प्राग हे मुळात चालणार्यांचं शहर. ते त्यांनी असं ठेवलंय की ते आपोआप चालवतं. हे काय समोर… तिथं जाऊन बघू या… असं म्हणत म्हणत आपण सहज पाच-दहा किलोमीटर तुडवलेले असतात. आकार आणि सौंदर्य यांचं गुणोत्तर बर्याचदा जरा व्यस्तच असतं. म्हणूनच बहुधा ‘स्मॉल इज ब्यूटिफुल’ असा वाक्प्रचार वापरात आला असावा. अर्थात हा काही विज्ञानाचा नियम नाही. त्यामुळे या विधानाचा व्यत्यास खरा असू शकतो आणि वैज्ञानिक नसलेल्या नियमाला पर्यायही तसे असू शकतात. शहराचा विचार केला तर प्राग या नियमाला ठणठणीत अपवाद. हे शहर दणदणीत मोठं आहे. आणि तरीही कमालीचं सुंदर आहे. आकार आणि सौंदर्य यांचं गुणोत्तर राखणं जगातल्या अनेक शहरांना जमलेलं नाही, हे स्वानुभवावरनं ठामपणे सांगू शकतो. प्राग अतिशय अतिशय सुंदर. कोणत्याच मुद्द्यावर मुंबईशी या युरोपीय शहराची बरोबरी होऊच शकत नाही. किंवा करायची झाली तर मुंबईतला हुतात्मा चौक परिसर समजा तिकडे दहिसरपर्यंत आणि इकडे मुलुंडपर्यंत पसरवला तर शहर कसं दिसेल… तसं प्राग!
कुठंही आकार वाढल्यावर येणारा बेढबपणा गुंजभरही नाही. मध्य भागात जुने दगडी रस्ते. अत्यंत अरुंद. पुणेकरांना तर तुळशीच्या बागेची आठवण येईल. पण ती तितकीच. कारण प्रागमध्ये त्यातनं ट्राम जाते. तशी खडखड करत. मध्य प्रागमध्ये एक बोळ तर इतका अरुंद आहे की त्यात शिरताना ट्राम वरती घासणार आणि वळणावर दोन-चार गाड्यांना धडकणार असंच आपल्याला वाटतं. तसाच आपला अनुभव. पण तिथं तसं काहीही होत नाही. दोन्ही बाजूला गच्च गर्दीची दुकानं. अतिशयोक्तीच करायची तर रस्त्यावरच्या या बाजूच्या दुकानात पैसे द्यायची वेळ आली तर त्या बाजूच्या दुकानात उभं राहूनही ते देता येतील इतकी जवळीक रस्त्याच्या या दोन बाजूंत. आणि मधून ट्राम. टंग टंग घंटा वाजवत येते-जाते. ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यातनं एखाद्या तरुणीनं अलगद वाट काढावी तशी ती ट्राम जुन्या प्रागमध्ये सुखेनैव हिंडत असते. ते दृश्य बघण्यात तास-दोन तास सहज जातील इतकं ते सुंदर.
खरं म्हणजे प्रागमध्ये काय सुंदर नाही, हाच प्रश्न. युरोपातली शहरं सगळीच तशी सुंदर. पण त्यातही नवं शहर, जुनं शहर यांचा पोत वेगळा असतो. प्रागमध्ये सगळं कसं एकसारखं. जुनंही नवं आणि नवंही जुन्यासारखं. संपूर्ण शहरभर, महत्त्वाच्या रस्त्यांवरच्या सगळ्या इमारती एकसारख्या, एकाच उंचीच्या. शाळेच्या मैदानावर कवायतीच्या वेळेला सगळे कसे एकाला एक खेटून उभे राहतात तशा या इमारती. आणि त्यांचे रंग? जराही डोळ्यात घुसत नाहीत. खुपत नाहीत. सगळ्या शहरभरच्या इमारती पेस्टल कलरने रंगलेल्या. आइस्क्रीमवाल्याकडे काचेच्या कपाटात मंद रंगातली आइस्क्रीम्स कशी लावून ठेवलेली असतात, तशा त्या दिसतात. एक डाग नाही… शोध शोध शोधलं. दिसला नाही कुठं. स्थानिक नगरपालिकाच सगळ्या इमारतींना कळवत असावी बहुधा कोणी कोणता रंग लावायचा ते. आणि तसं सांगितल्यावर त्या इमारतीतले रहिवासीही ऐकत असणार, हे ओघानं आलंच.
या शहरात काय सुंदर नाही, असा प्रश्न पडतो. खरं तर तो हे शहर इतकं सुंदर कसं असा असतो. वास्तविक ऑ्ट्रिरयातलं व्हिएन्ना यापेक्षाही सुंदर असेल. पण त्याचं सौंदर्य वेगळं. व्हिएन्नाच्या सौंदर्याचा एक दरारा आहे. त्या शहरात सतत आपल्यामुळे काही तडा तर नाही जाणार या सौंदर्याला अशी चिंता असते. त्यात परत मोझार्ट, शुबर्ट, बिथोव्हेन वगैरे महारथी त्या गावचे. त्याचंही दडपण. प्रागमध्ये असं काही नाही. सगळे तुमच्या-आमच्यासारखे. आणि तरीही हे शहर सुंदर राहतं याचं जास्त अप्रूप. आणि मोठेपणही.
