वर्ष असेल साधारण १९६१-६२चं. अमेरिकेतल्या एका प्लेबॉय क्लबने जाहिरात केली होती- आकर्षक तरुणी हव्या आहेत. एका २८ वर्षांच्या मुलीने अर्ज केला. मॉडेल होण्यासाठी तिने अल्पावधीत चार-पाच किलो वजन कमी केलं. अत्यंत घट्ट आणि तोकड्या कपड्यांत, उंच टाचांची पादत्राणं घालून चालणं तिच्यासाठी फार कठीण होतं. पण तिने निभावून नेलं. तब्बल ११ दिवस ती मॉडेल म्हणून वावरली आणि त्यानंतर त्या अनुभवांवर आधारित एक सविस्तर वृत्तांत लिहिला.  मॉडेलिंगच्या ग्लॅमरस जगात मुलींच आयुष्य कसं काळवंडून जातं, याचा तो स्वानुभवाधारित दस्तावेज होता.

तरुणींच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषणाचे खणखणीत पुरावेच तिने या वृत्तांतातून मांडले होते. ती होती तरुण पत्रकार ग्लोरिया स्टाइनम. ‘एक्सपोज’ शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला तिचा हा वृत्तांत हे शोधपत्रकारितेचं हा एक उत्तम उदाहरण होतं, पण प्रत्यक्षात याचं बक्षिस मिळण्याऐवजी तिला प्रदीर्घकाळ शिक्षाच भोगावी लागली. तिच्यावर ‘प्रिटी गर्ल’चा शिक्का बसला.

आम्ही गंभीर पत्रकारिता करतो, अशा ‘बनी गर्ल्स’ आम्हाला नकोत म्हणत वृत्तपत्र, मासिकांनी ग्लोरियाच्या नावावर काट मारली. कुठून बुद्धी सुचली आणि या विषयावर वार्तांकन केलं, असं ग्लोरियाला वाटू लागलं होतं. पण या बहिष्कारात तिच्यातला स्त्रीवाद निष्प्रभ करण्याएवढी क्षमता नव्हती. आता या घटनेला ६०-६५ वर्षं लोटली. ग्लोरिया यांचं नुकतंच निधन झालं, पण ‘स्त्रीवादाच्या दुसर्‍या लाटेचा चेहरा’ ही त्यांची ओळख इतिहासात कायमची नोंदवली गेली.

त्यांच्यातल्या स्त्रीवादाचं मूळ त्यांच्या समस्यांनी ग्रासलेल्या बालपणात असावं. घटस्फोट, एकल पालकत्व, मानसिक आजार आणि नोकरीतील स्त्री-पुरुष भेदभाव अशा अनेक पातळ्यांवर झुंजणार्‍या आईला पाहण्यात गेलेली वाढीची वर्षं आणि वुमन्स लिबरल आर्ट कॉलेजमधलं शिक्षण यातून त्यांच्यातल्या स्त्रीवादी जाणिवा अधिक टोकदार होत गेल्या असाव्यात. शिक्षणानंतर काही काळ त्या पाठ्यवृत्तीवर भारतात राहिल्या. या काळात गांधींच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला.

अमेरिकेत परतल्यावर त्यांनी काही काळ ‘इंडिपेंडेंट रिसर्च स्व्हिहस’च्या संचालक म्हणून काम केलं. ही सीआयएशी संलग्न संस्था होती आणि व्हिएन्ना व हेलसिंकी येथील सोव्हिएत-नियंत्रित जागतिक युवा महोत्सवांमध्ये व्यत्यय आणण्यासाठी अमेरिकी विद्यार्थ्यांची भरती करण्याचं काम ही संस्था करत असे. मात्र त्यानंतर त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला.

गर्भपात या मुद्द्यावर त्यांचं लेखन व्यापक चर्चेचा कारण ठरलं होतं. ग्रिनविचमध्ये गर्भपातासंदर्भातील अनुभव मांडण्यासाठी एक सभा घेण्यात आली होती. त्यात एकूण १२ महिलांनी आपल्याला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा अनुभव सांगितला होता. त्या सभेमुळे आपल्या २२व्या वर्षी केलेल्या गर्भपाताच्या कटूस्मृती जाग्या झाल्याचं त्यांनी आपल्या ‘माय लाइफ ऑन द रोड्स’ या पुस्तकात नमूद केलं होतं.

त्यांनी १९७१मध्ये डोरोथी पिटमन ह्यूजेस यांच्यासह ‘मिस’ हे मासिक सुरू केलं. या मासिकाने महिला म्हणजे सौंदर्य, नजाकत वगैरे साचे मोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर चित्र होतं वंडरवुमनचं. डीसी कॉमिक्समध्ये तेव्हा वंडरवुमनने तिच्या प्रियकरासोबत राहण्यासाठी आपल्या सुपरपॉवर्सचा त्याग केल्याचं कथानक मांडण्यात आलं होतं. तिला तिच्या सुपरपॉवर्स परत देण्यात याव्यात, बाईने पुरुषासाठी तिचं स्वत्व त्यागण्याची काहीच गरज नाही, असा विचार त्यातून मांडण्यात आला. या मासिकातला ‘इफ मेन कुड मेन्स्ट्रुएट’ हा लेख चर्चेचा आणि वादाचाही विषय ठरला होता.

‘आउटरेजस ॲक्ट अँड एव्हरीडे रिबेलियन’, ‘मुव्हिंग बियाँड वर्ड्स’, ‘द ट्रुथ विल सेट यू फ्री बट फर्स्ट इट विल पिस यू ऑफ’, ‘ॲन अनएक्स्पेक्टेड लाइफ’ या पुस्तकांतून ग्लोरिया यांनी महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली. भारतातील आपल्या फेलोशिपच्या काळात आलेल्या अनुभवांवर आधारित ‘द थाउजंड इंडियाज’ हे पुस्तक त्यांनी लिहिलं. अमेरिकेतील विद्यार्थ्यांना भारतात येण्यास प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल, याविषयीच्या सूचना त्यात केल्या होत्या.  त्यांनी कौटुंबिक हिंसाचार, अश्लील साहित्याचा उद्योग आणि व्हिएतनाम व आखाती युद्धं, ‘ब्लॅक लाइव्हज मॅटर’, कोरियाचं एकत्रीकरण, महिलांचे प्रजननविषयक अधिकार, एलजीबीटीक्यू-प्लस वर्गाचे अधिकार अशा याविषयांवर विपुल लेखन केलं.

१९८४ मध्ये, वॉशिंग्टन डीसी येथील दक्षिण आफ्रिकेच्या दूतावासाबाहेर वर्णभेदाविरुद्ध निदर्शने करत असताना त्यांना अटक करण्यात आली होती. ग्लोरिया यांच्या प्रवासाला आता पूर्णविराम मिळाला असला, तरीही साठच्या दशकापासून आजवरच्या विविध टप्प्यांवर स्त्रीवादाला दिशा देण्यात त्यांचं योगदान मोलाचं ठरलं, हे निश्चित!