ज्या अमेरिकेत एपस्टीन-कांड घडले, त्याच देशात १९६३ पर्यंत ‘प्लेबॉय क्लब्ज’बद्दल भारी कौतुकाने लिहिले जात असे. सुशिक्षित घरांतल्या टंच तरुणी या क्लबांत सेविका म्हणून ‘स्वेच्छेने’ काम करतात, त्यांना पैसेही मिळतात आणि समाजातील बड्या लोकांशी (म्हणजे पुरुषांशीच) ओळख वाढवता येते, काहीजण तर अगदी आपल्या पत्नीसह येतात… असा एकंदर या कौतुकाचा सूर. त्याचा फुगा ग्लोरिया स्टाइनम यांनी फोडला.
पत्रकार ही ओळख लपवून एका ‘प्लेबॉय क्लबा’त त्यांनी काम मिळवले आणि तिथल्या सेविकांच्या ‘स्वेच्छे’मागे कोणत्या अगतिकता असतात, ‘सपत्नीक गिर्हाइकां’च्या पत्नी इथे कशा गोंधळतात आणि ‘ओळख वाढवल्यानंतर’ बड्यांना जे काही हवे असते ते टाळणार कसे हा प्रश्न इथल्या प्रत्येक सेविकेपुढे असतो, हे २९ वर्षांच्या ग्लोरिया यांनी चव्हाट्यावर आणले.
हा लेख छापणार्या नियतकालिकासह ग्लोरियांवरही बदनामीचा खटला प्लेबॉयने गुदरला आणि ‘स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी वावदूकपणे लिहितात या नवख्या पत्रकार मुली’ अशी बोळवण तेव्हाच्या प्रथितयश (म्हणजे पुरुषच) पत्रकारांनी केली. ‘लोकसत्ता’मधील ‘बुकमार्क’ पानावर ग्लोरियांना आदरांजली वाहणार्या मजकुरात (५ सप्टेंबर) उल्लेख झालेली उपेक्षा ती हीच. या ग्लोरिया पुढे महत्त्वाच्या स्त्रीवादी लेखिका- पत्रकार- संपादक म्हणून ओळखल्या गेल्या आणि कार्यालयात होणारा लैंगिक छळ, गर्भपाताच्या पर्यायासह स्त्रीचाच तिच्या प्रजननक्षमतेवर हक्क, राजकारण/ नोकरशाहीत महिलांचा टक्का असे विषय त्यांनी १९८० च्या दशकापर्यंत जोरकसपणे मांडले.
नव्वदीतही घरातच ‘ग्लोरिया फाउंडेशन’ स्थापून महिलांकृसाठी ‘बोलत्या व्हा’ उपक्रमाला जागा देणार्या ग्लोरिया २ सप्टेंबर रोजी निवर्तल्या. भारतात १९५७ ते ५८ त्या अभ्यासवृत्ती मिळवून आल्या. दिल्लीच्या ‘मिरांडा हाउस’ महाविद्यालयात प्रवेश घेऊन त्यांनी गांधीवादाविषयीचे कुतूहल स्वत:पुरते शमवले. अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या महिलांना तेव्हाच्या (१९६५ आधीच्या, म्हणजे अमेरिकेत मतदानाचा हक्क सार्वत्रिक नसताच्या) स्त्रीवादी चळवळीतही स्थान नव्हते, यासाठी गौरवर्णीय ग्लोरियांनी गौरेतर महिलेसह भाषणे दिली. ग्लोरिया यांनी लग्न केले, पण ते वयाच्या ६६ व्या वर्षी. ‘लग्न ही नवी सुरुवात वगैरे नसून तो स्वतंत्र अस्तित्वाचा शेवटच’ असे त्यांचे मत होते.
बेटी फ्रीडन व अन्य अनेकींसह ‘नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर विमेन’, पुढे अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहात महिला हक्कांसाठी खासदार-गट अशा संस्थात्मीकरणात त्या पुढे होत्या. पुढे क्लिंटन दाम्पत्याच्या मैत्रीपायी, मोनिका ल्युइन्स्की प्रकरणी बिल क्लिंटन यांचे समर्थन करून त्यांनी स्वत:च्या स्खलनशीलतेचेही दर्शन घडवले.
अस्थिर बालपणातून आलेला मनस्वीपणा, आजारी आईच्या सेवेमुळे आलेली संवेदनशीलता यांची जोड त्यांच्या पत्रकारितेला होती. ‘एमएस’ या मासिकाचा खप ५.४० लाखांवरून दोन लाखांवर आल्याने ते बंद केले जाऊ नये म्हणून पैसा उभारण्याची धमकही होती. पण लक्षात राहातील त्या, ‘चाळिशीच्या अजिबात वाटत नाही हं तुम्ही’ यासारखी दादही स्त्रीला वस्तूकरणाचीच याद देत असते, यासारखे अव्यक्त अन्याय नेमके पकडणार्या ग्लोरिया!