गावातनं मधनं एक नदी वाहते. घाटदार आणि मुसमुसलेली. तिच्यावर अर्धा डझन तरी पूल असतील. प्रत्येक पुलाची गंमत वेगळी. तिथनं दिसणारी नदीची कमनीयता वेगळी. त्या पुलाच्या दोनही बाजूंना चांगले, निरोगी फुटपाथ. सोबतीला झाडं. म्हणजे या पुलापासनं त्या पुलापर्यंत चालत जायचं म्हटलं तरी जाता येतं. खरं तर तसंच जायला हवं. कारण प्राग हे मुळात चालणार्यांचं शहर. ते त्यांनी असं ठेवलंय की ते आपोआप चालवतं. हे काय समोर… तिथं जाऊन बघू या… असं म्हणत म्हणत आपण सहज पाच-दहा किलोमीटर तुडवलेले असतात. पायाकडून तसा संदेश येतो… आणि मग समोरचा कॅफे पुढचं काम करतो.
या सगळ्या पुलात एका पुलाचा मान जरा जास्तच. चार्ल्स ब्रिज. अर्थात आहेही तो तसाच. आम्ही दुपारी या पुलावर गेलो आणि त्यावर पाऊल टाकण्याआधीच तिथल्या सुरावटीनं पाय थांबवले. पुलाच्या एका टोकाला एक जण सॅक्सोफोन वाजवत होतो. डोळे बंद. छान तंद्री लागलेली. समोर कोण किती पैसे टाकतायत आणि मुळात टाकतायत की नाही याचा कसलाही विचार नाही. हे अवघड वाद्य. ढगाळ वातावरण, पावसाची हूल देणारा हलका गार वारा, सगळ्या माहोलावर समान-सॉफ्ट प्रकाश आणि त्याची ही सुरावट. आतमध्ये काही तरी कालवाकालव करणारी…
या पुलाचं नाव चार्ल्स ब्रिज कारण तो सम्राट चार्ल्सनं बांधला. त्याचीही गंमत आहे. या सम्राटाला संख्यांशी खेळण्याचा छंद होता. कोणी भेटलं की सहा अधिक दोन, एक अधिक सात… वगैरे असं काय काय तो करायचा. तर त्यानं हा पूल बांधायचा निर्णय घेतला तेव्हा मुहूर्त काढला पहाटे ५.३१ असा. म्हणजे बरोब्बर पाच वाजून ३१ व्या मिनिटाला कुदळीचा घाव घालायचा म्हणजे घालायचा असा त्याचा आदेश. तो स्वत: त्यासाठी तिथं हजर राहिला. आणि वेळ ही का निवडली त्यानं? कारण त्या पुलाच्या बांधकामाची सुरुवात ज्या दिवशी होणार होती ती तारीख होती ९ जुलै १३५७. त्यामुळे त्या पुलाच्या शिलालेखावर त्याची नोंद झाली १३५७९७५३१ (१३५७ मध्ये ९ जुलै रोजी पहाटे ५:३१). हे फारच भारी. पण त्याहूनही भारी म्हणजे या पुलाचं बांधकाम. जवळपास ७०० वर्षं जुना आहे हा पूल. पण अजूनही आहे होता तस्सा. अगदी पिळदार. तो बांधणार्या सम्राटाला हे असं आकड्यांशी खेळणं आवडत असेलही; पण त्यानं केलेल्या कामाचा दर्जा वादातीत आहे. आपल्यातल्या या छांदिक भावनेला त्यानं कधी बुद्धीवर मात करू दिली नाही, हे किती कौतुकास्पद. अर्थात मुळातच तो बुद्धिमान होता ही बाब आहेच. असो.
प्रागची आणखी एक गंमत. युरोपमधल्या इतक्या शहरात हिंडलोय, पण हे कुठं दिसलं नाही. अगदी औषधाची दुकानं वाटावीत अशी ही दुकानं. छान सजवलेली. काचेचे दरवाजे. आणि त्या दरवाजांवर किंवा कडेला झाडाचं एक पंजासारखं भलंथोरलं पान. वरवर पाहिलं तर मेपल वृक्षाचं वाटेल काहींना. पण ते त्या झाडाचं नाही. ते कसलं आहे याचा खुलासा शेजारचे शब्द करतात. ते असतात ‘कॅनबीज शॉप’. म्हणजे शुद्ध भांग. मला एकदम वाराणसी वगैरेची आठवण झाली. तिथं असते ‘सरकारमान्य भांग की दुकान’. गेलो एका दुकानात. सोनाराकडे असतो तसा छोटा तराजू. दोन-पाच ग्राम वगैरे अशी ती विकतात. परत भांगेचे विविध प्रकार आहेत. चटण्या. लोणची. पेयं वगैरे. खरेदी करणार्यांचा कसलाही चोरटेपणा नाही. एखादं सिगारेटचं पाकीट घ्यावं तसं लोक कॅनबीज घेत होते. असो. म्हणजे असोच.
गदिमांच्या ‘जोगिया’त ओळ आहे… ‘भांगेत पेरूनी तुळस परतला शाम…’. तिच्यावरच समाधान मानलं आणि दुकानातनं बाहेर आलो. (क्रमश:)
