विद्यार्थ्यांचे पावसाळ्यातील हाल लक्षणीयरीत्या कमी झाले. रुग्ण, विशेषत: गर्भवतींना वेळीच उपचार मिळू लागले. शेतकर्यांना पावसाळ्यातही आपली उत्पादनं आजुबाजूच्या बाजारात सहज विकता येऊ लागली.
अशा पुलांची गरज सामान्यपणे दुर्गम खेड्यांतच असे. तिथे इंटरनेटची सुविधा नसणे, वन्य प्राण्यांचा धोका, माओवाद्यांचीही भीती असे अनेक अडथळे असत, पण भारद्वाज यांची कार्यशैली अशी की पूल बांधणार्या कामगारांबरोबर तेसुद्धा तीन-चार महिने कामाच्या ठिकाणीच तंबूूत राहात. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना २०१७ साली पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्यांचा वारसा आता त्यांचा मुलगा पतंजली भारद्वाज पुढे नेत आहे.
